Thursday, August 17, 2017

#श्रावणमासउपक्रम2

मी तसा नास्तीक नाही;पण कर्मकांडात फारसा न रमणारा माणूस आहे.आपल्या चांगल्या वाईट कर्मांचे फळ आपल्याला येथेच मिळते अशा माझ्या विचारसारणीमुळे आणि जीवनात तसेच अनेक अनुभव आल्यामुळे असेल; पर्यटन म्हणून कित्येक तीर्थस्थाने मी पाहिली असली तरी देवदेव करायचा म्हणून फारसा मी कधी कोणत्या मंदिरात गेलो नव्हतो.असं म्हणतात की जोपर्यंत सगळ काही सुरळीत चालू असते तोपर्यंत आपण ईश्वराच्या अमर्याद अस्तित्वाला फारसे गंभीरपणे घेत नाही! माझेही तसेच झाले,जीवनात काही अतर्क्य असे चढउतार आले आणि सुमारे वीसबावीस वर्षांपूर्वी माझ्या भावाच्या आग्रहामुळे पहिल्यांदा वाडीरत्नागिरीला गेलो आणि आमचे कुलदैवत जोतीबाचे दर्शन घेतले. जोतिबाच्या डोंगराचा रम्य परिसर आणि पुरातन मंदीर मला खूपच भावले. जोतिबाच्या पायावर डोके टेकवून मन एकदम प्रसन्न झाले.मंदीर परिसरातून प्रचंड उर्जा घेवून मी परत पुण्याला आलो.या जागृत देवस्थानच्या अनुभूती घेतल्यानंतर वर्षाआड का होईना, मी या आमच्या कुलदैवताचे आशीर्वाद घ्यायला आवर्जून जात असतो.पुढे बरीच वर्षे गेली. कुणीतरी जाणकाराने मला जाणीव करून दिली की तुम्ही कुलदैवताला जाता पण कुलस्वामिनीला मात्र भजत नाही. बहुजन समाजात परंपरेने ज्या गोष्टी चालत आलेल्या असतात त्याप्रमाणेच पुढची पिढी मार्गक्रमणा करत असते.इथे माझ्या आधीच्या पिढीलाच आपली कुलस्वामिनी कोणती हे माहीत नव्हते तर मला कुठून माहिती असणार?जुन्या जाणत्या लोकांना विचारले तर कुणालाच काही सांगता येईना.
मी लहानपणी घरातले याबाबतीतले संवाद आठवायचा प्रयत्न केला आणि कांही देवतांची नावे समोर आली.बायकोशी चर्चा केली आणि सुट्टीच्या दिवशीसाठी एक खाजगी गाडी बुक केली.
सकाळी सातला आम्ही पुणे सोडले आणि भोरमार्गे मांढरदेवीकडे प्रयाण केले. हिरव्यागार शाली पांघरलेला तो घाट पाहून चित्तवृत्ती प्रसन्न झाल्या. दिडेक तासाच्या प्रवासानंतर मांढरदेवीच्या मंदिरातल्या दर्शन रांगेत आम्ही उभे होतो.काळूबाई या नावानेही ही देवी प्रसिध्द आहे.मुख्य मंदिरातील काळूबाईची साडीचोळीने ओटी भरून मनोभावे पुजा केली आणि वाईकडे प्रयाण केले. ढोल्या गणपतीचे व कृष्णाघाटावरील इत्तर देवदेवतांचे दर्शन घेतले. आता औंधच्या यमाईमातेच्या दर्शनाची ओढ लागली होती.
औंधला यमाईच्या डोंगरावर हे मुळपीठ देवीचे भव्य पुरातन भव्य मंदीर आहे. औंधची ही यमाईमाता आमची कुलस्वामिनी असल्याचे मला नुकतेच समजले होते त्यामुळे या देवीदर्शनाचे नियोजन मी केले होते. देवीच्या प्रसन्न मुर्तीपुढे डोळे मिटून नतमस्तक झाल्यानंतर आपण अनेक दिवसाची इच्छा फलद्रूप झाल्याचे समाधान वाटले.औंध गावातही यमाईमातेचे भव्य मंदीर आहे. या मंदीरात औंधच्या पंतसचिवानी खास काढून घेतलेली पौराणिक प्रसंगावरील चित्रे लावलेली आहेत तीही बघण्यासारखी आहेत. डोंगरावर असलेले वस्तूसंग्रहालय पाहण्यासारखे आहे.
यमाईमातेचे दर्शन घेवून पुन्हा पुण्याकडे निघालो. खेडशिवापूरजवळ आल्यावर कोंढणपूर इथल्या तुकाईमातेच्या मंदिराकडे गाडी वळवली. आम्ही मंदिरात पोहोचलो आणि मंदिरात नेमकी आरती चालू झाली.आरती झाली आणि आमच्या श्रावणी देवदर्शन यात्रेची सांगता झाली.
कुलदेवता चैतन्याय नमो नम:!
..... प्रल्हाद दुधाळ.

Monday, August 7, 2017

श्रावण उपक्रम .

श्रावण उपक्रम .
     श्रावण महीना म्हणजे निसर्गावर हिरवाईची लयलूट! नद्या नाले तुडूंब भरून वहात असतात. या काळात आपल्याकडे विविध सण साजरे केले जातात.गावाकडे लोक एकत्र येवून आजूबाजूच्या परिसरातील देवदेवततांच्या दर्शनाला बाहेर पडतात.
माझ्या लहानपणी प्रत्येक श्रावणी सोमवारी आमच्या गावातल्या सिध्देश्वराला अभिषेक केला जायचा. बेलपत्र व मंदिराच्या आवारात फुललेली पांढऱ्या चाफ्याची फुले घेवून आमची वानरसेना सोमवारी सिध्देश्वराला आवर्जून जायची! रविवारी पहाटे उठून ओढ्यात डुबकी मारायची आणि ओले अंग घेवूनच आम्ही तांब्या भरून पाणी घेवून ग्रामदैवताच्या- नाथाच्या डोंगरावर भैरवनाथाला पाणी घालायलो जायचो. 
    आमच्या घरी श्रावण महीण्यात दरवर्षी ग्रंथांचे वाचन केले जायचे.अजून आमच्या गावात वीज पोहोचलेली नव्हती त्यामुळे दोन तीन गॅसबत्त्या लावून हे ग्रंथवाचन व्हायचे. आमच्या भावकितले नामदेवराव दुधाळ तेथे ग्रंथाचे वाचन करायचे. खड्या आवाजात ते एक एक प्रसंग वाचायचे आणि उपस्थित लोकातो तो प्रसंग साध्या सोप्या समजेल अशा भाषेत वर्णन करून सांगायचे. ज्ञानेश्वरी,नवनाथ भक्तीसार, पांडवप्रताप, भक्तीविजय, हरिविजय, रामविजय अशा अनेक ग्रंथांचे वाचन आमच्या घरी त्या काळी झाले. मी त्या काळात एकदम लहान होतो शाळेतही जायला लागलो नव्हतो; पण मला त्या भक्तीरसाच्या श्रवणाची अशी काही गोडी लागली होती की बस्स! ग्रंथ श्रवणाची ती अनुभूती घेण्यासाठी मी श्रावणाची वाट बघायचो. प्रत्येक दिवशी ग्रंथाचा एक किंवा दोन अध्याय वाचले जायचे आणि पसायदानाने शेवट केला जायचा. मग शेंगदाणे फुटाणे वा खडीसाखर प्रसाद म्हणून वाटला जायचा. प्रसाद वाटायचा मान कायम माझ्याकडेच असायचा. आपण काहीतरी खूप महत्वाची जबाबदारी पेलतोय असं त्यावेळी माझ्या बालबुध्दीला वाटत रहायचे. संपूर्ण ग्रंथाचे वाचन झाल्यावर समाप्तीचा उत्सव व्हायचा. सत्यनारायण पूजेचा प्रसाद व जेवायला सारे गाव यायचे. लहानपणी ऐकलेले ते ग्रंथवाचन माझ्यावर खूप मोठे अध्यात्मिक संस्कार करून गेले!
      आमच्या गावात अजून एक महत्वाचा सार्वजनिक उपक्रम श्रावणात अजुनही होतो, तो म्हणजे वनभोजन! एका ठरलेल्या दिवशी सगळे गाव घरी गोडाधोडाचे जेवण तयार करून ते घेवून नाथाच्या डोंगरावर जमतात. देवाला नैवेद्य दाखवून डोंगरावर निसर्गाच्या सानिध्यात गप्पांच्या महफिली जमतात. हिरव्यागार निसर्गाच्या सानिध्यात आग्रह करून करून गावकरी एकमेकांना जेवायला घालतात. हे परंपरागत वनभोजन म्हणजे आमच्या गावाचे सांस्कृतिक संचित आहे! लहानपणी अनुभवलेली श्रावणातली हिरवाई, सणाला चालणारी लगबग आणि मुख्य म्हणजे माणसामाणसातल्या माणुसकीच्या नात्यांची जोपासना करण्यासाठी जाणीवपूर्वक साजरे होणारे सण उत्सव कायमच मनात घर करून राहीले आहेत .
.... प्रल्हाद दुधाळ.

रक्षाबंधन,

रक्षाबंधन,
आज रक्षाबंधन, भावा बहिणीच्या नात्यातला एक महत्वाचा सण! मी माझ्या भावंडात एकदम धाकटा आहे . माझ्यापेक्षा मोठ्या बहिणीच्या आणि माझ्या वयात साताठ वर्षाच अंतर आहे.मी शाळेत जायला लागण्याआधीच तीचे लग्न झाले होते आणि ती सासरी निघून गेली होती. मला या बहिणीपेक्षा मोठ्या अजून दोन बहिणी पण त्यांच्यातले आणि माझ्यातले नाते बहीणभावापेक्षा जास्त करून मायालेकरांचे वाटायचे! त्या काळात ग्रामीण समाजात रक्षाबंधन क्वचितच साजरे केले जायचे,आमच्या वयातल्या अंतराने असेल, बहिणी सासरी आणि मी गावाला असल्याने असेल किंवा त्यावेळच्या आर्थिक गणितात बसत नसेल म्हणून असेल; पण लहानपणी बहीणीकडून मी रक्षाबंधनाच्या दिवशी कधी राखी बांधून घेतल्याचे मला आठवत नाही.पुढे वयाच्या चाळीशीनंतर रक्षाबंधनाच्या दरम्यान जर कधी काही वेगळ्या निमित्ताने गाठ पडलीच तर मुलांच्या आग्रहावरून कधीतरी बहिणीकडून राखी बांधून घेतली असेल पण खऱ्या अर्थाने बहीण भावाच्या नात्यातला तो खेळकरपणा मी कधी अनुभवलेलाच नाही. रक्षाबंधन वा भाऊबीजेच्या दिवशी आजुबाजूच्या बहीण भावंडातली सणासुदीची धूम पाहिली की मला आपल्या आयुष्यातल्या अशा आनंदाच्या न्युनतेने हमखास उदास वाटायचे अजूनही वाटतेे. आपल्याला एकतरी बहीण अशी असायला हवी होती जिच्याशी मनमोकळ बोलता आलं असतं असं प्रकर्षाने वाटत रहाते. माझ्या मनातल्या या बाबतीत असणाऱ्या भावना मी कायमच दाबत आलो आहे.
मधल्या काळात माझ्या पुतणीच्या सासूने मला राखी बांधून घ्यायचा आग्रह केला आणि आता दहा बारा वर्षे या मानलेल्या बहिणीकडून दरवर्षी नारळी पौर्णिमेच्या दिवशी किंवा नंतरच्या सुट्टीच्या दिवशी राखी बांधून घेतो.भाऊबिजेला ही बहीण मला ओवाळतेसुध्दा!
या वर्षी मात्र मी माझ्या सख्ख्या बहिणीकडून रक्षाबंधनाच्या आधल्या दिवशीच राखी बांधून घेण्याचा योग जुळवून आणला! झाले असे की, एका नात्यातल्या लग्नासाठी म्हणून मी आणि बायको फलटणजवळच्या आन्दरूड या गावाला काल भाड्याची गाडी घेवून गेलो होतो. लग्नसमारंभ उरकला जेवणे झाली आणि पुन्हा पुण्याकडे निघालो.अचानक लक्षात आले अरे उद्या रक्षाबंधन आहे.बायको म्हणाली आपण तुमच्या बहिणीकडे जाउ आणि रक्षाबंधन साजरे करू! माझ्या बहिणीचे गाव फलटणपासून पंधरा सोळा किलोमीटरवर आहे. घड्याळाचे गणित जमते का याचा अंदाज घेतला.आणि भाच्याला फोन लावला.मी येत असल्याचा निरोप त्याला दिला.फक्त अर्धा तास थांबून निघून जाईल असेही मी त्याला सांगितले. रस्ता बदलून आमची गाडी आता पुसेगाव रोडने निघाली.
अर्ध्या तासातच मी ढवळ या गावात पोहोचलो. साधारण दहा बारा वर्षानी मी माझ्या बहिणीच्या गावी येत होतो.
मी बहिणीच्या घरात पोहोचलो तर पासष्टीच्या आसपास वय असलेली माझी बहीण माझ्यासाठी उत्साहाने गोडाधोडाचा स्वयंपाक रांधत होती.खर तर लग्नाच्या ठिकाणी भरपेट जेवण झाले होते पण बहीणीचा तो उदंड उत्साह पाहून पुन्हा भूक लागली! तिने राखी बांधण्याची तयारी केली आणि गेल्या कित्त्येक दिवसांची सख्ख्या बहिणीकडून रक्षाबंधनाची माझी इच्छा प्रत्यक्षात आली! माझ्या बहिणीच्या चेहऱ्यावर या निमित्ताने पसरलेला प्रचंड आनंद मी याच देही याच डोळा अनुभवला!!!

....प्रल्हाद दुधाळ ०७ /०८/ २०१७.