Sunday, December 5, 2021

डुलकी दुपारची

डूलकी दुपारची.... आयुष्यात काही काही गोष्टींची वेळ यावी लागते असे म्हणतात ते काही खोटे नाही. माझ्या बाबतीत त्यातलीच एक गोष्ट म्हणजे दुपारच्या घटकाभर घेतलेल्या डुलकीत असलेले सुख अनुभवण्याची वेळ येण्यासाठी मला चक्क माझी वयाची साठी यावी लागली... शिकत असताना शाळा दिवसभर असायची,पुढे अगदी कॉलेजही संध्याकाळपर्यंत असायचे आणि कॉलेज लाईफ संपण्यापूर्वीच नोकरीत रुजू झाल्याने दुपारी झोपण्याचे ते सुख कधी मिळाले नव्हते.त्यातच आम्ही पडलो आयुर्वेदाचे हौशी अभ्यासक,आणि आयुर्वेदिक जीवनशैलीत जे वाचनात आले होते त्याप्रमाणे दुपारची झोप म्हणजे रोगांना आमंत्रण! त्यामुळे दुपारची झोप नको रे बाप्पा, असेच मनावर कोरले गेले होते.... आमचे अनेक मित्र छोटे मोठे व्यावसायिक होते ते मात्र या बाबतीत खूप म्हणजे खूप नशीबवान! सकाळी आठ नऊ वाजता आपल्या व्यवसायाच्या जागेवर जायचे,दुपारी घरी येऊन गरम गरम जेवण करायचे आणि मस्त पैकी पडी मारायची! चारनंतर वाफाळलेला चहा घेऊन पुन्हा व्यवसायाच्या ठिकाणी हजर! अशी मजेतली जीवनशैली प्रत्येकाला आकर्षक वाटणे अगदी साहजिक आहे. खरं तर बऱ्याच लोकांना दुपारी झोपावे आणि त्यातले सुख आपल्यालाही उपभोगता यावे अशी आंतरिक इच्छा असते परंतु बहुसंख्य लोकांना त्यांच्या नोकरी व्यवसायामुळे हे केवळ अशक्य असते... माझ्या बाबतीतही हेच होते.मला या दुपारी घडीभर का होईना झोप घेणाऱ्यांचा नाही म्हटलं तरी हेवा वाटत असायचा. ऑक्टोंबर २०१९ मध्ये मी स्वेच्छानिवृत्ती घेतली. निवृत्तीनंतर भरपूर फिरायचे, आपल्या छंदासाठी वेळ द्यायचा, परदेशात ट्रिपला जायचे.ज्येष्ठ नागरिक संघात रमायचे असे रम्य प्लॅन्स तयार होते;पण मार्च २०२०मध्ये कोरोनामुळे लॉक डाऊन लागले आणि जगाचे चक्र अक्षरशः थांबले.आमची निवृत्तीनंतर काय काय करायचे याची पाहिलेली स्वप्ने अक्षरशः कोमेजून गेली!मग सुरू झाली वेळ घालवण्याची लढाई....खाणे, बसणे, वाचन, टिव्ही,घरातल्या घरात येरझाऱ्या, घरातल्या कामातली बिनकामी लुडबुड...तरीही वेळ जात नव्हता! झोप कितीही आकर्षक वाटत असले तरी दुपारी शक्यतो झोपायचे नाही असे ठरवले होते,पण दुपारी जेवण झाले की नुसते बसून कंटाळा यायला लागला.सोफ्यावर बसून पाठ अवघडून येऊ लागली,मग जरा पाठ टेकवू... असे म्हणत दुपारी बेडवर आडवे होणे सुरू झाले आणि त्या आडव्या होण्याचे वामकुक्षीत रूपांतर कधी झाले ते माझे मलाच समजले नाही! न दुपारची झोप आरोग्याला हानिकारक आहे हे मनावर कोरलेले असूनही या डुलकीचा मोह मात्र अनावर होऊ लागला आणि शेवटी मनाची समजूत घातली....त्यातच कुठे तरी एका प्रख्यात वैद्यांनी लिहिलेले वाचनात आले....दुपारच्या जेवणानंतर आटोपशीर वामकुक्षी घेणे आरोग्यास हितकारक असते! मग काय माझ्या वामकुक्षीचे शास्त्रशुध्द कारणही हाताला लागले.... आता पूर्णवेळ 'नो टेन्शन फुल पेन्शन ' अर्थात निवृत्त असल्याने दुपारी दीड दोन वाजता मनसोक्त जेवण करायचे, थोडी शतपावली करायची आणि आवडीचे पुस्तक किंवा मोबाईल मध्ये एखाद्या आवडत्या लेखकाचे आर्टिकल वाचायला घ्यायचे.वाचता वाचता अचानक डोळे जड होतात ती वेळ साधायची आणि निद्रादेवीच्या अधीन होऊन जायचे. या डुलकीतली सुखाची अनुभूती? छे हो ते सुख शब्दात व्यक्त करणे केवळ अशक्य! ती वाचायची किंवा ऐकायची गोष्ट नाही तर अनुभवायची गोष्ट आहे तर उगाच चर्चेत वेळ घालवू नका आपल्याला रुचेल पचेल आणि शरीराला झेपेल इतकी वामकुक्षी अर्थात दुपारची झोप नक्की घेऊन बघा आणि या सुखाची सुंदर अनुभूती जरूर घ्या.... © प्रल्हाद दुधाळ पुणे. 9423012020

No comments:

Post a Comment