Monday, July 28, 2014

वडिलोपार्जित शेती

 वडिलोपार्जित शेती
       
      परवाचीच गोष्ट आहे, काही कामानिमित्त बसने प्रवास करत होतो.शेजारी एक पन्नाशी चे गृहस्थ्य बसले होते.सहज इकडच्या तिकडच्या गप्पागोष्टी चालल्या होत्या.त्यांनी सांगितले की, एके काळी पुण्याच्या शेजारील एका गावात त्यांची पंधरा एकर बागायती शेती होती त्यांचे वडील शेती करत पण त्यांचे निधन झाल्यानंतर त्यांचे भाऊ शेती विकून पैसे वाटून देण्याबद्दल भांडण करू लागले.खूप समजावले पण ते ऐकायला तयार नव्हते शेवटी दररोजच्या कटकटीना कंटाळून त्यांनी त्यांची  वंश परंपरेने आलेली  शेती एका बिल्डरला विकून टाकली व मिळालेले पैसे आपापसात वाटून घेतले.वाट्याला आलेल्या पैशातून त्या  गृहस्थ्याने  सोलापूर रोडवर थोडी शेतजमीन घेतली.शहरात एक दुकान घेऊन भाड्याने दिले आहे.एक मुलगा शेती करतो व दुसरा इंजिनअर झाला आहे.ठोस उत्पन्नाचे साधन  असल्यामुळे एकंदरीत आनंदात वाटला तो माणूस! त्याने पुढे सांगितले की" माझे ठीक आहे हो, पण माझ्या दोन्ही भावांची अवस्थ्या सध्या अत्यंत वाईट आहे! शेती विकून मिळालेल्या पैशांतून त्यांनी फक्त मौजमजा केली! प्रथम त्यांनी आलिशान मोटारी खरेदी केल्या.मुलांना  हव्या तशा किमती बाइक्स आल्या.त्यांना  हवा तेवढा पॉकेटमनी दररोज च्या दररोज मिळू  लागला.पैश्याबरोबर अंगात भरपूर  मस्ती व तोंडी उद्धट भाषा आली.अचानक भरपूर पैसा आल्यामुळे 'असतील शिते तेथे जमतील भुते'  या न्यायाने आजूबाजूला मतलबी लोकांचा वावर वाढला. समाजात त्यांना मान मिळू लागला.मग या अचानक मिळालेल्या प्रतिष्ठेपायी पाण्यासारखा पैसा खर्च  व्हायला लागला.घरात नको एवढी किमती वस्तूंची खरेदी होऊ लागली.सर्व कुटुंब छानछोकीत राहू लागले.आपल्याला काहीच कमी नाही अशा समजुतीत पैसा उधळला जाऊ लागला.बाप व मुले दोघानाही दारूचे व्यसन लागले.ढाब्यांवर पार्ट्या व डान्सबारवर पैसा खर्च व्हायला लागला.अनेकांनी अनेक प्रकारे समजावले पण त्यांचेवर काही परिणाम झाला नाही.आपल्याच मस्तीत दोन्ही भाऊ व त्यांचे कुटुंबीय होते.आपल्या समजदार भावाला ते आपला शत्रू समजू लागले.शेवटी व्हायचे तेच झाले! हळू हळू शिल्लक पैसा कमी कमी होत गेला.आणि शेवटी लागलेल्या व्यसनांपायी सुरुवातीला गाड्या मग दागिने व शेवटी रहाते घर विकून मिळालेला पैसासुध्दा उधळला गेला.कुटुंब अक्षरश: रस्त्यावर आले. आज त्या दोन्ही भावांना भाड्याच्या झोपडीत राहावे लागत आहे! .काहीही उत्पन्न नाही.कुठलेही काम न करता ते चोवीस तास नशेत असतात!मुले वाईट संगतीत आहेत.बायका मोलमजुरी करून कसेबसे या सर्वाना पोसत आहेत!" शेजारील माणसाने सांगितलेले हे प्रखर वास्तव ऐकल्यावर मन सुन्न झाले.आपली वडिलोपार्जित शेती विकून माणसे अशी देशोधडीला का लागतायेत?  
        सध्या वाढत्या शहरीकरणामुळे शेतजमिनीचे झपाट्याने रहिवाशी पट्ट्यात रुपांतर होत आहे. वाढत्या शहरांचा आजूबाजूच्या गावात विस्तार होत आहे.शहरांकडे माणसांचे लोंढे वाढतायेत आणि या वाढत्या लोकसंखेच्या गरजा भागविताना  शेतजमीन कमी कमी होत चालली आहे.त्यातच शेती हा आतबट्ट्याचा व्यवसाय आहे असा मतप्रवाह वाढत आहे.शेतीत राबण्यापेक्षा आपली परंपरेने आलेली शेती विकून रोकडा पैसा मिळवण्याकडे शेतकऱ्यांचा कल वाढत आहे.शेती व्यवसाय भरवशाचा नाही,आणि  हा कमीपणाचा व्यवसाय असे मानणाऱ्या नव्या पिढीतील शेतकऱ्यांनी आपल्याकडील वडिलोपार्जित शेती विकण्याचा सपाटा लावला आहे.अनेक जमीन माफिया लोकांच्या या मानसिकतेचा पुरेपूर फायदा उठवीत आहेत.पैशाच्या व त्या निमित्ताने येणाऱ्या तात्कालिक ऐश्वर्याच्या  मोहाला  शेतकरी बळी पडत आहे व आपल्या जमिनी विकून टाकत आहेत!
                 हे खरे आहे की,आपल्याकडील धोरणांच्या दुष्काळामुळे शेती करणे भरवस्याचे राहीले नाही..अंगमेहनती चे कष्ट करण्याची नव्या पिढीची तयारी नाही त्यामुळे शेतीसाठी लागणारे मनुष्यबळ सहजासहजी उपलब्ध होत नाही.शेती या व्यवसायाला समाजात पुरेशी प्रतिष्ठाही मिळत नाही.शेती करणाऱ्या मुलाना लग्नासाठी कुणी मुली देत नाही हे वास्तव आहे!त्यामुळे आपली  वडिलोपार्जित शेती विकुन रोकडा पैसा उभारण्याची प्रवृत्ती वाढते आहे.शहरांच्या आजूबाजूच्या छोट्या छोट्या गावापर्यंत ही वृत्ती पसरली आहे.असा विनाकष्ट व अचानक मिळालेला पैसा कसा व कुठे वापरावा याची अक्कलच नसल्यामुळे  तो नको तेथे उधळला जातो आहे. थोडे दिवस या पैशातून खरेदी केलेल्या  जाड जाड सोनसाखळ्या, हातात जाड कडी घालून मिरवले जात आहे. महागड्या गाड्या, महागडी कपडे, हौस मौज यात हा पैसा अक्षरशः उधळला जात आहे.ढाब्यांवर व डान्सबार वर दौलतजादा  करून नोटांच्या थप्प्या उधळल्या जाताहेत.व्यसनांच्या आहारी जाऊन  क्वचित अपवादात्मक उदाहरणे सोडता अशा प्रकारे बहुसंख्य शेतकरी जमिनी विकून देशोधडीला लागले आहेत.हा पैसा हळूहळू संपत जातो आणि लागलेल्या वाईट सवयीमुळे पिढ्या बरबाद झाल्या आहेत आणि होत आहेत.अशी अनेक उदाहरणे पहायला मिळत आहेत की दहा पंधरा वर्षापूर्वी  मुबलक शेतीचा मालक असलेला शेतकरी आपली जमीन  विकून त्याच जमिनीवर बांधल्या गेलेल्या  हौसिंग सोसायटी च्या गेटवर चौकीदाराचे जिणे जगतो आहे! त्याची अर्धांगिनीला नाईलाजाने चार घरची धुणीभांडी करावी लागत आहेत!  विदारक असले तरी  हे  चित्र अगदी खरे आहे! 
             आपला  परंपरागत शेतीचा व्यवसाय गुंडाळून शेती विकायला माणस कशी काय तयार झाली? मला असे वाटते की वाढते शहरीकरण.शेतीचा बेभारवशाचा व्यवसाय, शेतमजुरांची चणचण,वाढता भांडवली खर्च व त्याच्या वसुलीचा नसलेला भरवसा.सुशिक्षित तरुणांचा शेतीबाबत अनुत्साह अशा अनेकविध कारणांनी शेती करण्याऐवजी ती विकून आयता पैसा उभारण्याकडे लोकांचा कल वाढला आहे.कृषिप्रधान भारतात शेती व्यवसायाला समाजात मिळायला हवी तेव्हढी प्रतिष्ठा मिळत नाही ही वस्तुस्थिती आहे,पण याचा अर्थ शेतीचे महत्व कमी झाले आहे असे थोडेच आहे? आपल्या मागच्या पिढ्यांनी कष्ट करून आपल्या हाती सोपवलेली शेती आपण तात्कालिक पैशाच्या मोहाला बळी पडून विकतो आहोत,त्यावर ऐश करत आहोत याची खर तर आपल्याला लाज वाटायला हवी.पण एकंदरीत उतरणीला लागलेल्या सामाजिक मूल्यांमुळे मनेही मुर्दाड झाली आहेत .आत्मकेंद्रित वृत्तीमुळे माणूस फक्त आजचाच विचार करतो आहे.वाढत्या जागतिकीकरणाच्या धबडग्यात माणसाचे माणूसपण हरवत चालले आहे.
       तेंव्हा,ही धरणी ओरडून सांगते आहे –“बळीराजा सावध हो, आपली काळी माय विकायला काढू नको.थोडा विचार कर! वडिलोपार्जित शेती विकून तुझी पिढी मौजमजा करेल,पण येणारी पुढची पिढी काय करेल? स्वार्थी वृत्ती सोडून दे. आपल्या आधीच्या पिढीने असलेली दौलत विकून विनाकष्ट आपले आयुष्य कसे जगता येईल असा स्वार्थी विचार केला हे कळेल तेंव्हा येणाऱ्या पिढ्या तुला माफ करणार नाहीत! तेंव्हा अजूनही वेळ गेली नाही आतातरी जागे होऊन राहिलेली शेती विकायची थांबव तुही ऐक आणि दुसऱ्याला सुध्दा जमिनी विकून येणाऱ्या परिस्थितीची जाणीव करून दे !”
धरणीमाय चा हा आक्रोश बळीराजाने आतातरी ऐकायलाच हवा! तुम्हाला काय वाटते?                                                                                                                                                                                      .................प्रल्हाद दुधाळ .

आनंदी जीवन

                                आनंदी जीवन.
                   आपले जीवन आनंदात असावे असे प्रत्येकाला वाटत असते, किंबहुना आपले जीवन सुख समाधान व आनंदात असावे यासाठीच माणसे जीवनभर अनेक प्रकारचे खटाटोप करत असतात.कुणाला वाटते की आपल्याला भरपूर संपत्ती मिळाली की त्याचे जीवन आनंदाने भरून जाईल,तर कुणाला वाटते त्याला अनिर्बंध सत्ता मिळाली की त्याच्यासारखा आनंदी तोच! कुणी गृहसौख्याला आनंदी जीवन समजते तर कुणी आपल्याच मस्तीत जगण्याला आनंदी जीवन मानत असतो! काही लोक विविध व्यसनात आपला आनंद शोधत असतात! अशा प्रकारे सकाळी उठल्यापासून ते रात्री झोपेपर्यंत, जन्मापासून ते मरेपर्यंत माणसे आपापल्या परीने आनंदी रहाण्याचा प्रयत्न करत असतात. आनंदाच्या मागे माणूस अक्षरश: धावत असतो! यात अगदी तुम्ही,मी,आखिल मानवजात असेच वागते!सर्वजण अशा आनंदी जीवनासाठी धावपळ करत असतात ! खरच मिळतो का आनंद अशा धावपळीतून? होते का आनंदी माणसाचे जीवन त्याच्या अपेक्षेप्रमाणे?
                    मला असे वाटते की, आपल्याला आनंदी व्हायचे आहे म्हणजे नक्की काय मिळवायचे आहे? हे जोपर्यंत माणूस निश्चित करत नाही तोपर्यंत तो आनंदी जीवन जगतो आहे की नाही हे ठरवणे अवघड आहे. म्हणजेच,प्रथम आपल्या आनंदाच्या कल्पना ठरवायला हव्यात.मग या कल्पना साकार झाल्या की खर तर तुम्ही आनंदी झाला असे व्हायला हवे, पण तसे होत नाही आनंद ही भावना अशी कोणत्याही व्याख्येत बसवणे अशक्य आहे! एक उदाहरण म्हणून सकाळच्या चहाचे उदाहरण घेऊ, सकाळी उठल्याबरोबर बाल्कनीत कोवळ्या उन्हात बसून चहाचे घोट घेत आजचा पेपर वाचण्यात एखाद्याला प्रचंड आनंद मिळतो असे समजू.त्या व्यक्तीला त्याच्या अपेक्षेप्रमाणे बाल्कनीत पेपर व चहा मिळाला.तो घुटके घेत चहा पीत आहे.आनंदात डुंबत दररोज असा तो चहा पीत असतो तसाच तो आजही पीत आहे पण त्याचे मन ऑफिसात आज प्रमोशनच्या ज्या ऑर्डर निघणार आहेत त्यात आपले नाव असेल की नसेल या चिंतेत आहे. मग तो आनंदी आहे असे म्हणता येईल का? तर नाही असेच म्हणावे लागेल!अशा अनेक गोष्टी मानवी जीवनात त्या त्या प्रसंगी आनंद निर्माण करत असतात! अशा प्रासंगिक आनंदाच्या कल्पना माणसाच्या  सर्वंकष आनंदी जीवनासाठी कुचकामीच ठरतात. अशा प्रासंगिक आनंदाचे अनेक क्षण प्रत्येकाच्या दररोजच्या आयुष्यात येत असतात पण त्यावरून त्या व्यक्तीचे जीवन आनंदी आहे असे म्हणणे धाडसाचे ठरू शकते! मग आनंदी जीवन कशाला म्हणायचे?        
                                आनंदी आणि समाधानी असणे ही एक मानसिक अवस्था आहे! जीवनभर आनंदी असण्यासाठी आपल्या जीवनाबद्दल त्याच्या उद्देशाबद्दल खूप अभ्यासाची गरज आहे.आपल्या जीवनात कोणत्या कोणत्या गोष्टींनी आनंद बहरू शकतो ते डोळसपणे ठरवायला हवे.तात्पुरत्या स्वरूपातील आनंदापेक्षा आपले जीवन कायम आनंदात राहील अशा कारणांची जाणीवपूर्वक यादी करायला हवी.अमक्या गोष्टीत खूप आनंद मिळेल पण त्या गोष्टीं ऐवजी अजून कशा कशामुळे तोच आनंद मिळू शकतो यावरही विचार करून ठेवायला हवा! कायम आनंदी अवस्थेत रहाण्यासाठी जीवनातले अगदी छोटे छोटे नकळत आयुष्यात येणारे आनंदी क्षणही जाणीवपूर्वक वेचता यायला हवेत.दुसऱ्याला झालेला आनंदही आपला आनंद म्हणून साजरा करता यायला हवा! घेण्यात आनंद आहेच पण काही देण्यातही आनंद असतो हे कळायला हवे. आपल्या प्रगतीमध्ये आनंद आहेच पण समाजाच्या उन्नतीमधील आनंदाचीही अंगी जाणीव हवी. कुणाला दु:खी करून आनंद मिळत असेल तर तो आनंद कामाचा नाही हे समजणारी संवेदना अंगी असायला हवी! आपल्याला मिळालेले मानवी जीवन हे भीती,चिंता,कटकटीने ग्रासलेले वा कसे तरी रडत खडत धुसफुसत ढकलण्यासाठी नसून ते आनंदात व उत्साहात प्रत्येक दिवस एक उत्सव म्हणून साजरा करण्यासाठी आहे असे सतत मनावर बिंबवायला हवे.आयुष्यातली घडणारी प्रत्येक घटना आपल्या मनाप्रमाणे घडणे अशक्य आहे, तसेच समोर येणारा प्रत्येक माणूस आपल्याला अपेक्षित आहे तसाच वागणेही अशक्य आहे याची जाणीव ठेऊन आनंदी जीवनासाठी या जीवनातला प्रत्येक क्षण प्रसन्न कसा होईल ते बघायला हवे.आयुष्यातले येणारे चढ उतार हे जीवनाचे  अविभाज्य भाग आहे, त्यामुळे ते समोर येणारच आहेत,ते चढ वा उतार साजरे करायला शिकायला हवे. समोर येणाऱ्या  समस्येला आनंदातला अडसर न मानता अशा समस्येवर स्वार होऊन आव्हान स्वीकारण्यात मिळणारा आनंद उपभोगता यायला हवा! अशा वृत्तीने समस्या ही समस्या न रहाता एक संधी म्हणून स्वीकारली जाईल व या संधीच सोन करण्यातला आनंदही साजरा करता येईल!
                         आपल्या दैनंदिन रुटीन आयुष्यात अनेक आनंदाचे क्षण हात जोडून उभे असतात पण आपल्या आनंदी जीवनाच्या पारंपारिक ठोकताळ्यात आपण गळ्यापर्यंत अडकलेले असल्यामुळे असे  छोटे छोटे आनंदाचे क्षण न उपभोगताच आपण जगत असतो. आभासी आनंदाच्या कल्पनाविश्वात रमत रहातो आणि जीवनातला खरा आनंद जीवनातून निसटून जातो! हे समजून घ्यायला हवे की थोडं हटके वागून प्रचंड आनंद निर्माण करता येतो.
             आयुष्यात आपल्याला जे मिळाले नाही त्यासाठी उगाच रडत वा चडफडत राहण्यापेक्षा जे समोर आहे त्यात सुख समाधान शोधून आनंदी जीवन जगण आपल्या मानसिक व शाररीक स्वास्थ्यासाठी अत्यंत आवश्यक आहे आणि हे उत्तम मानसिक व शाररीक आरोग्य म्हणजेच आनंदाची गुरुकिल्ली आहे हे समजून घ्यायला हवे!
         थोडा वेगळ्या पद्धतीने  विचार केला तर ही गोष्ट लक्षात येईल.असा सकारात्मक दृष्टीकोन अंगी येण्यासाठी अगदी डोळसपणे आपल्या आनंदी जीवनाच्या कल्पना पुन्हा एकदा तपासून पहा! बघा, नुसत्या अशा उत्साही सकारात्मक विचारानेसुध्दा तुम्हाला प्रसन्न वाटत आहे! ही प्रसन्नता हा आनंद कायम कसा मिळत राहील यासाठी आजपासूनच स्वत:ला थोडं बदलायचं का?   

                                               ......................प्रल्हाद दुधाळ.

Tuesday, June 24, 2014

नातेसंबंध

                            नातेसंबंध               

                       सर्वगुणसंपन्न माणुस ही अशक्य गोष्ट आहे !मला असे वाटते की प्रत्येक माणुस वेगळा असतो.अनेक चांगल्या गुणांबरोबरच काही अवगुणही माणसात असतातच! पण एकदा का स्नेहबंध तयार झाले की अशा व्यक्तीमधील सर्व गुणदोषासहीत स्विकारणे अपेक्षित आहे . एकमेकातल्या चांगुलपणाच्या पायावर असे नातेसंबंध टिकवले जातात.एकमेकाला सांभाळुन घेण्याची व्रूत्ती जोपासली जाते आणि मग आपोआपच प्रत्येकजण आत्मपरिक्षण करून आपल्यातले वाईट दूर करायचा प्रयत्न करायला लागतो आणि निकोप स्नेहाच्या नात्याना बळकटी येते.येथे गरज असते ती संबंधितांकडून सकारात्मक सपोर्टची !
                                                                                           ..........................प्रल्हाद दुधाळ.

शाकाहारी


                                                         शाकाहारी 

                  अनेक लोक वेगवेगळी व्रतवैकल्ये करतात, फक्त शुध्द शाकाहारच घेतात. देवाची कडक उपासना करतात. पण बोलताना त्यांच्या प्रत्येक शब्दात विखार भरलेला असतो! दिवसभर अनेकांशी ते कटू व शिवराळ भाषेत बोलत असतात. आपल्या बोलण्याने अनेक जित्याजागत्या माणसांची मने दुखावण्यात त्यांना असुरी आनंद मिळतो. अशाच प्रकारचे अनेक लोक सकाळी सोवळ्यातली साग्रसंगीत पूजा करतात आपण चिटपाखराला सुध्दा दुखावत नाही, शुध्द शाकाहारी आहोत असे टिमकी वाजवतात पण नोकरी /व्यवसायाच्या ठिकाणी गोरगरीब जनतेला लुबाडतात, भ्रष्ट मार्गाने पैसा मिळवतात.दिवसभर लोकाना वेठीला धरून अप्रत्यक्षपणे लोकांचे रक्त पिणाऱ्या अशा लोकाना शाकाहारी म्हणायचे का?
                                                                                                        .......प्रल्हाद दुधाळ.

“अती झाल हसू आलं!”

                         

                                                      “अती झाल हसू आलं!”

    माझ्या मित्राने-रफिकने पुण्यातल्या एका उपनगरात चायनीज फूड चे एक छोटेसे हॉटेल सुरू केले त्याला आता एक वर्ष होवून गेले होते. हॉटेलच्या ओपनिंगला मी अगदी आवर्जून उपस्थित होतो.रफिकने आत्तापर्यंत खूप कष्टात दिवस काढले होते. चार पाच वर्षे जमवाजमव करून त्याने या व्यवसायात पदार्पण केले होते.माझा एक मित्र धंद्यात स्थिर होवू पहात होता याचा नक्कीच आनंद होता.
 मधल्या काही दिवसात माझे त्या भागात जाणे झाले नाही.एक दिवस निवांत होतो म्हटलं रफिकच हॉटेल कसं चाललय बघू या.संध्याकाळी त्याच्या हॉटेल वर गेलो.रफिकचे या व्यवसायात चांगलेच बस्तान बसले होते.त्याने माझे उत्साहाने स्वागत केले.मागच्या बाजूला आमची गप्पांची महफिल जमली.चायनीज हॉटेल चांगले चालते आहे पण या धंद्यात काही त्रासही होतात असे तो सांगत होता.त्याने  सांगितलेला  हा किस्सा आहे       
      दररोज संध्याकाळी ठराविक वेळी त्याचे हे हॉटेल रफिक उघडत असे.पहिल्या दिवसापासूनच त्याने पदार्थांच्या क्वालिटीकडे तसेच स्वच्छतेकडे लक्ष दिले होते त्यामुळे त्याच्या हॉटेलवर त्याच्या हातचे टेस्टी चायनिज पदार्थ खायला दररोज रात्री उशिरापर्यंत लोकांची भरपूर गर्दी व्हायची.शहराबाहेर त्याचे हे हॉटेल होते त्याने कुठल्या सरकारी परवानग्या घेतलेल्या नव्हत्या त्यामुळे कायद्याच्या भाषेत तसा तो अनधिकृत धंदा होता. तो असा अनधिकृत धंदा करत असल्याने नगरपालिका कर्मचारी,आरोग्य खात्याचे लोक व पोलिस त्याच्याकडून नियमितपणे हप्ता घेउन जायचे.त्यामुळे तो आपला हा धंदा निर्वेधपणे करु शकत होता.असा धंदा करायचा तर या गोष्टी करायलाच लागायच्या!
      तर असाच एक दिवशी रफिक रात्री उशिरापर्यंत आपला धंदा करत होता रात्री साडे अकरा च्या दरम्यान पोलिसांचे गस्तीपथक पोलिस व्हॅन मधुन तेथे आले.आजच नव्याने रुजु झालेले साहेबही गाडीत होते. नेहमीचे  आर्थिक व्यवहार झाल्यावर साहेबाने एक चायनिजचे पार्सल बांधुन दे असे रफिकला  फर्मान सोडले.साहेबाने सांगितलेल्या डिश चे पार्सल घेउन (अर्थात फुकट ) घेउन साहेबाची गाडी गेली.
    दुसऱ्या दिवशी त्याच वेळी पुन्हा पोलिसांची गाडी आली.साहेबाच्या बायकोला ती डिश खुपच आवडली होती, त्यामुळे आजही साहेबाने पार्सलची ऑर्डर दिली होती.रफिकने त्या दिवशीही पार्सल दिले.आणि मग हा दररोजचा उद्योग झाला! रफिक वैतागुन गेला.दररोज हा नवा भुर्दंड चालू झाला होता.पोलिसांशी वाकडे नको हा विचार करून  दररोज रफिकला पार्सल तयार ठेवण्याचा आदेश पाळावा लागत होता.हे असेच चालत राहिले.रफिक ही ब्याद कशी टाळता येईल याच्यावर खूप दिवस विचार करत होता पण काय करावे ते त्याला सुचत नव्हते. एक दिवस मात्र त्याला एक युक्ती सुचली.त्या दिवसा पासून रफिक अजिबात न कुरकुरता अत्यंत आनंदाने साहेबाचे पार्सल तयार ठेवायला लागला! एक दिवस साहेबानी गाडीतून उतरून  त्याच्या डिश चे कौतुक केले,साहेब त्याला म्हणाले की "पुर्वी पेक्षा तुझ्या डीशची चव खुपच छान झाली आहे! मॅडम तर जाम खुश आहे तुझ्या कौशल्यावर!" रफिक साहेबांकडे बघून कसनुस हसला! साहेब नेहमी प्रमाणे फुकटचे पार्सल घेउन गेले!”
आता माझी उत्सुकता चाळवली गेली.
“असं काय केलंस रे रफिक तू ,की आनंदाने साहेबाला पार्सल द्यायला लागलास?”
       तुम्हाला काय वाटत? काय खास बदल केला असेल रफिकने, की त्याच्या त्या  डिशची चव एकदम एवढी फर्मास झाली असेल? मला तर काही सुचतच नव्हते.मी  सांग म्हणून खूपच आग्रह धरला तेंव्हा त्याने त्याचे ते सिक्रेट मला सांगितले, रफिक म्हणाला
 “तू माझा मित्र म्हणून हे तुला सांगतोय,तू मात्र हे तुझ्या जवळच ठेव.”
मी होकारार्थी मान डोलावली.
" या नव्या साहेबाच्या दररोजच्या पार्सल च्या मागणीवर मी वैतागुन एक उपाय शोधला. काय व्हायचं की माझ्याकडचे बरेच गिर्हाईक मागवलेले पदार्थ अर्धवटच खायचे व डिशमध्ये बरेच उष्टे अन्न  तसेच सोडुन जायचे.मग मी काय केले की  असे उरलेले अन्न मी एका वेगळ्या भांड्यात काढायला सुरुवात केली. साहेबाची गाडी येण्याच्या सुमारास मी हे मिश्रण गरम करुन साहेबाचे पार्सल तयार करायला लागलो व त्याला देउ लागलो! आता तर साहेबाला व त्याच्या बायकोला हीच डीश आवडते !"
दररोज न चुकता गाडी आजही पार्सल घेउन जात आहे.
मी तुम्हाला म्हणून हे सांगतोय,प्लीज कुणाला सांगू नका,काय?
                                                                                              ...........प्रल्हाद दुधाळ.पुणे.

जातीभेद.

                                            मला वाटते की वर वर मी जात मानत नाही असे म्हणणारे लोकही स्वत:ची जात कुरवाळत असतात.भारतीय माणुस फक्त परदेशात असला की भारतीय असतो.परराज्यात असला की त्याचा राज्याबद्द्ल अभिमान जागा होतो आणि मग त्याच क्रमाने जिल्हा तालुका व गावाचा गर्व दाखवला जातो पण समाजात वावरताना मात्र धर्म आणि जातीवर जातो.फेसबुक सारख्या माध्यमातही असे जातीनिहाय कळप तयार झाले आहेत .जोपर्यंत सर्व सरकारी कागदपत्रातुन जातीचा रकाना नष्ट होत नाही तोपर्यंत जाती व जातीभेद नष्ट होणे अवघड आहे.
                                                                                           .........प्रल्हाद दुधाळ 

माणसाची जडणघडण.

                                                    माणसाची जडणघडण.
           सर्वसाधारणपणे एखादी व्यक्ती जेंव्हा लोकांच्या दृष्टीने वावगी वागायला लागते तेंव्हा  ती व्यक्ती बिघडली असे  म्हटले  जाते.त्या व्यक्तीच्या  अशा बिघडण्याच्या कारणांची चर्चाही समाजात अगदी चवीने होत रहाते.अशा वेळी त्या वाया गेलेल्या माणसाच्या आईवडीलांचा, झालेल्या संस्कारांचा,त्याच्या संगतीचा उध्दार होतो.गोष्ट इथेच थांबत नाही तर ज्या वस्तीत त्याचे पालनपोषण झाले त्या वस्तीला,तो ज्या  गावात रहातो त्या गावालाही बदनाम केले जाते! अशावेळी लोक अगदी सहजपणे बोलतात-
"त्या वस्तीत रहातो ना तो,मग बिघडणारच ! दुसरे काय होणार?”
किंवा “ते गावच तसले, तिथले संस्कारच वाईट!” ”खाण तशी माती!” असेही लोक बोलतात.सगळा दोष संस्कारांना दिला जातो!
   एकंदरीत माणसाच्या जडणघडणीचा वरवर अभ्यास केला तर असे आढळते की,माणसाच्या वागण्याबोलण्यावर विचारप्रक्रियेवर त्याचे आईवडिल,शेजारी,मित्रमंडळी या बरोबरच दैनंदिन आयुष्यात त्याचा ज्यांच्या  ज्यांचाशी  संपर्क येतो अशा माणसांचा जाणते  अजाणतेपणी परिणाम होत असतो. यालाच आपण संस्कार असे नाव देतो!
 हे संस्कार ज्या पध्दतीने होतात तशीच त्याची जडणघडण होत असते.चांगले संस्कार चांगले शिक्षण मिळाले तर जीवनाला योग्य पद्धतीने गती मिळते पण यापैकी एका घटकाचा जरी वाईट प्रभाव पडला तरी त्या व्यक्तीवर त्याचा वाईट परिणाम होवू शकतो.म्हणजेच माणसाचे घडणे वा बिघडणे,त्याची जडणघडण ही त्याच्यावर झालेल्या संस्कारांवर अवलंबून असते असे सर्वसाधारणपणे मानले जाते.
       हे गृहीतक काही अंशी बरोबर असेलही,पण मला वाटते की, हे अर्धसत्यच आहे,कारण बहुतांश लोकांच्या बाबतीत जरी हा ठोकताळा बरोबर असला तरी आपण समाजात बरीच अशी माणसे पहातो की त्यांना लहानपणापासून कोणत्याही प्रकारचे सुसंस्कार मिळालेले नाहीत,अत्यंत विपरीत परिस्थितीत ते रहात आहेत,त्यांच्या आजूबाजूला अत्यंत प्रतिकूल वातावरण आहे तरीही त्या प्रतिकूल परिस्थितीचा कोणताही अनिष्ट परिणाम न होता,ते त्या दलदलीमधून कमळासारखे फुलतात! एक यशस्वी सुसंस्कारित व्यक्ती म्हणून समाजात आपले स्थान ते निर्माण करतात.आपली समाजात वेगळी ओळख तयार करतात!समृद्धी प्रतिष्ठा व कीर्ती त्यांच्या पायाशी लोळण घेत असते.याचाच दुसरा अर्थ असाही होतो की,फक्त चांगले संस्कार अथवा आजूबाजूचे वातावरण माणसाला चांगला किंवा वाईट ठरवू वा बनवू शकत नाहीत!
      मला असे मुळीच म्हणायचे नाही की चांगले संस्कार महत्वाचे नाहीत.चांगल्या संस्काराचा माणसाच्या जडण घडणीत महत्वाचा वाटा आहेच, पण माणसामधील जन्मत: असलेली आंतरिक समज व प्रगतीसाठीची जिद्दही त्याच्या जडणघडणीत अत्यंत मोलाची आहे !अत्यंत दरिद्री अशिक्षित सांस्कृतिकदृष्ट्या मागासलेल्या समाजात जन्म घेऊन व त्याच वातावरणात पालनपोषण होऊनही चिखलात उमलणाऱ्या कमळाप्रमाणे काही व्यक्तीमत्वे त्यांच्यातल्या असामान्य बुद्धिमत्तेच्या व स्वप्रयत्नाने समाजात नाव कमावतात. एक यशस्वी व कर्तबगार माणूस म्हणून त्यांचे नाव आदराने घेतले जाते! आपल्या आजूबाजूलाअसलेल्या आजच्या अशा यशस्वी लोकांचा,उद्योगपती,शास्रज्ञ विचारवंत,लेखक,कवी,वेगवेगळ्या क्षेत्रातले तज्ञ, यांच्या जीवनाचा अभ्यास केला तर आढळेल की यातल्या अशा अनेक व्यक्ती अत्यंत टोकाच्या प्रतिकूल परिस्थितीशी सामना करत त्यांच्या आजच्या पदावर पोहोचल्या आहेत! कोणतेही सुनियोजित संस्कार व पद्धतशीर शिक्षण न घेताही अनेक माणसे आयुष्यात यशस्वी झालेली दिसतात.अशा माणसांचे जीवन सर्वसामान्यांसाठी कायम आदर्शवत असते.
    याच्या उलट परिस्थितीही आपल्याला समाजात पहायला मिळते.अगदी उच्चशिक्षित संस्कारित घरात वाढलेली, परिस्थितीची कोणतीही झळ न लागलेली,अत्यंत चांगल्या वातावरणात वाढलेली व्यक्तीसुध्दा वाममार्गाला लागलेली दिसते.सामाजिकदृष्ट्या बिघडलेल्या व्यक्तींमध्ये तथाकथित संस्कारित कुटुंबातून आलेल्या व्यक्तींचे प्रमाणही नक्कीच विचार करायला लावणारे आहे.
                 
याचाच अर्थ असा की माणसाच्या व्यक्तीमत्वाची जडणघडण केवळ तो कोणत्या कुटुंबात जन्माला आला, त्याच्यावर कशा प्रकारचे संस्कार झाले,कोणत्या आर्थिक वा सामाजिक परिस्थितीत तो राहिला/वाढला,तो काय खातो, कुणाबरोबर व कशा प्रकारच्या घरात रहातो यावर अवलंबून नाही तर या सर्व परिस्थितीबरोबरच त्या माणसाची  आंतरिक समज व परिस्थितीवर मात करण्यासाठीची तीव्र इच्छाशक्ती त्या व्यक्तीला एक आदर्श माणूस बनवू शकते! आपण कुणाच्याही पोटी जन्म घेतलेला असू दे ,कोणत्याही जाती धर्मात आपण जन्म घेतलेला असुदे, घरची आर्थिक परिस्थिती कशीही असू दे ,कोणत्याही सामाजिक व्यवस्थेत तुम्ही वाढलेले असू दे,  तुमची जर कष्ट करण्याची मानसिक तयारी व समोर येणाऱ्या कुठल्याही प्रतिकूल परिस्थितीवर मात करण्याची जिद्द अंगी असेल तर अशा इच्छाशक्तीच्या जोरावर असा माणूस यशाच्या शिखरावर पोहोचणे सहज शक्य आहे! एक चांगला माणूस होण्यासाठी जात,धर्म,आर्थिक परिस्थिती,चांगले शिक्षण,उत्तम संस्कार,चांगली संगत एवढेच पुरेसे नाही या सर्व गोष्टी अनुकूल असो अथवा नसो पण  एक चांगला माणूस होण्यासाठी तुमच्याकडे एक चांगले संवेदनशील मन आणि कुठल्याही प्रतिकूल परिस्थितीतून भरारी घेण्यासाठीची जिद्द मात्र नक्की असायला हवी.तुमच्याकडे असलेले  हे चांगले मन जगातील चांगले गुण,चांगले संस्कार,परोपकार व आदर्श यांना आकर्षित करते आणि या चांगल्या मनाच्या  व जिद्दीच्या जोरावर तुमचे एका आनंदी यशस्वी संवेदनशील माणसात परिवर्तन अगदी सहजपणे होऊ शकते! आत्मविश्वास व प्रामाणिकपणे केलेले प्रयत्न वाल्याला  वाल्मिकी बनवू शकतात तर त्याच पध्दतीने तुम्ही एक आनंदी उत्साही व संवेदनशील माणूस बनायला काय हरकत आहे?
 निश्चितच असे होऊ शकते!
तर करायची सुरू ही आनंदयात्रा?   
    
                                   
                                        ....................प्रल्हाद दुधाळ.
                                                              ५/९ रुणवाल पार्क
                                                              मार्केट यार्ड पुणे ३७
                                                                 (९४२३०१२०२०)