Wednesday, October 18, 2017

मला बोनस नको!

मला बोनस नको!
दसरा दिवाळी जवळ आली की पुर्वीच्या काळी खाजगी क्षेत्रातल्या कामगारांमधे " या वर्षी बोनस किती मिळणार?"  याची चर्चा सुरू व्हायची.अपेक्षित आकडा बोनस म्हणून मिळणार नसला तर कामगार युनियनकडून आंदोलनाचे बिगूल वाजायचे काही वेळा संपाचे हत्यारही वापरले जायचे.व्यवस्थापन आणि कामगार नेत्यांत चर्चा झडायच्या आणि शेवटी बहूतेक ठिकाणी सन्मान्य तोडगा निघायचा.बोनस मिळाला की कामगार खूष असायचे आणि दिवाळीचा आनंद दुप्पट व्हायचा! आम्ही पडलो  सरकारी नोकर त्यामुळे बोनस मिळायचा प्रश्नच नव्हता.आमची दिवाळी फेस्टीवल ॲडव्हांसवर साजरी व्हायची. काही वर्षे गेली आणि सरकारी क्षेत्रातल्या रेल्वे पोस्ट आणि टेलिफोन खात्यासारख्या खात्यात  काही प्रमाणात बोनस मिळायला लागला.
    जेव्हा आमच्या खात्यात पहिल्यांदा बोनस जाहीर झाला  तेव्हा आता आपली दिवाळीही अगदी खाजगी क्षेत्रातल्या कामगारांएवढी नाही तरी पुर्वीपेक्षा जास्त आनंदाची होणार या विचाराने सरकारी नोकरही खुष झाले.
     बोनस मंजूर झाला आणि दसऱ्याच्या आधी त्याचे वाटप करावे असा आदेशही निघाला. या बातमीने आमच्या खात्यातल्या कर्मचाऱ्यांत चैतन्य पसरले. बोनसच्या रकमेत काय खरेदी करायची याची स्वप्ने रंगवली जाऊ लागली. खरे तर मिळणारी रक्कम फार मोठी नव्हती पण छोट्या छोट्या गोष्टीत आनंद मानण्याचा तो काळ होता. आमचे  एक  सुपरवायझर सोडून आमच्या ऑफिसातील सगळेजण बोनस मिळणार म्हणून  आनंदात होते. हे सुपरवायझर मात्र म्हणत होते ..
" मी सरकारी नोकर आहे आणि मी जे काम करतो त्याचा मला पगार मिळतो, जो पगार मिळतो तो पुरेसा आहे.मी बोनस घेणार नाही!"
  ते फक्त बोलले नाहीत तर खरचं त्यांनी बोनसची रक्कम स्वीकारली नाही!
   अशीही भेटली माणसे!
... प्रल्हाद दुधाळ.