Wednesday, November 8, 2017

चणे दात आणि आपण ...

चणे  दात आणि आपण ...
      आमच्या शेजारच्या सोसायटीत घोलपकाका रहातात.एकदम उत्साही व्यक्तीमत्व लाभलेल्या या फक्त सत्त्याऐंशी वर्षे वयोमान असलेल्या तरूणाशी गप्पा मारणे म्हणजे  माझ्यासाठी प्रचंड आनंददायी अनुभव असतो.अशा वयाने जेष्ठ व सर्वार्थाने अनुभवी लोकांशी मैत्री करायला मला मनापासून आवडते. वेळ मिळाला की या माझ्यापेक्षा तब्बल तीस पावसाळे जास्त पाहीलेल्या मित्राशी संवाद साधण्याची संधी साधायचा माझा प्रयत्न असतो. जवळ जवळ तीस वर्षापूर्वी एका सरकारी खात्यातून  वरिष्ठ अधिकारी पदावरून रिटायर झालेल्या घोलप काकांची तब्बेत तशी एकदम ठणठणीत दिसत असली तरी वयपरत्वे त्यांच्या हिंडण्याफिरण्यावर मर्यादा आलेल्या आहेत.काकू होत्या तोपर्यंत तसा त्यांना काहीच प्रश्न नव्हता;पण आता सुनामुले अगदी कितीही काळजी घेत असले तरी काका मानसिकदृष्ट्या थोडे एकटे पडले आहेत.बोलताना तसे ते जाणवू देत नसले तरी त्यांचा एकटेपणा लपत नाही.
  असाच एका रविवारी काका माझ्याशी गप्पा मारत होते......म्हणजे, ते बोलत होते आणि मी फक्त ऐकत होतो ....
"आमच्या पिढीचे प्रश्नच वेगळे होते. जीवनातल्या प्राथमिकता आजच्यापेक्षा भिन्न होत्या,आपल्याला रिटायर झाल्यावर आयुष्यभर पेंशन मिळत राहील म्हणून त्या काळात खाजगी क्षेत्रात भरपूर पगाराच्या नोकऱ्या उपलब्ध असूनही सुरक्षित  सरकारी नोकरीला मी चिकटून राहीलो.लग्न झाले, मग नवा संसार, मुलांचे पालनपोषण, त्यांचे शिक्षण असे चारी बाजूंनी खर्चच खर्च आ वासून उभे असायचे. सरकारी नोकरीत पगार तसा अत्यंत तुटपूंजा होता.महिना अखेरपर्यंत खर्चांची तोंडमिळवणी करता करता अक्षरश: नको नको व्हायचं.त्या काळी शॉपींग,हॉटेलिंग पिकनिक, नाटकसिनेमा या गोष्टी आमच्या शब्दकोशातच नव्हत्या.सगळ्या सांसारिक जबाबदाऱ्या निभावता निभावता आयुष्यातील सगळी उमेदीची वर्षे भरकन उडून  गेली आणि  रिटायरमेंट कधी समोर आली ते समजलेच नाही!"
 "रिटायर झालो, मिळालेल्या पैशात नडीअडीला काढलेलं तसचं घराचं उरलेलं कर्ज फेडलं आणि दर महिन्याला मिळणाऱ्या पेंशनवर उदर्निर्वाह सुरू झाला.मुलांची लग्नकार्ये होता होता पासष्टी कधी ओलांडली ते कळलेच नाही.आता बास झाली पळापळ, जरा स्वत:च्या आयुष्यातील राहून गेलेल्या हौशीमौजी करू म्हणे  म्हणेपर्यंत  नातवंडासाठी वेळ काढावा लागला आणि छंद व आवडी बाजूला पडले."
 " पंचाहत्तर वर्षाचा झाल्यावर सरकारी नियमांनुसार पेंशन वाढली, पुन्हा ऐंशी व पंचाऐंशी वय झाल्यावर पेंशनचा आकडा वाढतच राहिला.वेतन आयोग लागू झाला आणि बँकेतल्या शिलकीचा आकडा अजूनच फुगला.आता तर रिटायर होताना जेवढा पगार मिळायचा त्याच्या दुप्पट रक्कम दरमहा बॅंकेत जमा होते आहे,आज माझ्याकडे भरपूर पैसा  आहे; पण या वयात  तो खर्च करायची उमेद वा उत्साह उरलेला नाही नाही. कुठे फिरायला बाहेर पडावं तर  या वयात प्रवासही झेपत नाही! ज्यांच्यासाठी एवढा आटापिटा केला त्या मुलाबाळांनाही माझ्याकडच्या पैशाची आज तरी गरज वाटत नाही!" घोलप काकांचे डोळे भरून आले होते.
      काय असत ना? आयुष्यभर नोकरी एके नोकरी माणूस करत रहातो, प्रमोशन पगारवाढ याच्या चक्रात अडकतो,आपल्या मुलाचं भविष्य सुरक्षित करण्याच्या नादात आवश्यक असलेल्या खर्चालाही कात्री लावत पैसा साठवतो आणि त्याचे स्वत:साठी जगणे राहूनजाते.जेव्हा खऱ्या अर्थाने उपभोगाचे वय असते तेव्हा स्वत:च्या आवडीनिवडीला फाटा देवून डोळ्याला झापडं लावून शर्यत लावल्यासारखा माणूस पळत राहतो.अगदी रिटायरमेंटचा क्षण समोर येईपर्यंत त्याला ‘एक दिवस या सगळ्या व्यापांतून बाहेर पडावे लागणार आहे या वास्तवाची जाणीवच नसते!
जेव्हा हे सगळं लक्षात येइपर्यंत ना उमेद राहीलेली असते ना उपभोगाचे वय!
"दात असतात तेव्हा चणे घ्यायची परिस्थिती नसते आणि आता भरपूर चणे  समोर पडलेले आहेत; पण ते चावून खायला आता तोंडात दातनाहीत!"
थोडक्यात काय की,
आयुष्यात एक गोष्ट नेहमी लक्षात ठेवायला हवी की पैसा कितीही आला तरी त्याची हाव मरेपर्यंत संपत नाही! आपण जे काही कमावतो ना,त्याचा योग्य वयात योग्य प्रमाणात उपभोगही घेता यायला हवा!
अन्यथा, सगळच व्यर्थ!,
बरोबर ना?
...........प्रल्हाद दुधाळ.


No comments:

Post a Comment