Wednesday, February 11, 2015

स्वीकार.

                        
    स्वीकार.
   रडून रडून लतिकाचे डोळे लालभडक झाले होते.रात्रभर ती हमसून हमसून रडत होती, पण माधव ने,तिच्या नवर्याने तिची समजूत घालण्याचा एका शब्दानेही प्रयत्न केला नव्हता.यापूर्वी असे कधी घडले नव्हते.किरकोळ वाद झाला तरी माधव तिला खूप समजावून सांगायचा.तिची बाजू समजून घ्यायचा.हे वरचेवर अगदी कारणाशिवाय घडतंय याची तिला जाणीव होती पण बऱ्याच वेळा तिच्याकडून ही चूक होत होती हे निश्चित! तिची जेंव्हा जेंव्हा चिडचिड होत असे त्या त्या वेळी माधव तिला असे वारंवार अगदी क्षुल्लक कारणावरून चिडणे किती धोकादायक आहे हे समजून सांगायचा प्रयत्न करत असे पण अशा प्रसंगी ती काय बोलते यावर तिचे नियंत्रणच रहात नसे! माधव मात्र तिची चूक असतानाही कमीपणा घेवून तिला शांत करायचा.जवळ घेवून हे जीवन काय आहे.आपल्या उज्वल भविष्यासाठी असे छोट्या छोट्या गोष्टीवरून होणारे वाद टाळायला हवेत हे छान समजून सांगायचा.तिला स्वत:ची चूक होतेय हे समजायचं,ती माफी मागायची व सर्व काही पूर्ववत व्हायचं.हे गेले दोन वर्ष कमी अधिक प्रमाणात होत होत,पण आज नेहमीसारखं काहीही घडले नव्हते. माधवने सकाळी उठल्यावर तिची मुळी दखलच घेतली नव्हती.आपलं आवरून तो ऑफिसला निघाला तेंव्हा तिला सारखं वाटत होत की तो निघताना तरी रात्रीच्या प्रकाराबद्दल काहीतरी बोलेल पण त्याने तिची अजिबात विचारपूस केली नाही.तो घराबाहेर पडल्यानंतर मात्र तिला अजूनच रडू यायला लागलं.अगदीच एकट एकट वाटायला लागलं.रडता रडता ती विचार करायला लागली ....
   फक्त दोन वर्षापूर्वी लग्न करून या घरी आले तेंव्हा किती उत्साहात होते! माधव च्या आईबाबांनी व इत्तर नातेवाइकानी अगदी मनापासून तिचे नव्या घरी स्वागत केले होते.एकुलत्या एका मुलाची ती पत्नी होती! माधवचे बाबा तर म्हणायचे की ही माझी लाडकी लेक आहे! आणि हे नुसते बोलले नव्हते तर आई व बाबांकडून तिला खरचं खूप प्रेम मिळत होत! आई बाबा तिला खूपच समजून घ्यायचे.प्रत्येक बाबतीत तिचे मत विचारायचे.घरातले सर्वजण तिचा आदर करायचे.पण तिला मधेच काय व्हायचं कुणास ठाऊक,अचानक ती विचित्र वागायला लागायची सर्वांवर चिडायची,खेकसून बोलायची.तरीही आईबाबा तिला समजून घ्यायचे.पण एकदोनदा अश्याच चिडचिडेपणा करताना तिच्याकडून आईबाबांचा अगदी वाईट शब्दांत अपमान केला गेला.दुसऱ्या दिवशी बाबांनी तिला व माधवला जवळ घेऊन सांगितले की यापुढे तुमच्या दोघांत आमची अडचण व्हायला नको.कुठलाही राग मनात न ठेवता आईवडिलांनी गावाकडे राहायचे ठरवले.लता व माधव ने पुन्हा असे घडणार नाही असे सांगून माफी मागितली पण त्यांचा निर्णय प्रत्यक्षात आणला होता व त्या दिवसापासून हे दोघेच घरात रहात होते! मधून मधून बाबांचा फोन येत असे अगदी प्रेमाने ते तिच्याशी बोलत पण परत यायला सौम्य भाषेतच नकार देत असत.आई बाबाना दुखाऊन आपण  खूप मोठी चूक केलेली आहे याची आता लताला जाणीव झाली होती  आणि याचा लताला खूप त्रासही  होत होता पण शब्दांनी झालेल्या जखमानी आपले काम चोख केले होते.माधवने लताच्या या समस्येवर अनेक वेळा एखाद्या डॉक्टरांचा सल्ला घेऊ असे सुचवले होते पण तिने ते साफ धुडकावून लावले होते.त्यावरून सुध्दा दोघामधे एकदोनदा वाद झाले होते.माधवला पूर्ण कल्पना होती की योग्य ते मानसिक उपचार घेतले तर लता यातून पूर्णपणे बरी होवू शकेल.
     माधवने लताच्या स्वभावाचा अभ्यास केलेला होता.तिच्या लग्नापूर्वीच्या आयुष्याचा मागोवा घेताना एक गोष्ट त्याला समजली होती की, कॉलेजला असताना लताचे एका श्रीमंत व रुबाबदार तरुणावर एकतर्फी प्रेम होते.पण लता त्याच्या खिजगणतीतही नव्हती! त्या तरूणाचे लग्न झाल्यामुळे लताला त्या काळात  जबरदस्त मानसिक धक्का बसला होता. अपेक्षाभगाच्या तीव्र दु:खामुळे तिला नर्वस ब्रेकडाऊन चा त्रास  सुरू झाला होता.पण हळूहळू कुठलाही उपचार न घेता ती या मानसिक धक्क्यातून सावरली होती.माधव बरोबरचा लग्नाचा सांगून आलेला प्रस्ताव तिने आनंदाने स्वीकारला होता व आपल्या सुखी वैवाहिक जीवनात पदार्पण केले होते.नव्या नवलाईचे पहिले सहा महिने अगदी सुरळीत गेले होते.लता माधव च्या सुखी संसाराचा व त्यांच्या सुखी कुटुंबाचा शेजारीपाजारी व नातेवाईक अगदी हेवा करत असत,पण अचानकपणे एक दिवस लताला अचानक  निराशेने ग्रासले व ती  विचित्रपणे वागू लागली.अगदी शांतपणे आनंदात जगणारे माधवचे कुटुंब काळजीत पडले.घरातले सर्वजण लतावर खूप प्रेम करत होते त्यामुळे आज ना उद्या सर्वकाही व्यवस्थित होईल असेच सगळे म्हणत.सर्वजण लताला शक्यतो सांभाळून घ्यायचा प्रयत्न करायचे.तिचा मूड बिघडू नये अशी काळजी जाणीवपूर्वक आई,बाबा व माधव घेत असत, पण लताचा मानसिक तोल वारंवार ढळतच राहिला.जेंव्हा ती नॉर्मल असेल, तेंव्हा लता सर्वांची खूप काळजी घेत असे.नवे  नवे पदार्थ तयार करून सर्वाना प्रेमाने भरवत असे.माधववर तर ती अतोनात प्रेम करत होती,अगदी सांगूनही लताचे वेगळे वागणे कुणाला पटले नसते, एवढी चांगली ती वागत असे! आणि असे वारंवार घडत राहिले!कितीही सांभाळले तरी पुन्हा पुन्हा तेच तेच घडत होते! माधव च्या आईवडिलाना वाटायला लागले की लता आणि माधवला वेगळा संसार करायला मिळाला तर सर्व काही सुरळीत होईल.एक दिवस नैराश्याच्या भरात लताने आई व बाबा ,दोघांचाही नको एवढा अपमान केला.जिव्हारी लागतील असे शब्द वापरले.आयुष्यात सरळमार्गी चालणारे हे जोडपे या प्रसंगाने खचून गेले.कायम दुसऱ्यांच्या मनाचा विचार करणारे ते दोघे हताश झाले होते! लताचा त्या दोघांना राग येत नव्हता तर कीव करावीशी वाटत होती.त्यांनी आपल्या मुलांच्या सुखासाठी गावाकडे जायचा निर्णय घेतला.
  आपल्याकडून अजाणता खूप मोठी चूक झाली आहे याची लताला जाणीव होती पण एकदा मूड बिघडला की काय होतंय याच तिला भानच रहात नव्हत. माधवने  शांतपणे तिला समोर बसवून जे तिच्या लग्नापूर्वीच्या आयुष्याबद्दल समजले होते त्याबद्दल तिच्याशी चर्चा केली. अडनिड्या वयात अशा गोष्टी जवळ जवळ  प्रत्येकाच्या आयुष्यात कमी अधिक प्रमाणात घडत असतात आणि यात तिचा कोणताही दोष नसल्याचेही वारंवार समजावले.तिच्या मागे तो खंबीरपणे उभा आहे व तिने नैराश्याच्या या गर्तेतून बाहेर पडावे यासाठी आवश्यक ते सर्व उपचार करूया,असे वारंवार समजावले 
 ,पण आपल्याला उपचाराची  मुळीच गरज नाही असे ती ठामपणे सांगत राहिली.माधवने तिला हे पटवून देण्याचाही प्रयत्न केला की- मान्य आहे की ती त्या तरुणाबरोबर लग्न करून जास्त आनंदी झाली असती,पण ती गोष्ट वास्तवात येवू शकलेली नाही! म्हणून आपले आयुष्य बिघडवून घेण्यात अर्थ नाही! तेथे कदाचित तुला जास्त वैभवात व ऐटीत रहाता आले असते,पण तो सुद्धा तिला तेव्हढ्याच सुखात ठेवण्याचा प्रयत्न करतो आहे! आपला पेला भले पूर्ण भरलेला नाही पण तो अर्धा तरी भरलेला आहे हे वास्तव तिने स्वीकारायला हवे! तो तिला समजून घेत होता,समजावून सांगत होता, पण कळूनही ती न कळल्यासारख वागत होती.त्याने आता निर्णय घेवून टाकला होता ही कुतरओढ थांबवायची! लताला तिच्या नशीबावर सोडून द्यायचे.तिच्या जगण्यातली आपली लुडबूड थांबवायची! रात्री झालेल्या वादानंतर त्याने आता लताबद्द्ल कोणतीही दया दाखवायची नाही असे ठरवूनच तिरीमिरीतच तो बाहेर पडला होता.कुठे कुठे फिरत राहिला. 
         लताला आता जाणीव व्हायला लागली होती की,आपण रात्री फारच टोकाला जाऊन बोलत होतो.नकळत आपण माधवाच्या आत्मसन्मानाला दुखावले आहे त्यामुळेच त्याने आज नेहमी प्रमाणे कोणत्याही प्रकारे समजूत काढली नाही.आपल्या स्वभावाची  आता लताला  लाज वाटायला लागली.काय काय नाही केले माधवने आपल्याला समजून सांगण्यासाठी? आपण उपचार घेतले तर यातून बरे होवू असे कितीतरी वेळा मला समजावले पण हट्टापायी मी त्याकडे दुर्लक्ष केले.याच हट्टापायी मी माधव व त्याच्या आईबाबांचा अपमान करत राहिले.माझ्या पुर्वायुष्यातल्या  एका  माणसाकडे मी आकृष्ट झाले. माझ्यासाठी खर तर तो नालायक होता .एकतर्फी  प्रेम कसले  आकर्षणच  होत ते ! त्याने  मला नाकारून  माझी अवहेलना केली अशी समजूत मी करून घेतली व नैराश्य ओढवून घेतले! या सर्व प्रकाराची  जबाबदारी माझीच आहे .माझ्या वाईट वागण्याची व त्यामुळे  ओढवलेल्या परिस्थितीची शिक्षा मात्र माधव व त्याच्या आईबाबाना देत राहिले.परंतू  या देवमाणसानी माझा राग राग न करता मला आधार दिला व  देत राहिले.किती कृतघ्न आहे मी! माझा सुखाचा पेला रिकामा आहे असे समजून मी माझे व माझ्या परिवाराचे जगणे अवघड करत आले.परंतु माझा हा पेला माधव व आईबाबांमुळे सुखाने भरलेला आहे हे वास्तव मात्र विसरले.आभासी सुखाने मला वेडे केले होते. काही नाही,आता ही चूक सुधारायची! माधव व आईबाबांना सुखात ठेवायचे! ते म्हणतील ते मानसिक उपचार घ्यायचे! माधवला ताबडतोब फोन करून माझा हा निर्णय सांगायलाच हवा.नाहीतर उशीर होईल! लताने ताबडतोब माधवचा मोबाईल नंबर लावला .......
                                              .........प्रल्हाद दुधाळ .पुणे (९४२३०१२०२०)

No comments:

Post a Comment