Tuesday, September 25, 2018

मढेघाट

मढेघाट ...
दररोजच्या धकाधकीच्या शहरी जीवनाचा कधीतरी खूप कंटाळा येतो.या धावपळीतून एखादा दिवस तरी ब्रेक मिळावा असे आतून वाटत असते;पण समोर उभे असलेले कामाचे डोंगर यावर विचारही करू देत नाही तर तो अमलात आणणे तर खूप लांबची गोष्ट. कधीतरी बोलाफुलाची गाठ पडते आणि अचानक एखाद्या एकदिवसीय सहलीचा प्रस्ताव समोर येतो.रूटीन आयुष्यातून एक दिवस का होईना पण बाहेर पडता येईल म्हणून आपण तो प्रस्ताव लगेच स्वीकारतो.आपण कुठे जाणार आहोत,सहलीत नक्की काय बघणार आहोत याचा विचार येथे गौण होतो.एक दिवसाचा बदल एवढाच एक विचार यामागे असतो.माझेही असेच झाले.आम्हा पुण्यात रहात असलेल्या गाववाल्यांचा एक मंच आहे आणि या मंचाच्या माध्यमातून वेगवेगळे उपक्रम राबवले जातात.महिन्यातून एकदा आम्ही भेटत असतो."या महिन्यात आपण एक दिवसाची एक सहल आयोजित करत आहोत" या प्रस्तावाला मी लगेच प्रतिसाद दिला तो हवा असलेला एक दिवसीय बदल या विचातूनच!    काल प्रत्यक्ष सहल सुरू झाल्यावर   मात्र पुण्यापासून इतक्या जवळ अशी देखणी उर्जादायी ठिकाणे असूनही अजूनपर्यंत आपण ती कशी काय पाहिली नव्हती याबद्दल क्षणभर खंत वाटली. आमची ही सहल सुरू झाली ती खडकवासला धरणापासून! मग आम्ही पानशेत व वरसगाव ही धरणे पाहून वरची खिंड ओलांडून गुंजवणी धरणाकडे कूच केले.या खिंडीतून एका वेळी एका बाजूला तीन धरणे आणि दुसऱ्या बाजूला गुंजवणीचा नजारा अक्षरशः अवर्णनीय होता!
    केवळ एका हिरव्या रंगाच्या या अगणित छटा पहाताना भान हरपून गेले!रस्त्याच्या दुतर्फा विविध रंगांची रानफुले अगदी स्वागताला उभी असल्यागत डोलत होती. निसर्गाने अशा सजवलेल्या मार्गाने आम्ही अलगद गुंजवणी गावात उतरलो.आता भूक लागली होती.विशाल नावाच्या हॉटेलमध्ये मिसळपाव चापून आमचा पुढचा प्रवास सुरू झाला. आता आम्ही तोरणा किल्ल्याच्या बाजूने मढे  घाट बघायला निघालो होतो. आत्तापर्यंतच्या अनुभवावरून असे वाटत होते की तेथे मढे नावाचे गाव असेल आणि त्या गावाच्या नावावरून त्या घाटाचे हे नाव पडले असेल;पण प्रत्यक्षात वेगळाच इतिहास समजला. कोंढाणा किल्ला जिंकताना शिवबाचा शूर मावळा तानाजी मालुसरे कामाला आला.गड आला पण सिंह गेला.या सिहाचे शव   अंत्यसंस्कारासाठी या अत्यंत अवघड अशा घाटाने एका रात्रीत त्याच्या कोकणातील मूळ गावी नेले होते.बोली भाषेत शव म्हणजे मढे, म्हणून या घाटाचे नाव मढे घाट असे पडले. इथल्या निसरड्या वाटेने तोल सांभाळत खाली अर्धा किलोमीटर गेल्यावर विहंगम असा लक्ष्मी  धबधबा पाहिल्यावर प्रवासाचा सगळा शीण कुठल्या कुठे निघून जातो! वरच्या कड्यावरून दिसणारे तळकोकण नजरेत साठवू म्हटले तरी साठवता येत नाही. हिरवाईने सजलेली इथल्या सृष्टीचा नजारा इतका मनमोहक होता की परत निघावे असे वाटत नव्हते!आमचा हा सह्याद्री केवळ दगड धोंड्याचा नाही तर येथील निसर्गसौंदर्याने संवेदनशील मनाला मोहिनी घालण्याची अदा या सौंदर्यात नक्कीच आहे याची साक्ष पटते! दुपार उलटून गेली होती आता पोटात कावळे कोकलायला लागले होते त्यामुळे गाडीत बसलो आणि वाजेघरकडे कूच केले ...(क्रमशः)