Wednesday, April 26, 2017

कुटूंब व्यवस्था संवर्धनासाठी.....

कुटूंब व्यवस्था संवर्धनासाठी.....
        लहानपणी मी खेड्यात रहायचो.त्या काळी आमच्या गावात एक मोठे प्रतिष्ठित कुटूंब रहात होते.गावात या कुटूंबाच्या मालकीची भरपूर बागायती शेती होती,गोठ्यात भरपूर गाई म्हशीं होत्या.यांच्या मालकीच्या हजारो मेंढ्या होत्या.गावात यांचा मोठा वाडा होता.या संयुक्त परिवारात लहानथोरांसहीत निदान चाळीसेक तरी माणसे एकत्र रहात होती.अत्यंत गडगंज असलेल्या या घरातल्या कर्त्या पुरुषाच्या निर्णयांचा सर्व सदस्य आदर करायचे.राजा बोले आणि दल हालेउक्तीप्रमाणे कुटूंबप्रमूख सांगायचा आणि घरातले सगळेजण त्याप्रमाणे वागायचे.सहा भावंडे त्यांच्या बायकामुलांसह या परिवारात गुण्यागोविंदाने रहात होती.प्रत्येकजण आपल्याला नेमून दिलेले काम प्रामाणिकपणे करायचा.कुणी मेंढरे वळायचा,कुणी गाईम्हशींची जबाबदारी घ्यायचा तर कुणी शेतात घाम गाळून मोती पिकवायचा.येणाऱ्या उत्पन्नातून परीवारातल्या सर्वांना हवे नको ते पुरवले जायचे.कुणाला काही कमी पडायचे नाही.सर्वांची मुले चांगल्या शाळेत शिकत होती.सणासुदीला सर्वांच्या हौशीमौजी पुरवल्या जात होत्या. एका छत्राखाली गुण्यागोविंदाने नांदत असलेल्या या संयुक्त परिवाराबद्दल गावाच्या पंचक्रोशीत कौतुकाने बोलले जात होते.
    मधल्या पंचवीस वर्षांत मला या कुटूंबाबद्दल काहीच माहीत नव्हते.लहानपणी पाहिलेले हे संयुक्त कुटूंब आजही तसेच रहात असेल का,याबद्दल मला प्रचंड उत्सुकता होती.गावात त्या परिवाराबद्दल चौकशी केली तेव्हां मला जे समजले ते ऐकून मात्र माझा भ्रमनिरास झाला,कारण आता त्या कुटूंबाची अनेक छोटी  शकले झाली होती! चौकशीअंती मला बऱ्याच गोष्टी समजल्या.सर्वाना एकत्र बांधून ठेवणाऱ्या त्या कर्त्या व्यक्तीच्या मृत्यूनंतर त्या संयुक्त परिवाराची आता सोळा सतरा विभक्त कुटुंबे झाली आहेत.त्या कुटूंबातल्या माणसांमध्ये आता टोकाचे मतभेद आहेत.पूर्वीच्या त्या एकत्र परिवाराचे नामोनिशानही आता शिल्लक नव्हते.
  मधल्या पंचवीस वर्षात असे काय झाले असेल की अत्यंत गुण्यागोविंदाने राहणाऱ्या या कुटूंबाची अशी वाताहात झाली?काळाबरोबर आलेल्या नव्या पिढीत ते आधीच्या पिढीत असलेले सामंजस्य,तशी एकजूट का राहिली नसावी?वर दिलेले उदाहरण हे एकूणच भारतीय संयुक्त कुटूंब व्यवस्थेच्या होत असलेल्या ऱ्हासाचे एक प्रातिनिधिक उदाहरण आहे.
     प्राचीन काळात माणसे प्रथम टोळ्या करून राहायला लागली त्यातलीच प्रगत अवस्थ्या म्हणून कुटूंब व्यवस्था अस्तित्वात आली. भारतीय संस्कृतीत नीती-अनीतीच्या कल्पना अगदी मुळापर्यंत रुजल्या आणि लग्नसंबंध तसेच इत्तर नात्यांना पावित्र्य आले. या पवित्र नात्यांच्या संकल्पनेतून एक आदर्श अशी कुटूंबसंस्थ्या आपल्याकडे रुजली आणि जोमाने वाढली.भारतीय संस्कृती आणि धार्मिक आधाराने भारतीय कुटूंबव्यवस्थेला एक गौरवशाली परंपरा प्राप्त झाली.जगातील सर्व देशांशी तुलना करता भारतीय कुटुंबव्यवस्था ही सर्वात मजबूत कुटुंबव्यवस्था म्हणून संपूर्ण जगाने मान्य केली.अनेक परकीय आक्रमणे पचवूनही अशी अनेक संयुक्त कुटुंबे आजही अस्तित्वात आहेत.पण बदलत्या सामाजिक परिस्थितीत पाश्चात्यांच्या पाठोपाठ भारतातही कुटूंबसंस्थेला दखल घेण्याइतपत हादरे बसत आहेत.या धक्क्यांनी या संस्थेला भारतात अजून जरी मोठी हानी पोहोचली नसली तरी संयुक्त प्रकारची कुटुंब पद्धती मात्र दिवसेंदिवस नामशेष होत चालली आहे हे तेव्हढेच खरे आहे. माझ्या मते यासाठी विविध बाबी कारणीभूत आहेत. एकंदरीत समाजव्यवस्थेत झालेले बदलसाक्षरतेचे वाढते प्रमाण,वाढते जागतिकीकरण याबरोबरच काळाबरोबर नोकरी धंद्यानिमित्त लोकांचे मोठ्या शहरात अथवा परदेशात झालेले स्थांनांतर- अशी विविध कारणे सांगता येतील.आधुनिक सोयीसुविधांनी जग जवळ आले आहे.वेगवेगळ्या संस्कारात वाढलेली माणसे कामधंद्याच्या निमित्ताने एकमेकांच्या संपर्कात आली.पूर्वी स्री व पुरुषांच्या कार्यक्षेत्रात असलेल्या  सीमारेषा नष्ट झाल्या. नीती-अनीतीच्या प्राचीन कल्पना अडचणीच्या ठरू लागल्यालग्नसंस्कार व  त्याबरोबर येणाऱ्या जबाबदाऱ्यांचे काही लोकांना जोखड वाटू लागले.सामाजिक बंधने झुगारून वैयक्तिक आशा आकांक्षा साकारण्याची आत्मकेंद्रित वृत्ती वाढीला लागली. आपले करियर व कर्तुत्व घडवताना अडचणीच्या ठरणाऱ्या बोजड व काळाशी विसंगतत्रासदायक झालेल्या रूढी परंपरा नाकारण्याकडे लोकांचा कल वाढला व याचा एकंदरीत परिणाम म्हणून मजबूत समजली जाणारी कुटूंब व्यवस्थ्या धोक्यात आली आहे. अजूनही तशी वेळ गेलेली नाही,पूर्वीच्या काळासारखी अगदी फार मोठी नाही,पण नवरा बायको मुले सासू सासरे यांना एकसंघपणे बांधून ठेवणारी कुटूंब व्यवस्था टिकायला हवी.या व्यवस्थेचे समाजस्वास्थ्यासाठीचे फायदे व महत्व नव्याने अधोरेखित करणे आवश्यक आहे,संकुचित विचारसरणीमुळे वाढीला लागलेल्या फक्त राजा राणी’ छापाच्या कुटुंब व्यवस्थेच्या होणाऱ्या दुरगामी दुष्परिणामांची जाणीव वेळीच सर्वाना होणे आवश्यक आहे. कुटूंबसंस्थेच्या सकारात्मक बाजूंवर प्रकाश टाकताना काही मुद्द्यांवर गंभीरपणे विचार केला तर नक्कीच कुटुंबसंस्था टिकून राहील यात शंका नाही.
      सध्याच्या जमान्यात पती व पत्नी दोघेही नोकरी वा व्यवसायानिमित्ताने घराबाहेर पडतात.आय टी क्षेत्रात काम करणाऱ्या दांपत्यांना तर अजिबात वेळ नसतो.अशा व्यस्त जीवनात एक तर मुले जन्माला घालणेच टाळले जाते आणि मुले जन्माला घातलीच तर अशा पालकांना आपल्या मुलांसाठी द्यायला भरपूर पैसा असतो; पण वेळ मात्र अजिबात नसतो.अशा लोकांची मुले डे केअर सेंटरच्या भरवशावर  वाढतात आणि जंक फुडस खावून अशा कुटुंबाचे पालनपोषण होते.संस्कारांच्या नावाने मात्र बोंब असते! च मुलांवर चांगले संस्कार व्हावेत म्हणून भरपूर पैसे मोजून यांना संस्कार वर्गांवर अवलंबून राहावे लागते.खरे तर मुलांच्या वाढत्या वयात होणारे संस्कार त्यांच्या भावी आयुष्यासाठी अत्यंत महत्वाचे असतात.कुटुंबात आज्जी आजोबा किंवा इतर वडीलधारी रक्ताच्या नात्याची माणसे रहात असली की हे आवश्यक असलेले संस्कार आपोआपच होत असतात.मुलांच्या मनातल्या बालसुलभ शंकांचे निराकरण सहजपणे होते.घरात साजऱ्या होणाऱ्या  सणसमारंभात व आनंदाच्या क्षणी किंवा अचानक घडलेल्या एखाद्या वाईट प्रसंगी कुटुंबातल्या सदस्यांना एकमेकांचा आधार मिळतो.सुखाचे क्षण वाटून घेतले जातातच पण दु:खेही वाटून घेण्याचा संस्कारही  रुजायला मदत होते.आपल्या जिवाभावाच्या माणसांच्या सहवासात उदासीनता वा नैराश्य येण्याचा प्रश्नच उद्भवत नाही.व्यवहारी जीवनात येणाऱ्या अडचणी व त्यावर खंबीरपणे मात करायचे प्रशिक्षण अनुभवी वडीलधाऱ्या माणसांकडून कुटुंबातल्या नव्या पिढीला मिळतरहाते.प्रसंगी तडजोड करायची सवय, एकमेकांना वेळप्रसंगी मदत करायचे व त्यागाचे संस्कार फक्त कुटुंबातच मिळू शकतात.कोणत्याही संस्कार वर्गात असे संस्कार विकत मिळू शकत नाहीत हे समजून घेणे आवश्यक आहे.
    आधुनिक युगात माणसे स्वार्थी होत आहेत.ज्या मातापित्यांनी तळहाताच्या फोडाप्रमाणे आपल्या मुलांना जपले,पालनपोषण केले,शिक्षण दिले,त्याना स्वत:च्या पायावर उभे करण्यासाठी अहोरात्र कष्ट केले ते पालक वृद्ध झाले की पोटच्या मुलांना त्यांची अडचण व्हायला लागते.नव्या पिढीच्या संकुचित विचारसरणीमुळे विभक्त कुटुंबे वाढत आहेत. जुन्या पिढीतली वृध्द माणसेही हट्टीपणा सोडायला तयार नाहीत.एकंदरीत नवी पिढी आणि आता वृद्धत्वाकडे झुकलेली जुनी पिढी यांच्यात सामंजस्याचा अभाव वाढतो आहे आणि या दोन्ही पिढ्यांमधील आडमुठेपणाचा फटका मात्र कळतनकळतपणे त्यांच्या पुढच्या पिढीला आणि एकंदरीत कुटूंबसंस्थेला बसतो आहे; पण यावर कुणी गंभीरपणे विचार करायला तयार नाही!
  आपल्या सशक्त कुटूंब संस्थेच्या संवर्धनासाठी व आस्तीत्वासाठी बदलत्या काळानुसार काही प्रयत्न व्हायला हवेत. आता निवृत्त झालेल्या किंवा निवृत्तीच्या उंबरठ्यावर उभे असलेल्या पिढीने यासाठी स्वत:मधे काही बदल करणे आवश्यक आहेच पण एकत्र कुटूंब व्यवस्थेची मधुर फळे जर पुढच्या पिढीपर्यंत पोहोचावीत यासाठी मधल्या पालक पिढीनेही काही पथ्ये पाळणे आवश्यक झाले आहे.त्यासाठी मला सुचलेल्या काही टिप्स इथे द्यायला मला आवडेल –
१.      आता आपण आपली सगळी कर्तव्ये पार पाडली आहेत तेव्हा आपल्या मुलांच्या संसारात अनावश्यक दखल देणे आधीच्या पिढीने टाळायला हवे. मुलांना मदत हवी असेल तर मात्र जरूर मदत करावी,मान्य आहे; तुम्ही शून्यातून तुमचे हे विश्व उभारले आहे पण पुन्हा पुन्हा ही गोष्ट उगाळण्यात आपली उर्जा वाया घालवणे चुकीचे आहे आणि तुमच्या या कृतीने आपले जिवलग दुरावू शकतात याची जाणीव सदैव असायला हवी.आता तुमचे कर्तुत्व सिद्ध करून झाले आहे तेव्हा आता सगळ्या बाबी नव्या पिढीकडे सोपवून टाका.मुलांच्या कर्तुत्वाला आता वाव द्या. आवश्यक असेल तेथे त्यांनी जर मत मागितले तर जरूर मार्गदर्शन करा; पण उठसूठ त्यांना शिकवत बसू नका.काही गोष्टी या नव्या पिढीला अनुभवातूनच शिकणे आवश्यक आहे.आपले निवृत्त जीवन समरसतेने जगा.आपल्या व्यस्त आयुष्यात राहून गेलेल्या आवडीच्या गोष्टीना आता वेळ द्या. नव्या पिढीच्या स्वातंत्र्य आणि अवकाशाच्या कल्पनांचा आदर करायला शिका.वागण्यात लवचिकता आणा.नव्या पिढीत असलेल्या चांगल्या गोष्टींचे कौतुक तर कराच पण तुम्हीसुद्धा जगाबरोबर रहायचा प्रयत्न करा. भूतकाळात रमण्याऐवजी वास्तवात जगण्याने निश्चितच जीवनातला आनंद वाढेलच पण आरोग्यपूर्ण राहायलाही मदत होईल.
२.      आपले पालक आता निवृत्त झाले आहेत वाढत्या वयाप्रमाणे त्यांच्या स्वभावात काही दोष आले असणे शक्य आहे त्यांच्या वयाचा आदर ठेवून समजावून सांगितले तर ते नक्की ऐकतील यावर विश्वास ठेवा.आवश्यक असेल तेथे त्यांचे मार्गदर्शन घ्या.जाणते अजाणतेपणे आपल्याकडून त्यांच्याकडे दुर्लक्ष तर होत नाही ना याबद्दल काळजी घ्या.आपल्या पालकांनी अनेकदा आपल्या चुका पदरात घातल्या आहेत, मोठया मनाने माफ करून जीवनात प्रगती करण्यासाठी मदत केली आहे याची जाणीव सदैव असू द्या.त्यांच्या बारीक सारीक गोष्टी सोडून द्यायची सवय लावा.आपल्या वृध्द मातापित्यांच्या आयुष्यात राहून गेलेल्या गोष्टी करण्यासाठी त्यांना प्रोत्साहन द्या.समवयस्क लोकांमध्ये त्यांना मिसळू द्या. छोट्या मोठया ट्रिप्ससाठी त्यांना आग्रहाने पाठवा.आपणही कधीतरी या अवस्थेत जाणार आहोत याची जाणीव असू द्या.आपली काळजी घेतली जाते आहे हे त्यांना जाणवू द्या.आणि हो,त्यांच्याशी दिवसातून एकदा तरी बोला.अनुभवांचे जिते जागते कोठार आपल्या घरात उपलब्ध आहे त्याचा सुयोग्य उपयोग करून घ्या.त्यांच्याकडे असलेली संस्कारांची शिदोरी पुढच्या पिढीला मिळण्यासाठी तुम्ही मध्यस्थ म्हणून आपली भूमिका निभावण्याचा प्रयत्न करा.
   भारतीय कुटूंब पध्दती ही जगातली अत्यंत उत्कृष्ट व्यवस्थ्या आहे आणि ती टिकावी,जगाच्या कानाकोपऱ्यात अशा पध्दतीच्या कुटुंबांचे आस्तित्व पोहोचावे यासाठी आपण आपल्याकडे आधीच असलेला हा ठेवा जपायला हवा. जुन्या नव्यांचा मेळ घालून एका नव्या स्वरूपात ही कुटूंब व्यवस्था  नव्याने रुजू शकते!
 बरोबर ना?
        .............. प्रल्हाद दुधाळ.(९४२३०१२०२०)
               ५/९ रुणवाल पार्क,मार्केट यार्ड,पुणे- ४११०३७

Thursday, April 13, 2017

आनंद

आनंद.

आज दुपारी मला एका अनोळखी नंबरवरून फोन आला. 
" आपण दुधाळ सर बोलताय का?" 
" हो, मी दुधाळच बोलतोय."
" आपण कुठे असता."
"मी पुण्यात असतो; पण आपण कोण ?"
" मी कोल्हापूर कागल तालुक्यातील कापशी सेनापती या गावातून सौ चौगुले बोलतेय, .काय झालं की मागच्या आठवड्यात माझ्या मुलीच्या शाळेत वत्कृत्व स्पर्धा होती. एरवी मी तिला भाषण लिहून देते,पण यावेळी मला बिल्कूल वेळ नव्हता,त्यामुळे मी माझ्या पुतण्याला हिला कुठून तरी शोधून भाषण लिहून दे, असे सांगितले आणि मी कामावर निघून गेले. दुपारी मला माझ्या मुलीच्या क्लासटीचरचा फोन आला की तुमच्या मुलीने एकदम छान भाषण केल आणि तिचा स्पर्धेत पहिला नंबर आलाय! माझ्या तिसरीत असलेल्या मुलीने न अडखळता अगदी हावभाव करून भाषण केल्याचे त्यांनी सांगितले,मला खूपच आनंद झाला."
" छानच झाले की! आपले अभिनंदन!" 
मी काहीतरी बोलायला हवं म्हणून मधेच बोललो. पण मला प्रश्न पडला की हे सगळ या बाई मला का सांगताहेत, आणि तेही खास फोन करून? 
मी हे त्यांना विचारण्यापुर्वीच बाई पुढे सांगायला लागल्या -
" मग काय झालं ना की, संध्याकाळी मी माझ्या पुतण्याला त्या भाषणाबद्दल विचारले.तर तो म्हणाला की त्याने गुगलवर ्शोधले आणि पहिला जो लेख मिळाला तो लेख तिला दिला! माझ्या मुलीने ते लेखन पाठ केले आणि स्पर्धेत ते जसेच्या तसे हावाभावासहीत सादर केले!"
पुन्हा मी बोललो -
"छानच झाले की!" 
बाई पुढे सांगायला लागल्या-
" माझ्या पुतण्याकडून मी ती प्रिंट पुन्हा काढून घेतली तर त्या लेखाखाली नाव होते 'प्रल्हाद दुधाळ' शिवाय मोबाईल नंबरही होता. आज माझ्या मुलीला बक्षीस आणि प्रमाणपत्र मिळाले,जाम खुश झाली होती ती! तिचा तो आनंद आपल्यापर्यंत पोहचावा असे मला प्रकर्षाने वाटले म्हणून आपल्याला फोन केला! सर, आपण माझ्या मुलीला जी मदत केलीत याबद्दल आपली मी खूप खूप आभारी आहे!, असेच लिहीत रहा"
यावर मला काय बोलावे ते कळेनाच! 
दरवर्षी फेसबुकवर 'रेणुका आर्ट्स' या समूहाच्या वतीने आसावरी इंगळेताई एक ओनलाईन साहित्य संमेलन आयोजित करतात,गेली तीन वर्षे मी या संमेलनात सहभागी होत आहे. या संमेलनात साहित्यातले विविध प्रकार हाताळून पहाता येतात. मान्यवर साहित्यिक या साहित्य प्रकारांचे समीक्षणही करतात अशाच एका संमेलनात आपण दुसरी किंवा तिसरीत शिकतो आहे असे समजून 'माझा आवडता ऋतू ' या विषयावर एक निबंध लिहायचा होता.मी त्यावेळी हा निबंध लिहिला होता.पुढे मी हा निबंध माझ्या ब्लॉगवरही प्रसिद्ध केला.गुगलवर शोधल्यानंतर माझा हा निबंध त्या मुलाला मिळाला होता आणि तिसरीतल्या त्या चिमुरडीला भाषण म्हणून पाठ करायला दिला होता.तिला पहिले बक्षीस मिळाले म्हणून तिची आई माझे आभार मानत होती! 
खर तर त्या चिमुरडीने माझ्या लेखनाचे सादरीकरण करून तिच्या कौशल्याने पहिले बक्षीस मिळवले होते! मी तसे तिच्या आईला बोलूनही दाखवले तर ती म्हणाली -
" सर, तुमचे आभार यासाठी की तुम्ही लहान होवून हा निबंध लिहिलात,शिवाय तो इंटरनेटवर उपलब्ध करून ठेवलात. आमच्यासारख्याना आपल्या दैनंदिन व्यवहारातून मुलांना वेळ देता येत नाही, आणि अशा अडचणीच्या प्रसंगी तुमचे ते लेखन माझ्या मुलीच्या कामाला आले.तिला पहिले बक्षीस मिळाले याचा जो आनंद तिच्या चेहऱ्यावर दिसत होता ना,त्याचे वर्णन मी नाही करू शकत!" 
चौगुलेबाईंच्या वाक्यावाक्यातून तो आनंद ओसंडून वाहात होता! 
खास फोन करून त्यांच्या आनंदात मला सहभागी करून घेतल्याबद्दल मी त्या माउलीचे आभार मानले!
आपल्या तोडक्या मोडक्या लिखाणाचा असाही उपयोग होवू शकतो, हे अनुभवून मलाही खूप आनंद झाला!
....... प्रल्हाद दुधाळ. १३/०४ /२०१७ 
(९४२३०१२०२०)

Thursday, April 6, 2017

आगंतुक.

आगंतुक.
आचार्य अत्रे यांच्या मोरूची मावशी’ नाटकात एक मजेशीर गाणे आहे 
टांग टिंग टिंगा की टांग टिंग टिंगाटांग टिंग टिंगा की टून
यातच एक ओळ आहे
आंब्याच्या झाडाला,शेवग्याच्या शेंगा!
मला आत्तापर्यंत तरी ही कविकल्पना वाटत होती, आंब्याच्या झाडाला शेवग्याच्या शेंगा? हे कसे शक्य आहे? पण ‘याच देही;याच डोळा’ मला आंब्याच्या झाडाला शेवग्याच्या शेंगा आल्याचे दिसले!
झाले असे कीदोन वर्षापूर्वी पावसाळ्यात गावाकडच्या घराच्या कंपाउंडमधे मी काही रोपे लावली होती. ही रोपे प्रामुख्याने आंबा,पेरू,लिंबू,चिक्कू,नारळ इत्यादी फळझाडांची होती.त्या वर्षी तसा दुष्काळ होता; पण तरीही त्या रोपांची काळजी घेतली गेल्याने त्यातली काही झाडे व्यवस्थित लागली आणि जोमाने वाढायलाही लागली.एका वर्षात त्यातल्या काही झाडांची उंचीही बऱ्यापैकी वाढलेली आढळली. ही जागा तशी माळरानावर होती.उन्हाळ्यात सुटणाऱ्या वादळवाऱ्याने या वाढलेल्या झाडांच्या फांद्या चांगल्याच झुकायला लागल्या, त्यातल्या काही इतक्या वाकल्या की जमिनीवर लोळायला लागल्या.यावर काहीतरी उपाय करणे आवश्यक होते. मी विचार करून तिथेच आजुबाजूला पडलेली लाकडे गोळा केली आणि दोन लाकडे एकमेकांना बांधून टेकू तयार केले.झुकलेल्या फांद्याना अशा टेकूने आधार दिला,जेणेकरून ही झाडे
वारावादळात ताठपणे उभी रहावीत.
अशाच त्यातल्या एका आंब्याच्या झाडाला दोन लाकडांचा आधार दिला गेला होता.  
     मागच्या पूर्ण वर्षात तसे या झाडांकडे माझे चांगलेच दुर्लक्ष झाले होते.या ना त्या कारणाने मी गावाला जावू शकलो नाही.मधल्या काळात एक संपूर्ण पावसाळा आला आणि गेला.
       गेल्या आठवड्यात मी गावी गेलो होतो.सलग सुट्ट्या आल्यामुळे यावेळी मात्र मी निवांतपणे माझ्या या गावाकडच्या घरी दोन दिवस राहीलो.त्या दिवशी दुसरा काहीच उद्योग नव्हता त्यामुळे मी त्या झाडांचे निरीक्षण करत बसलो होतो. माझ्या असे लक्षात आले की ज्या आंब्याच्या झाडाला लाकडांचा आधार दिला होता ती लाकडे शेवग्याची होती. आंब्याच्या झाडाला घातलेल्या खतपाण्यावर त्या शेवग्याच्या लाकडालाही मस्त हिरवीगार पालवी फुटली होती! ज्या झाडाला आधार दिला होता ते आंब्याचे झाड जरी फारसे वाढले नव्हते, पण या टेकू म्हणून वापरलेल्या शेवग्याची वाढ मात्र जोरात झाली होती. विशेष म्हणजे या शेवग्याला आता पंधरावीस शेंगाही आल्या होत्या!
मला या सगळ्या प्रकाराची फारच गंमत वाटली!
    आपण पाहतो की माणसाच्या आयुष्यातही अशा प्रकारच्या गोष्टी घडत असतात.घरातले वडीलधारे,पालक आपल्या परिवारातल्या लहान मुलांची प्रगती व्हावी.आयुष्यात त्यांचे कर्तुत्व फुलावे यासाठी धडपडत असतात. त्यांना सर्व सोयी सुविधा मिळाव्यात, त्यांच्यावर सुसंस्कार व्हावेत यासाठी  अहोरात्र झटणाऱ्या अशा लोकांची एवढीच माफक अपेक्षा असते की आपल्या पाल्यांची भरभराट व्हावी, त्यांचे जीवन सुखी व्हावे; पण अशी सगळी अनुकूलता व प्रगतीसाठी आवश्यक असलेले वातावरण लाभूनही सगळ्यांनाच म्हणावी अशी प्रगती साधता येत नाही.याउलट अशा  पाल्याच्या आजुबाजूला वावरत असलेली एखादी व्यक्ती केवळ योगायोगाने मिळालेल्या संधीचे सोने करते,प्रतिकूल परिस्थितीवर मात करून प्रचंड इच्छाशक्तीच्या जोरावर दैदिप्यमान यश मिळवते! अशा प्रकारे अपघाताने किंवा योगायोगाने वा नशिबाने मिळालेल्या संधीचा सदुपयोग करता येवू शकतो!
त्या आगंतुकपणे उगवलेल्या त्या शेवग्याच्या झाडाने हे सप्रमाण सिद्ध केले होते!
प्रतिकूल परिस्थिती असतानाच माणसाच्या कर्तुत्वाला घुमारे फुटत असावेत का?
काय वाटतंय आपल्याला?
..................... प्रल्हाद दुधाळ, (९४२३०१२०२०)