Sunday, June 21, 2020

फादर्स डे.

फादर्स डे.
    एरवी आपण पाश्चात्य संस्कृतीला कितीही नावे ठेवत असलो तरी त्यांच्या काही काही गोष्टींना मात्र सलाम करावासा वाटतो. वेगवेगळ्या नात्यांचे सन्मान करणारे विविध 'डे'ज साजरे करण्याची त्यांची पद्धत खरंच कौतुकास्पद आहे!
   नात्यांबद्दलच्या भावना व त्याप्रतीची कृतज्ञता व्यक्त करण्यासाठी एक छान मार्ग या निमित्ताने मिळतो त्यामुळेच जगभर असे 'डे'ज उत्साहाने साजरे केले जातात.
   काहीजण म्हणतील की वर्षातून एकदा असा डे साजरा करून काय होणार; पण आपल्या विवेकबुद्धीला स्मरून खरं खरं सांगा की आपण आपल्या या नात्यांसाठी सध्या किती वेळा संवेदनशील असतो? या विधानाला काही सन्मान्य अपवाद असतील तर ते खरंच खूप थोर आणि वंदनीय आहेत!
त्यातल्या त्यात मदर्स डे आणि फादर्स डे म्हणजे तर माता पित्याच्याबद्दलच्या भावना व्यक्त करायची सुवर्णंसंधीच!
   सोशल मीडियाच्या माध्यमातून का होईना आई वडिलांप्रती आपल्या अव्यक्त  भावना व्यक्त  होत  आहेत,  ही माझ्या मते त्यातली खूप मोलाची बाब आहे.
  आज फादर्स डे च्या निमित्ताने ज्या नात्याबद्दल सहसा बोलले जात नाही त्या पित्याबद्दलच्या  भावना व्यक्त करायला मलाही प्रेरणा मिळाली आहे.
    माझ्या बाबतीत म्हणाल तर माझ्याकडे माझ्या वडिलांबद्दलच्या खूप कमी आठवणी आहेत,  कारण मी तेरा चौदा वर्षांचा असतानाच आमच्या दादांनी हे जग सोडले होते.
त्या अल्पकाळातली त्यांची जी प्रतिमा समोर आहे ती खूपच आदर्शवत आहे.
   मला अस्पष्टसे आठवते त्याप्रमाणे माझे आईवडील मी लहान होतो त्यावेळी काही दिवस शेतीबरोबरच कांदा बटाटा लसूण घेऊन आजूबाजूच्या गावातल्या आठवडाबाजारात विकायचे.त्या काळात बहूतेक ते बऱ्यापैकी कमवत असावेत. गावात त्यांना बराच मानही  होता. लोक त्यांना सावकार या टोपण नावाने ओळखायचे...
    पुढे मात्र ते आजारी पडू लागले आणि तो व्यापार बंद झाला. मग त्यांनी आपल्याला झेपेल असे मोसंबी डाळींबीच्या बागांच्या राखणीचे काम सुरु केले. शहरातले बागवान लोक या फळबागा ठोक भावात घ्यायचे आणि पुढे फळे काढायला येईपर्यंत राखण्याची जबाबदारी दादांना मिळायची. मी अगदी सहावी सातवीत असतानापर्यंत शाळेतून आल्यावर त्या बागेत त्यांच्याबरोबर जायचो. तिथेच मी अभ्यास करत त्यांना मदत करायचो.
   मधल्या काळात बहिणीच्या लग्नात होती ती जमीन गहाण पडली. आई शेतमजुरीबरोबर सकाळी आजूबाजूच्या खेड्यात तरकारीची हाळीपाटी करायची. वडिलांची तब्बेत आणि आमच्या कुटुंबाची आर्थिक हालत खालावत गेली आणि मी आठवीत असताना कार्तिकी एकादशीच्या दिवशी दादांनी इथला मुक्काम संपवला. खूप कमी वय होते माझे त्यावेळी...
     त्यांच्या सहवासातल्या त्या मोसंबीच्या बागेतल्या आठवणीच काय त्या सोबत आहेत. मी शाळेत कायम पाहिला नंबर मिळवतो याचे त्यांना खूप अप्रूप होते! मला ते अत्यंत मृदू भाषेत जगरहाटी समजावून सांगायचे. इथे गावात राहिला तर खायचे वांदे होतील त्यामुळे जमेल तेवढं शिकून एखादी चांगली नोकरी मिळाली तरच आयुष्यात निभाव लागेल याची जाणीव त्यांनी त्यांच्या शेवटच्या दिवसांत मला करून दिली होती,  त्यामुळे कितीही हाल झाले तरी शिक्षण घेणे सोडायचे नाही हे ठामपणे ठरवले होते.
     त्यांच्याकडूनच मला माझ्या शांत स्वभावाची व सारासार विचार करून निर्णय घेण्याच्या  वृत्तीची देणगी मिळालेली आहे आणि त्या जोरावर मी आयुष्यात कितीही कठीण प्रसंग आला तरी माझे मानसिक स्वास्थ्य ढळू देत नाही.त्यांचा करारी बाणा व स्वाभिमानी वृत्तीही माझ्यात वारशाने आलेली आहे.
 आज जे काही समाधानी व आंनदी जीवन मी जगतो आहे त्यामागे माझ्या माता पित्याचे संस्कार आणि आशीर्वाद आहेत!
 आजच्या फादर्स डे च्या निमित्ताने परमपूज्य दादांस अभिवादन...
   फादर्स डे च्या सर्व बाप लोकांना शुभेच्छा..
©प्रल्हाद दुधाळ.

Monday, June 15, 2020

कुबेर_मातृदिन.

कुबेर_मातृदिन... लेखन स्पर्धेतील पारितोषिक विजेता लेख. 
आई.... 
   प्रत्येकाच्या हृदयात आपल्या आईसाठी एक हळवा कोपरा असतोच असतो.ज्या व्यक्तींना आईवडिलांचा सहवास त्यांच्या वयाच्या पन्नाशी-साठीनंतरही मिळत रहातो त्या व्यक्तींचा मला खरंच खूप हेवा वाटतो! अशी माणसं माझ्या दृष्टीने खूप म्हणजे खूप भाग्यवान असतात! 
    आपल्याकडे एक जुनी म्हण आहे "माणसाने नकटं व्हावं;पण धाकटं होऊ नये". माझ्या दृष्टीने या म्हणीचा उगम अशा धाकट्या असलेल्या व्यक्तीच्या व्यथेतून झाला असावा, कारण आई आणि वडिलांचा सर्वात कमी सहवास धाकट्याला मिळतो!
   माझ्या सहा बहीणभावंडातले मी शेंडेफळ!कधी कधी सहजच मनात विचार येतो की जर पन्नास साठच्या दशकात मर्यादित कुटुंबाचा फंडा असता तर?... 
....तर,  कदाचित माझा जन्मच झाला नसता!
...  तर, मी माझ्या पालकांचे शेवटचे अपत्य होतो....
    पुरंदर तालुक्यातल्या परिंचे गावातील आमचं कुटुंब अत्यंत गरीब, अल्पभूधारक शेतकरी कुटुंबं होतं. शेतीच्या तुटपुंज्या उत्पन्नावर भागणे शक्यच नव्हते,त्यामुळे आई आणि वडील दोघेही मजुरी करता करता आजूबाजूच्या गावात आठवडा बाजारात तरकारी विकायला जायचे.
   आठवडा बाजार नसेल त्या दिवशी माझी आई पहाटे उठून भाजीपाला घेऊन माहूर, मांढर, हरगुडे, यादववाडी, सटलवाडी इत्यादी ठिकाणी हाळीपाटी करायची.पुन्हा घरी येऊन कुणाच्यातरी शेतावर खुरपणी, काढणी अशी काही ना काही कामे करायची.उन्हाळ्यात कामे नसायची तेव्हा कुणाच्या शेवया, कुरडया  करून दे, गोधड्या शिवून दे अशी तिची अखंड कामे चालू असायची.माझे प्राथमिक शिक्षण चालू असताना वडील वारंवार आजारी पडू लागले....
    त्यांच्या आजारपणामुळे आठवडा बाजार बंद झाले.मग ते तब्बेतीला झेपेल असे काम म्हणून मोसंबीच्या बागा राखणीला घेऊ लागले. मी तिसरी चौथीत असल्यापासून शाळा सुटली की त्या बागेत त्यांच्या मदतीला जायचो.
   पुढे माझ्यापेक्षा मोठ्या बहिणीच्या लग्नात होती नव्हती ती शेती सावकाराकडे गहाण पडली. मी आठवीत असताना वडिलांचा आजार बळावला आणि ते आम्हाला सोडून गेले.
   वडील गेल्यानंतर आई आणि मी असे दोघेच गावी रहायचो.दोन मोठे बंधू आपापल्या वाटेने शहराकडे गेले आणि आपल्या तुटपुंज्या मिळकतीत स्वतःच्या संसारात रमले....
     आईच्या आयुष्यात एवढी संकटे आली, प्रचंड  चढउतार आले;पण मी माझ्या आईला वैतागलेले, त्रागा करताना कधीच पाहिलेले नाही.सतत हसतमुखाने ती आलेला दिवस साजरा करायची....
    तिला घरगुती झाडपाल्याच्या औषधांची खूप माहिती होती.पंचक्रोशीत तिच्यासारखी दाई नव्हती असे अजूनही जुने लोक नाव काढतात! 
      ती स्वतः अजिबात शिकलेली नव्हती;पण का कुणास ठाऊक ती मला  शिक्षणासाठी कायम प्रोत्साहन देत राहिली.
      शाळेत प्रत्येक वर्षी मी पहिल्या क्रमांकाने पास होतं होतो,माझे प्रगतीपुस्तक घरोघरी बघण्यासाठी/दाखवण्यासाठी फिरायचं, माझ्या हुशारीचे कौतुक व्हायचे. तिला मिळालेले मार्क्स, पाहिला नंबर त्यातलं फारसं काही समजायचं नाही;पण आपल्या धाकट्याचं सारं गाव कौतुक करतं याची  प्रचंड ख़ुशी मी प्रत्येक रिझल्टच्या दिवशी तिच्या डोळ्यात पाहायचो!.
     ती मला नेहमी म्हणायची...
" भरपूर शिक,मोठा हो, कुणाच्यापुढे हात पसरू नको, आपली आब सांभाळून रहा!"
मला हायस्कुल स्कॉलरशीप मिळायची.बारा रुपये महिना मिळायचे.स्कॉलरशिपचे पैसे घरातल्या तेलमिठाची पाच सहा महिन्याची  बेगमी करायचे.
    बहात्तरच्या दुष्काळात आई दुष्काळी कामावर जायची.तिथे मिळणाऱ्या लाल मिलोची भाकरी,सुकडी खाऊन आम्ही कित्येक दिवस काढले आहेत.कित्येकदा हुलग्याचं माडगं खाऊन रहावे लागायचं;पण शेवटपर्यंत तिने आत्मसन्मानाशी तडजोड केली नाही.
     आपली मोठी दोन पोरं आयुष्यात फार काही करु शकली नाहीत, आता या धाकट्याचं तरी नीट व्हावं.कपाळावरचा दारिद्र्याचा शिक्का पुसला जावा असं तिला मनोमन वाटायचं.
     पहाटे जात्यावर दळण दळताना ती ज्या ओव्या म्हणायची त्यात माझे नाव गुंफून माझ्या कर्तृत्वाची स्वप्ने ती रंगवायची... 
अवसेची जाईल रात उगवेल तो चंद्र पुन्हा,बुक वाचतो माझा राजा, बैरीस्तर माझा कान्हा!
किंवा 
लेक चालला साळला,संगे दिलीय भाकरी, साहेबावानी आहे त्याची, मोठ्या पैक्याची नोकरी!
 तिच्या त्या माझ्या भविष्याची स्वप्ने पेरलेल्या ओव्या मला खूप आवडायच्या, तासन तास मी त्या ओव्या ऐकत रहायचो, त्यातला अर्थ शोधत रहायचो!
मला वाटते पुढे जीवनात मला चारोळ्या,कविता,कथा,लेख,लिहिण्यावाचनाची आवड निर्माण झाली, ती आईने माझ्यावर लहानपणी केलेल्या या संस्कारांमुळेच!
तिने आपल्या वागण्याबोलण्यातून मला सतत काही ना काही शिकवण दिली..
- कोणतीही वाईट परिस्थिती आली तरी  आपल्या स्वाभिमानाशी इमान राखायचे.
उगाच हवेत इमले न बांधता कायम वास्तवात जगायचे.
जीवनात ऐश्वर्य आले म्हणून माजायाचे नाही,गरीबीला लाजायचे नाही.
अन्याय सहन करायचा नाही, स्वार्थासाठी कोणालाही फसवायचं नाही.
आपण चांगले वागलो तर आपल्याशीही लोक चांगलेच वागतात.
आपले काम प्रामाणिकपणे करत राहिले तर त्याचे चांगले फळ एक ना एक दिवस नक्कीच  मिळते,
मोठी स्वप्ने बघायची;पण नेहमी अंथरून पाहून पाय पसरायचे.
व्यसनाने आयुष्याचं वाटोळे होते, त्यामुळे कधीही कोणतेही व्यसन करायचे नाही.
   मी आयुष्यभर तिने  दिलेल्या शिकवणीप्रमाणे मार्गक्रमणा करत राहिलो. हायस्कूल आणि कॉलेजला असताना अनेक व्यसनी छंदीफंदी मित्रांच्यात राहूनही मला कधी त्यांच्यासारखे वागायचा मोह झाला नाही.आयुष्यात वाममार्गाने पैसा कमावण्याच्या अनेक संधी हात जोडून समोर उभ्या होत्या; पण त्या आडवाटेने जाण्याचा लोभ कधीच झाला नाही.ज्या गोष्टीवर माझा नैतिक अधिकार नव्हता,अशा कोणत्याच गोष्टीचा मला जीवनात कधी मोह झाला नाही.माझ्या तोंडी कधीही कुणासाठीही अरेतुरेची भाषा नसते.कुणी माझ्याशी वाईट वागले तरी मी कुणाबद्दलही आकस बाळगत नाही.कुणी माझा रस्ता आडवला तर मी आपली ऊर्जा वाया न घालवता आपला रस्ता बदलण्याचा प्रयत्न करतो.
“ऐसी जगह बैठिये-कोई ना बोले उठ, ऐसी बात कहिये-कोई ना बोले झूठ!” हे माझे जगण्याचे तत्व माझ्या आईच्या संस्कारांचा परिपाक आहे असे मी मानतो! प्रतिकूल परिस्थिती असतानाही जीवनात सकारात्मक कसे रहावे, समस्येत दडलेली संधी कशी शोधायची यांचे व्यावहारिक ज्ञान मला माझ्या आईच्या सहवासात राहून मिळाले.मला मिळालेल्या या ज्ञानाच्या जोरावर मी मला अभिप्रेत असलेल्या यशापर्यंत पोहोचलो याचं सगळं श्रेय्य माझ्या आईने माझ्यावर केलेल्या संस्कारांना आहे.आईच्या प्रचंड इच्छाशक्ती,आशीर्वाद आणि केलेले संस्कार यांच्या जोडीला माझे प्रयत्न आणि नशिबाची साथ या जोरावर आमच्या खानदानातला पहिला सरकारी नोकरदार होण्याचे भाग्य मला मिळाले.
   नोकरीतील प्रगतीबरोबरच पद प्रतिष्ठा आणि आर्थिक सुबत्ता आली...
    माझ्या प्रगतीमधला फक्त एकच टप्पा तिने डोळे भरून पाहिला;पण माझ्या कर्तुत्वाला खऱ्या अर्थाने आलेली गती बघायला मात्र ती थांबली नाही.
    अठरा मार्च 1994 रोजी माझ्या आईने  आमचा आणि या जगाचा निरोप घेतला...       आई मला सोडून गेली त्याला एवढी वर्षे झाली;पण आजही माझ्या जीवनावर तिचा  प्रचंड प्रभाव आहे.
    अडचणी आल्या म्हणून रडत बसण्यापेक्षा त्या अडचणींचे संधीत रूपांतर करून त्यावर स्वार व्हायचे बाळकडू मला माझ्या आईकडून मिळालेले आहे आणि त्याच्या जोरावर माझी मार्गक्रमणा सतत सकारात्मक दिशेने चालू आहे, आणि अशीच चालू राहील....
ती कधी न पाहिली थकलेली, समस्येशी कुठल्या थबकलेली.
सुरकुतल्या हातात हत्तीच बळ, आधार मोठा ती असता जवळ.
कोणत्याही प्रसंगी मागे ती सदा,निस्वार्थ सेवा वृत्तीने वागे सर्वदा.
माया ममता सेवा भरलेल ते गाव, सदा ओठी असु दे आई तुझे नाव!

  ... ©प्रल्हाद दुधाळ, पुणे.9423012020

Tuesday, June 9, 2020

पात्र... विचारमंथन

'पात्र'
  मराठी भाषा आहे ही, एकाच शब्दाचे कितीतरी अर्थ असणारी ही समृद्ध अशी भाषा आहे! आता हाच शब्द घ्या की 'पात्र', या एका शब्दाच्या उच्चाराने वेगवेगळ्या व्यक्तींच्या मनात वेगवेगळा अर्थ येऊ शकतो,  म्हणजेच मराठीत फक्त तो शब्द  सांगून उपयोगाचा नाही तर तो शब्द कोणत्या संदर्भात वापरण्यात आलेला आहे हे सुद्धा खूप महत्वाचे आहे.
 उदाहरण म्हणून खालील वर्णन वाचा...
   "पात्रता असूनही त्याला डावलले गेल्याने तो विरक्त होऊन गंगा किनारी गेली कित्येक दिवस रहात होता. आता गंगा नदीच्या त्या विशाल पात्राकडे पाहून  त्याला आपण किती शूद्र आहोत याची प्रथमच जाणीव झाली. त्याने तिथेच किनाऱ्यावर बैठक ठोकली आणि हातातले भिक्षापात्र समोर ठेवले. समोरच्या बाजूला  विद्यार्थ्यांचे एक पथनाट्य चालू होते. गंगा नदीच्या प्रदूषणावर आधारित त्या पथनाट्यातले प्रत्येक पात्र जीव तोडून गंगामय्याच्या स्वच्छतेचा संदेश देत होते.थोडे पलीकडे एक युवक आपल्या प्रेमपात्राला बाहुपाशात घेऊन तिच्याशी लगट करत बसला होता.बाजूने जाणारे येणारे त्यांच्या त्या उघड्यावरच्या शृंगाराचे नयनसुख घेत होते... '
   बघा इथे 'पात्र' हा एकच शब्द; पण किती वेगवेगळ्या संदर्भात वापरला गेला आहे...
अशी माझी मराठी भाषा, एक समृद्ध बोली!
(विचार मंथन)
©प्रल्हाद दुधाळ.