Wednesday, June 12, 2013

तथास्तु!


                                   तथास्तु!

                  फार फार वर्षापूर्वी एका गावात एक सज्जन माणूस रहात होता.प्रयत्न व परमेश्वराची कृपा यामुळे सर्व सुखे त्याच्या पायाशी लोळण घेत होती. परोपकारी म्हणून सर्वत्र त्याचे नाव झाले होते. परमेश्वरावर त्याची निस्सीम भक्ती होती.आपल्या भक्तीभावाने त्याने परमेश्वराला प्रसन्न करून घेतले होते.आपल्याबरोबरच सर्व जग सुखात असावे असे त्याला वाटत असे.या जगात कोणीही कुठल्याही समस्येने  गांजलेला नसावा अशी प्रार्थना तो दररोज करत असे.गावात त्याला सर्वजण मान देत असत.तो उदार मनाने सर्वांना कायम मदत करत असे.आपण जरी सुखात असलो तरी आजूबाजूला अनेक लोक वेगवेगळ्या कारणाने दु:खात असलेले पाहून त्याने ठरवले की परमेश्वराला सांगून सर्वांना सुखी करायचे! त्यासाठी त्याने मनोभावे पूजापाठ सुरु केला.परमेश्वराने सज्जनाला दर्शन दिले व तुझ्यासाठी अजून काय करू असे विचारले.

                 “ तुझ्या आशीर्वादाने माझ्याकडे सर्व काही आहे! मला काहीच नको पण अवतीभवतीच्या सगळ्यांनाही तू  सुखी कर! “ भक्ताने साकडे घातले.

                “अरे असे नाही करता येणार! तू सुखात आहेस ते  तुझ्या कर्मामुळे!

           इथे प्रत्येकाला जे काही मिळते ते ज्याच्या त्याच्या कर्माचे फळ असते! त्यामुळे कोण कसा जगणार ते मी त्याच्या बऱ्यावाईट कर्माप्रमाणे ठरवतो! तेंव्हा जसे आहे ते ठीक आहे तू सुखात आहेस ना? तेव्हढेच पहा! मला माझे काम करू दे !”

                 एवढे सांगूनही सज्जनावर त्याचा काहीच परिणाम झाला नाही.त्याने सर्वांच्या सुखासाठी देवाला आळवणे चालूच ठेवले. देवाचा तो आवडता भक्त होता त्यामुळे देवाने शेवटी हार पत्करली व त्या गावातील सर्वांना सुखी करायचे ठरवले!

               सज्जनाचे घर सोडून सगळ्या गावातील लोकांना पक्की घरे मिळाली.सर्व लोक एका रात्रीत श्रीमंत झाले. दु:खाचा नायनाट झाला.कुणालाही काहीही करायची गरज राहिली नाही.खाणेपिणे व ऐशारामात रहाणे हा प्रत्येकाचा दिनक्रम झाला.कुणालाही काम करायची गरज उरली नाही! गाव सुखी व संपन्न झाले.

                 एकदा सज्जनाची चप्पल तुटली तो नेहमीच्या दुकानात गेला तर दुकान बंद!

             काही करण्याची गरजच उरली नसल्यामुळे चप्पल दुरुस्तीचे दुकान बंद झाले होते! सुखात असल्यामुळे गावातील सर्वांनी कामच करणे बंद केल्याचे दिसले! सज्जनाचे घर जसे आधी होते तसेच असल्यामुळे पावसामुळे गळायला लागले पण दुरुस्तीसाठी कोणीही येईना कारण सगळेच सुखात! कुणालाही कामाची गरजच  नाही! कुणालाही कसलीही चिंता नाही! सगळीकडे आनंदी आनंद!

                  सज्जनाला परमेश्वराचे म्हणणे आठवले. आपल्या हट्टापायी आपण काय चूक केली आहे हे सज्जनाला समजून आले! कोणतेही कर्म न करता आलेल्या सुखाची /ऐश्वर्याची लोकांना काहीच  किंमत नव्हती! सज्जनाने देवाला पुन्हा सगळे पाहिल्यासारखे करण्याबद्दल साकडे घातले! परमेश्वर गालातल्या गालात हसला!

                आपल्या आवडत्या भक्ताचे गाऱ्हाणे देवाने ताबडतोब ऐकले!

                   म्हणाला “ तथास्तु ” !

                                    .......... प्रल्हाद दुधाळ.                               (एका दंतकथेवर आधारीत)