फादर्स डे.
एरवी आपण पाश्चात्य संस्कृतीला कितीही नावे ठेवत असलो तरी त्यांच्या काही काही गोष्टींना मात्र सलाम करावासा वाटतो. वेगवेगळ्या नात्यांचे सन्मान करणारे विविध 'डे'ज साजरे करण्याची त्यांची पद्धत खरंच कौतुकास्पद आहे!
नात्यांबद्दलच्या भावना व त्याप्रतीची कृतज्ञता व्यक्त करण्यासाठी एक छान मार्ग या निमित्ताने मिळतो त्यामुळेच जगभर असे 'डे'ज उत्साहाने साजरे केले जातात.
काहीजण म्हणतील की वर्षातून एकदा असा डे साजरा करून काय होणार; पण आपल्या विवेकबुद्धीला स्मरून खरं खरं सांगा की आपण आपल्या या नात्यांसाठी सध्या किती वेळा संवेदनशील असतो? या विधानाला काही सन्मान्य अपवाद असतील तर ते खरंच खूप थोर आणि वंदनीय आहेत!
त्यातल्या त्यात मदर्स डे आणि फादर्स डे म्हणजे तर माता पित्याच्याबद्दलच्या भावना व्यक्त करायची सुवर्णंसंधीच!
सोशल मीडियाच्या माध्यमातून का होईना आई वडिलांप्रती आपल्या अव्यक्त भावना व्यक्त होत आहेत, ही माझ्या मते त्यातली खूप मोलाची बाब आहे.
आज फादर्स डे च्या निमित्ताने ज्या नात्याबद्दल सहसा बोलले जात नाही त्या पित्याबद्दलच्या भावना व्यक्त करायला मलाही प्रेरणा मिळाली आहे.
माझ्या बाबतीत म्हणाल तर माझ्याकडे माझ्या वडिलांबद्दलच्या खूप कमी आठवणी आहेत, कारण मी तेरा चौदा वर्षांचा असतानाच आमच्या दादांनी हे जग सोडले होते.
त्या अल्पकाळातली त्यांची जी प्रतिमा समोर आहे ती खूपच आदर्शवत आहे.
मला अस्पष्टसे आठवते त्याप्रमाणे माझे आईवडील मी लहान होतो त्यावेळी काही दिवस शेतीबरोबरच कांदा बटाटा लसूण घेऊन आजूबाजूच्या गावातल्या आठवडाबाजारात विकायचे.त्या काळात बहूतेक ते बऱ्यापैकी कमवत असावेत. गावात त्यांना बराच मानही होता. लोक त्यांना सावकार या टोपण नावाने ओळखायचे...
पुढे मात्र ते आजारी पडू लागले आणि तो व्यापार बंद झाला. मग त्यांनी आपल्याला झेपेल असे मोसंबी डाळींबीच्या बागांच्या राखणीचे काम सुरु केले. शहरातले बागवान लोक या फळबागा ठोक भावात घ्यायचे आणि पुढे फळे काढायला येईपर्यंत राखण्याची जबाबदारी दादांना मिळायची. मी अगदी सहावी सातवीत असतानापर्यंत शाळेतून आल्यावर त्या बागेत त्यांच्याबरोबर जायचो. तिथेच मी अभ्यास करत त्यांना मदत करायचो.
मधल्या काळात बहिणीच्या लग्नात होती ती जमीन गहाण पडली. आई शेतमजुरीबरोबर सकाळी आजूबाजूच्या खेड्यात तरकारीची हाळीपाटी करायची. वडिलांची तब्बेत आणि आमच्या कुटुंबाची आर्थिक हालत खालावत गेली आणि मी आठवीत असताना कार्तिकी एकादशीच्या दिवशी दादांनी इथला मुक्काम संपवला. खूप कमी वय होते माझे त्यावेळी...
त्यांच्या सहवासातल्या त्या मोसंबीच्या बागेतल्या आठवणीच काय त्या सोबत आहेत. मी शाळेत कायम पाहिला नंबर मिळवतो याचे त्यांना खूप अप्रूप होते! मला ते अत्यंत मृदू भाषेत जगरहाटी समजावून सांगायचे. इथे गावात राहिला तर खायचे वांदे होतील त्यामुळे जमेल तेवढं शिकून एखादी चांगली नोकरी मिळाली तरच आयुष्यात निभाव लागेल याची जाणीव त्यांनी त्यांच्या शेवटच्या दिवसांत मला करून दिली होती, त्यामुळे कितीही हाल झाले तरी शिक्षण घेणे सोडायचे नाही हे ठामपणे ठरवले होते.
त्यांच्याकडूनच मला माझ्या शांत स्वभावाची व सारासार विचार करून निर्णय घेण्याच्या वृत्तीची देणगी मिळालेली आहे आणि त्या जोरावर मी आयुष्यात कितीही कठीण प्रसंग आला तरी माझे मानसिक स्वास्थ्य ढळू देत नाही.त्यांचा करारी बाणा व स्वाभिमानी वृत्तीही माझ्यात वारशाने आलेली आहे.
आज जे काही समाधानी व आंनदी जीवन मी जगतो आहे त्यामागे माझ्या माता पित्याचे संस्कार आणि आशीर्वाद आहेत!
आजच्या फादर्स डे च्या निमित्ताने परमपूज्य दादांस अभिवादन...
फादर्स डे च्या सर्व बाप लोकांना शुभेच्छा..
©प्रल्हाद दुधाळ.

No comments:
Post a Comment