Thursday, May 19, 2016

लेबल.

         लेबल.
            माझ  लग्न ठरलं  लग्नपत्रिका छापून आल्या. निमंत्रण  करायला  सुरूवात करायची होती. मी असा विचार केला की ज्या वस्तीत आपण इतके दिवस रहातोय तेथील प्रतिष्ठीत व्यक्तींना आपण प्रथम निमंत्रण पत्रिका देवू या! वस्तीत आमच्या छत्रपती  शिवाजी मंडळाने साईबाबा मंदिर बांधले होते. या साईं मंदिराचा मी सुरूवातीपासून क्रियाशील सदस्य होतो.सर्वप्रथम मी बाबांच्या मुर्तीसमोर लग्नपत्रिका ठेवली. साईबाबाना मनोभावे नमस्कार करून पत्रिका देण्यासाठी पहीली व्यक्ती निवडली- गाढवे कील! या वकील साहेबांचे आणि माझे जरी तोंड ओळख होती तरी कधी समोरासमोर बोलणे झाले नव्हते. मला ते मंदिराच्या चौकात उभा असताना कायम बघायचे.त्यांचा चेहराच असा होता की ते कायम थोडे घुश्शात असल्यासारखे  दिसायचे,मीसुध्दा स्वत: होवून कधी त्यांच्याशी बोलायचा प्रयत्न केला नव्हता.असे असले तरी त्यांची बायको मात्र मला ओळखायची.बऱ्याचदा ती माझ्याशी गप्पा मारायची, येता जाता आस्थेने विचारपूही  करायची.अशा वस्तीत राहून, शिकून मी सरकारी नोकरी मिळवल्याने वकीलीनबाईना माझे नेहमी कौतुक असायचे.तर माझी लग्नपत्रिका द्यायची सुरूवात या वकीलसाहेबांपासून करायच्या हेतूने मी त्यांचा दरवाजा वाजवला गाढवेसाहेबानी दरवाजा उघडला.मला पहाताच त्यांची मुद्रा त्रासिक झाली.
एक अत्यंत तुच्छतेने नजरेचा रागीट कटाक्ष माझ्याकडे टाकून ते फिस्कारले -
" काय आहे रे ?"

" सर पत्रिका द्यायची होती ." मी चाचरत बोललो.

" कसली पत्रिका?" त्यांचा तोच तुच्छतेचा स्वर होता.

" सर पुढच्या सोळा तारखेला माझे लग्न आहे,त्याची पत्रिका द्यायची होती ." माझ्या आवाजाला नको एवढा कंप आलेला होता. माझ्याकडे अविश्वासाने बघत त्यांनी माझ्या हातातून पत्रिका जवळ जवळ हिसकावून घेतली.आता बाईसाहेबही बाजूला येवून उभ्या राहिल्या होत्या.हातात आलेल्या पत्रिकेवर भराभर नजर फिरवत वकीलसाहेबानी मला आपादमस्तक न्याहळले! अत्यंत कुत्सित व् हेटाळणीपूर्ण आवाजात कडाडले .

" तर आता लग्न करणार तू ! नोकरी ना धंदा तुला ! एक पै कमवायची अक्कल नाही, दिवसभर वस्तीतल्या फालतू कारट्यांबरोबर चकाट्या पिटत फिरतोस आणि लग्न करतोय!" 

" आणि काय रे बायकोला कसा पोसणार आहेस? पहिलं काम धंदा बघ, स्वत:च पोट भरायची  सोय कर आणि मग लग्न कर! मुर्ख कुठला! "

गाढवेकीलांच्या तोंडाचा पट्टा जोरात सुटला होता, आवाजही वाढला होता शेजारीपाजारी जमा झाले होते! मला काय आणि कसे बोलावे तेच उमजेना.बाजूला उभ्या असलेल्या बाईसाहेब त्यांना काहीतरी सांगायचा प्रयत्न करत होत्या,पण ते ऐकायच्या मनस्थितीत ते बिल्कूल नव्हते! शेवटी एकदाची कीलीनबाईना बोलायला संधी मिळाली-
" अहो असे काय बोलताय त्याच्याशी?"

" मग काय करू,खेटराने पूजा करू त्याची? कमवायची काडीची अक्कल नाही आणि चाललालग्न करायला !" 

" अहो कुणी सांगितलं तुम्हाला तो नोकरी करत नाही म्हणून ? अहो टेलिफोन खात्याची चांगली सरकारी नोकरी आहे त्याला! चांगला ग्रॅज्युएट झालाय तो!" 

आता मात्र वकील साहेब शांत झाले,पण तरीही माझ्याकडे अविश्वासाने बघत होते.मी खिशातले माझे खात्याचे ओळखपत्र थरथरत्या हाताने त्यांच्या हातात दिले.त्यांनी ते नीट बघितले व परत मला दिले.
" नोकरीला आहे तर मग नोकरीला कधी जातोस. कायम दांडी मारतो वाटतो. जेंव्हा जेंव्हा बघतो तेंव्हा त्या मंडळाच्या फालतू पोरांबरोबर पडीक असतोस!"
आता मात्र मला त्यांचा माझ्याबद्दल असलेला गैरसमज दूर करणे आवश्यक वाटले.
" सर मी रात्रपाळी करतो.दोन दिवसातुन एकदा संध्याकाळी पाच ते सकाळी सात अशी डबल ड्युटी करतो! " 

आता साहेबाना माझ्याशी रागाने बोलल्याचा पश्चात्ताप झालेला दिसत होता.माझा हात धरून त्यानी मला घरात नेले. बाईसाहेब हातावर द्यायला साखर घेवून आल्या.
  चुक त्यांची नव्हती, मी ज्या वस्तीत रहात होतो, ज्या मित्रांच्या सहवासात वावरत होतो,त्यातली अनेक मुले विविध व्यसनांच्या आहारी गेलेली होती.कित्येकानी शिक्षण अर्धवट सोडलेले होते, अनेकाना कामधंदा नव्हता! ही मुले मनाने खुप चांगली होती. पण माणूस म्हणून ही मुले कितीही चांगली असली तरी समाजाने त्याना वाया गेलेली व टारगटपणाचे लेबल चिकटवलेले होते! आणि अशा मुलांच्यात  वावरणारा मी त्यांच्यातलाच एक असणार, असे वाटणे अगदी साहजिक होते! शेवटी तुम्ही कितीही सज्जन आणि चांगले असला तरी तुमच्या कपाळावर थोडेच ते लिहिलेले असते? समाजात तुमचे मूल्यमापन होताना तुम्ही काय काम धंदा करता,तुम्ही किती कमावता,तुम्ही कोठे रहाता,तुमचे मित्र कोण आहेत,तुम्ही घालत असलेले कपडे,इत्यादि वरवरच्या बाबींवरून होते! या गोष्टींवरून तुम्हाला लावायचे लेबल ठरते!

--- (कॉपीराईट)- प्रल्हाद दुधाळ .



Friday, May 13, 2016

भिडस्त

भिडस्त.
असा मी बावळा नी भिडस्त
भोवताली लुटारूंची गस्त
जगणे किती येथे महाग 
मात्र मरण जाहले स्वस्त
घर चंद्रमौळी ही झोपडी
मन माझे परंतु प्रशस्त
राखण्यास दिला देश ज्यांना
त्यांनी केले तयास उध्वस्त
राहती कष्टणारे उपाशी
शेठजी भरपेट नी मस्त
कथा ही असे युगायुगांची
बळी कान पिळती समस्त

   ---प्रल्हाद दुधाळ  

Sunday, May 8, 2016

गती ते सद्गती

गती ते सद्गती.

  परवा मित्रांबरोबर गप्पा चालू होत्या. विषय होता रूटीन  जीवनातल्या  बदलाचे महत्व. आयुष्य जर समरसतेने जगायचे असेल  तर  दैनंदिन आयुष्यात  वरचेवर  थोडाफार  बदल  असायला हवा. क्षणभरासाठी का होईना पण  आपल्या  कंटाळवाण्या आयुष्यात  जो जाणीवपुर्वक बदल करतो त्याला  जगण्यासाठी नव्याने उर्जा मिळते. रटाळ जगणे म्हणजे  आयुष्याला असलेली  रूक्ष अशी  गती !
या गतीमधे काही  सकारात्मक बदल केले  तरच जीवनात प्रगती होते. थांबला तो संपला! एका जागी थांबले तर  एक प्रकारचे साचलेपण  येते . गती,मग ती शिक्षणात असेल तर   स्वत:ला  गती  असलेल्या  विषयांचे सखोल ज्ञान मिळवता येते. त्यासाठी आपल्याला कोणत्या  विषयात गती आहे हे  जाणून  घ्यायला  हवे. एकदा  का ते समजले की मग त्या विषयात पारंगतता मिळवणे सोप्पे होवून जाते, पण  उगाच   आपल्याला गती नसलेल्या  विषयात  ओढून ताणून प्रगती करण्याचा अट्टाहास  आयुष्यभरासाठी महागात पडू शकतो. असा  अट्टाहास  जीवनातील  प्रगतीऐवजी  अधोगतीस कारणीभूत होवू  शकतो! कुणाला  व्यवसायात,कुणाला नोकरीत,कुणाला एखाद्या अभिजात कलेमधे गती असू शकते. ज्याने त्याने  जर वेळीच  स्वत:चा नैसर्गिक कल  ओळखून  त्या दिशेने  प्रामाणिकपणे  प्रयत्न केले  तर  नक्कीच  प्रगती  होते  व  आयुष्याला  अपेक्षित असलेली  गती  मिळते . ड्रायव्हिंग करताना  आपण जसे कुठे थांबायचे, कधी गती  वाढवायची, कधी  गती कमी  करायची,  कोणत्या  दिशेला  वळायचे या सर्व  बाबींचे  भान ठेवागती असेल तरच जीवनात प्रगती होते. थांबला तो संपला. गती मग ती शिक्षणात असेल तर विषयांचे सखोल ज्ञान मिळवता येतेआपल्याला कोणत्या  विषयात गती आहे हे का एकदा समजले की मग त्या विषयात पारंगतता मिळवणे सोप्पे होवून जाते,पण  उगीच  गती नसलेल्या  विषयात  ओढून ताणून प्रगती करण्याचा अट्टाहास महागात पडू शकतो. कुणाला  व्यवसायात,कुणाला नोकरीत,कुणाला एखाद्या अभिजात कलेत गती असू शकते. ज्याने त्याने  जर वेळीच  स्वत:चा नैसर्गिक कल  ओळखून  त्या दिशेने  प्रामाणिकपणे  प्रयत्न केले  तर  नक्कीच  प्रगती  होते  व  आयुष्याला  गती  मिळते . ड्रायव्हिंग करताना जसे कुठे थांबायचे,  कधी गती  वाढवायची, कधी  गती कमी  करायची वा  कोणत्या  दिशेला  वळायचे याचे भान ठेवावे  लागते आणि तसे  गतीत  केलेल्या बदलानुसार  आपण इप्सित स्थळी   पोहोचू  शकतो  त्या प्रमाणेच  मानवी  जीवनात  गतीचे  भान ठेवून  वाटचाल केली  तर  जीवनातील  अंतीम  धेय्य -  सद्गतीपर्यंत  पोहचता येते.

,,,,,,,,,प्रल्हाद दुधाळ  पुणे .९४२३०१२०२० .