Monday, May 19, 2014

विचारांचा गुंता.

विचारांचा गुंता.
                     सर्वसाधारणपणे माणूस आपल्या  स्वत:च्या मनात काय चालले आहे याचा सुगावा कोणालाही लागू देत नाही.अगदी जिवाभावाच्या जवळच्या माणसालाही आपले  मनातले विचार कळू  नयेत अशी तो खबरदारी घेत रहातो.अशा वेळी काही अपवादात्मक परिस्थिती सोडली तर अशा वागण्यामागे इत्तरांसमोर आपला मानसिक कमकुवतपणा उघड होऊ नये यासाठीच त्याची ही सर्व धडपड चालत असावी!
                  खर तर माणसाच्या मनात येणारे चांगले वाईट विचारच बऱ्याच प्रमाणात त्याचे  व्यक्तीमत्व घडवित असतात. त्यामुळेच तामसी विचाराचा माणूस वागताना कायम विचित्र आक्रस्ताळेपणा करतो! अशी व्यक्ती कायमच दिसायला उग्र व रागीट असते, तर प्रत्येक बाबीचा शांतपणे विचार करणारा माणूस वागायला बोलायला शांत असतो! अशा माणसाचे व्यक्तीमत्वही  सौम्य शालीन व प्रसन्न असते. माणूस ज्या व जशा प्रकारचा विचार करतो तशा प्रकारचेच वागायला लागतो.चुकीचे विचार सतत मनात घोळवत बसलेली व्यक्ती चुकीचेच वागायची शक्यता अधिक असते! त्यामुळे आपल्याच विचारात आत्म मग्न रहाणाऱ्या व्यक्ती शेवटी मानसिक विकारांनी ग्रस्त होऊ शकतात! मानवी मन हे एक अतर्क्य असे कोडे आहे. मानवी मनात कायम एक विचारांची गुंतावळ ठाण मांडून बसलेली असते. मुद्देसूद विचारांची देणगी लाभलेला माणूस हा गुंता सहजपणे सोडवतो व योग्य पद्धतीने आपले आयुष्य जगत असतो पण सगळ्यांनाच हे जमत नाही बहुतेकांना हे विचाराचे गुंते सुटता सुटत नाहीत आयुष्यभर अशा व्यक्ती एकामागोमाग येणाऱ्या या गुंतावळीमध्ये अडकून पडतात आणि मग त्यांचे आयुष्यही गुंतागुंतीचे होऊन जाते! मला वाटते की ही परिस्थिती मानवनिर्मित आहे.या सृष्टीमध्ये सर्व प्राणीमात्रांमध्ये फक्त मानवालाच कुशाग्र बुद्धिमत्तेची देणगी लाभलेली आहे व या बुद्धीच्या जोरावर तो कुठल्याही परिस्थितीवर मात करू शकतो! मग तरीही काही माणसांना अशा वैचारिक गुंत्यांचा सामना का करावा लागतो? मला वाटते याला कारण आहे माणसातला प्रचंड अहंकार! विचार व्यक्त करण्यापेक्षा,समस्यांची चर्चा करण्यापेक्षा तो आत्मप्रौढीला नको तेव्हढे महत्व देऊन कुणासमोरही व्यक्त होणे नाकारतो! “ मी स्पेशल आहे, मला कुणाला विचारायची गरजच नाही ,मी एकटा निर्णय घ्यायला समर्थ आहे, होईल ते  बघू पण कुणापुढे झुकणार नाही,ई ई”. अशा प्रकारच्या त्याच्या ताठर वैचारिकतेमुळे व योग्य वेळी योग्य व्यक्तींशी चर्चा व विचारविनिमय न केल्यामुळे माणूस अशा अडचणीत सापडत असावा.
                  आपणास माहीत आहे की, या जगातली प्रत्येक व्यक्ती वेगळी आहे त्याचप्रमाणे त्याचे व्यक्तीमत्व ,त्याची विचारशक्ती, विचारसरणी वेगवेगळी असू शकते.मग प्रत्येकजण योग्य दिशेनेच विचार कसा काय करू शकेल? म्हणजेच मनात आलेला विचार योग्य आहे की नाही हे ठरविण्यासाठी तो विचार कुणाबरोबर तरी शेअर करणे आवश्यक आहे. आपली  जीवाभावाची माणसे, आपले कुटुंबीय,आपले हितचिंतक, मित्र यांच्यासमोर मनातल विचार व्यक्त केले,त्यावर सखोल चर्चा केली तर हे विचार बरोबर आहेत की चुकीचे आहेत याचे मूल्यमापन होऊ शकते. यामुळे चुकीच्या निर्णयापायी  होणाऱ्या  संभाव्य परिणामांची तीव्रताही  कमी करता येऊ शकेल वा असे नुकसान टाळता येईल.यासाठी आवश्यकता आहे ती विचारांच्या देवाणघेवाणीची,योग्य सल्ला-मसलीतीची. दिलखुलास चर्चा करून तसेच योग्य तेथे योग्य त्या विषयातल्या तज्ञ व्यक्तीचा सल्ला घेऊन निर्णय घेतले तर आयुष्यातले बरेचसे अपयशाचे प्रसंग कमी करता येऊ शकतात!
                    जीवनातल्या अनेक छोट्या मोठ्या समस्यांवर चर्चा व संबंधितांशी केलेला विचारविनिमय हा रामबाण उपाय आहे.अशा चर्चांमधून जो  योग्य असेल असाच निर्णय सुचविला जाईल योग्य सल्लाही मिळेल ,पण तो स्वीकारण्यास आवश्यक असलेली स्वभावातली लवचिकता व तडजोडीची तयारी मात्र संबंधित व्यक्तीने दाखवायला हवी .
                       तर अशा प्रकारे सर्वसमावेशक विचारविनिमय व चर्चेअंती घेतलेला कुठलाही निर्णय सहसा चुकीचा ठरत नाही,कारण चर्चा होताना संबंधित विषयांवर सर्व बाजूनी  विचारांची देवाण घेवाण होते, त्या विचारांचे होणारे चांगले वाईट परिणाम तपासले जातात.भविष्यातल्या परिणामांचाही उहापोह होतो व मगच सर्वमान्य असा निर्णय घेतला जातो.योग्य काय अयोग्य काय हे सर्वांच्या समोर येते. संभाव्य निर्णयामुळे होणारे फायदे व तोटे याविषयी सविस्तरपणे चर्चा झालेली असते त्यामुळे आपसूकच योग्य त्या दिशेने कार्यवाही होते.आधी असलेला वैचारिक गोंधळ संपल्यामुळे मने साफ होतात. मनामनात विश्वासाचे बंध तयार होतात व मानसिकसुरक्षा मिळाल्यामुळे माणूस आनंदी रहातो.मनावर कुठलाही ताण रहात नाही .त्यामुळे माणसाने नेहमी आपल्या मनात आलेले विचार योग्य ते सहकारी व कुटुंबियांसमोर व्यक्त करायला हवेत! त्यावरच्या सर्वांच्या प्रतिक्रिया ऐकून घ्यायला हव्यात.योग्य मतांचा व विचारांचा आदर करून कार्यवाही करायला हवी.प्रत्येक समस्येवर चर्चेच्या माध्यमातून तोडगा काढायची सवय प्रत्येकाने लावायला हवी. अशा चर्चेमधून कधी कधी समोरच्या व्यक्तीलाही तशाच प्रकारची मदत हवी असल्याचे जाणवते त्यावेळी त्याने मांडलेल्या विचारांवर/समस्यांवर आपले अभ्यासपूर्ण मतही द्यायला हवे! योग्य असेल  तेथे वैचारिक मदत द्यायला हवी. अश्या प्रकारे जेंव्हा क्रमाक्रमाने प्रथम वयक्तिक पातळीवर,कौटुंबिक पातळीवर, नंतर गावपातळीवर,सामाजिक पातळीवर व शेवटी वैश्विक पातळीवर असे चर्चेअंती निर्णय घेतले जातील तेंव्हा मतभेद व द्वेष अजिबात रहाणार नाहीत मग माणसाचे हे जगणे सुंदर व्हायला कितीसा वेळ लागेल?.

                                                      .........प्रल्हाद दुधाळ.


Friday, May 9, 2014

गैरसमज- नात्यांमधला कर्करोग.


                 नात्यांमधला भयानक कर्करोग-गैरसमज.
                   माणसा माणसातील नाती ही त्यांच्या एकमेकांवर असलेल्या विश्वासावर टिकून असतात मग ती नाती रक्ताची असोत नाहीतर मैत्रीची! अशी नाती निर्मळ व पारदर्शी  असतील तर सहसा कुठल्याही प्रकारच्या गैरसमजाचे प्रसंग येत नाहीत, पण जर एकमेकांशी संवाद साधताना एका बाजूने जरी शब्दाचा वेगळा अर्थ लावला गेला तरी अशा नात्याला गैरसमजाची लागण होऊ शकते.आणि गैरसमजाचा हा कर्करोग प्रत्यक्ष कर्करोगा पेक्षाही वेगाने पसरून नात्याचा विनाश व्हायला फारसा वेळ लागत नाही! म्हणून चुकून माकून जर अशा नातेसंबंधात जर अशी गैरसमजाची भयानक गाठ आढळली तर त्यावर  वेळीच उपचार करणे आवश्यक आहे.अर्थात हे नाजूक स्नेहबंध जीवापाड जपण्यासाठी प्रत्येक व्यक्तीने आपल्यापरीने काळजी घ्यायलाच हवी.
                  असे नाजूक नातेसंबंध जपण्यासाठी आपण काय करू शकतो ते पाहू –
१.      कुणाशीही संवाद साधताना शब्दांचा वापर जपूनच करायला हवा, शब्द हे शस्र आहे याची जाणीव प्रत्येकाला असायला हवी. बोलताना चुकीची शब्दफेक,आवाजातील चढ-उतार, उच्चारांची चुकलेली पट्टी आदी गोष्टी क्षणात अर्थाचा अनर्थ करु शकतात! त्यामुळे बोलताना जाणीवपूर्वक व शांतपणे आपले म्हणणे योग्य शब्दामध्ये मांडणे आवश्यक आहे. आपल्या बोलण्याचा काही वेगळा अर्थ तर निघत नाही ना? हे पडताळून पहाणे गरजेचे आहे.जरूर असेल तेथे तत्काळ स्पष्टीकरण देऊन आपल्याला अभिप्रेत असलेला अर्थच समोरच्या व्यक्तीपर्यंत पोहचत आहे ना हे पाहिले पाहिजे.कारण योग्य प्रकारे झालेला सुसंवादच स्नेहबंध घट्ट करायला मदत करतो
२.      कधी कधी बोलताना स्पष्ट बोलणे आवश्यक असते. गोल गोल बोलून तात्पुरता वाईटपणा घेणे टाळता येते,पण यामुळे पुन्हा पुन्हा तसेच प्रसंग समोर येतात त्यामुळे उगाच  भिडस्तपणा न ठेवता स्पष्ट भाषेत बोलणे गरजेचे असते त्यामळे गैरसमजाचे प्रसंगच येणार नाहीत.समोरच्या व्यक्तीपासून एखादी गोष्ट लपविण्यापेक्षा सत्य परिस्थिती समोर ठेवल्यामुळे संबंधिताला वास्तवाची जाणीव होईल.समोर उभी असलेली अपरिहार्य परिस्थिती व त्याचे गांभीर्य समोरच्या व्यक्तीला समजेल.हे सर्व योग्य अशा शब्दांमध्ये समजाऊन दिल्यामुळे मने कलुषित व्हायचे तर टळेलच पण नात्यात उद्भवणारी संभाव्य कटुतासुद्धा टाळता  येईल.स्पष्टवक्तेपणा हवा पण बोलताना विनाकारण टोमणे मारून बोलणे वा टोचून बोलणे टाळणे आवश्यक आहे.ज्यावेळी समोरची व्यक्ती बोलते आहे त्यावेळी शांतपणे मधे न टोकता त्याचे संपूर्ण बोलणे ऐकून घ्यायची तयारी ठेवली पाहिजे. अर्धवट ऐकलेल्या बोलण्यातून वेगळा अर्थ निघू शकतो त्यामुळे समोरच्या व्यक्तीला नक्की काय म्हणायचे आहे ते समजून घेतल्याने गैरसमज वा वादविवादाचा प्रश्नच येणार नाही.समोरच्या व्यक्तीचे बोलणे जर तुम्हाला पटणारे नसेल तर त्याचे बोलणे पूर्ण ऐकून घेवून नंतर मुद्देसूदपणे व सप्रमाण त्याचे मत  कसे योग्य नाही हे शांतपणे समजाऊन सांगणे जरुरीचे आहे.येथे लक्षात घेणे आवश्यक आहे की, असा संवाद साधताना दोघांपैकी एकजण जरी क्रोधात असेल तर असा संवाद तात्पुरता थांबवणे कधीही योग्य ठरते! कारण बहुतेक वेळा भावनेच्या भरात केलेली कृती नातेसंबंधात बाधा आणते, याशिवाय रागाच्या भरात अनेकदा एकमेकांच्या आत्मसन्मानाचा आदर राखला जात नाही.चुकून समोरच्या व्यक्तीचा झालेला तेजोभंग पुढे अनर्थास कारणीभूत होवू शकतो!
३.      एक गोष्ट कायम लक्षात घेतली पाहिजे की जगात असणाऱ्या प्रत्येक समस्येला एक तरी योग्य,समाधानकारक वा त्याच्या जवळचे उत्तर असतेच असते! त्यामुळे कोणत्याही समस्येवर सकारात्मक दृष्टीकोन ठेऊन विचार केला तर नक्कीच सर्वमान्य पर्याय समोर येतो.नातेसंबंधात कोणतीही कटुता न आणता समोरासमोर चर्चा करून,एकमेकाला समजून घेऊन,प्रसंगी माफ करून वा माफी मागून, झालेले गैरसमज दूर करता येतात.प्रत्येकाने असे माणसामाणसांत तयार झालेले स्नेहबंध टिकवण्याला प्राधान्य द्यायला हवे, त्यासाठी सर्व प्रकारचे मतभेद,अहंकार बाजूला ठेऊन या नातेसंबंधाला महत्व द्यायला हवे.
४.                      मानवी मन हे एक गहन असे कोडे आहे, हे कोडे सोडवण्यात भल्या भल्यांना अपयश आले आहे.या विचित्र मनोव्यापारामुळे क्षणभरात सरळपणे वागणारा माणूस अचानक वाकड्यात घुसू पहातो.एकदा का मनाला षड्रिपूंपैकी एकाची जरी बाधा झाली तरी माणसाच्या वागण्याला धरबंध रहात नाही त्यातूनच समज-गैरसमज वाढत जातात.मानवी नातेसंबंधात दुरावा येतो.अपेक्षाभंग होतात.अहंकारी व हट्टी मन माघार घ्यायला तयार होत नाही.अहंकाराला ठेच पोहचते आणि मग व्यक्ती व्यक्तीमधल्या अगदी क्षुल्लक गोष्टी प्रतिष्ठेच्या केल्या जातात.मोडेन पण वाकणार नाही अशी भूमिका घेऊन पुढचा मागचा विचार न करता,जीवनातील अत्यंत महत्वाच्या अशा नातेसंबंधाला तिलांजली दिली जाते. अशा वेळी सारासार विवेकबुध्दीचा वापर करणे माणूस विसरून जातो.डोक्यात राख घालून आततायीपणे वागले जाते.खर तर अशा वेळी जीवनातले स्नेहबंध महत्वाचे की इत्तर भावना? याचा थंड डोक्याने विचार करायला हवा.
५.      या जगात जन्मलेली प्रत्येक व्यक्ती वेगळी आहे.व्यक्ती तितक्या प्रकृती या म्हणीप्रमाणे प्रत्येकात विविध गुण दोष,वृत्ती व विकृती भरलेल्या आहेत,हे सत्य समजून घ्यायला पाहिजे.एक माणूस दुसऱ्यासारखा बोलेल अथवा वागेल याची मुळीच खात्री देता येत नाही त्यामुळे तशा तऱ्हेच्या अपेक्षांवर आधारीत नातेसंबंध कधीच टिकणारे नसतात हे प्रत्येकाने समजून घ्यायला हवे.नाती टिकवण्यासाठी काही घेण्याबरोबरच काही देण्याची अर्थात तडजोडीची भूमिका असायला हवी.
      अशा प्रकारे नातेसंबंधात कोणत्याही प्रकारचे गैरसमज होणार नाहीत आणि झालेच तर चर्चेने सुसंवाद साधून ते दूर होतील व हे संबंध अडचणीत येणार नाहीत याची प्रत्येकाने काळजी घेतली तर माणसा माणसातली नाती अजूनच दृढ होत जातील. मानवी जीवन क्षणभंगुर आहे,आपल्याकडे असलेला प्रत्येक क्षण महत्वाचा आहे त्यामुळे तो क्षण नको त्या गोष्टींत व्यर्थ घालवण्याऐवजी तो आनंदात जगण्यासाठी  माणसा माणसातला सुसंवादच उपयोगी ठरणार आहे! असतो.यासाठी -
                                    चुकल चुकून काही,
लगेच मागावी माफी.
चुकल कुणाच काही,
 करुन टाकाव माफ .
बोलून टाकाव काही,
 खुपलेल मना मनात.
  किल्मिष नकोच काही,
 आनंदी नातेसंबंधात .

  आपल्याला काय वाटते?

                          .......................प्रल्हाद दुधाळ.                                 ५/९ रुणवाल पार्क, मार्केट यार्ड पुणे ३७.
         (९४२३०१२०२०)
pralhad.dudhal@gmail.com

                         

Tuesday, May 6, 2014

ओळख स्वत:ची.

ओळख स्वत:ची.
       तसं पाहिलं तर आपण इत्तरांपेक्षा स्वत:ला चांगलंच ओळखत असतो! आपल्यामधे काय चांगले गुण दडले आहेत, आपले अवगुण काय आहेत हे सुध्दा त्याला माहीत असतं!आपला जन्मत: स्वभाव कसा आहे,आपल्यातली बलस्थ्याने कोणती व आपल्यात काय कमी आहे याची निश्चित जाणीव प्रत्येकाला असतेच असते.आपण कशाने आनंदी होतो,कोणत्या गोष्टी आपल्याला क्लेशदायक आहेत.आपल्याला कोणत्या गोष्टीमुळे राग येतो तर कोणत्या परिस्थितीत आपल्याला सुख समाधान मिळते याचाही अंदाज आलेला असतो.   पण जगताना  आपल्या खऱ्या स्वरूपाकडे माणूस जाणूनबुजून दुर्लक्ष करतो व तो वास्तवात जसा नाही तशी स्वत:ची एक आभासी प्रतिमा मनात तयार करतो व ही प्रतिमाच  लोकांसमोर आणण्याचा प्रयत्न करतो. अशा प्रकारे त्या प्रतिमेचा एक मुखवटा घालून तो जगात वावरायला लागतो. लावलेला हा मुखवटा हाच आपला खरा चेहरा असल्याचा आव तो आयुष्यभर आणतो व आपली सर्व एनर्जी ती गोष्ट सिद्ध करण्यासाठी वाया घालवतो. या सर्व प्रकारात त्याला काय आनंद मिळतो कोण जाणे? बहुदा आपल्यात जे आहे ते जसेच्या तसे लोकांसमोर आले तर ते कमीपणाचे आहे असे त्याला वाटते मग तो आपल्याकडे नसलेल्या गुणांची लेबले स्वत:ला चिकटवण्याचा प्रयत्न करतो.जसे मग तो त्याची आर्थिक परिस्थिती बेताची असली तरी आपली ‘श्रीमंत’ ही प्रतिमा लोकांसमोर ठेवण्यासाठी आटापिटा करतो! शिक्षण व प्रतिष्ठेच्या खोट्या कल्पना बाळगून तशा प्रतिष्ठेचे तो प्रदर्शन करत रहातो. स्वत:चा समाजात दरारा आहे या कल्पनेपायी गुंडागर्दी करत रहातो. अशाच मानसिकतेतून काळे धंदे करणारे आपण कसे सोज्वळ आहोत हे सिद्ध करण्यासाठी व उजळ माथ्याने समाजात वावरण्यासाठी राजकारण व समाजकारण करतात! काही जण स्वत:ची दानशूर अशी प्रतिमा बनविण्यासाठी प्रयत्न करतात.गल्लोगल्ली लागणारे वाढदिवस व तत्सम भडक फ्लेक्स हा त्यातलाच एक भाग आहे. कसे ही करून लोकांच्या नजरेत रहाण्यासाठी मग वाट्टेल ते चाळे अशा व्यक्ती करत रहातात! मग साधारण  दिसणारी व सुमार अभिनय करणारी नटी सगळे ताळतंत्र सोडून वेगवेगळ्याप्रकारे मिडीया ला मुलाखती देते, नको त्या स्वरूपातले तिचे फोटो फिल्मी मासिकांमध्ये छापून आणते. असा माणूस आपले पितळ उघडे पडू नये सत्य  जगासमोर येऊ नये असा प्रयत्न आयुष्यभर करत रहातो,यासाठी कुठल्याही थराला जायची त्याची तयारी असते पण असे हे बेगडी मुखवटे परिधान करून फार काळ जगाला फसवता येत नाही. एक ना एक दिवस या सगळ्याचा पर्दाफाश होतो आणि मग अशावेळी त्या व्यक्तीचे खरे स्वरूप समाजासमोर उघड झाल्यामुळे नको त्या  नामुष्कीला त्याला सामोरे जावे लागते.
        खरं सांगायचं तर आपण आपली खरी ओळख विसरायची मुळीच गरज नाही. प्रत्येक माणसांकडे अनेक सद्गुण ,सद्विचार मनाच्या तळाशी लपलेले असतात. आपण स्वत:ला आहे त्या स्वरूपात न स्वीकारल्यामुळे स्वत;वरच अन्याय करत असतो. खोटेनाटे वागून थोडे दिवस आपली चांगली छाप समाजात व आजूबाजूच्या माणसांवर पडत असेलही पण हे फार काळ टिकत नाही.आज ना उद्या कुठल्या न कुठल्या कारणाने खरे स्वरूप लोकांसमोर येते आणि  मग असे  बिंग फुटले की नको त्या समस्या संबंधितासमोर उभ्या राहतात. याउलट आपण जर आपल्यात असलेल्या  गुण व दोषांसहित आयुष्याला सामोरे गेलो तर आपल्यावर मनापासून प्रेम करणारे लोक निश्चितच फक्त प्रेमच करत राहतील. त्यासाठी आभासी जगात अधांतरी तरंगत राहण्याऐवजी प्रत्येकाने आपल्यातल्या सद्गुणांच्या खजिन्याची ओळख  करून घेणे आवश्यक आहे. येथे एक गोष्ट कायम लक्षात घ्यायला हवी की या जगातल्या  हरेक व्यक्ती मध्ये काही ना काही गुणदोष हे असतातच!  सर्वगुणसंपन्न व्यक्तीमत्व हे फक्त कल्पना विश्वातच असते. वास्तवात ज्याला आपण सद्गुणांचा पुतळा वगैरे  समजतो अशा माणसातही अनेक दुर्गुण ठासून भरलेले असतात. फक्त त्या नजरेने आपण अशा व्यक्तीकडे पहात नाही म्हणून!
          म्हणून मला असे वाटते की प्रत्येकाने प्रथम स्वत:ला ओळखायला हवे.तुम्ही जसे आहात तशा स्वरूपात स्वत:चा स्वीकार करा जसे आहात त्याच स्वरूपात लोकांसमोर जा! यामुळे तुम्हाला तर स्वत:ची खरी ओळख तर होईलच पण स्वत:ला इत्तरांच्या नजरेतून पारखण्याची संधीही तुम्हाला मिळेल.आपल्या व्यक्तीमत्वातले चमकते पैलू तुम्हाला समजतील या शिवाय कुठे कुठे सुधारणेला वाव आहे ते सुध्दा समजेल. जेथे आवश्यक आहे तेथे सुधारणा करून स्वत:ला एक चांगला माणूस म्हणून घडवू शकाल आणि एकदा का तुम्ही एक चांगला माणूस झाला की धन दौलत प्रतिष्ठा आणि सर्वात महत्वाची मानसिक शांतता आणि समाधान तुमच्यासमोर हात जोडून उभे असेल! त्यासाठी तर माणूस जगत असतो!

                                ......प्रल्हाद दुधाळ.
प्रकाशित -पुनवडी प्रबोधन दिवाळी अंक २०१५.