Wednesday, September 26, 2012

विवाह आणि जोडीदाराची निवड.


विवाह आणि जोडीदाराची निवड.

भारतीय संस्क्रुतीमधे एकूण सोळा संस्कार सांगीतले आहेत त्यापॆकी विवाह हा एक महत्वाचा संस्कार आहे.माणसाच्या आयुष्यातला हा अत्यंत महत्वाचा संस्कार आहे.-याच वेळा विवाहाबाबत निर्णय घेताना तो प्रेमविवाह असो नाहीतर ठरवून केलेला विवाह असो, वर अथवा वधू जोडीदाराच्या निवडीबाबत पुरेसे गंभीर नसतात.खरं तर हा उभ्या आयुष्यासाठीचा एकदाच घ्यायचा निर्णय असतो, पण जसे जेवण्याची वेळ झाली की जेवण केले जाते तसेच विवाहाचे वय झाले की चला लग्न करू म्हणून एक जोडीदार निवडला जातो व लग्न उरकलं जात.-याच वेळा तर केवळ जुजबी चॊकशा केल्या जातात. कातडीचा रंग, जात, पोट्जात,नोकरी,घर,आणि लग्नात किती थाट्माट होणार या पुढील आयुष्यात कमी महत्व असलेल्या बाबी तपासल्या जातात त्याही वडीलधा-या माणसांकडुन! एवढा सहजपणे घ्यायचा हा सोपा निर्णय नाही!
लग्नाला उभे रहाण्यापुर्वी आपल्या या लग्नापासुनच्या अपेक्षा काय आहेत यावर विचार होणे आव्यश्यक आहे.लग्न हा संस्कार म्हणजे सुयोग्य वेळी,योग्य हेतू मनात रूजवणे व या हेतूची शपथ पालक,नातेवाइक,समाजातील प्रतिष्टित यांचेसमोर घेणे! आश्वासन देणे आणि घेणे!लग्नापुर्वी माणुस आत्मकेन्द्री असतो परंतु लग्नानंतर जबाबदा-या पार पाडताना तो विचारी,संयमी, चिंतनशील, प्रगल्भ होणे अपेक्षित आहे.तर लग्नापुर्वीच्या बेजबाबदार मुक्त व्यक्तींचे जबाबदार व विवेकी माणसामधे परिवर्तन घडवण्याचे सामर्थ्य लग्न या संस्कारात आहे.जरा काव्यात्मक भाषेत लग्न म्हणजे दोन जिवांचे मधुर मिलन! पण प्रत्यक्षात भिन्न संस्कार,भिन्न परिस्थिती, भिन्न कल्पना यात वाढलेली दोन माणसं लग्नामुळे एकमेकाशी कायमची जोडली जातात.यात असतात द्ड्लेल्या अव्यक्त अपेक्षा! मग होऊ शकतात अपेक्षाभंग! व त्यामागोमाग येते दु:!म्हणुन लग्नाआधी हवी काही तयारी!
जोडीदाराची निवड हा लग्नसंस्कारातला सर्वात महत्वाचा टप्पा आहे.ही निवड जर योग्य झाली तर विवाहातून फुलते एक उत्तम सहजीवन! उभा रहातो एक यशस्वी व आदर्श संसार! आपल्या जोडीदाराची निवड डोळसपणे अचुक व पुर्ण विचारपुर्वक करणे आवश्यक आहे.त्यासाठी प्रथम स्वत:ला ओळखता यायला हवे.जो स्वत:ला पुरेसा ओळखत नाही तो स्वत:साठी जोडीदार कसा निवडणार? जोडीदार निवड्ताना अवास्तव अपेक्षा वा भ्रामक समजुती टाळायला हव्यात.अनेक लोकांचा समज असतो की एकदा लग्न झालं की पुढच्या गोष्टी आपोआप होतात पण हा गॆरसमज आहे.पुढ्च्या गोष्टी म्हणजे शरीर व्यवहार होतीलही, पण बदलत्या जीवनाचा स्विकार आपोआप होत नाही,तडजोडी आपोआप होत नाहीत,काही घेण्याची काही देण्याची सवय आपोआप लागत नाही.एक परकं घर आपलं मानणे, जोडीदारचे पालक व नातेवाईक आपले मानणे आपोआप घडत नाही. परस्पर पुरक जगणं आपोआप जमत नाही! जोडीदाराच्या निवडीतली घाई बेहिशोबीपणा बरीच महागात पडू शकते! आयुष्यभर पश्चाताप करायला लागू शकतो. प्रत्येकात काही ना काही दोष असतात पण ज्या व्यक्तीबरोबर आपण उभं आयुष्य काढायच म्हणतोय त्या व्यक्तीचे गुणदोष माहीती असणे आणि त्या गुणदोषासहीत आपण तिला स्विकारू शकतो का हे ठरवता येण महत्वाच आहे.लग्न हा स्वप्निल व्रुत्तीने भावनेच्या भरात करायचा व्यवहार नाही.आपणास जर कुठे पॆसा गुंतवायचा असला तर किती सावधपणे व्यवहार करतो आपण? पण जोडीदाराची निवड करताना पुढचा मागचा विचार करायला नको का? लग्न म्हणजे नुसतं अक्षता पडणं किंवा रजिस्ट्रार समोर सह्या करणं नाही तर ती एक जबाबदारी आहे जी कोणत्याही दबावाशिवाय व विचारांती स्विकारायला हवी. आपला सुयोग्य जोडीदार निवडताना खालील सुचना पाळणे फायदेशीर राहील-
उगाच नाईलाज नको.
अवास्तव अपेक्षा नको.
अतिरेकी तडजोड नको.
बाह्य रंगाबरोबरच आंतरिक गुणांचीही पारख हवी.
वास्तव जीवनाची व भविष्याची रूपरेषा स्पष्ट असावी.
मोकळेपणी व प्रामाणिकपणे सुसंवाद हवा.
घाईने उताविळपणे व भावनेच्या भरात निर्णय नको.
एकमेकांच्या छंदांची व आवडी निवडींची माहीती हवी.
लग्नानंतरच्या कराव्या लागना-या तडजोडींची व्याप्ती स्पष्ट असावी.
सवयी,व्यसने,मित्रमॆत्रिणींबद्द्ल माहीती असावी.
आर्थिक स्थिती,कमाई,खर्च यांची योग्य माहीती हवी.
कुटूंबियांच्या सवयी,कुलाचारांची माहीती हवी.
मुळात आपल्याकडील विवाह हे जास्तकरून ठरवून केलेले विवाह असतात.लग्नाआधी जोडीदाराची संपुर्ण माहीती मिळवणे आपल्याकडील रूढी परंपरांमुळे तितकेसे सोपे नाही.आपल्याकडे लग्न ही तडजोड करायचा संस्कार म्हणुनच समजला जातो व या विश्वासावरच लग्नसंस्था टिकून आहे! पण आज समाजात घट्स्फोटाचे प्रमाण वाढले आहे त्याचे मुख्य कारण ही तड्जोड करण्याची मानसिकता आजच्या पिढीमधे कमी होत जाणे हे असावे! म्हणुनच आपल्या परंपरेच्या चॊकटीत राहुन जोडीदार निवडताना जास्तीत जास्त काळजी घेणे एवढेच आपल्या हातात आहे.विवाह जमविताना कोणतीही गोष्ट दोन्ही पक्षांनी प्रतिष्ठेची न करता हा एक संस्कार, एक पारदर्शक व्यवहार म्हणुनच आपणाला यापुढे स्विकारावा लागणार असे वाटते! यातुनच फुलतील सहजीवनाच्या सुंदर बागा!
सहजीवन ही सुंदरशी कला! तुटेल एवढ नाही ताणायचं!
उसवल तर लगेच विणायच!
सहजीवन अधांतरी झुला! धोक्यांना नाही घाबरायचं!
गेला तोल तर सावरायचं!
सहजीवन रंगंमंच खुला! मुखवट्यांना ना भुलायचं!
चेह-यांना ओळखायचं!
सहजीवन आनंदाचा मळा! उणंदुणं ना काढायचं!
जमवून सुर जीवनगीत गायचं!
प्रल्हाद कों.दुधाळ.
/९ रूणवाल पार्क मार्केट यार्ड पुणे ३७.
९४२३०१२०२०.

No comments:

Post a Comment