Monday, July 24, 2017

व्यायाम आणि आम्ही!

व्यायाम आणि आम्ही!
जन्मताच मी म्हणजे तब्बेतीने अगदी सुकट बोंबील! अगदी काटकुळ्या शरीरयष्टीचा! एकतर आईवडीलांच्या पन्नाशीतले आणि एकंदर सहा भावंडांपैकी शेवटचे अपत्य,त्यात घरात खायची मारामार आणि त्यात मला कधीच कडकडून भूक लागायची नाही त्यामुळे मी कायम बारकुंडाच राहिलो.असं म्हणतात की लहानपणी मी कधीच बाळसे धरलेच नाही! तसा लहानपणी फार आजारी पडल्याच काही आठवत नाही,पण एकदा मला आई म्हटलेलं आठवत की मी एक महीन्याचा असताना जगतो की मरतो एवढा आजारी पडलो होतो! अगदी लहानपणापासूनच मला खायला खूप कमी लागायचं!
या एकंदरीत कुपोषणाचा परिणाम व्हायचा तोच झाला आणि मी शरीराने तोळामासाच राहिलो! खरी जन्मतारीख माहीत नसल्याने अंदाजे सहा वर्षाचा झाल्यावर शाळेत घालायला नेले तर मास्तरांनी सांगितले की हा सहा वर्षाचा वाटत नाही, त्यामुळे शाळाप्रवेश एक वर्षाने लांबला.माझ्या बरोबरीने जन्माला आलेली मुले मुली शाळेत जायला लागली मी मात्र ती मुले दुसरीत गेली तेंव्हां पहिलीत गेलो!लहानपणी माझा मैदानी खेळाकडे बिलकूल कल नव्हता! शाळेत शाररीक शिक्षणाच्या तासाला खोखो कबड्डी खेळायचो; क्वचित सुरपारंब्या व लगोरही खेळलो असेल; पण एकंदरीत बैठे खेळ, वाचन आणि भरपूर अभ्यास याच माझ्या आवडीच्या गोष्टी राहिल्या! अभ्यासात मात्र अगदी पहिली ते दहावीपर्यंत आपला पहिला नंबर असायचा त्यामुळे या पुस्तकी किड्याला कुणी कधी खेळायला जात नाही धुडगूस घालत नाही म्हणून रागावले नाही.PT च्या परीक्षेत लांब उडी, उंच उडी,दोरीवरच्या उड्या, पुलप्स हे सगळे केले पण एकतर शाळेचा हुशार मुलगा असल्याने असेल पण नापास कधी झालो नाही! आम्हाला धायगुडे नावाचे PT चे शिक्षक होते त्यांनी  विद्यार्थ्यांच्या परिक्षा घेताना त्यांना मदतनीस म्हणून रेकॉर्ड कीपिंग चे काम माझ्यावर कायमचे सोपवून टाकले यामुळे झाले काय की अस्मादिकांचा रुबाब अजूनच वाढला!
शालेय शिक्षण चालू असताना शाळेपर्यंत अनवाणी पायाने तीनेक किलोमीटर सकाळी संध्याकाळी चालायला कमी जास्त करून उशीर होवू नये म्हणून पळायला लागायचे, हाच एक महत्वाचा व्यायाम कंपल्सरी घडायचा! शिवाय अर्धी वा चतकोर खाल्लेली भाकरी जिरवायला तो पुरेसा असायचा!
पुढच्या शिक्षणासाठी एक वर्ष घराबाहेर नातेवाईकाकडे राहिलो. मुळात लाजरा स्वभाव असल्यामुळे तिथे ताटात सुरवातीला जे काही वाढलेले असेल ते कसे तरी पोटात ढकलायचो आणि भरपूर पाणी पिवून जेवण संपायचे.पुढे स्वत: स्वयपांक करून खायला लागलो.मधला एक दोन वर्षांचा काळ सोडला तर अगदी वयाच्या पंचविशीपर्यंत मी जमले तर अन्न शिजवले आणि शिजवले तर खाल्ले अशा परिस्थितीत काढले. शाररीक तंदुरुस्तीसारखा विषय कायम ऑप्शनला टाकला गेला! कॉलेजलाअसताना सायकलवर येरवडा ते कर्वे रोडला गरवारेपर्यंत यायचो, रस्त्यात एखादा वडा सांबार किंवा टोमेटो आम्लेट खाल्ले की झाली दिवसाची पोटपूजा! त्यातच नोकरी करून शिकत असल्यामुळे
व्यायाम,खेळ असे विषय डोक्यात यायला कधी वेळच मिळाला नाही! मला वाचनाचा मात्र प्रचंड नाद लागला! जेवायला नसले तरी चालेल पण वाचायला दररोज एक आख्खे पुस्तक लागायचे! एखादे आम्लेटपाव,भाकरी आणि बेसनाची पोळी, आठवडा आठवडा माझा हा एकच चौरस आहार असायचा! ऐकायला मजा वाटेल पण एकवीस वर्षे वयाचा असताना माझे वजन होते चाळीस किलो! असे असूनही त्या वयात कोणता गंभीर आजार नाही झाला हे नशीब!
खाण्यापिण्याचे खरे नशीब उघडले ते लग्न झाल्यावर घरात अन्नपुर्णा आल्यावरच! ज्या वयात खऱ्या अर्थाने शरीराचे पालनपोषण होते त्या वयात झालेल्या कुपोषणामुळे असेल किंवा एकंदर प्रवृत्ती व प्रकृतीच तशी असल्यामुळे पोट भरण्यासाठी फार काही लागायचे नाही! आपली किरकोळ असलेली तब्बेत आता सुधारायला हवी असे आता आतून वाटायला लागले होते आणि आता हे शक्यही झाले होते. खाण्यात सकस पदार्थ वाढवले तब्बेतीकडे जाणीवपूर्वक लक्ष दिले आणि त्याचा एकंदरीत परिणाम म्हणून लवकरच माझे वजन पंचावन्नच्या पुढे गेले! आता थोडे आर्थिक स्थैर्यही आले होते.बायकोही नोकरी करत होती त्यामुळे सकाळी घरातली सगळी कामे उरकून दोघानाही ऑफिसला जायला लागायचे.पहिले काही वर्षे सोडली तर पुढे प्रमोशन नंतर माझी नोकरीही दगदगीची झाली.साईट्सवर भरपूर फिरणे व्हायचे त्यामुळे व्यायाम वा खेळासाठी कधीच वेळ काढता आला नाही.यावर मी एक उपाय शोधला आणि एक व्यायामाची सायकल खरेदी केली.आता आम्ही दोघेही सकाळ संध्याकाळ ही सायकल चालवू लागलो आणि घरच्या घरी व्यायाम करू लागलो!
नव्याचे नऊ दिवस उत्साहात संपले आणि एक दिवस ही सायकल एका कोपऱ्यात धूळ खात पडली! कधी तरी आठवण झाली की त्यावरची धूळ झटकली जायची पण पुन्हा येरे माझ्या मागल्या! एक दिवस ट्रेडमिल घ्यायचं मनाने घेतलं आणि लगेच शक्ती स्पोर्ट्स मधून मैन्यूअल ट्रेड मिल घेवून आलो, आता वेळ मिळेल तेव्हा घरच्या घरी मस्त चालणे सुरू झाले! एखादे वर्ष गेले आणि गुढगे दुखायला लागले ही कसरत बंद पडली आणि त्या सायकलच्या बाजूला ही ट्रेडमिलही जावून पडली! घरात जीम केल्यावर व्यायाम आपोआप होतो हा विश्वास होता तो मात्र भंगला! मग अचानक वाटायला लागल की ही मॅन्युएल ट्रेडमिल जोर देवून चालवावी लागते म्हणून कंटाळा केला जात असावा ती जर स्वयंचलीत असती तर फार जोर न देता चालता येईल आणि गुढघेही दुखणार नाहीत! आता पुन्हा एकदा व्यायामाचे भूत अंगात संचारले आणि आधीची ट्रेडमिल बाय बॅक मधे दिली आणि नवीकोरी स्वयंचलीत ट्रेडमिल घेवून आलो.आता आमचा दोघांचा व्यायाम जोषात सुरू झाला. यावरचे स्पीडचे आकडे, हवा तसा तो बदलता येणे,किती कैलरी जळाल्या याचा आकडा दिसणे या गोष्टींमुळे रेग्युलर व्यायाम करायचा उत्साह वाढला होता.मधल्या काळात सिद्ध समाधी योगा चा कोर्स करून घेतला आणि थोडाफार योगा प्राणायाम सुध्दा शिकलो होतो त्याचीही जोड मिळाली. योगा आणि प्राणायाम चालू राहिले पण ती ट्रेडमिल चालवायचा उत्साह मात्र दीडदोन वर्षात विरून गेला! लवकरच आधीच्या ट्रेडमिलच्या जागी ही नवी ट्रेडमिलही धूळ खात पडली. मग सकाळी व संध्याकाळी फिरायला जायची आवड झाली आणि उभयता मोकळ्या हवेत फिरायला जायला लागलो! हा सगळ्यात सोपा आणि परिणामकारक व्यायाम आहे याची प्रचीती यायला लागली. मधेच कधी तरी सिझनप्रमाणे यात अनियमितता येते मधेच फिरणे बंद होते पण पुन्हा रुटीन सुरू होते! आता जमेल तेव्हा जमेल तसे फिरतो,माफक योगासने आणि प्राणायाम करतो.यातही कधीतरी अनियमितता येते; पण पुन्हा सुरुवात करतो! अजूनपर्यंत थोडा सिजनल सर्दी खोकला श्वासाचा त्रास सोडला तर कोणताही मोठा आजार झालेला नाही. वर्षभरात वजन चोपन्न पासून ते अठ्ठावन्न पर्यंत वाढते व पुन्हा आटोक्यात येते. गेली पंधरा वर्षे ना कम ना जादा!
आणि हो ती व्यायामाची सायकल आणि ट्रेडमिल मात्र मी येईल त्या किमतीला विकून टाकली आणि घरातली अडगळ कमी करून टाकलीय!
एक लक्षात आलंय तुम्ही जमेल तेव्हा जमेल तो व्यायाम कराच पण सर्वात महत्वाची गोष्ट मात्र निश्चित करायला हवी ती म्हणजे जिभेवर ताबा ठेवायला हवा! दोन वेळच्या सकस जेवणानंतर अगदी कितीही आवडीचा पदार्थ समोर आले तरी ते खाण्याचा मोह आवरायला शिकायचं,मग वजन वाढणे आणि त्यापोटी होणारे आजार जवळ फिरकणारच नाही! वाटायला अवघड पण एकदम सोप्पा व्यायाम, जिभेला शिस्त लावायची! मी आता जिभेला बऱ्यापैकी शिस्त लावलीय आता मनाला शिस्त लावतोय त्यासाठी योगा प्राणायामाच्या जोडीला ध्यानधारणाही सुरू केली आहे. आपले मानसिक आरोग्य उत्तम असले, आहार विहारावर नियंत्रण असले की कोणताही आजार तुमच्याकडे फिरकू शकत नाही असे मला वाटते!
खर आहे ना?
...... प्रल्हाद दुधाळ.(९४२३०१२०२०)

Wednesday, July 19, 2017

स्वप्नातले घर-एक प्रवास.

स्वप्नातले घर-एक प्रवास.
  अन्न वस्र निवारा या माणसाच्या आयुष्यातल्या मुलभूत गरजा आहेत.या गरजांच्या पूर्ततेसाठी तो आयुष्यभर प्रयत्न करत असतो. प्रत्येकाला आपल्याला चांगल्या प्रतीचे पोटभर व वेळच्या वेळी खायला मिळावे चांगले कपडे घालायला मिळावे व रहायला छानसे घर असावे असे वाटत असते आणि मग आपल्या या अपेक्षा पूर्ण व्हाव्या म्हणून धडपड करत असतो.माझे बरेचसे आयुष्यही या प्राथमिक गरजा पूर्ण व्हाव्यात म्हणून झगडण्यात गेले.इथे मी चर्चा करणार आहे ती माझ्या मनातल्या घरापर्यंतच्या प्रवासाची! आयुष्यात फार मोठी स्वप्ने मी पाहिली नाहीत,पण ‘अंथरूण पाहून पाय पसरावेत’ या शिकवणी प्रमाणे छोटी छोटी स्वप्ने मात्र पाहायचो.
    माझे वडिलोपार्जित गावाकडचे घर म्हणजे मातीच्या विटानी (भेंडा) बाधलेल्या भिंती व वर छताला  जुन्या टाईपची कौले असलेले दोन खोल्यांचे घर होते.मी पाचवीसहावीला असताना पावसाळ्यात या घराची  मागची भिंत कोसळली.आधीच या घराचे कौल्रारी छत पावसाळ्यात ठिकठिकाणी गळायचे.घरातली सगळी भांडी छतातून गळणारे पाणी गोळा करण्यासाठी कामाला यायची! पन्नासेक वर्षापुर्वी साध्या पध्द्तीने बांधलेल्या त्या घराने सेवा तरी  किती द्यायची नाही का?तर आयुष्यातले हे पहिले घर पडले आणि आमच्या कुटूंबाचे रहायचे वांधे झाले! आई वडिलांनी जवळच असलेल्या गुरांच्या गोठ्यात आपला संसार हलवला.
     गव्हाच्या काडापासून बनलेले छप्पर,कडब्यापासून बनवलेला झोपा हे त्याचे दार,कुलुपाची गरजच नाही! तर असा हा गोठा हे माझे घर नंबर दोन! या घरात माझे सगळे बालपण गेले.रॉकेलच्या चिमणीसमोर  अभ्यास केला,हाताला येईल ते पुस्तक वाचले! या उजेडातच पहिली कविता लिहिली.याच घरात आठवीत शिकत असताना माझे पितृछत्र हरपले.मॅट्रीक झाल्यावर शिक्षणासाठी बाहेर पडलो होतो तरी सुट्टीत आईबरोबर याच घरात रहात होतो.येथेच आईने माझ्यावर चांगुलपणाचे संस्कार केले.या राच्या छताकडे बघत छोटीमोठी स्वप्ने पाहिली.नोकरी लागली लग्नही झाले तरी हेच माझे म्हणावे असे एकमेव  घर होते!
      पुढील शिक्षणासाठी पुण्याला भावाकडे आलो. भावाला नोकरीनिमित्त परदेशी जावे लागले.त्याच्या मालकीची पत्र्याच्या भिंती व छताला लाकडी पट्ट्यावर मंगलोरी कौले असलेली येरवडा भागातील नागपूर चाळ येथील दहा बाय दहाची झोपडी मला राहायला मिळाली. जवळपास सहासात वर्षे मी या झोपडीत राहीलो. येथे पत्र्याच्या भोकातून शेजारच्या झोपडीतला संसार दिसायचा! इथे राहून शिकत असतानाच नोकरी मिळाली.कंदिलासमोर बसून अभ्यास केला.नोकरी करत पदवीही मिळवली.येथेच बरेवाईट मित्र मिळाले.त्यांच्यातले चांगले गुण आत्मसात केले.माणसाने कसे असावे व कसे नसावे हे या झोपडपट्टीतल्या  घरी राहून शिकलो.जीवनात स्थैर्य मिळवण्याची स्वप्ने पहात हे घर मी सोडले आणि लग्न केले. पुढच्या स्वप्नपूर्तीसाठी कुठेतरी एखादे घरटे उभारावे लागणारच होते!
      वडगांव शेरी येथे चाळीतली एक छोटी खोली भाड्याने घेतली आणि संसार थाटला. हे माझे तसे चौथे,पण गृहस्थ्याश्रम सुरू केल्यानंतरचे भाड्याचे का होईना,पण स्वत: सजवलेले पहिले घर! आम्हा  दोघांनी  उभारलेले हे होते आमचे घरटे!लवकरच या खोलीच्या शेजारची एक डबलरूम रिकामी झाली आणि मी  माझ्या पाचव्या  घरात रहायला गेलो! या भाड्याच्या घरात असतानाच आम्ही स्वत:च्या घराचे स्वप्न बघू लागलो.नोकरीत बढतीही मिळाली.इथे असतानाच आम्हाला मुलगा झाला.त्याचे पहिले बोबडे बोल,टाकलेले पहिले पाउल हे सगळे या घराच्या साक्षीनेच झाले!
  नंतर धनकवडीवनरूम किचन फ्लॅट बुक केला,स्वत:च्या घराचे आमचे स्वप्न साकार झाले! तिनशे स्क्वेअर फुटाच्या माझ्या आयुष्यातील सहाव्या घरात मी रहायला गेलो!येथे  पाण्याचे हाल असले तरी ते घर माझे स्वत:चे होते!या घरात मुलाचा शिक्षणाचा श्रीगणेशा झाला.येथे गैरसोयी होत्या! पाच वर्षे तेथे राहून मी मार्केटयार्डमध्ये वनबेडरूमचे घर घेतले. जीवनातल्या सातव्या वास्तूत गेलो!नंतर शेजारचा ब्लॉकही  घेतला. दोन्ही एकत्र करून तेथेच रहातो आहे.ऐसपैस घर आहे पण आता येथला गोंगाट नको वाटतोय! रिटायरमेंटनंतर एखादे निवांत घर घेउ असे स्वप्न पहात असतो! पाहूया काय होतंय या स्वप्नाचे!
                        ---प्रल्हाद दुधाळ ,
                                                          ५/९, रुणवाल पार्क पुणे ४११०३७
                        (मो.- ९४२३०१२०२०)


Saturday, July 1, 2017

डॉक्टर

त्यावेळी माझा मुलगा लहान होता.तो खूपच गप्पा मारायचा.समोर अनोळखी अबोल व्यक्ती असली तरी तो त्याला प्रश्न विचारून बोलायला भाग पाडायचा! वयाच्या मानाने त्याचे बरेचसे प्रश्न इतके मुद्देसूद असायचे की समोरच्या माणसाची बोलती बंद व्हायची. आमच्या बिल्डींगमधेच एका नव्यानेच बी ए एम एस झालेल्या डॉक्टरांनी दवाखाना चालू केला होता. त्या डॉक्टरांचे जे काही पहिले लकी पेशंट होते त्यापैकी हा एक होता.थोडक्यात, याच्या गप्पागोष्टीमुळे त्यांचा हा लाडका पेशंट होता.किरकोळ तक्रारींसाठी आम्ही त्याला त्यांच्याकडे घेवून जायचो.जेव्हा कधी त्यांच्याकडे जायचो याच्यासाठी  वेटींग करायची गरज भासायची नाही! डॉक्टर  त्याला डायरेक्ट आत बोलवायचे.त्यालाच प्रश्न विचारून औषधे ठरवायचे आम्ही फक्त तो बरोबर सांगतोय ना एवढेच बघायचो. हे डॉक्टर पुढे तेथून  घर बदलेपर्यंत आमचे फॅमिली डॉक्टर होते.अगदी परिवाराच्या सदस्याप्रमाणे आमचा स्नेह अनेक वर्षे होता.
   एकदा आमच्या या बाळाला किंचित ताप आला होता म्हणून या डॉक्टरसाहेबांकडे जायचे ठरवले. आम्ही तयार होइपर्यंत हा खाली त्यांच्या दवाखान्यात पोहोचला होता. मी दवाखान्यात पोहोचलो तर हा तिथल्या रिसेप्शनवर असलेल्या बाईला प्रश्न विचारत होता.
 " काका अजून का नाही आले?"
 " अरे बाळा आज ते येणार नाहीत."
 " का नाही येणार?"
 " अरे आज त्यांना ताप आलाय!"
  " काका डॉक्टर आहेत ना?'
   " हो रे बाळा..."
    " डॉक्टरला ताप कसा काय येईल?"
    " अरे डॉक्टर सुध्दा आजारी पडतो की!"
     " खोट नका सांगू, काकांना कसा ताप येईल, डॉक्टर   कधी आजारी नाही पडतं काही!"
त्याने हे वाक्य अशा काही अविर्भावात म्हटले की त्या बाईला काही बोलावे हे कळेनाच! मी पुढे जावून त्याला समजावले पण त्याचे म्हणणे कायम होते ...
" डॉक्टर कधी आजारी पडत नाही!"
 शेवटी मी हार मानली आणि त्याला डॉक्टरकाका आल्यावर त्यांनाच विचार असे समजावून घरी नेले. क्रोसीन देवून त्याला झोपवले.तो बरा झाला.पुढे दोन तीन दिवस तो सारखा खाली जावून डॉक्टर आलेत का बघत होता.तिसऱ्या दिवशी एकदाचे काका सापडले.त्याला डॉक्टर आजारी पडू शकतो हे पटलेले नव्हते! तो डायरेक्ट डॉक्टरच्या केबीनमधे घुसला. दोन्ही हात मागे बांधून त्याने विचारले ...
" काका, डॉक्टर कधी आजारी असतात का?"
 " हो, कधी कधी आजारी पडतात की!"
 " तुम्हाला ताप आला होता?"
" हो आला होता ना!"
आता मात्र हा बिघडला ...
" मग तुम्ही कसले डॉक्टर ???"
मोठा प्रश्न फेकून तो सरळ घरी आला.
पुढचे दोन दिवस त्याला" डॉक्टर म्हणजे शेवटी माणूसच असतो, त्यालाही आजारपण येवू शकतं, त्यांच्यापेक्षा मोठ्या जास्त शिकलेल्या डॉक्टरांच्याकडे जावून औषध घ्यावे लागते!" हे समजावले तेव्हा कुठे त्याचे प्रश्न संपले!
 Happy Doctors Day!
..... प्रल्हाद दुधाळ.