Wednesday, February 11, 2015

बोचरे शल्य.

बोचरे शल्य.

  माणसाच्या आयुष्यात अनेक बऱ्यावाईट घटना घडतच असतात.कधी हातून अजाणता काही चुका होतात,कधी अचानक नकोशा प्रसंगाना सामोरे जावे लागते.यातील काही घटना टाळता येण्यासारख्या असतात,तर काही प्रसंग टाळणे कुणाच्याही हातात नसते.खर तर जे घडले आहे त्याबद्दल खंत न करता जे काही समोर वाढलेले आहे त्या वास्तवाचा स्वीकार करत मार्गक्रमणा करणे हा आनंदी जीवनाचा राजमार्ग आहे, अस असलं तरी,प्रत्यक्षात असे क्षण आयुष्यभर टोचणी देतच रहातात कधी अपेक्षाभंग,कधी हातातली निसटलेली महत्वाची संधी,अपूर्ण राहिलेली स्वप्ने,पाळता न आलेले शब्द,गैरसमजातून तुटलेले नातेसंबंध वा अजून एखाद्या वेगळ्या कारणांची बोच माणूस आयुष्यभर बाळगत असतो! अश्या बोचऱ्या जखमा बऱ्या झाल्या असे वरवर वाटले तरी एखाद्या हळव्या क्षणी त्यावरची खपली निघतेच! अशा अनेक शल्यांची अदृश्य गाठोडी बाळगतच माणूस जगत असतो!
   गोष्ट एकोणीसशे शहात्तर सालातली आहे,नुकताच मी शालांत परीक्षा उतीर्ण झालो होतो.जवळपास कोठेही पुढील शिक्षणाची सोय नव्हती त्यामुळे यापुढे शिक्षणासाठी जिल्ह्यांच ठिकाण-पुण्यात जायचं किमान इंजीनारिंगची पदवी वा पदविका घ्यायची असे स्वप्न मी पहात होतो! घरची आर्थिक परिस्थिती अत्यंत हलाखीची होती त्यामुळे हे स्वप्न कितीही आकर्षक वाटत असले तरी कुणीतरी आर्थिक व मानसिक आधार दिला तरच ते प्रत्यक्षात येणार होते! आजच्या इतके इंजीनारिंग पदविकेला प्रवेश मिळवणे सोप्पे नव्हते कारण त्याकाळी फक्त चारदोन शासकीय संस्थ्यामधेच असे शिक्षण घेता येत असे! मी शासकीय तंत्रनिकेतन मध्ये प्रवेशासाठी अर्ज दिला व गावाकडे जावून राहिलो. साधारण एक महिना गेला तरी प्रवेशासंबंधी काहीच समजले नाही.त्याकाळी गावाकडे टेलिफोनची सुविधा नव्हती.पोस्टाने पत्र येईल व प्रवेशासंबंधी कळविले जाईल असे संस्थेने सांगितले होते त्यामुळे दररोज पोस्टमनला त्याबद्दल विचारत होतो.पुण्याला जाण्यासाठी प्रवासखर्चाची सोय करणेही दुरापास्त होते. त्या वर्षीच्या जुलै महिन्यात प्रचंड पाऊस पडत होता सगळ्या ओढ्यांना,नाल्यांना पूर आलेला होता, रस्ते वाहून गेले होते त्यामुळे गावाकडे येणारी एस.टी.ची बसही चारपाच दिवस गावाकडे फिरकली नव्हती! आठवडाभरानंतर पाऊस थांबला.एक दिवस पोस्टमन ने शासकीय तंत्रनिकेतन कडून आलेले पत्र मला दिले,आनंद गगनात मावत नव्हता! घाई घाईने पत्र उघडले माझ्या प्रवेशासाठीचा तो चान्स कॉल'' होता! मी पत्र पुन्हा वाचले त्या पत्रातील मजकुराप्रमाणे दिलेल्या तारखेच्या आत मी प्रवेशासाठी प्रवेश फी व प्रवेशाचे इत्तर सोपस्कार पूर्ण करायचे होते अन्यथा वेटिंग लिस्ट मधील पुढच्या विद्यार्थ्याला प्रवेश दिला जाणार होता! पत्रावरची तारीख पुन्हा पुन्हा पाहिली आणि रडूच कोसळलं! शेवटची तारीख उलटून एक आठवडा झाला होता! आयुष्यातली एक अनमोल संधी हुकली होती! रडून काहीच होणार नव्हत!उशीर तर झालाच होता.कुणाचेही या बाबतीत मार्गदर्शन मिळण्याची सुतराम शक्यता नव्हती!
   त्या काळी इंजीनारिंग पदविका धारकाला शासकीय व खाजगी क्षेत्रात भरमसाठ संधी उपलब्ध होत्या!आपल्या आयुष्यातली आयुष्याचं सोन करणारी ती संधी हुकल्याचे बोचरे शल्य कायमच खुपत राहिले!नियतीची योजना दुसरे काय?
    पुढच्या आयुष्यात टेलिफोन खात्यात नोकरी करत करत परीक्षा देत देत अभियंता झालो. तेस्वप्न साकार झाल्याचे समाधान नक्कीच मिळाले! आता नावासमोर उपविभागीय अभियंताहे पद लावत असलो तरी त्यावेळी तीसंधी जर साधता आली असती तर आयुष्यात अजून खूप मोठा पल्ला गाठता आला असता असे पुन्हा पुन्हा वाटते! संधी हुकल्याच शल्य कितीही नाही म्हटलं तरी, नकळत बोचतेच आहे!बोचतच राहील!
. ....प्रल्हाद दुधाळ.पुणे (९४२३०१२०२०)


No comments:

Post a Comment