Wednesday, February 11, 2015

चला बालपण जगू या ........

चला बालपण जगू या ........
               खरे तर बालपणाचा काळ,रम्य सुखाचाअसे म्हटले जाते.सर्वसाधारणपणे बहुसंख्य लोकांचा
बालपणीचा काळ लाडाकोडात व आनंदात गेलेला असतो
      पण सर्वांचे बालपण तसे रम्य असेलच असे म्हणता येत नाही! अती डोंगराळ भागातील खेड्यामधल्या अल्पभूधारक शेतकरी/शेतमजूर कुटुंबातला जन्म,  त्यामुळे अगदी न कळत्या वयातही पालकांची आपल्या लहानग्यांच्या तोंडात चार घास कसे पडतील यासाठी चाललेली धडपड पहातच बालपण गेलेलेत्यामुळे बालपणीच्या आठवणीतले रम्य क्षण आठवू म्हटले तरी फार काही हाती लागत नाही! 
       आर्थिक परिस्थिती अत्यंत गरीबीची असली तरी मनाची अतोनात श्रीमंती लाभलेल्या आईवडिलांच्या पोटी जन्म मिळणे म्हणजे भाग्यच की! आई व वडील दोघेही अक्षरशत्रू! सहीच्या वेळी हाताचा डावा अंगठा पुढे करणारे! पण आपली मुले शिकायला हवीत,ती आपल्या हिमतीवर शिकून मोठी व्हावीत,त्यांनी आपल्या पायावर खंबीरपणे उभे राहून गरीबीचा कलंक पुसला जावा, म्हणून कितीही कष्ट पडले तरी ते करण्याची त्यांची तयारी! आणि ही धडपड पहातच लहानाचा मोठा होत असलेला मी! पण त्या वयातच एक सत्य समजलेलं-
जसं जमेल तसं शिकून लवकरात लवकर  स्वत:च्या पायावर  उभं रहाण्याला पर्याय नाही!’.पालकांच्या या ध्यासाला साथ देत अगदी पहिलीपासून ते शालांत परीक्षेपर्यंत पहिल्या क्रमांकाने उतीर्ण होत राहिलो.प्रत्येक वर्गाच्या परीक्षेचा रिझल्ट आल्यावर आईवडिलांच्या डोळ्यातले अपेक्षापूर्तीच्या आनंदाने अनावर झालेले,पण प्रयत्नपूर्वक लपवलेले आनंदाश्रूयापेक्षा रम्य आठवण ती काय असू शकेल! त्यातूनही एक हृद्य आठवण सांगायला हरकत नाही-
                  सातवीत असतानाची गोष्ट आहे,दर अमावास्येच्या दिवशी ग्रामदेवता भैरवनाथाच्या मंदिरात गावजेवण(भंडारा)दिले जात असे.गावात त्यावेळी विजेची सोय नव्हती,त्यामुळे रात्री अभ्यासासाठी
आम्ही शाळेतच राहून कंदिलाच्या प्रकाशात अभ्यास करत असू.शाळेची कडक शिस्त होती.गावातच राहणारे अत्यंत मारकुटे म्हणून विद्यार्थ्यांमध्ये प्रचंड दहशत असलेले गुरुजी शाळेचे मुख्याध्यापक होते.त्यांचा नियम होता की काहीही कारण असले तरी रात्री आठ वाजल्यानंतर कुणीही शाळेच्या बाहेर पडायचे नाही.आमची शाळा गावातल्या पेशवेकालीन वाड्यात भरत असे. तर झाले काय की त्या दिवशी आम्हा मुलांनी मंदिरातल्या भंडाऱ्याच्या जेवणावळीत जेवायचे ठरवले. कुणाच्याही नकळत गुपचूपपणे आम्ही मंदिरात गेलो व मान खाली घालून जेवणावळीच्या पंक्तीत बसलो.समोरच्या पत्रावळीवर लापशी वाढली गेली हातात घास घेणार तोच समोर लक्ष गेले आणि समोरच्या व्यक्तीला पाहून हादरलोच!
           शाळेचे मुख्याध्यापकच पंक्तीत लापशी वाढत होते!त्यांची एवढी दहशत होती की आम्ही जेवायचे सोडून  शाळेकडे धूम ठोकली! आता आपली धडगत नाही,शाळेतून आपल्याला काढून टाकणार या भीतीपोटी पुढचे तीन दिवस शाळेच्या वेळेत घरातून निघत होतो,पण शाळेला गेलोच नाही! आता शाळा कायमसाठी सोडायची व शेतातच काम करायचे असं मनाशी पक्क ठरवूनही टाकले!
  स्वत: मुख्याध्यापक चौथ्या दिवशी जातीने घरी आले व समजूत घातली तेंव्हा कुठे शाळेवर उपकार
केल्याच्या अविर्भावात अस्मादिक शाळेत गेले! त्यावर्षी सातवीच्या (त्यावेळची पी.एस.सी.)परीक्षेत
केंद्रात पहिला आलो आणि शेतमजूर होता होता वाचलो!!!!
आजही तो प्रसंग आठवतो तेंव्हा अजाण वयातल्या त्या वेडेपणाचे हसू येते!
.....प्रल्हाद दुधाळ. पुणे. (९४२३०१२०२०)


No comments:

Post a Comment