Wednesday, September 20, 2017

आनंदी वाटा

   आनंदी  वाटा.
    धैर्यशील पवार-एक  उमद व्यक्तीमत्व होत.एका खाजगी कंपनीत व्यवस्थ्यापक म्हणून त्यांनी इमानेइतबारे नोकरी केली आणि मागच्या वर्षी सेवानिवृत्त झाले. आपलं काम भले आणि आपण भले या वृत्तीने त्यांनी आपले आत्तापर्यन्तचे आयुष्य जगले होते.
     सकाळी आठ वाजता घरातून बाहेर पडलेले पवार साहेब संध्याकाळी आठनंतरच घरी यायचे.बऱ्याचदा गुरूवारी सुट्टीच्या दिवशीही त्यांना कंपनीत जायला लागायचे. रिटायर होईपर्यंत त्यांनी नेहमीच आपल्या कामाला प्राथमिकता दिली.घरात त्यांची बायको सगळ सांभाळून घ्यायची.घरातल्या कुठल्याच गोष्टीत पवार साहेबांची इन्व्हाल्वमेंट नसायची.एकुलत्या एका मुलाच्या शाळेतही ते ना कधी पालक मिटींगला गेले ना कधी कौतुकाने त्याच्या शाळेच्या गैदारिंगला हजेरी लावली. कुठल्याही नातेवाईकाच्या लग्न बारसेच काय पण कुणाच्या मयतीला जाणेही त्यांना उभ्या आयुष्यात जमले नव्हते.या सगळ्या आघाड्या त्यांची पत्नी अगदी लीलया पेलायची.मुलाच्या वाढदिवसालाही ते कसेबसे पोहोचायचे.मुलगा लहान होता तोपर्यंत ठीक होत पण मोठा झाल्यावर आपल्या वडीलांची अशा प्रसंगी असलेली अनुपस्थिती त्याला बोचायची.यावरून बरेचदा त्याने वडीलांशी अबोलाही धरला होता: पण पवार साहेबांच्या लेखी अशा गोष्टीना फारसे महत्व नव्हते.कमालीचे वर्कहोलिक असलेले पवारसाहेब रिटायर झाल्यावर मात्र काहीच काम उरले नसल्याने कासावीस झाले.आत्तापर्यंतच्या आयुष्यात त्यांना कुणाचीच गरज भासली नव्हती.फारसे मित्रही त्यांना जोडता आले नव्हते.कुणा नातेवाईकाशीही त्यांची कधी जवळीक नव्हती आणि घरात त्यांचे नसणे तर कुटुंबीयांना अंगवळणीच पडलेले होते त्यामुळे आपल्या मोकळ्या वेळेचे आता करायचे काय हा प्रश्न पवार साहेबांसमोर आ वासून उभा होता. सुरुवातीचे काही दिवस त्यांनी घरात बसून काढले पण बसल्या बसल्या घरातल्या नको त्या गोष्टीतली त्यांची लुडबूड त्यांच्या पत्नीला त्रासदायक व्हायला लागली.बाहेर फिरायला जायला लागले तर एकटेच वेड्यासारखे तरी किती फिरणार? अवघ्या महिनाभरात ते रिटायर लाईफला कंटाळले.काम एके काम असे आयुष्य जगल्याने आपण आयुष्यात काय काय गमावले आहे याची आता त्यांना जाणीव झाली.आयुष्यात पैसा मिळवणे भरपूर काम करणे यालाच आपण आनंद मानत आलो.कुठलाही छंद जोपासला नाही,वर्तमानपत्रसुध्दा धडपणे वाचले नाही,बायकोमुलाबरोबर कधी कुठे फिरायला गेलो नाही.कधी निवांतपणे घरी टीव्ही सुध्दा बघितला नाही.अत्यंत एकसुरी आयुष्य जगलो याचा पवारसाहेबांना आता पश्चाताप होत होता;पण वेळ निघून गेली होती!
   आता मात्र पवार साहेबांनी स्वत:ला बदलायचं ठरवलं.जे झालं ते गेलं,एक नवी सुरुवात करायचा संकल्प केला.सोसायटीतल्या लोकांशी ते स्वत:हून बोलायला लागले.बायको व मुलाशी आपुलकीने बोलायला लागले.नातेवाईकाना भेटून त्यांच्याशी संवाद साधायला सुरुवात केली.कॉलेजात असताना ते कैरम व चेस खेळायचे.आता पुन्हा त्यांनी ते खेळ खेळायला सुरुवात केली.आयुष्यात जे जे करायचे राहून गेले आहे ते आता जमेल तसे करायचे असा त्यांनी संकल्प केला.आता पवार साहेब आनंदी जीवन जगत आहेत.
      बऱ्याच लोकांच असंच असतं....
      एका ठराविक वयानंतर माणसाला एका क्षणी असं वाटू लागतं की आजपर्यंत आपण जशा प्रकारे जगलो,जे काही केले वा करतो आहोत, ते सगळं निरर्थक आहे. जीवनातला अत्यंत महत्वाचा कालावधी आपण नको त्या गोष्टींमधे अडकून वाया घालवल्याची प्रखर जाणीव होते. अशावेळी आयुष्य अत्यंत निरस वाटायला लागतं, " का आणि कशासाठी एवढा अट्टाहास केला?" ही भावना मनात प्रबळ व्हायला लागते, आणि हाच तो क्षण असतो स्वत:ला सावरण्याचा, स्वत:ला समजावण्याचा-
     " अरे बाबा, ज्यात तू आनंद शोधत होतास, तेथे तो नाहीये!". हाच क्षण असतो स्वत:ला नव्याने ओळखण्याचा.
      ज्याला हे जमेल तो निश्चितच पुन्हा नवी सुरूवात करू शकतो! एकदा का हे जमायला लागलं ना की माणसाला कोणाच्याही बेगडी आधाराची गरज उरत नाही. आनंदी जीवनाच्या लाखो वाटा त्याच्या स्वागताला सज्ज असतात!
                                                                    .... प्रल्हाद दुधाळ.

No comments:

Post a Comment