Tuesday, June 24, 2014

“अती झाल हसू आलं!”

                         

                                                      अती झाल हसू आलं!”

    माझ्या मित्राने-रफिकने पुण्यातल्या एका उपनगरात चायनीज फूड चे एक छोटेसे हॉटेल सुरू केले त्याला आता एक वर्ष होवून गेले होते. हॉटेलच्या ओपनिंगला मी अगदी आवर्जून उपस्थित होतो.रफिकने आत्तापर्यंत खूप कष्टात दिवस काढले होते. चार पाच वर्षे जमवाजमव करून त्याने या व्यवसायात पदार्पण केले होते.माझा एक मित्र धंद्यात स्थिर होवू पहात होता याचा नक्कीच आनंद होता.
 मधल्या काही दिवसात माझे त्या भागात जाणे झाले नाही.एक दिवस निवांत होतो म्हटलं रफिकच हॉटेल कसं चाललय बघू या.संध्याकाळी त्याच्या हॉटेल वर गेलो.रफिकचे या व्यवसायात चांगलेच बस्तान बसले होते.त्याने माझे उत्साहाने स्वागत केले.मागच्या बाजूला आमची गप्पांची महफिल जमली.चायनीज हॉटेल चांगले चालते आहे पण या धंद्यात काही त्रासही होतात असे तो सांगत होता.त्याने  सांगितलेला  हा किस्सा आहे       
      दररोज संध्याकाळी ठराविक वेळी त्याचे हे हॉटेल रफिक उघडत असे.पहिल्या दिवसापासूनच त्याने पदार्थांच्या क्वालिटीकडे तसेच स्वच्छतेकडे लक्ष दिले होते त्यामुळे त्याच्या हॉटेलवर त्याच्या हातचे टेस्टी चायनिज पदार्थ खायला दररोज रात्री उशिरापर्यंत लोकांची भरपूर गर्दी व्हायची.शहराबाहेर त्याचे हे हॉटेल होते त्याने कुठल्या सरकारी परवानग्या घेतलेल्या नव्हत्या त्यामुळे कायद्याच्या भाषेत तसा तो अनधिकृत धंदा होता. तो असा अनधिकृत धंदा करत असल्याने नगरपालिका कर्मचारी,आरोग्य खात्याचे लोक व पोलिस त्याच्याकडून नियमितपणे हप्ता घेउन जायचे.त्यामुळे तो आपला हा धंदा निर्वेधपणे करु शकत होता.असा धंदा करायचा तर या गोष्टी करायलाच लागायच्या!
      तर असाच एक दिवशी रफिक रात्री उशिरापर्यंत आपला धंदा करत होता रात्री साडे अकरा च्या दरम्यान पोलिसांचे गस्तीपथक पोलिस व्हॅन मधुन तेथे आले.आजच नव्याने रुजु झालेले साहेबही गाडीत होते. नेहमीचे  आर्थिक व्यवहार झाल्यावर साहेबाने एक चायनिजचे पार्सल बांधुन दे असे रफिकला  फर्मान सोडले.साहेबाने सांगितलेल्या डिश चे पार्सल घेउन (अर्थात फुकट ) घेउन साहेबाची गाडी गेली.
    दुसऱ्या दिवशी त्याच वेळी पुन्हा पोलिसांची गाडी आली.साहेबाच्या बायकोला ती डिश खुपच आवडली होती, त्यामुळे आजही साहेबाने पार्सलची ऑर्डर दिली होती.रफिकने त्या दिवशीही पार्सल दिले.आणि मग हा दररोजचा उद्योग झाला! रफिक वैतागुन गेला.दररोज हा नवा भुर्दंड चालू झाला होता.पोलिसांशी वाकडे नको हा विचार करून  दररोज रफिकला पार्सल तयार ठेवण्याचा आदेश पाळावा लागत होता.हे असेच चालत राहिले.रफिक ही ब्याद कशी टाळता येईल याच्यावर खूप दिवस विचार करत होता पण काय करावे ते त्याला सुचत नव्हते. एक दिवस मात्र त्याला एक युक्ती सुचली.त्या दिवसा पासून रफिक अजिबात न कुरकुरता अत्यंत आनंदाने साहेबाचे पार्सल तयार ठेवायला लागला! एक दिवस साहेबानी गाडीतून उतरून  त्याच्या डिश चे कौतुक केले,साहेब त्याला म्हणाले की "पुर्वी पेक्षा तुझ्या डीशची चव खुपच छान झाली आहे! मॅडम तर जाम खुश आहे तुझ्या कौशल्यावर!" रफिक साहेबांकडे बघून कसनुस हसला! साहेब नेहमी प्रमाणे फुकटचे पार्सल घेउन गेले!”
आता माझी उत्सुकता चाळवली गेली.
“असं काय केलंस रे रफिक तू ,की आनंदाने साहेबाला पार्सल द्यायला लागलास?”
       तुम्हाला काय वाटत? काय खास बदल केला असेल रफिकने, की त्याच्या त्या  डिशची चव एकदम एवढी फर्मास झाली असेल? मला तर काही सुचतच नव्हते.मी  सांग म्हणून खूपच आग्रह धरला तेंव्हा त्याने त्याचे ते सिक्रेट मला सांगितले, रफिक म्हणाला
 “तू माझा मित्र म्हणून हे तुला सांगतोय,तू मात्र हे तुझ्या जवळच ठेव.”
मी होकारार्थी मान डोलावली.
" या नव्या साहेबाच्या दररोजच्या पार्सल च्या मागणीवर मी वैतागुन एक उपाय शोधला. काय व्हायचं की माझ्याकडचे बरेच गिर्हाईक मागवलेले पदार्थ अर्धवटच खायचे व डिशमध्ये बरेच उष्टे अन्न  तसेच सोडुन जायचे.मग मी काय केले की  असे उरलेले अन्न मी एका वेगळ्या भांड्यात काढायला सुरुवात केली. साहेबाची गाडी येण्याच्या सुमारास मी हे मिश्रण गरम करुन साहेबाचे पार्सल तयार करायला लागलो व त्याला देउ लागलो! आता तर साहेबाला व त्याच्या बायकोला हीच डीश आवडते !"
दररोज न चुकता गाडी आजही पार्सल घेउन जात आहे.
मी तुम्हाला म्हणून हे सांगतोय,प्लीज कुणाला सांगू नका,काय?
                                                                                              ...........प्रल्हाद दुधाळ.पुणे.

No comments:

Post a Comment