Sunday, August 8, 2021

चिंतन -वृत्ती

चिंतन १... भर्तृहरी एक कवी,त्याने माणसाचे एकूण चार प्रकार सांगितले आहेत १. ' माझे वाटोळे झाले तरी चालेल;पण जगाचे चांगले व्हायला हवे.गरज पडली तर मी लोकांचे पाय धरेन;पण आयुष्यात कधी कोणाचे पाय ओढणार नाही ' असा विचार करून तसे वागणारी माणसे. २. ' माझे चांगले होण्यासाठी कुणाचे नुकसान झाले तरी चालेल.एकदा का सगळे माझ्या मनासारखे झाले की मग मी दुसऱ्यासाठी विचार करेन.माझे पोट भरल्यानंतर मी लोकांच्यासाठी काय करता येईल याचा विचार करेन. ' असा विचार करणारी माणसे. ३. ' माझे चांगले होणे याला माझी सर्वोच्च प्राथमिकता असेल भले त्यासाठी इत्तरांचे वाटोळे झाले तरी चालेल.मी फक्त माझाच विचार करेन.' असे वागणारी माणसे. आणि ४. ' माझे वाटोळे झाले तरी हरकत नाही; पण माझ्याबरोबर सगळ्यांचे वाटोळे व्हायला हवे. मला जर सुख मिळणार नसेल तर माझ्याबरोबर सर्वांच्या आयुष्यात केवळ दुःखच असायला हवे ' असा आततायी विचार करून तसेच वागणारी माणसे. खरे तर इतरांचे वाईट चिंतून या जगात सर्व प्रकारची सुखे मिळूनही खऱ्या अर्थाने मिळालेले सुख कोणीही उपभोगू शकत नाही.... .... प्रल्हाद दुधाळ

Friday, August 6, 2021

कर्मयोगी संत सावता माळी..

प्रपंची असुनी परमार्थ साधावा I वाचे आळवावा पांडुरंग I मोट,नाडा,विहीर, दोरी Iअवघी व्यापिली पंढरी I किंवा 'स्वकर्मात व्हावे रत, मोक्ष मिळे हातोहात।’ ‘सावत्याने केला मळा। विठ्ठल देखियला डोळा।’ ज्या काळात ईश्वर प्राप्तीसाठी अनेक महान संत तीर्थाटने,भजन,कीर्तन, योगयाग,जपतप वा व्रतवैकल्ये आदी मार्गांचा अवलंब करत होते त्याच काळात असेही एक संत होते,ज्यांनी ईश्वरप्राप्तीसाठी कर्मयोगाचा अवलंब केला आणि आपल्या दैनंदिनबकामात पांडुरंग शोधायला भक्तांना सांगितले. हे महान संत म्हणजे संतश्रेष्ठ सावता माळी! सावता महाराज संत नामदेव संत ज्ञानेश्वर यांचे समकालीन संत होते. ईश्र्वराला प्रसन्न करून घेण्यासाठी योग-याग-जप-तप, तीर्थव्रत, व्रतवैकल्ये याची बिलकूल आवश्यकता नाही तर केवळ ईश्र्वराचे अंत:करणपूर्वक चिंतन करायला हवे अशी शिकवण त्यांनी दिली. संत सावता माळी यांच्याबद्दल संत नामदेव म्हणतात:- धन्य ते अरण, रत्नांचीच खाण। जन्मला निधान सावता तो।। सावता सागर, प्रेमाचा आगर। घेतला अवतार माळ्या घरी।I सावतोबा यांचे आजोबा देबू माळी हे पंढरीचे वारकरी होते.त्यांना दोन मुले होती. पुरसोबा आणि डोंगरोबा.पुरसोबा हे धार्मिक वळणाचे होते.आपला शेतीचा परंपरागत व्यवसाय सांभाळून ते भजन-पूजन करीत असत.पंढरीची वारीही ते नियमितपणे करायचे.पुरसोबा यांचा विवाह त्याच पंचक्रोशीतील सदू माळी यांच्या मुलीशी झाला.या दांपत्याच्या पोटी सावतोबा यांचा जन्म( ईसवी सन १२५०) झाला. या घराण्याचे मूळ गाव मिरज संस्थानातले औसे होय. दैवू माळी (आजोबा) अरण या गावी स्थायिक झाले होते.सावता माळी यांनी भेंड गावचे ‘भानवसे रूपमाळी’ हे घराणे असलेल्या जनाई नावाच्या मुलीशी लग्न केले. तिने उत्तम संसार केला. त्यांना विठ्ठल व नागाताई अशी दोन अपत्ये झाली. सावता माळी यांनी आपल्या अभंगात आपल्या व्यवसायातील शब्द व वाक्प्रचार मुक्तपणे वापरले आहेत. ‘साव’ म्हणजे खरे तर शुद्ध चारित्र्य, सज्जनपणा,सावपणा असा याचा अर्थ होतो.सावता महाराज लहानपणापासून विठ्ठलभक्तीमध्ये रममाण झाले. फुले,फळे,भाज्या आदी पिके काढण्याचा त्यांचा पारंपरिक व्यवसाय होता. ‘आमची माळियाची जात, शेत लावू बागाईत’ असे ते म्हणतात. 'कांदा मुळा भाजी, अवघी विठाई माझी I ’'लसुण मिरची कोथंबिरी | अवघा झाला माझा हरि ||’ ऐहिक जीवनात कर्तव्यकर्मे करीत असतानाच काया-वाचे-मने ईश्र्वरभक्ती करता येते, हा अधिकार सर्वांना आहे. ‘न लगे सायास,न पडे संकट,नामे सोपी वाट वैकुंठाची’ असा त्यांचा सरळ साधा अनुभव होता.त्यांनी जनसामान्यांना आपले कर्तव्य करता करता साधता येणाऱ्या आत्मोन्नतीचा मार्ग दाखविला. सावता माळी हे कर्तव्य आणि कर्म करीत राहणे हीच खरी ईश्वरसेवा अशी शिकवण देणारे संत आहेत. वारकरी संप्रदायातील एक श्रेष्ठ आणि ज्येष्ठ संत म्हणूनही त्यांचा लौकिक आहे. श्री विठ्ठल हेच त्यांचे परमदैवत होते. ते कधीही पंढरपूरला गेले नाहीत.प्रत्यक्ष पांडुरंगच त्यांना भेटावयास येत. निरपेक्ष वृत्तीने ईश्र्वरार्पण बुद्धीने केलेला प्रपंचच परमार्थ होतो, हीच त्यांची जीवननिष्ठा होती. त्यांना मोक्ष-मुक्ती नको होती. ‘वैकुंठीचा देव आणू या कीर्तनी’ ही त्यांची प्रतिज्ञा होती ‘योग-याग तप धर्म । सोपे वर्म नाम घेता।। तीर्थव्रत दान अष्टांग। याचा पांग आम्हा नको।। हाच विचार त्यांनी आग्रहाने मांडला. प्रपंच व आपले कर्तव्य करताना त्याबरोबरच नामसंकीर्तन करण्यावर त्यांनी जास्त भर दिला. भगवंत भक्तीसाठी सर्वसंगपरित्याग करण्याची जरुरी नाही.प्रपंच करता करताही ईश्वर भेटतो असे ते सांगत. पंढरपूरला जाणाऱ्या वारकऱ्यांना पाणी भाकरी फळे फुले देऊन त्यांची पूजा ते करत.त्यांचे शेत त्यांचा मला हेच सावतोबाचे पंढरपूर होते. मळ्यात काबाडकष्ट करणे, भाज्या आणि फले पिकवणे वाटसरू ची सेवा हीच त्यांच्यासाठी पांडुरंग भक्ती होती. 'तो परमेश्वर माझ्या मळ्यात रहातो मला पंढरपुराला जायची गरज नाही.पांडुरंग मूर्तीत नाही तर आपण रोज जे काम करतो ते मनापासून केले की पांडुरंगाची भेट होते' असा त्यांचा ठाम विश्वास होता. संत एकनाथ सावतोबाबद्दल म्हणतात... 'एका जनार्दनी सावता तो धन्य I तयाचे महिमान न कळे काहीI' अध्यात्म व भक्ती, आत्मबोध व लोकसंग्रह, कर्तव्य व सदाचार यांचा मेळ त्यांनी आपल्या आचरणात घातला.धर्माचरणातील अंध:श्रद्धा, कर्मठपणा, दांभिकता, अवडंबर व कर्मकांडे याबाबत त्यांनी कोणाचीच भीडभाड ठेवली नाही. त्यावर सतत कोरडे ओढले. तत्त्वचिंतन, सदाचार, निर्भयता, नीतिमत्ता, सहिष्णुता इत्यादी गुणांची त्यांनी भलावण केली. ‘‘प्रपंची असूनि परमार्थ साधावा। वाचे आळवावा पांडुरंग मोट, नाडा, विहीर, दोरी। अवघी व्यापिली पंढरी,’’ 'सावता म्हणे ऐसा भक्तीमार्ग धरा I जेणे मुक्ती द्वारा ओळंगती I' ' आमुची माळीयाची जात I शेत लावू बागाईत II आम्हा हाती मोट नाडा I पाणी जाते फुल झाडा II' असे म्हणणाऱ्या सावता महाराजांना त्यांच्या मळ्यातच विठ्ठलदर्शन होत असे. त्यांच्या सर्व अभंगरचना काशिबा गुरव यांनी लिहून घेतल्या आहेत. ‘स्वकर्मात व्हावे रत, मोक्ष मिळे हातो हात।’ ‘सावत्याने केला मळा। विठ्ठल देखियला डोळा।’ सावता महाराजांना केवळ ४५ वर्षांचे आयुष्य लाभले. धार्मिक प्रबोधनाचे व भक्तिप्रसाराचे कार्य त्यांनी निष्ठेने व्रत म्हणून आचरिले. समरसता आणि अलिप्तता यातील विलक्षण समतोल त्यांच्या व्यक्तिमत्त्वात प्रकर्षाने जाणवतो. आज त्यांचे केवळ ३७ अभंग उपलब्ध आहेत.अरण येथे आषाढ वद्य चतुर्दशी, शके १२१७ (दि. १२ जुलै, १२९५) रोजी संत सावता महाराज अनंतात विलीन झाले. आजही पंढरपूरच्या श्री विठ्ठलाची पालखी वर्षातून एकदा खास त्यांना भेटावयास येत असते. तर अशा या संतश्रेष्ठ सावता महाराज यांना त्यांच्या पुण्यतिथी निमित्त साष्टांग दंडवत.. पंढरीस आषाढीला जमे वैष्णवांचा मेळा संत सावता ने ना कधी सोडला आपुला मळा पंढरीच्या वाटेवरी अखंड टाळ कुटाई संतश्रेष्ठ सावतालेखी कांदा मुळा ही विठाई पांडुरंग स्व कर्मामध्ये काम भजन कीर्तन मनामध्ये हवा भाव नको देखले नमन कर्मयोगी सावताने नाही पहिली पंढरी भक्ताच्या या दर्शनार्थ केली विठ्ठलाने वारी .....पांडुरंग हरी वासुदेव हरी..... ©प्रल्हाद दुधाळ पुणे.