वाढावा नात्यात गोडवा
परवा एक फेसबुक मित्र प्रथमच समोरासमोर भेटला.एरवी फेसबुकवर माझ्या पोस्ट्सवर/लिखाणावर मोकळ्याढाकळ्या कॉमेंट्स आणि लाईक करणारा हा माणूस प्रत्यक्षातही अगदी तसाच असेल अशी माझी कल्पना होती;पण समोरासमोर भेटल्यानंतर मात्र माझा भ्रमनिरास झाला.आपल्या फेसबुक भिंतीवर प्रचंड मजेशीर खुसखुशीत गोड गोड भाषेत व्यक्त होणारी ही व्यक्ती प्रत्यक्ष बोलताना मात्र अगदीच कोरड्या एकसुरी भाषेत बोलत होती! प्रथमच समोरासमोर भेटल्यानंतर पुढाकार घेऊन मी सुरू केलेल्या संवादात केवळ औपचारिकपणे सहभागी होऊन दोन चार वाक्यातच त्याने एका बाजूने संवाद संपवला.
मग माझ्या लक्षात आले की त्या संवादात फक्त मीच भरभरून बोलत होतो आणि तो मात्र जेव्हढ्यास तेव्हढे बोलून संवाद केव्हा एकदा संपतोय याची वाट पहात होता!
काही काही लोकांना प्रथम भेटीत अनोळखी माणसाबरोबर बोलताना बुजल्यासारखे होऊ शकते हे मी समजू शकतो, काही लोक मितभाषीही असू शकतात हे सुद्धा मान्य आहे;पण सोशल मीडियावर एकमेकांना जन्मोजन्मीची ओळखत असल्यासारखी चॅटींग करताना मोकळेपणी वागणारी,बोलणारी माणसे प्रत्यक्षात भेट झाल्यावर अशी वागू शकतात हे पाहून नाही म्हटलं तरी थोडा निराश झालो.अर्थात प्रत्येकाचा आपला एक स्वभाव असतो.
सोशल मीडियाचे सोडा;पण आपल्या वास्तव आयुष्यातही अशी अनेक माणसे वावरताना आढळतात ज्यांचे घातलेले गुडीगुडी मुखवटे आणि खरे चेहरे आपण कल्पनाही करू शकत नाही एवढे भिन्न असतात!
आपला काही मतलब साधायचा असला की तेव्हढ्यापुरतं गोड गोड बोलणाऱ्या व्यक्ती एकदा का अपेक्षित असलेला कार्यभाग साधला की आपला मूळ स्वभाव दाखवतात.असे कामापुरत्या गोड गोड बोलणाऱ्या माणसांकडून फसले जातो तेव्हा संवेदनशील मनांना किती यातना होतात ते फक्त अशी मने असलेल्या माणसासलाच माहीत! हे सगळं आठवायचं कारण म्हणजे आजचा मकर संक्रांतीचा दिवस....
आपल्याभोवती नेहमीच आतून बाहेरून स्वच्छ सुंदर पारदर्शी मन असलेली माणसं असावीत, त्यांचे संपर्कांतील प्रत्येक माणसांशी वागणेबोलणे स्वच्छ निर्मळ असावे.ज्यांच्याशी मनमोकळं बोलल्यानंतर प्रसन्न वाटावं,सुखदुःखाच्या प्रसंगी एकमेकांना आधार देण्याइतपत त्यांच्यात सहकार्य भावना असावी.एखाद्या चुकीच्या गोष्टींसाठी परखडपणे एकमेकांचे कान पकडण्यापर्यंत अधिकार आणि मायेचा ओलावा असावा.कोणत्याही प्रकारचा गैरसमज होणार नाही इतपत निर्मळ निरपेक्ष नातं मनामनात असावं. जातीधर्म प्रातांच्या सीमा ओलांडून असे संबंध माणसामाणसात निर्माण व्हावेत म्हणून आपल्या संस्कृती व परंपरात अनेक सण सभारंभांची योजना केलेली आहे.आज मकरसंक्रात,माणसा माणसातील नाती वृद्धिंगत व्हावीत,तीळ आणि गुळाच्या रूपाने नात्यांमध्ये स्नेह आणि गोडवा निर्माण व्हावा म्हणून साजरा केला जाणारा सण! तिळगुळ घ्या व द्या आणि मनापासून एकमेकांशी गोड बोला/गोड वागा असा संदेश देणारा आपला सण!.....
तर, अशा या मकरसंक्रांतीच्या आपणा सर्वाना खूप खूप शुभेच्छा!
तीळगूळ घ्या गोड बोला!
...........प्रल्हाद दुधाळ.
No comments:
Post a Comment