Saturday, June 7, 2014

मोठ्या मनाची माणस!

मोठ्या मनाची माणस!
मनाने मोठे असलेल्या माणसांच्या संपर्कात येणाऱ्या प्रत्येक व्यक्तीशी वागताना अशी माणसे खूप चांगले वागतात.समोरच्या माणसाचा पूर्ण आदर करून गरजू व्यक्तीच्या भल्यासाठी काय काय करता येऊ शकेल याचा विचार ते प्रथम करतात व तशी कृतीसुध्दा संबंधिताकडून केली जाते! अशावेळी त्यांच्या मनात समोरच्या व्यक्ती बद्दल केवळ माणुसकी व सदभावना असते, भले समोरच्या व्यक्तीच्या मनात त्यांच्या विषयी काहीही भावना असोत! अनेकदा अशी माणसे स्वमत बाजूला ठेऊन केवळ इत्तर माणसांच्या मताचा आदर करण्यासाठी प्रसंगी स्वत:चे मन मारून वा पडती बाजू घेऊन, तडजोड करतात.येथे त्यांच्या मनात समोरच्या व्यक्तीच्या म्हणण्याचा वास्तविकतेपेक्षा मन सांभाळण्याचा प्रयत्न असतो.उपकाराची भावना तर मुळीच नसते.असे करताना प्रसंगी ते मनाचा मोठेपणा दाखवून दुसऱ्याच्या चुका पोटात घालतात व अजाणतेपणे झालेल्या चुकांबद्दल प्रतिष्ठेचा प्रश्न न करता विनाशर्त माफीही मागतात. अशावेळी त्या माणसाच्या लेखी महत्व असते ते फक्त नाते संबंधाला! नाती टिकवण्यासाठी व नात्यांच्या संगोपनासाठी तन,मन व प्रसंगी धनही खर्च करण्यास अशी मोठी माणसे सदैव तत्पर असतात. बऱ्याचदा अशा माणसांना त्यांनी दाखवलेल्या मनाच्या श्रीमंतीचा पत्ताही नसतो! कुणी जाणीवपूर्वक त्यांचे आभार मानायचा प्रयत्न केला तर ते “हे आपण कुणावर उपकार केलेले नसून केवळ कर्तव्य केल्याचे सांगतात!” पण वास्तव जगात असे जाणीवपूर्वक कृतज्ञता व्यक्त करणारे क्वचितच आढळतात. जास्त करून अशा माणसांचा स्वत:च्या स्वार्थासाठी पद्धतशीरपणे उपयोग करून घेणारेच त्यांच्या आजूबाजूला वावरत असतात, पण त्या माणसाला या परिस्थितीची मुळीच जाणीव नसते.तो आपल्या कर्तव्य भावनेने व विश्वासाने सर्वाना अशी मदत करत रहातो. तो त्याच्या सहज सुलभ वागणुकीचा भाग असतो व नंतर तोच त्यांचा स्वभाव बनतो! आजूबाजूची माणसे त्याचे तसे वागणेच गृहीत धरायला लागतात. त्याचेकडून कायमच तसेच वागणे अपेक्षिले जाते पण माणूस मनाने कितीही मोठा असला तरी व्यावहारीक जगामध्ये एक ना एक दिवस वयक्तिक कारणामुळे अथवा अन्य काही कारणामुळे त्याला कायमच तसे वागता येत नाही.आणि त्याच्या वेगळ्या वागण्यामुळे त्याला विचित्र प्रतिसाद मिळायला लागतात.या प्रतिक्रीया इतक्या टोकाच्या असतात की आपल्या उदार वागण्यातला फोलपणा त्याला कळून येतो, पण तोपर्यंत बराच उशीर झालेला असतो! अशा माणसांच्या मनातील भावना किंवा त्याला आलेल्या समस्या जाणून घेण्याची कुणाला कधी गरजच वाटलेली नसते किंवा तशी कुणी तसदीही घेतलेली नसते! आणि मग एक दिवस असा उजाडतो की आजूबाजूंच्या माणसांच्या भावनिक,आर्थिक वा अजून कोणत्याही प्रकारच्या वाढलेल्या अपेक्षा पूर्ण होऊ शकत नाहीत. सगळ्यात शेवटी एक माणूस म्हणून असलेल्या मर्यादामुळे हे घडणे अगदी साहजिक आहे! मग लोकांची गृहीतके बिघडायला लागतात व त्या माणसाकडून थोडे वेगळे वागले जाताच लोकांसाठी तो एक अपेक्षाभंग ठरतो.त्या व्यक्तीच्या खऱ्या परिस्थितीची शहानिशा न करता मग नको त्या वावड्या उठायला लागतात! त्याच्या वागण्याचे वेगळे वेगळे अर्थ लावले जातात.त्याला बदनाम केले जाते. असे वारंवार घडत राहिले की लोक अगदी सहज अशा व्यक्तीबद्दल म्हणायला लागतात-.
”तो आता बदलला बर का!”
थोडक्यात माणसे खूप कृतघ्न असतात!
खर तर ती व्यक्ती जशी होती तशीच असते! त्याच्या मजबुरीमुळे त्याने आपल्या वागण्यात तात्पुरता बदल केलेला असतो.थोडक्यात तो फक्त समोरच्या व्यक्तीच्या मनाप्रमाणे वागलेला नसतो.या एकाच कारणाने आधी त्याने केलेले अनंत उपकार विसरून त्याच्याबद्दलचा बघण्याचा दृष्टीकोनच माणसाने बदलून टाकलेला असतो! अशा स्वार्थी लोकांना याचे भान रहात नाही की कोणत्याही व्यक्ती बद्दल मत बनवताना, त्याचेबद्द्ल कुठलीही टिपण्णी करताना, थोडं स्वत:च्या वागण्याचाही प्रामाणिकपणे विचार करायला हवा! आपल्या या वागण्याकडे सोयीस्करपणे दुर्लक्ष करून आपल्या उपकार कर्त्याला बदनाम करणाऱ्या अशा माणसानी नीती अनीतीचे सगळे संकेत गुंडाळून ठेवलेले दिसतात. केवळ आपल्या मनासारखे घडत नाही म्हणून जग वाईट असल्याचा कांगावा असे लोक करतात.
मला असे वाटते की असे कृतघ्न लोक आजूबाजूला आहेत म्हणून सज्जनपणा हा दुर्गुण ठरत नाही! सज्जन लोक जगात आहेत म्हणून हे जग सुंदर आहे! वाईट पणाच्या या दलदलीत मोठ्या मनाची सज्जन माणसे कमळाप्रमाणे वावरत असतात म्हणून माणसातली माणुसकी जिवंत आहे अन्यथा हे जग नरक म्हणून ओळखले गेले असते! तेंव्हा स्वच्छ नजरेने माणसे पारखायला शिकायला हवे आपल्यातला चांगुलपणा योग्य माणसांसाठीच वापरला जातो आहे ना हे आजच्या जगात तपासून घ्यायला हवे कुणी आपल्याला त्याच्या स्वार्थासाठी वापरून तर घेत नाही ना, हे सजगपणे पहायला हवे! अन्यथा चांगल्या माणसांचा चांगुलपणावरचा विश्वास उडून जाईल!
आपल काय मत आहे?
.............प्रल्हाद दुधाळ.

No comments:

Post a Comment