Monday, June 16, 2014

विनाशक क्रोधभावना.

                                                            विनाशक  क्रोधभावना.
                              या विविधरंगी  जगात वावरताना आजूबाजूला असे काही प्रसंग घडतात ज्यामुळे आपणास खूप राग येतो. आलेल्या प्रचंड रागामुळे आपण सारासार विचार न करता प्रतिक्रिया देतो. रागाच्या भरात आपण समोरच्या माणसाला वाट्टेल तसे बोलतो,त्यांचा अपमान करतो.समोरची व्यक्ती सुध्दा तुमच्या सारखीच कोपिष्ट असली तर असे वाद शाब्दिक न रहाता प्रकरण हाणामारीपर्यंत जाते. दोधेही मग आपले सर्व संस्कार विसरून हीन पातळीवर जातात.काही वेळा असे टोकाचे वाद कायमच्या दुष्मनीत रुपांतरीत होतात.अगदी पिढ्यान पिढ्यांचे हाडवैराचे स्वरूप या दुष्मनीला येते, याउलट कधी कधी आपल्या स्वत:च्या हातून अशीच चूक होते व कुणाचा तरी तेजोभंग होतो अशा दुखावलेल्या समोरच्या माणसाच्या रागाचे आपण बळी होतो. ठोश्याला ठोश्याने उत्तर द्यायची भाषा बोलली जाते व द्वेष भावना वाढत जाते.अशा प्रकारच्या वैमनस्यासाठी फार मोठी कारणे असतीलच असे काही नाही कधी कधी तर अगदी किरकोळ व हास्यास्पद कारणाने सुध्दा दोन व्यक्ती कायमचे वैरी होऊन आयुष्यभर भांडत रहातात. स्वत:चे आयुष्य तर बरबाद करतातच पण आपल्या परिवाराचे आयुष्यसुध्दा पणाला लावतात! खोट्या प्रतिष्ठेपायी अशा केसेस पिढ्यानपिढ्या कोर्टात लढल्या जातात.आपली एनर्जी व पैसा दोन्हींची बरबादी होत रहाते.अशा दुष्मनी निभावण्याचे भूत का एकदा मानगुटीवर बसले की माणसाला दुसरे काही सुचतच नाही.साम दाम दंड भेद असे सर्व पर्याय आपल्या वै-यावर सूड उगवण्यासाठी वापरले जातात.असे करताना आपले वयक्तिक नुकसान होत आहे हे अशी माणसे विसरूनच जातात. एक प्रकारच्या नशेतच अशी माणसे वावरत असतात.
                 अशा प्रसंगी दोन्ही बाजूंनी थोडी समजदारी दाखवली तर माफी मागून व माफ करून वैमनस्य टाळता येऊ शकते. एकमेकांवर निशाणा साधून आपल्याला नक्की काय साध्य करायचे आहे यावर एकदा दोन्ही व्यक्तींनी विचार करायला हवा. क्रोधाच्या अवस्थेत सारासार विवेकबुध्दी काम करत नाही त्यामुळे रागाची भावना असताना कोणतीही प्रतिक्रिया देणे टाळणे कायमच   शहाणपणाचे ठरते. भावनेच्या भरात घेतलेले बहुतांश निर्णय पुढच्या आयुष्यात पश्चातापाची वेळ आणतात.आपल्या आयुष्यात आपल्याला नक्की काय साध्य करायचे आहे.आपल्या जीवनाचे अंतिम इप्सित काय आहे याची जाणीव असलेला माणूस कधीही असा आततायीपणा करणार नाही.आपल्या धेय्याकडे वाटचाल करताना योग्य तेथे दुराभिमान बाजूला ठेऊन आत्मसन्मानाला ठेच लागणार नाही अशा प्रकारे तडजोड करायला अशा माणसाची तयारी असते.खोट्या प्रतिष्ठेपायी नको त्या गोष्टीना अवाजवी महत्व असे लोक देत नाहीत. समोर जर एकमेकाना भिडण्याची परिस्थिती तयार झाली तर वैमनस्याऐवजी सौहार्दपूर्ण तोडगा काढण्याला प्राधान्य असले पाहिजे.बदल्याची भावना पाळण्या ऐवजी योग्य तेथे बदलण्याचा दृष्टीकोन अंगी यायला हवा.हा बदल होण्यासाठी प्रथम आपल्या भावनांवर नियंत्रण आणायला हवे .पण हे काम सोपे मुळीच नाही .हा बदल कसा घडू शकेल?
                 भावनांवर ताबा ठेवायला शिकण्यासाठी प्रथम स्वत:ला ओळखायला शिकले पाहिजे .आपली बलस्थाने व  आपल्यातला कमकुवतपणा यांची ओळख व्हायला हवी .कोणत्या गोष्टी आपल्याला आनंद देतात तर कोणत्या प्रसंगी आपल्या भावनांचा स्फोट होतो याचा  पध्दतशिरपणे स्व अभ्यास करायला हवा रागावर नियंत्रणासाठी ज्या परिस्थितीत राग येतो ती परिस्थिती निर्माणच होणार नाही असे पहावे लागेल .कुठल्या परिस्थिती मधे आपली मनस्थिती प्रसन्न असते याचे निरिक्षण करायला हवे आपल्यात असणारे दोष दूर करण्यासाठी जरुर तर योग्य त्या समुपकदेशकाची मदत घ्यायला हवी व योग्य ते उपचार करायला हवेत.समोरची व्यक्ती तुम्हाला अनुकुलच वागायला हवी हा दुराग्रह सोडुन द्यायला हवा .समोरच्या व्यक्ती च्या भुमिकेत जाउन विचार करता यायला हवा आणि  एकदा का  दुसर्याच्या मनाचा विचार करता आला की वादाचे प्रसंग आपोआप टाळता येतील .समस्या हाताळताना सामोपचाराची पध्दत वापरली तर नक्कीच सर्वमान्य मार्ग निघू शकतो .कधी अशीही परिस्थिती समोर येवु शकते की तेथे तोडग्याचा पर्यायच  उपलब्ध नाही अशावेळी उगाच आकांडतांडव न करता थंड डोक्याने ,मुध्देसुद पध्दतीने कायदेशीर सल्ला घेउन प्रकरण हाताळता येते .विचारपुर्वक केलेली कृती सहसा पश्चातापाची वेळ आणू देत नाही त्यामुळे आत्मविश्वासाने विचारपुर्वक निर्णय घेउन क्रोधाचे प्रसंग टाळायला हवेत . वितंडवादाने संबंध सुधारण्यापलिकडे बिघडतात तर तड्जोडीने आदर पुर्वक मार्ग निघतात असे वाटते त्यामुळे आपल्या आरोग्याला खुपच धोकादायक असलेली क्रोधभावना व त्यापोटी होणारे मनोकायिक परिणाम टाळणे कधिही चांगले .कारण आयुष्यात सर्वात महत्वाचे आहे ते आपले आनंदी जीवन!
                                                                              ............प्रल्हाद दुधाळ.

.
                              

No comments:

Post a Comment