Saturday, March 22, 2014

हसतमुख दु:ख.

आज जागतिक हास्यदिनाच्या निमित्ताने सर्वांना हसऱ्या शुभेच्छा! या दिनाचे औचित्य साधून माझी एक पूर्वप्रकाशित कथा..... 
.....................
हसतमुख दु:ख.

      जॉन हा माझा एक मित्र. तसा तो मल्याळी भाषिक, पण त्याचा जन्म पुण्यातला.त्याचे शिक्षणही मराठी माध्यमातले,त्यामुळे तो मल्याळी आहे हे सांगितल्याशिवाय समजत नसे.एकदम अस्सल मराठी बोलायचा! उंची साडेपाच फुटाच्या आसपास,तजेलदार व गोरा चेहरा,एकदम बोलके डोळे. तो जाडसर मिशा ठेवायचा आणि चेहऱ्यावर कायमचे मिश्किल हसू, दुर्मुखलेला वैतागलेला भाव त्याच्या चेहऱ्यावर मी कधीच पाहिलेला नव्हता.उत्साहाने कायमच सळसळत असलेला असा हा माझा मित्र! लौकिक अर्थाने कमी शिकलेला होता,पण चलाख आणि तेव्हढाच हुशारही  होता. स्वभावाने एकदम हजरजबाबी व तेव्हढाच दिलखुलास माणूस! कायम हसतमुख असणारा जॉन आणि मी काही काळ एकाच सेक्शनला काम करायचो.तेथेच त्याची माझी काही काळासाठी का होईना पण अगदी घट्ट मैत्री झाली होती.पुढे माझे प्रमोशन झाले व त्या सेक्शनशी माझा संपर्क जवळ जवळ तुटून गेला. त्या काळातल्या अनेक आठवणी अजूनही ताज्या आहेत. आपले काम अगदी प्रामाणिकपणे करणारा हा जॉन, आपले सहकारी व सुपरवायझर यांच्याबरोबर कायम हसत खेळत, चेष्टा मस्करी व भंकस करत असे. आमची नोकरी अशी मजेत चालली होती! ऑफिसात काम करता करता तो जीवनात घडलेले अनेक मजेदार किस्से सांगायचा. ते किस्से तो असे काही खुलवून सांगायचा की बस्स! त्याच्या विनोदी स्वभावामुळे आमचा ऑफिसातला दिवस कसा जायचा ते कळायचेच नाही.कधी तो असे काही सांगायचा, किंवा अचानक अस काही वागायचा, की नंतर सर्वांचे हसून हसून पोट दुखायचे! मात्र हे सगळ करत असताना तो स्वत: मात्र अत्यंत गंभीर चेहरा करून त्या सगळ्याची मजा घेत असे.

     मधल्या कितीतरी वर्षात जॉनचा संपर्क होऊ शकला नाही.खरे सांगायचे तर करिअर घडवण्याच्या नादात मी त्याला पूर्णपणे  विसरून गेलो होतो.एकदा असाच कुणाशी तरी त्या काळातल्या गप्पा रंगल्या होत्या.जुने सवंगडी कुठे  कुठे आहेत,त्यांचे कसे चालले आहे असे विषय निघत राहिले आणि अर्थातच जॉनचा विषयही निघाला. कुणीतरी तो काही दिवसापूर्वी रिटायर झाल्याचे सांगितले.त्याची आठवण निघाली आणि त्याच्या बाबतीतल्या गमती जमतीही  आठवल्या .नकळत चेहऱ्यावर हसू आले!

       तर अशा या माझ्या अवली मित्राचे काही किस्से-
      आम्हाला त्यावेळी एक महिला सुपरवायझर होत्या.आपल्या कामात त्या अत्यंत हुशार होत्या. आपल्या हाताखाली काम करणाऱ्या स्टाफच्या मागे उभे राहून अत्यंत चिवटपणे हवे ते काम करून घेण्यात त्या वाकबगार होत्या.या त्यांच्या चिवटपणामुळे सेक्शन मधील माणसांकडून त्या भरपूर काम करून घेत असत. असे करताना त्या एवढ्या पिडायच्या की समोरच्याला त्यांचा राग यायचा;पण त्यांचा अधिकार व वयाचा आदर ठेवून सहसा त्यांना कोणी उलट उत्तर देत नसे.खर तर त्या मुद्दाम असे वागत नसत; पण कामाच्या नादात हे त्यांच्या लक्षातच येत नसे!

       तर, झाले काय की, माझ्या या मित्राला सलग आठ दिवस या सुपरवायझरकडून भरपूर काम दिले गेले आणि ते काम तो विनातक्रार करत राहिला, त्या दिवसात त्याच्या घरी कुणीतरी आजारी होते,त्यामुळे त्याला त्या आठवड्यात सुट्टी हवी होती;पण या सुपरवायझरकडून ती दिली गेली नाही.त्याची खरी समस्या त्याने ऑफिसमध्ये कुणालाच सांगितली नव्हती. तो आपले काम करत राहिला. मधेच एक दिवस तो ऑफिसला आला नाही.त्या नंतरच्या दिवशी तो ऑफिसला थोडा उशिरा आला आणि तडक सुपरवायझरच्या टेबलाकडे गेला.त्याचा चेहरा अत्यंत गंभीर होता.तो सुपरवायझर समोर बसला.
  नेहमी अत्यंत हसतमुख असणाऱ्या जॉनचा आजचा मूड पाहून सेक्शनमधील सगळे काळजीत पडले होते.आता काय घडणार याचा अंदाज नसल्यामुळे सगळेजण एकदम गोंधळून एकमेकांकडे बघत होते.सुपरवायझरने  त्याला काही विचारायच्या आतच त्याने पिशवीतून आणलेला मोठा दगड टेबलावर ठेवला! दगड पाहून सुपरवायझर बाईंची पार घाबरगुंडीच उडाली.त्यांच्या तोंडातून एकही शब्द फुटेना! रागा रागात जॉन खेकसला

       “मला जर आता कोणी काही बोलले तर बघा! एक तर तुमच्या डोक्यात दगड घालेल किंवा माझे डोके तरी त्यावर आपटून घेईल!”

     असे काही घडू शकेल याचा विचारही कुणाच्या डोक्यात आला नव्हता .सेक्शन मधील सगळेजण एकदम भांबावून गेले होते.एकदम स्तब्धता पसरली.जॉनला अशा प्रकारे वागताना कुणीच कधी पाहिले नव्हते! सुपवायझरला त्याच्या हातातला दगड पाहून आधीच घाम फुटलेला होता! पूर्ण सेक्शनमधे विचित्र शांतता पसरली.सर्वांच्या चेहऱ्यावरची भीती पाहून जॉन ने चेहरा अजूनच गंभीर केला आणि अचानक तो खो खो हसायला लागला! 
     ही सगळी मस्करी होती हे लक्षात आल्यावर सेक्शन मधील सगळेजण त्या हसण्यात सामील झाले व वातावरण निवळले. 
झालेल्या सर्व प्रकाराबद्दल जॉनने बाईंची तसेच सर्वांची माफी मागीतली.........
 तर असा हा जॉन!
     एकदा काय झाल की, हा जॉन आणि त्याचे काही मित्र लोकलने एका लग्नासाठी पुण्याहून दौंडला निघाले होते. नेहमी प्रवास करत असल्याने जॉनकडे दौंड-पुणे असा रेल्वेचा पास होता;पण बरोबर असलेल्या पाच-सहा मित्रांकडे मात्र पास नव्हते. बाकीच्यांची तिकिटे काढणे जरुरी होते; पण त्या मित्रांनी एक थ्रील म्हणून विदाउट तिकीट प्रवास करायचा निर्णय घेतला! जॉनने हे ठीक नाही हे सर्वांना समजाऊन सांगितले;पण कुणीच त्याचे ऐकेना! 
सगळेजण तिकीट न घेताच दौंड शटलमधे चढले. जॉनला काळजी पडली की जर तिकीट चेकरने या सर्वाना विदाउट तिकीट पकडले तर काय? 
     पुणे ते दौंड प्रवासात या मित्रांबरोबर जरी तो त्यांच्या हास्यविनोदात सामील होत होता तरी त्याचा एक डोळा  टी सी कडे होता. जर तिकीट चेक करण्यासाठी टी सी आला तर आपल्या या मित्रांना कसे वाचवायचे याचाच जॉन पूर्ण प्रवासात विचार करत होता.
    त्याने विचापुर्वक मनाशी एक योजना तयार केली.त्यांच्या सुदैवाने दौंड पर्यंत डब्यात टी सी आला नाही.
     आता गाडी दौंड स्टेशन वर आली व एकमेकांची थट्टा मस्करी करत ही मंडळी स्टेशनवर उतरली.जॉनची नजर टी सी चा अंदाज घेत होती.त्याने टी सी कुठे आहे ते पाहून ठेवले. तो नेमका बाहेर जाण्याच्या दरवाजावर उभा होता व प्रत्येकाची तिकिटे तपासूनच बाहेर सोडत होता.
     जॉनने सर्व मित्रांना परिस्थितीची कल्पना दिली व योजना सांगितली....
    सर्व मित्रांनी थोडा वेळ जागेवरच जॉनच्या इशाऱ्याकडे लक्ष देत थांबायचे ठरले. 
    जॉन स्टेशनच्या बाहेर पडायच्या गेटकडे निघाला.आता थोडी गर्दी कमी झाली होती.जॉन सावकाश चालत टी सी च्या दिशेने गेला व त्याची नजर जॉनकडे गेली त्याने तिकिट घेण्यासाठी हात पुढे केल्याबरोबर जॉनने उलट्या दिशेने पळायला सुरुवात केली!
 “चला बरे सावज सापडले!”  
असा विचार करून टी सी ने जॉनच्या मागे धावायला सुरुवात केली.  
जॉन पुढे व टी सी त्याच्या मागे पळायला लागला. 
    जॉन मागे पहात त्याचा अंदाज घेत घेत पळत होता! थोडे अंतर पळाल्यानंतर जॉन अचानक समोरच्या चहाच्या दुकानासमोर ब्रेक लावल्यासारखा थांबला व हाश-हुश्श करत चहावाल्याला चहाची ऑर्डर दिली! 
असे अचानक थांबलेल्या जॉन लापाहून टी सी धापा टाकत त्याच्याजवळ आला व त्याच्यावर जोरात खेकसला....
“टिकट बताव!”
जॉन ने त्याच्याकडे शांतपणे पाहिले व विचारले
“क्यू क्या हो गया?”
“आता बरा सापडला”  
या अविर्भावात टी सी ने दटावले...
“क्यू क्या?  पहले टिकट बताव!”
  जॉनने आरामात मागच्या खिशातून आपले पाकीट काढले, थोडी शोधाशोध केल्यासारखे दाखवले व तीन महिने चालणारा पास काढून त्याच्या समोर धरला!
आता मात्र टी सी चा चेहरा बघण्यासारखा झाला होता!
त्याने वैतागून विचारले
“पास है? फिर भागा क्यू ?”
“अरे साब, मुझे चाय पिने का था! चाय के लिये भागना मना है क्या?  ऐसा कहां लिखा है? मै बाहर थोडे ही भाग रहा था? आओ ना साब आपभी चाय पिओ!”
  “काय हा पागल माणूस आहे!”  अशा नजरेने टी सी ने जॉन कडे पाहिले व त्याचा पास परत दिला आणि घाईघाईने तो बाहेर जाणाऱ्या गेटकडे निघाला.
    जॉनने आरामात चहा घेतला,चहाचे पैसे चुकते केले व गेटवर आला.टी सी कडे पाहून मिश्कीलपणे पास दाखऊ का असे खुणेनेच विचारले.
   वैतागूनच त्याने त्याला हात जोडले व बाहेरचा रस्ता रस्ता दाखवला!
  जॉन बाहेर आला.टी सी ला बाजूला नेवून तयार झालेल्या संधीचा फायदा घेऊन जॉनचे मित्र गेटमधून बाहेर पडून समोरच्या झाडाखाली जॉनची वाट पहात होते.हसत हसत जॉन पुन्हा त्यांच्या गप्पांत सामील झाला!....

       त्याचा अजून एक किस्सा असाच रंजक आहे. एकदा तो आपल्या बाईकवरून चालला होता घाईमध्ये त्याच्या लक्षात आले नाही व चुकून एकेरी वहातूक असलेल्या गल्लीत विरुध्द दिशेने गेला. पुढच्या छोट्या वळणावरच वहातुक पोलीस उभा होता! आता मागे वळणे तर शक्य नव्हते.तो तसाच पुढे निघाला.पोलिसाने शिट्टी मारली व अपेक्षेप्रमाणे त्याला अडवले! त्याचे लायसन्स घेतले,चेक केले व 'नो एन्ट्री'तून आल्याबद्दल पावती फाडायला सांगितले.जॉनने ठरवले की आता याला कसेही करून पटवायला हवे. तो हवालदाराला म्हणाला-
“काकामाफ करा! घाईत माझ्या लक्षात आले नाही, पुन्हा असे नाही होणार!” ;पण हवालदार ऐकण्याच्या मनस्थितीमध्ये नव्हता.
तो दंडाची पावती फाडण्यासाठीच आग्रही होता! जॉन पुन्हा पुन्हा  काकुळतीला येऊन पैसे नाहीत असे सांगत होता;पण हवालदार काही ऐकेना. शेवटी जॉनने हवालदाराला हळूच कानात काहीतरी सांगितले.हवालदाराने विचित्र नजरेने त्याचेकडे पाहिले व मान डोलावली.जॉनने आपली मोटारसायकल वळवली व पुन्हा जेथे त्याने जेथे ‘नो एन्ट्री’ मध्ये प्रवेश केला होता त्या चौकाच्या तोंडाशी गाडी लाऊन उभा राहिला तेथून त्याला हवालदार जरी आडबाजूला उभा होता तरी दिसत होता.गल्लीतून नुकताच बाहेर तो येऊन उभा राहिल्यामुळे पाठोपाठ आलेल्या दोन तीन बाईकवाल्यांनी त्याला विचारले 
“पुढे हवालदार आहे का हो?”
जॉनने आडवी मान हलवल्याबरोबर सगळेजण ’नॉ एन्ट्री’ मधून पुढे गेले, त्यांना पाहून मागे एकापाठोपाठ अजून चारपाच बाईक गेल्या.
जॉनने पोलिसाला हाताने खूण केली.
“जाउ का?”
हवालदार हसला व त्याने त्याला खुणेनेच जायला सांगितले!
जॉनने आपली बाईक चालू केली व पुढे आपल्या मार्गाने निघाला.
हवालदाराशी केलेल्या मांडवलीप्रमाणे जॉन ने दहा-बारा ‘ बकरे ‘ हवालदाराला दिले होते!......
     अशीच एक मजेदार घटना बसच्या संदर्भातली ...  
    जॉन  दुपारची ड्यूटी करायचा.पुणे स्टेशनवरून भोसरीकडे जाणारी बस पकडून तो रात्री  दहाला घरी जायचा.दापोडीला तो उतरायचा. दुपारची ड्युटी असली की तो असाच बसने घरी जायचा. त्या दिवशी ऑफिसमध्ये जरा जास्त काम होते,त्यामुळे त्याला भोसरीला जाणारी रात्रीची शेवटची बस मिळाली.बसमध्ये दोन तीन प्रवाशीच होते, तेही बोपोडीला उतरून गेले. आता हा एकटाच प्रवासी म्हणून बसमध्ये उरला.
 दापोडी आल्यावर तो बसच्या दरवाजासमोर जावून उभा राहिला; पण शेवटची ट्रीप असल्यामुळे ड्रायव्हर व कंडकटर दोघांचेही लक्ष नव्हते.जॉनने बस थांबली नाही हे पाहून स्वत:च बेल ओढली;पण तोपर्यंत दापोडी ओलांडून बस अर्धा किलोमीटरवर पुढे आली होती!
पुढच्या थांब्यावर बस थांबली.                                                                                                         ”घ्या उतरून ...” कंडकटरने जॉनला फर्मावले.                                                        ‘अरे कंडकटरसाहेब मला दापोडीला उतरायचे आहे, मला दापोडीलाच सोडा.                                        “उतरून घे रे, जा ना चालत परत!” 
कंडकटरने उद्धट स्वरात सांगितले;पण जॉन खाली उतरला नाही.                         “कंडकटसाहेब मला दापोडीला उतरायचं आहे,तुम्ही गाडी तेथे थांबवली नाही, आता परत गाडी वळवा आणि मला दापोडीच्या थांब्यावर सोडा, इथे मी उतरणार नाही!”  जॉन विनवणीच्या सुरात बोलत होता.                                                                     “ये उतर खाली; नाहीतर गाडी आता डेपोला जाणार आहे,तिथेच उतरवून देईन!”
 आता त्याच्या मदतीला ड्रायव्हर सुध्दा आला. “मी उतरणार नाही सांगितले ना ,गाडी डेपोला घे नाही तर पोलीस स्टेशनला! माझे दापोडीचे तिकीट आहे, मला दापोडीला सोडायचं”    
आता जॉनने एका बाकावर बैठक मारली. 
जॉन तसा तब्बेतीने मजबूत होता त्यामुळे बळजबरी करणे तर शक्य नाही हे दोघांच्याही  लक्षात आले.                                                                                 “चल रे घे डेपोला गाडी, कसा उतरत नाही ते बघू!” कंडकटरने ड्रायव्हरला फर्मावले.                                 आता बस भोसरी डेपोला आली, गेटवर थांबली. ते दोघे जॉनला उद्धटपणे उतरायला सांगू लागले.धमक्या देवू लागले.   
जॉनचा सत्याग्रह चालूच होता.तो बाकावरून जाम उठायला तयार नव्हता!
 आता कंडकटर व ड्रायव्हरच्या मदतीला सुरक्षा रक्षकही होता;पण त्याच्या अंगाला हात लावायचं धैर्य कुणालाच होत नव्हतं!.
काय करावे ते तिघांनाही समजत नव्हते.शेवटी गेटवरून त्यांनी डेपोच्या व्यवस्थ्यापकाला फोन केला.तो समझदार होता.
त्याने ड्रायव्हरला सांगितले. “जा ,त्याला दापोडीला सोडून ये. तक्रार झाली तर नोकरीवर गदा येईल!” 
   ड्रायव्हरने नाईलाजाने गाडी परत दापोडीकडे वळवली थांब्यावर आल्यावर जॉनला म्हणाला..                                                                                             “आता तरी उतर ना बाबा!”                                                                                मठ्ठाप्रमाणे बसलेल्या जॉनने आता स्मितहास्य केले व खाली उतरला, तोपर्यंत रात्रीचे बारा वाजून गेले होते.                 
    ही गोष्ट इथेच संपती तर तो जॉन कुठला.दुसऱ्या दिवशी जॉनने शहर वाहतूक व्यवस्थेच्या मुख्य महाव्यवस्थ्यापकाला भेटून रीतसर लेखी तक्रार केली आणि मग पुढील पंधरा दिवस ते उद्धटपणे बोलणारे कंडकटर व ड्रायव्हर जॉनच्या हातापाया पडत होते, परत परत माफी मागत होते, दिलेली तक्रार मागे घेण्याची विनंती करत होते! 
  शेवटी जॉनने लेखी माफीनामा घेवून तक्रार मागे घेतली! तर असा हा जॉन मेणाहून मऊ, तर प्रसंगी वज्राहून कठीण होता......
.....तर जॉन रिटायर झाला.अलीकडे त्याच्याशी संपर्क नव्हताच....
दिवस,महिने, वर्षे जात राहिली....
 ....परवाच त्याकाळी आमच्याबरोबर त्या सेक्शनमधे काम करणारा दत्ताराम भेटला.बराच वेळ इकडच्या तिकडच्या गप्पा मारत बसलो. सेक्शन मधील सगळी धमाल पुन्हा आठवली!
“अरे जॉनची काय खबर?” "बर चाललय ना त्याच?"
दत्ताराम गंभीर झाला.
“फार हाल झाले रे शेवटी त्याचे!”
“अस काय झाल?” “शेवटी म्हणजे ? तो आहे ना?”
“नाही रे महिन्यापूर्वीच तो गेला! “.... माझ्यासाठी हा मोठा धक्का होता.
“कसा गेला रे, आजारी होता का?”
दत्तारामने सांगितले...
"अरे आयुष्यभर तो दुर्धर आजाराशी लढत होता! आपल्या सेक्शनमध्ये असतानाच त्याचा आजार त्याला समजला होता; पण कुणालाच माहीत होऊन दिले नाही त्याने! कायम हसत होता, हसवत होता! त्याच्या चेहऱ्यावर आपण कायम फक्त मिश्कील हसूच बघत होतो; पण आयुष्यभर तो दुर्धर कैन्सरशी लढत होता! अगदी जवळच्या माणसांना सुध्दा त्याचा हा आजार माहीत नव्हता! घरी एकटाच असायचा! शेवटी शेवटी त्याचा आजार खूपच बळावला व त्यातच गेला तो!”
दत्तारामला अगदी भरून आलं होतं.
    मी सुन्नपणे बसून राहिलो.खरच आपण समोरच्या माणसाला 'ओळखतो' असे म्हणतो पण कितपत ओळखत असतो ? 
अशा अनेक हसऱ्या चेहऱ्यामागची किती जणांची दु:खे आपल्याला माहीत असतात?
.......मनोमन जॉनला मी सलाम केला.
........ती संध्याकाळ खूपच उदास उदास होती !!!!                                                                © प्रल्हाद दुधाळ.(९४२३०१२०२०)

प्रकाशित -साहित्य चपराक दिवाळी विशेषांक २०१५ .

Friday, March 21, 2014

अहंकार.

                                                       अहंकार. 
            कधीतरी आपण बसने प्रवास करत असतो आपला अत्यंत चांगला मूड असतो.शेजारच्या सीटवरील माणसाशी मस्त गप्पा मारत मजेत प्रवास करू, असा विचार तुम्ही करत असता.तशी गप्पा मारायला सुरुवातही तुम्ही करता पण शेजारचा माणूस तुच्छतेने तुमच्याकडे एक नजर टाकतो व मान वळवून बसतो.त्याच्यात असणाऱ्या अहंकारामुळे तो तुम्हाला बोलण्यायोग्य समजत नाही!
                कधी तुम्ही एखाद्या नातेवाईकाच्या किंवा मित्राच्या घरच्या लग्न समारंभाला जाता अनेक ओळखीची मंडळी आजूबाजूला वावरत असतात,पण प्रत्येकजण आपण कुणीतरी स्पेशल असल्याच्या थाटात वावरत असतो. आपल्याच विश्वात रममाण झालेला असतो.चुकून कोणी बोलला तरी तो स्वत:बद्दलची मीपणाची टेप वाजवायला लागतो.एकूणच ”मी असा आणि मी सा याचा जपच ऐकू यायला लागतो.
                अशा प्रकारे आपल्या दररोजच्या आयुष्यात अनेक अहंकारी व्यक्तींशी आपला संबंध येत असतो तर कधी कधी आपण सुद्धा अहंकार बाळगून समोरच्याशी वागत असतो! काय असतो हा अहंकार? माणसाच्या स्वभावात तो कसा येत असावा? प्रत्येक माणसाच्या स्वभावात अनेक गुणअवगुण असतातच. येथे अहंकार या अवगुणाबद्द्ल मी चर्चा करणार आहे.
    माणसातला सर्वात धोकादायक असलेला अवगुण म्हणजे त्याच्यामधे असणारा अहंकार( इगो) होय! माझ्या मते जन्मानंतर काही दिवसच लहान मूल खऱ्या अर्थाने निरागस असते!तेवढेच मोजके काही दिवस कुठल्याही भाव भावना त्याच्या मनात नसतात,पण थोड्या दिवसातच त्याला आपली जवळची माणसे-जसे की आई, वडील,आज्जी, आजोबा वा इत्तर नातेवाईक ओळखायला येऊ लागतात.आपली जवळची माणसे कोण?अनोळखी कोण? याचा त्याला बोध व्हायला लागतो त्यातही आपल्या माणसांपैकी त्याचे कोण जास्त लाड करतो तेही हळुहळु त्याला समजायला लागते.त्यामुळे नकळतआवडता-नावडता ही भावना त्याच्या मनात रुजली जाते.त्यामुळेच काही ठराविक माणसे समोर दिसली की बाळाची कळी खुलते तर काही व्यक्ती समोर येताच बाळ भोकाड पसरते! हळू हळू त्यातल्या आवडत्या माणसांवर फक्त त्याचा एकट्याचा अधिकार असल्याची भावना किंवा समज त्याला यायला लागते.थोडक्यात मोठेपणी ज्या बऱ्यावाईट सवयी लागू शकतात त्याची सुरुवात नकळत या निरागस वयातच होते.यापुढची पायरी म्हणजे त्याला त्याच्या वस्तु कोणी घेतलेल्या आवडत नाहीत.चुकुन जर त्याच्या माणासांवर, त्याच्या वस्तुंवर कुणाचे अतिक्रमण झाले तर रडून वा गोंधळ घालुन ते आपला निषेध व्यक्त करु लागते. मी म्हणजे कुणीतरी स्पेशल व्यक्ती असल्याची जाणीव त्याला व्हायला लागते त्याच्या  हसण्याला बोबड्या बोलण्याला एवढेच काय प्रत्येक लहान मोठ्या बाललीलांना मिळणारा प्रतिसाद त्याच्या मनावर कुठेतरी नोंदवला जातो. त्याच्या पालकांकडूनही त्याच्या प्रतिक्रियेला लगेच सकारात्मक प्रतिसाद दिला जातो त्याच्या हट्टाला नकळत खतपाणी मिळते त्याला विशेष महत्व मिळते व हळूहळू तशा प्रतिसादाची त्याला सवय जडते.आपण कुणीतरी विशेष आहोत आणि आपण जसे पाहिजे तसे आजुबाजुच्या माणसाना वागायला भाग पाडू शकतो ही जाणीव या चक्रातली पुढची पायरी असते.ही पायरी म्हणजे माणसामधील अहंगंडाचा मीपणाचा पाया असतो.पुढच्या आयुष्यात हीच व्यक्ती कुणाचा तरी मुलगा, कुणाचा तरी मित्र वा नातेवाईक म्हणून ओळखला जातो या बरोबरच तो उच्च शिक्षण घेउन आपल्या नावासमोर वेगवेगळ्या पदव्या लावायला लागतो,आपल्या शिक्षणाला साजेशी नोकरी त्याला मिळते अथवा एखादा बडा उद्योग तो सुरु करतो.आपल्या कर्तुत्वाच्या जोरावर तो सर्व प्रकारचे यश मिळवतो.त्याची स्वत:ची ओळख आता बनायला लागते,बंगला गाडी,नोकर चाकर अशी सर्व प्रकारची सुखे हात जोडून त्याच्या समोर उभी रहातात.सुंदर पत्नी व गोंडस मुळे या वैभवात अजून भर घालतात सत्ता आणि संपती व ऐश्वर्य एकदा मिळाले की त्याबरोबरच या सत्ता व श्रीमंतीचा कैफ त्याला चढायला लागतो.काही खुशमस्करे त्यांचा अहंकार कुरवाळत त्याच्या कडून आपला योग्य तो फायदा करून घेतात. समाजात आपण कुणीतरी विशेष आहोत आपला वेगळाच वट आहे असे तो समजायला लागतो,आपला सामाजिक व आर्थिक स्तर इत्तरांपेक्षा वरचा असल्याची भावना व त्या सोबतची मग्रुरीही स्वभावात व त्याच्या वागण्या बोलण्यात येते.अहंकारी माणूस स्वत:ला विशेष मानत असल्यामुळे तशाच प्रकारची विशेष वागणुक सर्वांकडून त्याला मिळायला हवी अशी नकळत अपेक्षा व पुढच्या टप्प्यात जबरदस्ती आजुबाजुच्या माणसांना तो करायला लागतो. ही विशेष वागणुक म्हणजे त्याला त्याचा हक्क वाटू लागतो! प्रसंगी साम दाम दंड भेद अशी सर्व प्रकारची आयुधे वापरुन हा विशेष दर्जा कायम राखण्याचा प्रयत्न केला जातो.एकदा का ही ग ची बाधा त्याला झाली की असा माणुस नाती-गोती,सखे-सोबती अशा सगळ्यां नात्यांशी फारकत घेतो.आपला अहंकार कुरवाळत बसण्याचे त्याला व्यसनच लागते.हा अहंकाराचा फुगा मग फुगतच रहातो.अशा अहंकारी माणसाचा संबंधच नको असा विचार करून आजुबाजुला वावर असणारी माणसे एक एक करुन त्याच्यापासून तन व मनाने दूर होतात.त्याच्या घमेंडखोर बोलण्याने काही संबंध तर तो स्वत:च तोडतो. या सर्वाचा परिणाम म्हणून मने दुखावलेली अशी अगदी जवळची वा संबंधातली माणसे दुरावतात, पण अहंकारी माणसाला त्याची जाणीव नसते.मित्रमंडळी,नातेवाईक,धंद्यातले भागीदार, हाताखालचे कर्मचारी एवढेच नाही तर कुटूंबातील जवळच्या व्यक्तीसुध्दा अशा माणसाला टाळायला लागतात व एक दिवस असा उगवतो की त्याच्या अहंकाराबरोबर तो फक्त एकटाच असतो.त्याच्या हट्टी,दुराग्रही व अहंकारी स्वभावामुळे तो मानसिक आजाराला बळी पडायला लागतो अशा माणसाने वेळीच आपला अहंकारी स्वभाव स्वत:च बदलण्याचा प्रयत्न केला नाही तर त्याचे भयंकर परिणाम त्या माणसाला आयुष्यभर भोगावे लागतात.
                अहंकार कशाचाही असू शकतो.कधी कुणाला विद्वत्तेचा,कुणाला सत्तेचा,कधी संपत्तीचा तर कधी फुकट्च्या बडेजावाचाही अहंकार असु शकतो. अहंकार मग तो कोणत्याही प्रकारचा असो तो वाईटच,नाही का?
तुम्हाला काय वाटते ?
                            ............प्रल्हाद दुधाळ.पुणे.
(९४२३०१२०२०)