Tuesday, October 22, 2019

पार्सल...

    पंधरा दिवसापूर्वी युनिक इंटरनॅशनल एक्स्प्रेस या कुरियर कंपनीकडून त्यांच्या मार्केटिंग पॉलिसीचा भाग म्हणून 'मागच्या वर्षीप्रमाणेच या वर्षीही दिवाळी फराळ परदेशात पाठवायचा आहे ना?' याची चाचपणी कम आठवण करून देण्यासाठी म्हणून फोन आला आणि "अरे हो, दिवाळी जवळ आली की!" याची जाणीव झाली....
    माझा मुलगा,सुनबाई आणि छोटा नातू मागच्या वर्षी मे  महिन्यापासून मुलाच्या नोकरीच्या निमित्ताने अमेरिकेत रहात आहेत.मागच्या वर्षी दिवाळीला त्यांच्यासाठी फराळ आणि कपडे पाठवायचे ठरवले खरे,पण त्यासाठी काय प्रोसिजर असते कुणाला संपर्क करायचा याबद्दल मी अगदीच अनभिज्ञ होतो.आपली नोकरी भली आणि आपण भले अशा मर्यादित जगतात वावरत असल्याने अशा अवांतर बाबींचे ज्ञानार्जन कधी केलेच नव्हते!
   खरं तर आजूबाजूला अनेकांची मुले शिकायला वा नोकरीच्या  निमित्ताने परदेशात होती,पण मध्यमवर्गीय मानसिकतेमुळे असेल,परदेशात पार्सल कसे पाठवायचे याबद्दल मी संपूर्णपणे अज्ञानी होतो!आता ती गरज झाली होती....
    बरीच चौकशी केल्यावर,  इंटरनेटवर धांडोळा घेतल्यावर लक्षात आलं की 'अशी सेवा देणाऱ्या खूप कंपन्या आहेत की!' मग त्या त्या कंपन्यांचे रिव्ह्यू वाचून मी एक कंपनी निवडली.या सिझनला चक्क मंगल कार्यालय घेऊन ही कंपनी दरवर्षी आपल्या ग्राहकांना दिवाळी फराळ व भेटवस्तू परदेशी पाठवण्यासाठी मदत वा आपला व्यवसाय करत असते!
     तर या कंपनीची सेवा घेऊन मागच्या वर्षी मी फराळ पाठवला होता आणि याही वर्षी तो पाठवण्याची आगावू आठवण करून दिल्याने मीही तयारीला लागलो.....
    मला पाठवायच्या होत्या त्या वस्तू घेऊन काल दुपारी मी त्या कार्यालयात गेलो तर तेथे मागच्या वर्षीपेक्षा खूपच गर्दी दिसत  होती.किमान तास दीड तास तरी इथे लागणार होता.मग तिथले सोपस्कार करता करता माझ्यासारख्याच काऊंटरवर जाण्याची वाट पहात असलेल्या लोकांचे निरीक्षण मी सुरू केले, काही लोकांशी बोललोही....
    त्यातल्या अनेकांची मुले शिकण्यासाठी परदेशात गेलेली  होती. पहिल्यांदाच जे लोक पार्सल पाठवणारे होते ते त्यांच्या देहबोलीवरून सहज ओळखता येत होते....
   काही लोकांची मुले एमएस करुन नुकतीच तिथे सेट झालेली होती त्यांच्या हालचालीत एक प्रकारचा अभिमान व आत्मविश्वास जाणवत होता. काहींची मुले नुकतीच ग्रीनकार्ड होल्डर होऊन तिथले  रहिवासी झाले होते, अशांच्या पालकांच्या चेहऱ्यावर आपल्या मुलांच्याप्रती अभिमान आणि कर्तव्यपूर्तीचे समाधानही ओसंडत होते!
  मात्र ज्यांची मुले वर्षानुवर्षे तिकडचीच झालेली होती आणि ते  परत येण्याची शक्यता धूसर  झालेली होती अशा परदेशस्थ्य मुलांचे पालक जे आता बऱ्यापैकी वयस्कर झालेले होते त्यांच्यात एक दोनच पालकांनी वास्तव मनापासून  स्वीकारलेले दिसत होते.व्यावहारिक अपरिहार्यतेची जाणीव त्यांना होती मात्र अनेकांच्या  चेहऱ्यावर एक वेदनामिश्रित हतबलता वाचता येत होती!फराळ पाठवण्याच्या माध्यमातून ते आपली मुले वा नातवंडे यांच्यातला नात्यांचा धागा जपण्यासाठी धडपडताना दिसत होते!
  तिथे वाट पहाणाऱ्या लोकांच्या चेहऱ्यावरच्या  त्या विविध भावभावना वाचणे हा एक वेगळाच अनुभव होता!
   "टोकन नंबर एकशे चाळीस" माझे टोकन पुकारले गेले आणि मी माझ्या वस्तूंच्या बॅगा सावरत पुढे सरकलो.....
   .... प्रल्हाद दुधाळ.

Thursday, October 17, 2019

माझी व्यसन मुक्ती

संतोषजींच्या गुटकामुक्तीच्या पोस्टनंतर अनेकजण आपल्या व्यसनांवर लिहिण्यासाठी प्रेरित  झालेले दिसताहेत.
    माझ्या लहानपणी गावात हातभट्टी होती तसेच देशीचेही एक दुकान होते. गावात बोटावर मोजण्याएवढ्या व्यक्ती सोडल्या तर अख्ख्या गावात दारू आणि गांजाने धुमाकूळ घातलेला होता! शाळेचे काही  मास्तरच माझ्या वर्गातल्या  थोराड विद्यार्थ्याना हाताशी धरून भर शाळेत नशापाणी करत असायचे! त्या वातावरणात दारू चाखून बघावी किंवा चिलमीचा एक झुरका मारून बघावा असे कधीच वाटले नाही,  याचे कारण अगदी लहान वयात झालेली पुस्तकांशी गट्टी हे तर  असावेच, पण याबरोबरच माझ्या आजूबाजूला दारूच्या व्यसनामुळे अनेक संसारांची चाललेली ससेहोलपट मी  अगदी जवळून पहात असल्यामुळे संवेदनशील मनावर झालेला परिणाम हे कारण सुद्धा असावे!
    पुढे पुण्यात आल्यावर झोपडपट्टीत रहात होतो.अमली पदार्थ ते वेश्यागमनापर्यंतची सगळ्या प्रकारची व्यसने मुक्तपणे करणारे अनेक मित्र दररोज  संपर्कात होते, मनात आलं असतं तर एका क्षणात त्यांच्याप्रमाणे वागू शकलो असतो,पण ईश्वराने तशी कधी बुद्धी दिली नाही! माझ्या जीवनातला हा एक मोठा चमत्कार म्हणावा लागेल!
    नोकरीत अधिकारी झाल्यावर खूप आग्रह करूनही हा बाबा बधत नाही हे बघून एका पार्टित माझ्या साहेबाने लिम्कामध्ये जीन  मिसळून पाजली होती.हा प्रकार थोड्या वेळातच माझ्या लक्षात आला आणि मी पार्टि सोडून निघून आलो!त्यानंतर एकाही ओल्या पार्टीला मी कधी गेलो नाही.
   आता कुणी म्हणेल "आयुष्यभर  एकही व्यसन  केले नाही?"  "ही कसली  जिनगागी?"  कुणाला काहीही म्हणूदे,मी आहे तो असाच आहे.
   व्यसन करणे म्हणजे आयुष्यातली मजा असेल तर जीवनभर असली मजा मी केली नाही याचा मला सार्थ अभिमान आहे!
    "पान बिडी सिगरेट तमाकू ना शराब, हमको तो नशा है मोहब्बत का जनाब!"
   हो , स्नेहाची माणसं जोडायचं व्यसन मात्र लागलंय आणि मनापासून जपतो आहे!
   ..... प्रल्हाद दुधाळ. (17/10/2019)

लकडी पुल... एक आठवण

लकडी  पुलावरून आता दुचाकीला परवानगी  दिल्याचे वाचले आणि माझ्या बाबतीत घडलेला एक किस्सा आठवला. ते 1992-93 साल असावं. मी माझ्या आयुष्यातली पहिली स्कुटर-बजाज कब खरेदी केली. मी तोपर्यंत स्कुटर चालवायला शिकलो नव्हतो. तर झाले काय की  पहिल्याच दिवशी थोडी प्रॅक्टीस केली आणि सौ.ला मागे बसवून कार्पोरेशन मार्गे जंगली महाराज रोडने पुन्हा स्वारगेटकडे निघालो. डेक्कनवरून दुचाकीला बंदी असलेल्या लकडी पुलावरून स्कुटर चालवत अलका चौकाकडे निघालो आणि नेमकं व्हायचं तेच झालं....
   पूल  ओलांडल्याबरोबर  डाव्या बाजूला चौकीच्या समोरच सहा ट्रॅफिक पोलीस उभे! एकाने अडवलं आणि माझ्या स्कुटरची चावी ताब्यात घेतली. गाडी बाजूला घेऊन, सौ.ला तिथंच उभं  करुन    मी प्रश्नार्थक चेहरा घेऊन त्या पोलिसांकडे गेलो....
" साहेब काय झालं?"
त्या पोलिसाने मला वरपासून खालपर्यंत न्याहाळलं...
"स्कुटर नवीन का? "
 " हो साहेब..."
 " लायसन  बघू... "
 मी माझं लायसन्स त्याच्या हातात दिलं  त्यानं  ते शांतपणे त्याच्या वरच्या खिशात टाकलं ! आता बाकीचे पाचही जण माझ्याजवळ  आले.
"पुण्यात कधीपासून राहाता? " एकाने मला तिरकस  प्रश्न विचारला....
" पंधरा वर्षें... "
मी खरं  ते सांगितलं..
" या पुलावर स्कुटरला बंदी आहे माहीत  नाही का?"
आता माझ्या डोक्यात प्रकाश पडला! खरं तर माझं शिक्षण आबासाहेब गरवारे कॉलेजात झालेलं आणि लकडी पुलावर दुचाकीला बंदी आहे हेही मला माहीत होतं, पण नवीन स्कुटरवर फेरफटका मारायच्या नादात मी  ते साफ विसरून गेलो होतो!
"नाही हो, मला माहीत नव्हतं!आज तर स्कुटर घेतलीय मला कसं  काय माहीत असणार? "
मी माझ्या चुकीचं  समर्थन करू  पहात होतो....
"चला,  दोनशेची पावती फाडा...."
"जाऊ द्या ना माहीत नव्हतं  म्हणून चूक झाली..."
मी विनवणीचा सूर आळवला...
"ते काही नाही पावती फाडावी लागेल...."
दुसऱ्या  पोलिसाने आता घटनेचा ताबा घेतला होता....
काही तरी तोडगा निघून चहापाण्याची तरी सोय करायचा इरादा सहाही  चेहऱ्यावर मी वाचला....
मी पवित्रा  बदलायचं  ठरवलं...
" एक काम करा, माझ्यावर रीतसर  खटला दाखल करा,मला ही केस लढवायची आहे! तुम्ही सहाजण इथे आडबाजूला उभे राहून सावज पकडताय काय? मी वकील देऊन केस लढवणार! तुम्हाला खरंच सेवा करायची असती तर एकजण  पुलाच्या त्या  टोकाला  उभा राहिला असता,  मला तिथेच सांगितल असतं  की हा पूल दुचाकीला बंद आहे  तर मी पुलावर  आलोच नसतो, पण तुम्ही सहा सहा जण बकरे पकडायला दबा धरून  बसलात! तुम्हाला कुठे सही पाहिजे असेल ती घ्या...
 आता तुम्ही खटला भरा माझ्यावर!
तसें माझे पन्नास हजार गेले तरी चालतील,पण मी आता दोनशे भरणार नाही!"
माझा तो पवित्रा त्यांना बहुतेक अनपेक्षित होता!
" अरे काय लावलाय खटला भरा, खटला भरा म्हणून..."
मी पुन्हा पुन्हा त्यांना खटला भरण्याबद्दल सांगत राहिलो...
शेवटी पहिला पोलीस  माझ्याकडे आला....
" फार शहाणे आहात!पक्के पुणेकर दिसताय! पुन्हा चूक करू नका,  हे घ्या.... "
वैतागून  त्याने माझे लायसन्स  आणि स्कुटरची चावी माझ्या हातात कोंबली....
मी स्कुटरला किक मारली,  सौ.मागे बसली, कुत्सितपणे मी एकदा सहाही जणांकडे पाहिले आणि गियर टाकून स्पीड घेतला....
  ..... प्रल्हाद दुधाळ.(17/10/2019

Wednesday, October 16, 2019

निवडणूका आणि मी ...

निवडणूका आणि मी ...
लहानपणी कळायला लागलं तेव्हाची पहिली निवडणूक आठवते. ती बहुतेक जिल्हा परिषदेची निवडणूक असावी. ट्रकमागे ट्रक भरून माणसं यायची,  प्रत्येकाच्या खिशाला एक रंगीत चित्र लावलेलं असायचं,  हातात पक्षाचे झेंडे असायचे.कुणीतरी  एकजण घोषणेचा अर्धा भाग म्हणायचा आणि ती घोषणा पूर्ण करण्यासाठी ट्रकमधली बाकी माणसं  अगदी बेंबीच्या देठापासून ओरडायची! पंधरावीस मिनिटात अख्या गावात घोषणांचा धुराळा उडवून या गाड्या पुढच्या गावाला जायच्या! दुसऱ्या दिवशी दुसरे लोक यायचे आणि घोषणा देत रान उठवायचे! त्या वयात हे नक्की  काय चाललंय हे मुळीच समजत नव्हतं.शाळेत नागरिकशास्र शिकायला लागल्यावर या  लोकशाहीच्या उत्सवाची थोडीफार ओळख झाली.मला जी पहिली निवडणूक आठवते त्यातल्या एका उमेदवाराचे नाव बहुतेक ज्ञानेश्वर खैरे होते, ते  पुढे आमदार होते... त्यांचं चिन्ह होतं बहुतेक बैलजोडी! पुढे थोडी प्रगल्भता आल्यावर त्या  घोषणा देण्याऱ्या गर्दीत मीही मित्रांबरोबर सामील झालो.आमचा तालुका त्यावेळी समाजवादी पक्षाचा बालेकिल्ला होता. "चिमासाहेब बाळासाहेब मुळीक" यांच्यासाठी दिलेल्या घोषणा  चांगल्याच आठवतात.अनेक वर्षें  समाजवादी पक्ष या एकाच पक्षाचे आस्तित्व आमच्या भागात जाणवायचं!दादा जाधवराव हे  एकच आमदार कित्येक  निवडणूका जिंकत होते! काँग्रेसच्या चरखा वा बैलजोडी यापेक्षा झाड आणि पुढे नांगरधारी शेतकरी ही चिन्हेच आमच्या भागात जास्त प्रसिद्ध होती असे आठवते.अर्थात विद्यार्थी दशेत असल्याने राजकारणातलं काही कळायचं ते वय आणि तेव्हढी   समजही नव्हती. ग्रामपंचायतीच्या रेडिओवरून ज्या बातम्या ऐकायला मिळायच्या तेवढंच अख्ख्या गावाचं ज्ञान असायचं!  आणीबाणी नंतरची निवडणूक आणि जनता दलातल्या नेत्यांची भाषणे मात्र खूप मन लावून ऐकली होती शिवाय ते वयही संस्कारक्षम होते त्यामुळे असेन, पण स्वतःची अशी काही राजकीय मते बनायला लागली होती.वृत्तपत्रे वाचून व बातम्यांचे विश्लेषण करून एव्हाना  कोण खरं बोलतंय आणि कोण खोटं बोलतंय हे समजायला लागलं होतं.कॉलेज जीवनात असताना काही मित्रांच्या संगतीने थोडे दिवस राष्ट्र सेवा दलात काम करत होतो.काँग्रेस हॉलवर संत्र्यामंत्र्याच्या पुढे पुढे करुन  काहीतरी पदरात पाडून घेण्यासाठी  लोक कोणत्या थरापर्यंत जातात हे त्या काळात अगदी जवळून बघायला मिळालं.नंतर  समाजवादी काँग्रेसचा कार्यकर्ता म्हणून एक विधानसभा आणि एक मनपा निवडणुकीत कामही केलं!एक मात्र खरं आहे मी मनापासुन  तिथे रमत नव्हतो!
     दरम्यानच्या काळात मला  सरकारी नोकरी लागली आणि सीसीएस कंडक्ट रूल वाचला. नियमाप्रमाणे सरकारी नोकर म्हणून आता आपण राजकीय पक्ष सोडा आपलं साधं  राजकीय मतही व्यक्त करू शकत नाही याची जाणीव झाली! आपसूक त्या गोष्टींपासून  दूर झालो...
       नंतर  मात्र इमानेइतबारे मी एक सुजाण नागरिक म्हणून माझा गुप्त मतदानाचा अधिकार बजावत असतो!
नो पॉलिटिक्स, काय!   
 .... प्रल्हाद  दुधाळ.