Saturday, September 2, 2017

कारण

कारण.
श्यामराव नुकतेच एल आय सी मधून रिटायर झाले होते. लहानपणापासून त्यांनी अत्यंत कष्टाने एक शेतमजूराचा मुलगा ते एक उच्च अधिकारी पदापर्यंतचा प्रवास केलेला होता आपले करियर घडवत असताना सुरवातीला शिक्षणातले अव्वल स्थ्यान व नंतर नोकरीत प्रमोशन मागे प्रमोशन मिळवत राहीले. आपल्याला आयुष्यात जे मिळवायला प्रचंड सायास करावे लागले तसे आपल्या एकुलत्या एक मुलाच्या बाबतीत घडायला नको, त्याला हवे ते व हवे त्या प्रमाणात मिळायला हवे या ध्यासाने त्यानी प्रचंड पैसा व प्रतिष्ठा मिळवली. मुलाला उच्च शिक्षण दिले. त्याला उत्तम नोकरीही मिळाली. लग्न झाल्यावर मात्र तो यांच्याबरोबर न रहाता वेगळा रहातो. शामरावानी  मुलाच्या व कुटूंबाबाबत जे अपेक्षिले होते ते घडले नव्हते.आता रिटायर झाल्यावर रिकामे झाल्यावर काय करायचे वेळ कसा घालवायचा हा प्रश्न त्यांना सतावतो आहे कधी नव्हे तो चिडचिड होते आहे. त्यातच बीपी आणि शुगर वाढली आहे.आपण केलेले कष्ट, घडवलेले करियर या गोष्टी आता त्यांना व्यर्थ वाटताहेत. निराशेने ते ग्रासले आहेत.
      आज जे लोक पन्नाशीसाठीत आहेत त्याच्यातील बहुसंख्य लोकांनी स्वत:चे शिक्षण व करियर घडवताना प्रचंड कष्ट उपसले आहेत.आपला मार्ग आपणच निवडताना त्यापोटी येणारे यश अथवा अपयशाची जबाबदारीही  त्यांनी  स्वत: घेतली आहे.आपण करू किंवा म्हणू तेच खर या विचारप्रवृत्तीचे मूळ त्याच्या एकला चलोरे पद्धतीच्या जीवनप्रवासात आहे.या पिढीला ना मनाजोगता पैसा खर्च करता आला ना आजच्यासारख्या सुखसुविधा उपभोगता आल्या.त्यामुळेच असेल पण आजपण त्याला आपण कष्टातून उभारलेल्या विश्वाच्या अस्तित्वाची काळजी आहे.मिळवले ते चुकून हातातून निसटून तर जाणार नाही ना? हा विचार त्याला या वयात जास्त छळतो आहे त्यातूनच कौटूंबिक समस्या, कलह अथवा आजारपणे आली की त्याच्या चिडचिडेपणात भर पडते आहे.आपल्या मुलाबाळांसाठी आपण एवढे केले पण त्याची म्हणावी तशी कुणाला जाणीव नसल्याची भावनाही त्याला त्रास देते.ज्या लोकांनी आयुष्यात फक्त  आपली नोकरी धंदा व पैसा कमावणे यालाच महत्व दिले,  कोणतेही छंद जोपासले नाहीत, माणसे जोडली नाहीत,साहित्य कलेत जे कधी रमले नाहीत त्यांना आयुष्याच्या या टप्प्यावर एकटेपणा प्रचंड त्रास देतो.तो चिडचिडेपणा हा त्याने ज्या पद्धतीने जीवन जगले त्याचा परिपाक आहे.
काय वाटते आपल्याला?
..... प्रल्हाद दुधाळ.

No comments:

Post a Comment