Monday, May 6, 2019

उपवास आणि चिडचिड...

उपवास आणि चिडचिड ....
काल उपवास आणि चिडचिडचि यासंबंधी  पोस्ट वाचली आणि माझ्या बाबतीत घडलेला एक किस्सा आठवला....
    त्यावेळी(१९९३) मी फोन इन्स्पेक्टर म्हणून पुण्याच्या कैंप भागातल्या एका विभागाचा इंचार्ज होतो.त्या काळी टेलिफोन म्हणजे सामान्यांच्या आवाक्याबाहेर असलेली गोष्ट होती .मोबाईल सेवा भारतात आस्तित्वातच नव्हती....
  तर, माझ्या विभागातल्या टेलिफोन कनेक्शनबद्दलच्या तक्रारी, नवीन कनेक्शन देणे याची जबाबदारी माझ्यावर होती.माझ्या परीने ग्राहकांना उत्तम सेवा देण्याचा माझा प्रयत्न असायचा.येणाऱ्या ग्राहकांशी माझे वागणे, बोलणे तसेच त्यांच्या अडचणी सोडवण्यासाठी मी मनापासून प्रयत्न करायचो.त्यामुळे ग्राहक  तसेच माझ्या हाताखाली काम करणारे कर्मचारी यांच्यात मी खूप पॉप्युलर होतो. कर्तव्यपूर्तीमधले एक वेगळेच समाधान मला त्या काळात मिळत होते....
     अचानक काय झाले माहीत नाही; पण एका गुरूवारी सकाळी सकाळी एक ग्राहक माझ्याकडे आला . रागाने माझ्याशी त्याच्या टेलिफोन बाबत तो तक्रार करत भांडायला लागला आणि मी प्रथमच माझा एरवीचा शांत अवतार सोडून त्याच्या पेक्षा दुप्पट आवाज वाढवून त्याच्याशी वाद घालायला लागलो!
  त्या दिवशी माझ्या स्टाफ बरोबरही मी चिडून बोलत होतो!
दुसऱ्या दिवशी मात्र मी नेहमी सारखा वागत बोलत होतो.
पुन्हा पुढच्या गुरुवारी अगदी तसेच घडले! त्या दिवशीही मी सगळ्यांवर चिडचिड करत होतो. संध्याकाळी माझे कधी नव्हे ते डोके दुखत होते.
नंतरचे सहा दिवस मात्र मी नॉर्मल होतो.असे काय होतेय ते माझे मलाच कळेना. मग दर आठवड्याला असेच घडत राहिले...
   एक दिवस मी गंभीरपणे माझ्या स्वभावात होत असलेल्या त्या एका दिवसाच्या बदलाबद्दल विचार करत बसलो होतो, कारण माझ्या तशा वागण्याचा फटका काही ग्राहक व स्टाफला बसला होता.त्यांची नाराजी मला नंतर चांगलीच जाणवायला लागली होती. विचार करता करता अचानक माझी ट्यूब पेटली ....
   दर गुरूवारी मी कुणीतरी सांगितले म्हणून उपवास धरायला लागलो होतो आणि नेमक्या त्या गुरूवारी माझी पहिल्यांदा चिडचिड झाली होती!!!
   आपली चिडचिड पोटात काही नसल्याने होते आहे आणि दर गुरूवारी वादविवाद व भांडणे सुरु झाली हे लक्षात आल्यावर मात्र मी उपवासाच्या बाबतीत कानाला खडा लावला ते आजपर्यंत!
   आता चिडचिड व्हायला लागली की मी मला भूक तर लागली नाही ना? हे तपासून पोटपूजा करून घेतो....
     ..... प्रल्हाद दुधाळ.

Wednesday, January 30, 2019

जिद्द...

जिद्द....
     मागच्या आठवड्यात मी अन्नाची नासाडी टाळण्यासाठी एक शपथ पोस्ट केली होती.खूप जणांना ती पोस्ट खूप आवडली होती.
   अनेक मित्रांनी यापुढे आपणही अन्नाची नासाडी टाळू असे सांगितले.माझ्या एका मित्राने तर ती शपथ खूपच गांभीर्याने घेतली होती....
   आज ऑफिसात एका गृपने संक्रातीच्या निमित्ताने दुपारचे जेवण आयोजित केले होते आणि आम्ही सगळे आमंत्रित म्हणून हजर होतो.जेवणात तीळ पोळी, मसाला भात टॉमॅटो सार असा मस्त मेनू होता. प्रत्येक ताटात खूपच वाढून दिले होते.आपल्याला हे सगळं संपवणं शक्य नाही हे जवळपास प्रत्येकाला माहीत होते;पण आग्रहापुढे कुणाचेही चालत नव्हते. बऱ्याच जणांनी माझ्यासह अगदी नाईलाजाने समोर वाढलेले संपवले.माझा तो मित्र मात्र एका पोळीत आऊट झाला होता. ताटात शिल्लक राहिलेले अन्न कुणाला तरी खायला देऊन ती शपथ पाळायची असे त्याने ठरवले.त्याने तसे बोलूनही दाखवले आणि एका रद्दी न्युज पेपरमध्ये उरलेले अन्न घेवून तो गरजु भुकेलेला माणूस शोधायला तो बाहेर पडला!
 दोनशे मीटर अंतरावर एक भिक्षेकरी नेहमी बसतो हे त्याला माहीत होते.तो त्या चौकात गेला;पण आज नेमका तो भिक्षेकरी गायब होता. मग तो तसाच पुढं चालत राहिला.एक दीड किलोमीटर परिसरात त्याला कुणी गरजु सापडला नाही.एका उभ्या असलेल्या टेंपोच्या सावलीत एक कुत्रे झोपले होते.त्याने शेवटी त्या कुत्र्याला ते अन्न द्यायचा निर्णय घेतला.कुत्र्याला त्याने आवाज दिला." काय कटकट आहे" असा भाव ठेवून कुत्रे महाशयांनी डोळे उघडले.मित्राने उत्साहाने अन्नाचा कागद त्याच्यासमोर ठेवला.कुत्रे महाशयांनी अन्नाकडे एक कटाक्ष टाकला आणि पुन्हा झोपून घेतले!पुन्हा प्रयत्न करूनही कुत्रोबाने डोळे उघडायला नकार दिला!
आता मित्राने हार मानली आणि तो कागद उचलून अजून पुढे चालायला लागला.उपाशी माणूस, कुत्रा किंवा कोणताही प्राणी ज्याला हे अन्न खायला देता येईल,असा विचार करत शोधत शोधत तो चांगला दोन किलोमीटर पुढे गेला. अचानक त्याला एक दुसरा कुत्रा दिसला.लगबग करून तो पुढे गेला आणि तो कागद त्या कुत्र्यासमोर ठेवला.कुत्रा थांबला त्याने तो कागद क्षणभर हुंगला आणि मित्राकडे  एक नजरेचा कटाक्ष टाकला आणि सरळ पुढे निघून गेला.
आता मात्र मित्र चांगलाच वैतागला!
"माणूस सोडा, एक साधे कुत्रेही त्याने दिलेले अन्न खायला तयार नव्हते!"
  नाईलाज होवून त्याने तो पेपर पुन्हा उचलला आणि अजून पुढे चालायला लागला.रस्त्याच्या कडेला काही कोंबड्या मातीत चोच मारत होत्या.मित्राला मग कल्पना सुचली आणि पोळीचे छोटे छोटे तुकडे करून तो त्या कोंबड्यांना अन्न भरवत राहीला.
"मी अन्न वाया घालवणार नाही" ही शपथ अशा प्रकारे त्याने एकदाची निभावली!!!
याला म्हणतात जिद्द! हो की नाही?
..... प्रल्हाद दुधाळ.
     ३०/१/२०१९

Thursday, January 24, 2019

मोबाईलची कथा व्यथा

      मोबाईलची कथा व्यथा
       आमच्या बिल्डिंगमध्ये केवळ माझ्या घरात, तोही मी दूरसंचार खात्यात काम करत असल्याने फुकट मिळालेला टेलिफोन होता.बिल्डिंगमधील कुणाला फोन करायचा असला किंवा कुणाचा इनकमिंग कॉल आला तर त्याला बोलावून घेवून परत कॉल करायची मोफत सोय मी करून दिली होती.त्यावेळी मोबाईल सेवा नुकतीच चालू झाली होती इन्कमिंग कॉलला ही आठ रूपये चार्ज होता.आमच्या शेजारी एक व्यापारी राहायचे.त्यांच्याकडे असा मोबाईल होता.एकदा त्यांची बायको एका लग्नाला गेली आणि तेथे अचानक बेशुध्द  झाली.त्याचा फोन लागत नव्हता, त्यामुळे तो निरोप मला माझ्या फोनवर कुणीतरी दिला.ते महाशय नेमके बाहेर गेले होते.त्यांच्याकडे नवा नवा आलेला मोबाईल होता.मी त्यांना मोबाईलवर कॉल करून त्याच्या बायकोबद्दल सांगायचा प्रयत्न करत होतो;पण इन्कमिंगला चार्ज आहे म्हणून बाबा मोबाईलचा कॉल घ्यायला तयारच नाही! तब्बल एक तास मी  प्रयत्न करत होतो;पण त्याने फोन काही घेतला नाही! असा राग आला होता ना!शेवटी मी नाद सोडून दिला...
दुसऱ्या दिवशी कळाले की त्याच्या एका नातेवाईकाने परस्पर याच्या बायकोला हॉस्पीटलमध्ये  एडमिट केले होते ....

कथा कुणाची व्यथा कुणाला!
....प्रल्हाद दुधाळ.

Monday, January 14, 2019

शपथ...

शपथ....
 
   शिक्षिका असलेल्या एका फेसबुक मैत्रिणीचा मेसेज आला की शाळेत तिच्या विद्यार्थ्याना "अन्नाची नासाडी करू नये" अशा आशयाची  एक शपथ द्यायची आहे आणि त्यासाठीचा मजकूर मी लिहून द्यावा.मी प्रयत्न करतो म्हणालो...
 आज ती शपथ लिहून द्यायचा प्रयत्न केला.
मी लिहिलेली ती शपथ जेव्हा पुन्हा वाचली तेव्हा लक्षात आले की अरे; ते विद्यार्थीच का, अशी शपथ तर माझ्यासह प्रत्येकाने घ्यायला हवी ....
बघा जमली का?
 "आम्ही शपथ घेतो की...
- अन्न हे पूर्णब्रह्म आहे आणि या अन्नाचा प्रत्येक कण ही राष्ट्राची अनमोल संपत्ती आहे हे मला माहीत आहे .अन्न वाया घालवून या संपत्तीचा मी विनाश करणार नाही व होवू देणार नाही.
- माझ्या ताटात येणाऱ्या अन्नाच्या प्रत्येक घासामागे बळीराजाने केलेल्या अतोनात कष्टाची मला जाणीव आहे. अन्न वाया घालवून बळीराजाच्या त्या कष्टाचा मी अपमान करणार नाही .
- घरात किंवा एखाद्या कार्यक्रमात जेवण करताना भूक असेल एवढेच अन्न मी वाढून घेईन .अन्नाचा प्रत्येक घास मी निर्मिकाने दिलेला प्रसाद म्हणून खाईन.अन्न वाया जाणार नाही याची मी दक्षता घेईन व ईतर लोकांनासुध्दा अन्नाचे महत्त्व समजावून सांगेन
- मला जाणीव आहे की माझ्या देशात अनेक लोकांना खायला पुरेसे अन्न मिळत नाही. माझ्या अवतीभवतीच्या अशा एका तरी उपाशी माणसाला जमेल तेव्हा माझ्या घासातला घास द्यायचा मी प्रयत्न करीन.
- भूक असताना खाणे ही प्रकृती, भूक नसताना खाणे ही विकृती आणि स्वत: अर्धपोटी असताना आपल्यातला अर्धा घास दुसऱ्या गरजूला खायला देणे ही आपली भारतीय संस्कृती आहे आणि ती जोपासण्यासाठी आवश्यक ते सर्व करण्याचा मी यथाशक्ती प्रयत्न करीन."
..... प्रल्हाद दुधाळ.

Wednesday, December 19, 2018

पुण्यकर्म

काल एक मनोरंजक तेव्हढीच   गंभीरपणे विचार करायला लावणारी केस माझ्यासमोर आली होती.प्रशासन विभागात काम करत असल्याने सामान्यपणे लोकांना होता होईल एवढी मदत करण्याचा माझा प्रयत्न असतो;पण कधी कधी अशी काही बिलींदर माणसे भेटतात की ज्याचे नाव ते!
   निवृत्ती जवळ आलेल्या कर्मचाऱ्यांना बोलावून त्यांचे सर्व्हिस रेकॉर्ड तपासून काही त्रुटी असल्यास त्या दुरूस्त करून पुढे पेंशन संबंधी काही अडचणी येऊ नयेत यासाठी आम्ही मोहीम राबवत असतो.अशाच एका चतुर्थ श्रेणी कर्मचाऱ्याला तो पुढच्या सहा महिन्यात रिटायर होत असल्याने त्याचे सर्व्हिस बुक दाखवले.
सर्व्हिस पुस्तकातल्या नोंदी पाहून तो बराच विचारात पडलेला दिसला . त्या  दिवशी तो निघून गेला; पण सातआठ दिवसांनी तो काही कागदपत्रे घेऊन पुन्हा आला . त्याने एक अर्ज आणला होता.
  अर्जात त्याने लिहिले होते...
" माझी पहिली पत्नी राजश्री केशव जाधव हीचे दिनांक  २०/५/२००० रोजी निधन झाले.( सोबत मृत्यू प्रमाणपत्र जोडले आहे) .त्यानंतर २ जाने.२००१ ला मी उषा केशव बेंद्रे हिच्याशी लग्न केले आहे आणि तिचे नाव बदलून राजश्री केशव जाधव असे ठेवले आहे! (सोबत विवाह नोंदणी प्रमाणपत्र तसेच नाव बदली झाल्याचे प्रतिज्ञापत्र जोडले आहे) . नजर चुकीने माझ्या दुसऱ्या लग्नाबद्दल ऑफिसला कळवणे राहून गेले होते त्याबद्दल माफी असावी .आता माझ्या सर्व्हिस पुस्तकात माझ्या पहिल्या  पत्नीचे नाव वगळून दुसऱ्या पत्नीची नोंद करावी तसेच माझे आधीचे नॉमिनेशन बदलुन नवीन नोंद करावी ....."
त्याचा अर्ज वाचून मी विचारात पडलो.  
त्याचा  अर्ज घेतला आणि त्याला दोन तीन दिवसात फोन करून कळवतो असे सांगितले.
मी गोंधळून गेलो होतो.  
 लगेच त्याची केस वाचायला घेतली ...
आता तुम्ही म्हणाल यात मजेशीर काय आहे?....सांगतो....
  या महाशयांनी दुसरे लग्न २००१ सालात केले असे म्हटले आहे; पण त्याची नोंदणी सतरा वर्षांनी केली आहे. ऑफिसला पहिल्या बायकोचे निधन आणि दुसऱ्या लग्नाबद्दल कळवावे असे त्याला तब्बल सतरा वर्षानंतर आवश्यक वाटले . आपल्या दुसऱ्या बायकोला त्याने पहिल्या बायकोचे नावच दिले!
 विशेष म्हणजे दुसऱ्या बायकोच्या वडिलांचे नाव आणि हे महाशय दोघांचे नाव सारखेच!
केशव!!! आहे का नाही योगायोग?
सगळी केस वाचून डोक्याचा गोयंदा झालायं....
त्याचा नॉमिनेशन फॉर्म वाचून मात्र मी गंभीर झालोय...
आधीच्या नॉमिनेशन मध्ये त्याच्या पहिल्या पत्नी बरोबर एक मुलगा आणि एका मुलीचे नाव होते .नवीन नॉमिनेशन फॉर्म मध्ये मात्र  त्याने फक्त दुसऱ्या बायकोचे नाव लिहिले आहे ....
काय दोष त्या मुलांचा?
केस पेंडीग ठेवलीय...
विचारात पडलोय ...
बघूया काय करता येईल.  ...
(उत्तरार्ध..)

काल तो पुन्हा आला .
त्याची केस माझ्याकडे पडलेली होती त्यामुळे मी त्याची वाटच बघत होतो. त्याने  आपले नॉमिनेशन बदलावे म्हणून दिलेले एप्लिकेशन अजून मी कार्यवाहीसाठी घेतले नव्हते.
या केसमध्ये आपण नियमात बसवून काहीतरी करायला पाहिजे असे मनापासून वाटत होते पण;शेवटी ते त्याचे नॉमिनेशन होते आणि ते त्याने कुणाच्या नावाने करावे हा त्याचा अधिकार होता!असे असले तरी कितीही वाईट असला तरी प्रत्येक माणसात एक सज्जन माणूस दडलेला असतो यावर माझा विश्वास होता आणि त्याच्यातल्या त्या सज्जन माणसाला आवाहन करायचे आणि त्या मुलांवर भविष्यकाळात कळत नकळत होणारा अन्याय दूर करायचा मी प्रयत्न करणार होतो.त्याला नियमांच्या खिंडीत गाठून हे करणे शक्य आहे हे दोन तीन दिवस केलेल्या विचाराअंती मला माहीत झाले होते. आता तो विचार प्रत्यक्षात आणायची वेळ आलेली होती.
" सर माझ्या अर्जाचे काय झाले?"
"ते दुसरे लग्न आणि नॉमिनेशन बद्दल ना..."
मी उगीचच अज्ञान पाजळले..
" हो सर..."
" त्याचे काय आहे की तुमची बायको गेली २००० ला , पुढे २००१ सालात तुम्ही दुसरे लग्न केले बरोबर ना ?"
" हो..."
" मग अठरा वर्षांनी तुम्हाला हे ऑफिसला कळवावे असे का वाटले?"
मी माझ्या मनात खदखदत असलेला प्रश्न विचारला...
" हे कळवायला लागतं हे मला माहीत नव्हतं..."
" मग आता कसं काय समजलं?"
" मी या वर्षी रिटायर होणार आहे त्यामुळे एका नातेवाईकाने सगळं रीतसर करून घ्यायला सांगितलं, म्हणून अर्ज दिलाय ..."
" आधी दिलेलं नॉमिनेशन बदलायला त्यानेच सांगितलं का?"
"हो,त्यानेच सांगितलं!"
" तो माणूस दुसऱ्या बायकोच्या नात्यातला आहे ना?"
त्याने आता मान खाली घातली आणि मान डोलावली.
आता माझा आवाज वाढला..
" अरे काय आहे, त्याने सांगितले आणि तुम्ही लगेच अर्ज दिला, थोड स्वतः डोकं चालवाव वाटलं नाही तुम्हाला? फक्त दुसऱ्या बायकोच्या नावाने नॉमिनेशन हवंय ? त्या दोन पोरांनी काय केलंय? त्यांची नावे वगळायची?"
खर तर त्याच्याशी असं बोलणं नियमानुसार नव्हतं;पण चांगल्या कामासाठी ही रिस्क मी घेतली.
माझा तो बदललेला पवित्रा बघून तो बराच गंभीर झाला होता.त्याने काढता पाय घेतला..
"मी दुपारनंतर परत येतो सर..."
माझा निरोप घेवून तो निघून गेला.
लंचला जाऊन मी परत आलो तर तो माझी वाटच बघत होता.
" सर, ते आधीचे पेपर परत द्या, आणि माझे हे नवे नॉमिनेशन घ्या ..."
मी त्याचा नवीन अर्ज वाचला आणि मी माझ्यावर खुश झालो.
ऑपरेशन सक्सेसफुल झाले होते!
नव्या नॉमिनेशन फॉर्म मध्ये त्याच्या दुसऱ्या बायकोला ५०टक्के आणि दोन्ही मुलांना २५ टक्के प्रत्येकी असे वाटप होते .
"धन्यवाद सर, मी चूक करत होतो. तुम्ही मला सावध केले..."
त्याच्या चेहऱ्यावर वेगळेच समाधान होते.
नकळत हातून एक चांगले काम होणार होते .
...प्रल्हाद दुधाळ.

Friday, October 19, 2018

सिमोलांघण

सर्वांना विजयादशमीच्या हार्दिक हार्दिक शुभेच्छा!!!
 माणसाने आपल्या भोवती वेगवेगळ्या नको त्या गोष्टींची कुंपने  घालून घेतलेली असतात.या कुंपणाच्या आतले जग हेच खरे जग आहे असे तो समजायला लागतो.अशा कुंपणा पलीकडे असलेल्या भव्य जगाची त्याला जाणीवच उरत नाही.मग त्याच्या त्या संकुचित जगातल्या जाती, धर्म, आपला, तुपला अशा भेदाभेदात तो अडकून पडतो.त्याने आपल्याभोवती तयार केलेल्या कोषात  तो इतका गुरफटून जातो की तो त्याचे खरे जगणेच विसरून जातो. ही एक प्रकारची गुलामगिरी त्याने स्वीकारलेली असते.या संकुचित जगात वावरताना तो मुक्तपणे विहरणे विसरून जातो आणि मग त्याची  खरी ओळख हळू हळू  पुसली जाते.
   आजच्या या विजयादशमीच्या निमित्ताने स्वतः ला ओळखण्यासाठी या संकुचित सीमांचे उल्लंघन करून बाहेर काय चालले आहे ते उघड्या डोळ्यांनी बघायला हवे.या काल्पनिक भिंती पलीकडे  मुक्त विचार, मुक्त जग आपल्या स्वागतासाठी सज्ज आहेत.तेव्हा आता चला; जात, पात, धर्म अशा सीमा ओलांडून त्या मोठ्या जगाकडे पाहू या! त्या  वेगळ्या जगात आपली नवी ओळख निर्माण करुया. सीमोल्लंघन करूया संकुचित विचारांचे, सीमोल्लंघन करूया अहंकाराचे, सीमोल्लंघन करूया भेदभावाचे!
 खरा तो एकची धर्म जगाला प्रेम अर्पावे!
 या नव्या सीमा ओलांडून सुख, शांती, आरोग्य आणि त्यापाठोपाठ येणाऱ्या समृद्ध आयुष्यासाठी खूप खूप शुभेच्छा!
 हॅप्पी दशहरा!