Monday, February 19, 2018

लेखकांच्या व्यथा.

लेखकांच्या व्यथा.
                   लेखणीत एवढी ताकद असते की सर्व शक्तीमान सत्ताही लेखनी उलथवू शकते.खरच आहे ते. भारतीय स्वातंत्र्य लढ्यामधे वृत्तपत्रानी ब्रिटिश सत्ता उलथवून टाकण्यात सिहांचा वाटा उचलला. ब्रिटीश सत्तेविरूध्द असंतोष पसरविण्याचे महत्वाचे काम लोकमान्य टिळक,महात्मा गांधी यानी आपल्या अग्रलेखातुन केले.स्वातंत्र्य लढ्यात लोकानी स्वत:ला झोकून दिले अनेक स्वातंत्र्य सैनिकानी चलेजाव आंदोलनात उडी घेवून हौतात्म्य पत्करले. भारत स्वतंत्र झाला . लेखणी काय करू शकते याचे हे उदाहरण. अनेक लेखकानी आपल्या लेखनातुन सामाजिक क्रांतीचे महत्व जनतेपर्यंत पोहोचवले. सामान्य माणसापर्यंत ज्ञानगंगा पोहोचवण्यात लेखकानी अहम भुमिका निभावली.अनेक लेखक कवी आपल्या लेख कविता कथा कादंबर्या इत्यादि विविध प्रकारचे साहित्य निर्माण करून समाजाचे प्रबोधन व मनोरंजन करत असतात. पण लेखक म्हणजे शेवटी एक माणूसच आहे त्याच्याही समाजांच्या विविध घटकांकडून काही अपेक्षा असू शकतात लेखक म्हणून त्यांच्याही काही व्यथा असू शकतात नाही का?मी या क्षेत्रात अगदीच नवखा आहे पण जेंव्हा लेखकांच्या व्यथांचा मी जेंव्हा विचार केला तेंव्हा काही समस्या माझ्या अल्पअनुभवाने लिहाव्या वाटल्या त्या येथे मांडतों ...
            लेखकाच्या अनेक व्यथांपैकी प्रमुख व्यथा म्हणजे लोकांचे वाचन कमी कमी होत चालले आहे. टीव्ही चॅनल्स,फेसबूक ट्वीटर व वॉट्स ॲप सारख्या सोशल नेटवर्क साइट्समुळे उथळ लिखानाचा सुळसुळाट झाला आहे व सकस व अभ्यासपूर्ण वाचनसंस्कृती लोप पावत चालली आहे. दुसरी समस्या अशी की ,जे काही लिहिले जातेय ते वाचकांपर्यंत पोहोचवण्याचे महत्वाचे कार्य प्रकाशक करत असतात पण या प्रकाशन व्यवसायाचे व्यापारीकरण झाले असल्याने जे लेखक नामांकित व प्रस्थ्यापित आहेत त्यांचेच साहित्य प्रकाशित केले जाते आहे. जे विकण्याची खात्री आहे तेच छापले जाते आहे . नवे साहित्यिक प्रयोग तसेच उदयोन्मुख लेखकाना काही हाताच्या बोटावर मोजता येणाऱ्या प्रकाशकांचा अपवाद वगळता प्रकाशक संधी द्यायचे टाळताना दिसतात. नव्या लेखकाना आपले लेखन वाचकांपर्यंत पोहोचावे असे वाटते. काही नवसाहित्यिकाना मार्गदर्शन हवे असते पण प्रस्थ्यापित लेखक व कवी अशा नवसाहित्यिकाना जवळ फिरकू देत नाहीत.मग असे बरेच साहित्यिक नाऊमेद होतात व लिखाण सोडून देतात. काही नवोदित मात्र फेसबूक ट्वीटर वा वॉट्स ॲप इत्यादिच्या माध्यमातुन आपली लिखाणाची हौस भागवताना दिसतात.लेखकाची अजून एक व्यथा म्हणजे साहित्य मंडळा मधील कंपूशाही. विविध पातळ्यांवर अशी कंपूशाही आढळते. प्रदेश,जात,धर्म, लिंग अशा विविध निकषावर साहित्यिकाचे व त्याच्या लिखाणाचे मूल्यांकन होत असते. प्रस्थ्यापित साहित्यिक सगळेच वाईट आहेत असे मला मुळीच म्हणायचे नाही ,तेथेही काही चांगली माणसे आहेत म्हणून तर काही प्रमाणात नविन साहित्यिक उदयाला येताना दिसताहेत पण अशा वृत्ती क्रियाशील आहेत हे नक्की.साहित्य परीषदे सारख्या संस्थ्येत नवोदित लेखकांसाठी काही ठोस होताना दिसत नाही.काव्य हा साहित्य प्रकार दुर्लक्षित होतो आहे ही अजुन एक व्यथा आहे. साहित्य सम्मेलनातही कवी व कवितेकडे दुर्लक्ष केले जाते.नुकत्याच झालेल्या पिंपवड साहित्य सम्मेलनात कविकट्टा सभागृह याचे ताजे उदाहरण आहे. इत्तर साहित्य प्रकार आलिशान सभागृहात सादर होत होते. मूठभर निमंत्रित कवि याच सभागृहात कविता सादर करीत होते पण नवोदितांच्या कवीकट्ट्याची अवस्थ्या अगदी केविलवाणी होती! तेथे एकदम ढिसाळ व्यवस्थ्या होती. मान्य आहे सध्या कवी व कवितांचे उदंड पिक येते आहे पण अशा उदंड पिकातुनच सकस लिखाण करणारे साहित्यिक तयार होऊ शकतात! पण हे लक्षात कोण घेणार ?
प्रल्हाद दुधाळ (९४२३०१२०२०)

Tuesday, February 13, 2018

आठवणीतली महाशिवरात्री....

आठवणीतली महाशिवरात्री....
माझ्या लहानपणी गावाकडे महाशिवरात्री जोरात साजरी व्हायची. गावाच्या वायव्येस रूद्रगंगेच्या काठी सिध्देश्वराचं एक पुरातन मंदिर होते.गोळे असे आडनाव असलेल्या ब्राम्हण कुटुंबाकडे या मंदिराचे पौराहित्य होतं.मंदिराभोवती या गोळे यांच्या वहिवाटीत असलेली हिरवीगार शेती होती.त्या काळी या शेतातली डाळींबबाग, मंदिराच्या आवारातली फुलांनी बहरलेली चाफ्याची झाडे. बाजूच्या शेतातील या सिझनला मोहरांनी लगडलेली आंब्याची झाडे, मंदिराभोवतीची जुन्या किंग साईझ भाजक्या विटात व चुन्यात बांधकाम केलेली पक्की भींत, छोटेखानी सुंदर मंदिर, त्यासमोर बसलेला नंदी आणि गाभाऱ्यातली महादेवाची पिंड या सगळ्या गोष्टी इतक्या वर्षांनी सुध्दा आठवणींत ताज्या आहेत.
असं म्हटलं जातं की हे पांडवकालीन मंदिर होते पुढे पेशवे कालात त्याचा जिर्णोध्दार झाला असावा.
माझ्या लहानपणी या सिध्देश्वराच्या मंदिरात महाशिवरात्रीचा सण अत्यंत उत्साहाने साजरा व्हायचा.अख्खे गांव शंभो महादेवाच्या दर्शनाला जमायचे. भल्या पहाटे अभिषेक पुजा व्हायची. गावकरी पिंडीवर वाहण्यासाठी बेल, फुले, आंब्याचा मोहोर,फळे, दुध,दही व उपवासाचे पदार्थ आणायचे.एरवी रिकामा असलेला मंदिर परीसर माणसांनी गजबजून जायचा.
गावातल्या लहान थोरांना त्या दिवशी उपवास असायचा.आठवणीतला तो पवित्र महाशिवरात्रीचा सण मी आजही जपला आहे....
आता ते जुने मंदिर इतिहास जमा झाले आहे. शेताच्या मध्यभागी असलेल्या सिद्धेश्वराला बांधावर एक छोटीशी खोली बांधून स्थलांतरित केले आहे.असे का केले गेले या बाबतीत लोकांमधे खूप विविध व विचित्र चर्चा आहेत.कुणी म्हणत गुप्तधनाच्या लोभापायी व त्या धनाच्या शोधासाठी ते जुने मंदिर जमीनदोस्त केले गेले , खर खोट त्या शंभूदेवालाच माहीत! एरवी अगदीच शुकशुकाट असलेल्या या मंदिरात सोमवार महाशिवरात्रीला शिवभक्त आवर्जून भेट देतात."हर हर महादेव" चा गजर अजुनही तेथे होतो; पण काहीतरी हरवलं आहे! आठवणीतली ती पावित्र्याची दरवळ जाणवत नाही.....
" हर ssहर ssमहादेव!"
महाशिवरात्री च्या सर्व शिवभक्तांना हार्दिक शुभेच्छा ..भोले बाबा सर्व मित्रांच्या मनोकामना पूर्ण करो...जय शिव शंकर ..
..... प्रल्हाद दुधाळ.