Sunday, November 22, 2015

मी एक नाट्य कलाकार.

मी एक  नाट्य कलाकार.
 माझा आणि नाटकाचा संबंध तसा मुळीच नव्हता.शाळेत असताना गावात एक नाटक कंपनी आली होती.दररोज एका नाटकाचा प्रयोग व्हायचा.शाळेच्या पटांगणावर या नाटकाचे प्रयोग व्हायचे.नाटकाचे तिकीट पन्नास पैसे होते.दररोज पन्नास पैसे खर्च करणे तर शक्यच नव्हते.माझा भाउ त्याकाळी वायरमन ची फुटकळ कामे करायचा.एम एस ई बी च्या वायरमनशी त्याची मैत्री होती या ओळखीच्या जोरावर मला ही नाटके फुकटात पाहायला मिळाली.आता सगळी नावे आठवत नाहीत पण या स्टेजवरच मी 'सती महानंदा' 'उमाजी नाईक' तसेच काही ऐतिहासिक नाटके पाहिली.खेड्यात यात्रा जत्रेत मुख्यत्वे तमाशा/लोकनाट्यात  वगाचे प्रयोग मी मन लावून बघायचो.तेव्हढाच माझा नाटक/लोकनाट्य या कलांशी संबंध आला होता.हायस्कूलमध्ये असताना आम्हाला विद्यासागर नावाचे शिक्षक होते.ते नुकतेच पुण्याच्या बालगंधर्व रंगमंदिरात  श्रीराम लागू यांचे 'नटसम्राट' व काशिनाथ घाणेकरांचे 'अश्रुंची झाली फुले' ही नाटके पाहून आले होते.त्यांच्यावर या नाटकांनी एवढी जादू केली होती की वर्गात ते दोन्ही नाटकांच्या प्रयोगाचे हुबेहूब वर्णन करत.नाटकातले  सगळे संवाद त्यांनी तोंडपाठ केले होते.संपूर्ण प्रयोग अगदी सर्व पात्रांसहित ते वर्गात जिवंत करायचे.त्यावेळी आपण एकदा तरी बालगंधर्व रंगमंदिरात जावून नाटक पाहायचेच हे मनाशी ठरवले होते पण त्या वयात माझ्यासाठी ते एक दिवास्वप्नच  होते!मी मिळेल त्या नाटकांची पुस्तके मात्र मन लावून वाचत होतो.
   पुढे शिक्षणासाठी म्हणून मी पुण्यात आलो.दररोज बालगंधर्व समोरच्या जंगली महाराज रस्त्याने सायकल चालवत मी कॉलेजमध्ये जायचो पण या तेथे जावून नाटक पहाणे हे स्वप्नच  राहिले.पुढे टेलिफोन खात्यात नोकरी लागली.नोकरीत थोडा स्थिरस्थावर झाल्यावर युनियन,कल्चरल प्रोग्रॅम या क्षेत्रांतील कर्मचार्यांशी मैत्री झाली.त्या काळी आमचे टेलिफोन खात्या कडून एक गरवारे करंडक एकांकिका स्पर्धा घेतली जायची.या स्पर्धेत पुण्यातील पोस्ट ,टेलिफोन,आर एम एस ची अनेक कार्यालये आपली एकांकिका बसवून सादर करायची.साधारण पाच सहा कार्यालयांच्या एकांकिका या स्पर्धेत उतरायच्या.अगदी उत्साहात ही स्पर्धा व्हायची.भरत नाट्य मंदीर,टिळक स्मारक मंदीर वा बालगंधर्व रंगमंदिरात ही स्पर्धा दरवर्षी घेतली जायची.
एकोणीसशे त्र्याऐंशी सालच्या या स्पर्धेत आमच्या ऑफिसतर्फे  'काच सामान जपून वापरा ' ही एकांकिका या स्पर्धेकरीता बसवायचे ठरले. प्राध्यापक माधव वझे (श्यामची आई या सिनेमात त्यांनी लहानपणी श्याम ची भूमिका केली होती.) याना दिग्दर्शन करण्यासाठी पाचारण करण्यात आले होते.वाडिया कॉलेजवर ते प्राध्यापक होते. एकांकिकेत काम करण्यासाठी कर्मचार्यांची नावे मागवण्यात आली होती.त्यामधून वझे सर पात्रयोजना करणार होते.माझा मित्र आजचा प्रसिध्द एकपात्री कलाकार दिलीप हल्याळ याने नाव दिले होते त्याच्या बरोबर मी अगदी सहजच पात्रांची निवड होणार होती त्या हॉल मध्ये गेलो होतो.वझे सर एका एका कलाकराला समोर बोलावून काही वाक्ये म्हणायला सांगायचे वेगवेगळ्या प्रसंगी ते वाक्य कसे म्हणावे लागेल ते सांगून तसे करून घेत त्यांच्या पसंतीला आलेल्या कलाकारांची एकांकिकेतील भूमिका निश्चित करत होते.त्यांनी अचानक मला पुढे बोलावले."मी सहज आलोय,मी काम करणार नाही ."असे मी त्यांना सांगितले व जागेवरच थांबून राहिलो.समोर आमचे काही अधिकारीही हजर होते.त्यातील एका अधिकाऱ्याने मला "काही हरकत नाही जा तू पुढे, नसले केले तरी आता सर सांगतात तसे करून दाखव."असे सांगितले.मला घाम फुटला होता.मी आत्तापर्यंत नाटकात भूमिका सोडा,एखाद्या भाषणाच्या स्पर्धेतसुध्दा भाग घेतला नव्हता.चार लोकांसमोर बोलायचा कधी आयुष्यात प्रसंगच आला नव्हता.या बाबतीत प्रचंड न्यूनगंड मला होता, अजूनही थोडाफार आहेच! पण साहेबाला कसे नाही म्हणायचे,म्हणून मी पाय ओढत पुढे गेलो! माधव वझे सरांना मी सांगायचा प्रयत्न केला पण तोपर्यंत त्यांनी एक वाक्य लिहिलेला कागद मला दिला.आणि म्हणाले हे वाक्य म्हणून दाखव.
मी वाक्य वाचून पाहिले.बापरे लिहिले होते ....प्रियकर त्याच्या प्रेयसी ला म्हणतो ..
"  मला तू खूप आवडतेस,मी तुझ्यावर प्रेम करतो !"
मी वाक्य मनातल्या मनात वाचल्यावरच मला घाम फुटला.अंग थरथरायला लागले होते.कसेबसे मी ते वाक्य तोंडातल्या तोंडात  उच्चारले.वझे सर म्हणाले" जरा जोरात म्हण" मी थोडा धीर एकवटून ते वाक्य बोललो."छान !" आणि नको नको म्हणताना एकांकिकेतील  प्रियकराची  भूमिका माझ्यावर अक्षरशः लादली गेली.या एकांकिकेत हेलन माझ्या  प्रेयसीची भूमिका करायची.तालमी सुरू झाल्या आणि माधव वझे सर प्रियकर प्रेयसी चा जो सीन होता त्याची तयारी आम्हा  दोघांकडून परत परत करून घ्यायला लागले."अजून चांगले व्हायला हवे" "अजून जीव ओत " तीच तीच वाक्ये तोच सीन सगळे संवाद पाठ झाले होते पण वझे सरांना अभिप्रेत असणारा प्रवेश काही रंगत नव्हता! त्या दिवशी तोच सीन त्यांनी आमच्याकडून अंदाजे वीस वेळा तरी करून घेतला असेल.एक झाले की परत परत तो सीन केल्यामुळे हेलन व माझ्या अभिनयात मोकळेपणा आला जो सरांना अभिप्रेत होता आणि एकांकिका  स्पर्धेत सादर करण्यासाठी तयार झाली.भरत नाट्य मंदिराच्या स्टेजवर गेल्यावर अंगात अभिनय संचारला आणि आमची एकांकिका प्रेक्षकांनी उचलून धरली.आमच्या तो लव सीन छान झाला.पुढे दरवर्षी या एकांकिका स्पर्धेत आमच्या कार्यालयातर्फे जी एकांकिका सादर व्हायची त्यात छोटी का होईना पण माझी भूमिका असायचीच."बच्चू बर्वेची अफलातून दिवास्वप्ने" "गुड बाय मिसेस होम्स" "टेन मिनिट्स टू डेथ" इत्यादी एकांकिका आम्ही बसवल्या व सादर केल्या.आमचा एक नाटकाचा ग्रुप तयार झाला."राजा नावाचा गुलाम "हे नाटक राज्य नाट्य स्पर्धेसाठी बसवले गेले.या नाटकाचे दिग्दर्शन रघुनाथ माटेसर यांनी केले होते.या नाटकात एक छोटीसी भूमिका मी केली होती.या आमच्या मित्रमंडळी पैकी अशोक अवचट,दत्ता भुवड ,संजय डोळे,दिलीप हल्याळ, वसंत भडके,असे मित्र  अभिनय वा दिग्दर्शन  क्षेत्रात पुढे  आले.त्यांचे यश पहाताना एक दिवस आपणही यांच्याबरोबर काम केले होते याचा अभिमान  वाटतो.फक्त एक हौस म्हणून मी या गोष्टीकडे पहात होतो.माझ्या आयुष्यातल्या प्राथमिकता वेगळ्या होत्या.अनेक पारिवारिक व आर्थिक समस्या व जबाबदाऱ्या  माझ्या समोर आ वासून उभ्या होत्या.कितीही मोह होत असला तरी मला रंगभूमीवर मिरवणे  परवडणारे नव्हते. हे आभासी जग आपल्यासाठी नाही याची जाणीव होती.आयुष्यात खूप मोठा पल्ला गाठायचा होता. मी स्टेजवर काम करायची हौस भागवून घेतली होती.त्यातला आनंद उपभोगला होता. वैयक्तिक आयुष्यात प्रगती करून घेण्यासाठी  प्रमोशन मिळवायचे  होते. प्रमोशन साठीच्या  खात्यांतर्गत परीक्षेला बसायचे होते त्यामुळे  मनाला मुरड घालून लवकरच मी नाटक मंडळीत न जाता  अभ्यासात रमायला लागलो. जवळ जवळ पाच वर्षे मी या चळवळीत राहिलो.स्टेजवर चे नाटक, स्टेज च्या मागचे वातावरण आणि एखादा प्रयोग झाल्यावरचा कल्ला.त्यातली झिंग व  होणारे संभाव्य  परिणाम व दुष्परिणाम  अगदी जवळून हे सगळ अनुभवता आला याचा नक्कीच  आनंद आहे.मला माझ्या मर्यादा माहीत होत्या.अभिनय हे माझे क्षेत्र कधीच नव्हते पण योगायोगाने या क्षेत्रातल्या दर्दी लोकांशी संबंध आला .स्टेजवर अभिनय करून पहाता आला त्यातली नशा अनुभवता आली हे माझे भाग्य समजतो.माझे अनुभवविश्व यामुळे नक्कीच समृध्द झाले.
                                                                          ..............प्रल्हाद दुधाळ .