Tuesday, June 24, 2014

माणसाची जडणघडण.

                                                    माणसाची जडणघडण.
           सर्वसाधारणपणे एखादी व्यक्ती जेंव्हा लोकांच्या दृष्टीने वावगी वागायला लागते तेंव्हा  ती व्यक्ती बिघडली असे  म्हटले  जाते.त्या व्यक्तीच्या  अशा बिघडण्याच्या कारणांची चर्चाही समाजात अगदी चवीने होत रहाते.अशा वेळी त्या वाया गेलेल्या माणसाच्या आईवडीलांचा, झालेल्या संस्कारांचा,त्याच्या संगतीचा उध्दार होतो.गोष्ट इथेच थांबत नाही तर ज्या वस्तीत त्याचे पालनपोषण झाले त्या वस्तीला,तो ज्या  गावात रहातो त्या गावालाही बदनाम केले जाते! अशावेळी लोक अगदी सहजपणे बोलतात-
"त्या वस्तीत रहातो ना तो,मग बिघडणारच ! दुसरे काय होणार?
किंवा “ते गावच तसले, तिथले संस्कारच वाईट!” ”खाण तशी माती!” असेही लोक बोलतात.सगळा दोष संस्कारांना दिला जातो!
   एकंदरीत माणसाच्या जडणघडणीचा वरवर अभ्यास केला तर असे आढळते की,माणसाच्या वागण्याबोलण्यावर विचारप्रक्रियेवर त्याचे आईवडिल,शेजारी,मित्रमंडळी या बरोबरच दैनंदिन आयुष्यात त्याचा ज्यांच्या  ज्यांचाशी  संपर्क येतो अशा माणसांचा जाणते  अजाणतेपणी परिणाम होत असतो. यालाच आपण संस्कार असे नाव देतो!
 हे संस्कार ज्या पध्दतीने होतात तशीच त्याची जडणघडण होत असते.चांगले संस्कार चांगले शिक्षण मिळाले तर जीवनाला योग्य पद्धतीने गती मिळते पण यापैकी एका घटकाचा जरी वाईट प्रभाव पडला तरी त्या व्यक्तीवर त्याचा वाईट परिणाम होवू शकतो.म्हणजेच माणसाचे घडणे वा बिघडणे,त्याची जडणघडण ही त्याच्यावर झालेल्या संस्कारांवर अवलंबून असते असे सर्वसाधारणपणे मानले जाते.
       हे गृहीतक काही अंशी बरोबर असेलही,पण मला वाटते की, हे अर्धसत्यच आहे,कारण बहुतांश लोकांच्या बाबतीत जरी हा ठोकताळा बरोबर असला तरी आपण समाजात बरीच अशी माणसे पहातो की त्यांना लहानपणापासून कोणत्याही प्रकारचे सुसंस्कार मिळालेले नाहीत,अत्यंत विपरीत परिस्थितीते रहात आहेत,त्यांच्या आजूबाजूला अत्यंत प्रतिकूल वातावरण आहे तरीही त्या प्रतिकूल परिस्थितीचा कोणताही अनिष्ट परिणाम न होता,ते त्या दलदलीमधून कमळासारखे फुलतात! एक यशस्वी सुसंस्कारित व्यक्ती म्हणून समाजात आपले स्थान ते निर्माण करतात.आपली समाजात वेगळी ओळख तयार करतात!समृद्धी प्रतिष्ठा व कीर्ती त्यांच्या पायाशी लोळण घेत असते.याचाच दुसरा अर्थ असाही होतो की,फक्त चांगले संस्कार अथवा आजूबाजूचे वातावरण माणसाला चांगला किंवा वाईट ठरवू वा बनवू शकत नाही!
      मला असे मुळीच म्हणायचे नाही की चांगले संस्कार महत्वाचे नाहीत.चांगल्या संस्काराचा माणसाच्या जडण घडणीत महत्वाचा वाटा आहेच, पण माणसामधील जन्मत: असलेली आंतरिक समज व प्रगतीसाठीची जिद्दही त्याच्या जडणघडणीत अत्यंत मोलाची आहे !अत्यंत दरिद्री अशिक्षित सांस्कृतिकदृष्ट्या मागासलेल्या समाजात जन्म घेऊन व त्याच वातावरणात पालनपोषण होऊनही चिखलात उमलणाऱ्या कमळाप्रमाणे काही व्यक्तीमत्वे त्यांच्यातल्या असामान्य बुद्धिमत्तेच्या व स्वप्रयत्नाने समाजात नाव कमावतात. एक यशस्वी व कर्तबगार माणूस म्हणून त्यांचे नाव आदराने घेतले जाते! आपल्या आजूबाजूलाअसलेल्या आजच्या अशा यशस्वी लोकांचा,उद्योगपती,शास्रज्ञ विचारवंत,लेखक,कवी,वेगवेगळ्या क्षेत्रातले तज्ञ, यांच्या जीवनाचा अभ्यास केला तर आढळेल की यातल्या अशा अनेक व्यक्ती अत्यंत टोकाच्या प्रतिकूल परिस्थितीशी सामना करत त्यांच्या आजच्या पदावर पोहोचल्या आहेत! कोणतेही सुनियोजित संस्कारपद्धतशीर शिक्षण न घेताही अनेक माणसे आयुष्यात यशस्वी झालेली दिसतात.अशा माणसांचे जीवन सर्वसामान्यांसाठी कायम आदर्शवत असते.
    याच्या उलट परिस्थितीही आपल्याला समाजात पहायला मिळते.अगदी उच्चशिक्षित संस्कारित घरात वाढलेली, परिस्थितीची कोणतीही झळ न लागलेली,अत्यंत चांगल्या वातावरणात वाढलेली व्यक्तीसुध्दा वाममार्गाला लागलेली दिसते.सामाजिकदृष्ट्या बिघडलेल्या व्यक्तींमध्ये तथाकथित संस्कारित कुटुंबातून आलेल्या व्यक्तींचे प्रमाणही नक्कीच विचार करायला लावणारे आहे.
                 
याचाच अर्थ असा की माणसाच्या व्यक्तीमत्वाची जडणघडण केवळ तो कोणत्या कुटुंबात जन्माला आला, त्याच्यावर कशा प्रकारचे संस्कार झाले,कोणत्या आर्थिक वा सामाजिक परिस्थितीत तो राहिला/वाढला,तो काय खातो, कुणाबरोबर व कशा प्रकारच्या घरात रहातो यावर अवलंबून नाही तर या सर्व परिस्थितीबरोबरच त्या माणसाची  आंतरिक समज व परिस्थितीवर मात करण्यासाठीची तीव्र इच्छाशक्ती त्या व्यक्तीला एक आदर्श माणूस बनवू शकते! आपण कुणाच्याही पोटी जन्म घेतलेला असू दे ,कोणत्याही जाती धर्मात आपण जन्म घेतलेला असुदे, घरची आर्थिक परिस्थिती कशीही असू दे ,कोणत्याही सामाजिक व्यवस्थेत तुम्ही वाढलेले असू देतुमची जर कष्ट करण्याची मानसिक तयारी व समोर येणाऱ्या कुठल्याही प्रतिकूल परिस्थितीवर मात करण्याची जिद्द अंगी असेल तर अशा इच्छाशक्तीच्या जोरावर असा माणूस यशाच्या शिखरावर पोहोचणे सहज शक्य आहे! एक चांगला माणूस होण्यासाठी जात,धर्म,आर्थिक परिस्थिती,चांगले शिक्षण,उत्तम संस्कार,चांगली संगत एवढेच पुरेसे नाही या सर्व गोष्टी अनुकूल असो अथवा नसो पण  एक चांगला माणूस होण्यासाठी तुमच्याकडे एक चांगले संवेदनशील मन आणि कुठल्याही प्रतिकूल परिस्थितीतून भरारी घेण्यासाठीची जिद्द मात्र नक्की असायला हवी.तुमच्याकडे असलेले  हे चांगले मन जगातील चांगले गुण,चांगले संस्कार,परोपकार व आदर्श यांना आकर्षित करते आणि या चांगल्या मनाच्या  व जिद्दीच्या जोरावर तुमचे एका आनंदी यशस्वी संवेदनशील माणसात परिवर्तन अगदी सहजपणे होऊ शकते! आत्मविश्वास व प्रामाणिकपणे केलेले प्रयत्न वाल्याला  वाल्मिकी बनवू शकतात तर त्याच पध्दतीने तुम्ही एक आनंदी उत्साही व संवेदनशील माणूस बनायला काय हरकत आहे?
 निश्चितच असे होऊ शकते!
तर करायची सुरू ही आनंदयात्रा?   
    
                                   
                                        ....................प्रल्हाद दुधाळ.
                                                              ५/९ रुणवाल पार्क
                                                              मार्केट यार्ड पुणे ३७
                                                                 (९४२३०१२०२०)

No comments:

Post a Comment