Thursday, April 6, 2017

आगंतुक.

आगंतुक.
आचार्य अत्रे यांच्या मोरूची मावशी’ नाटकात एक मजेशीर गाणे आहे 
टांग टिंग टिंगा की टांग टिंग टिंगाटांग टिंग टिंगा की टून
यातच एक ओळ आहे
आंब्याच्या झाडाला,शेवग्याच्या शेंगा!
मला आत्तापर्यंत तरी ही कविकल्पना वाटत होती, आंब्याच्या झाडाला शेवग्याच्या शेंगा? हे कसे शक्य आहे? पण ‘याच देही;याच डोळा’ मला आंब्याच्या झाडाला शेवग्याच्या शेंगा आल्याचे दिसले!
झाले असे कीदोन वर्षापूर्वी पावसाळ्यात गावाकडच्या घराच्या कंपाउंडमधे मी काही रोपे लावली होती. ही रोपे प्रामुख्याने आंबा,पेरू,लिंबू,चिक्कू,नारळ इत्यादी फळझाडांची होती.त्या वर्षी तसा दुष्काळ होता; पण तरीही त्या रोपांची काळजी घेतली गेल्याने त्यातली काही झाडे व्यवस्थित लागली आणि जोमाने वाढायलाही लागली.एका वर्षात त्यातल्या काही झाडांची उंचीही बऱ्यापैकी वाढलेली आढळली. ही जागा तशी माळरानावर होती.उन्हाळ्यात सुटणाऱ्या वादळवाऱ्याने या वाढलेल्या झाडांच्या फांद्या चांगल्याच झुकायला लागल्या, त्यातल्या काही इतक्या वाकल्या की जमिनीवर लोळायला लागल्या.यावर काहीतरी उपाय करणे आवश्यक होते. मी विचार करून तिथेच आजुबाजूला पडलेली लाकडे गोळा केली आणि दोन लाकडे एकमेकांना बांधून टेकू तयार केले.झुकलेल्या फांद्याना अशा टेकूने आधार दिला,जेणेकरून ही झाडे
वारावादळात ताठपणे उभी रहावीत.
अशाच त्यातल्या एका आंब्याच्या झाडाला दोन लाकडांचा आधार दिला गेला होता.  
     मागच्या पूर्ण वर्षात तसे या झाडांकडे माझे चांगलेच दुर्लक्ष झाले होते.या ना त्या कारणाने मी गावाला जावू शकलो नाही.मधल्या काळात एक संपूर्ण पावसाळा आला आणि गेला.
       गेल्या आठवड्यात मी गावी गेलो होतो.सलग सुट्ट्या आल्यामुळे यावेळी मात्र मी निवांतपणे माझ्या या गावाकडच्या घरी दोन दिवस राहीलो.त्या दिवशी दुसरा काहीच उद्योग नव्हता त्यामुळे मी त्या झाडांचे निरीक्षण करत बसलो होतो. माझ्या असे लक्षात आले की ज्या आंब्याच्या झाडाला लाकडांचा आधार दिला होता ती लाकडे शेवग्याची होती. आंब्याच्या झाडाला घातलेल्या खतपाण्यावर त्या शेवग्याच्या लाकडालाही मस्त हिरवीगार पालवी फुटली होती! ज्या झाडाला आधार दिला होता ते आंब्याचे झाड जरी फारसे वाढले नव्हते, पण या टेकू म्हणून वापरलेल्या शेवग्याची वाढ मात्र जोरात झाली होती. विशेष म्हणजे या शेवग्याला आता पंधरावीस शेंगाही आल्या होत्या!
मला या सगळ्या प्रकाराची फारच गंमत वाटली!
    आपण पाहतो की माणसाच्या आयुष्यातही अशा प्रकारच्या गोष्टी घडत असतात.घरातले वडीलधारे,पालक आपल्या परिवारातल्या लहान मुलांची प्रगती व्हावी.आयुष्यात त्यांचे कर्तुत्व फुलावे यासाठी धडपडत असतात. त्यांना सर्व सोयी सुविधा मिळाव्यात, त्यांच्यावर सुसंस्कार व्हावेत यासाठी  अहोरात्र झटणाऱ्या अशा लोकांची एवढीच माफक अपेक्षा असते की आपल्या पाल्यांची भरभराट व्हावी, त्यांचे जीवन सुखी व्हावे; पण अशी सगळी अनुकूलता व प्रगतीसाठी आवश्यक असलेले वातावरण लाभूनही सगळ्यांनाच म्हणावी अशी प्रगती साधता येत नाही.याउलट अशा  पाल्याच्या आजुबाजूला वावरत असलेली एखादी व्यक्ती केवळ योगायोगाने मिळालेल्या संधीचे सोने करते,प्रतिकूल परिस्थितीवर मात करून प्रचंड इच्छाशक्तीच्या जोरावर दैदिप्यमान यश मिळवते! अशा प्रकारे अपघाताने किंवा योगायोगाने वा नशिबाने मिळालेल्या संधीचा सदुपयोग करता येवू शकतो!
त्या आगंतुकपणे उगवलेल्या त्या शेवग्याच्या झाडाने हे सप्रमाण सिद्ध केले होते!
प्रतिकूल परिस्थिती असतानाच माणसाच्या कर्तुत्वाला घुमारे फुटत असावेत का?
काय वाटतंय आपल्याला?
..................... प्रल्हाद दुधाळ, (९४२३०१२०२०)

No comments:

Post a Comment