Friday, September 8, 2017

नसतेस घरी तू जेंव्हा.......

       नसतेस घरी तू जेंव्हा.......

       तिची आणि माझी गाठ नियतीने बांधलेली होती म्हणूनच आम्ही दोघे एकमेकांच्या आयुष्यात आलो असेच म्हणावे लागेल! एकोणीसशे पंच्याऐशी साल होते,मी नोकरीला लागून चारेक वर्षे झाली होती.
  एक दिवस आमच्या साहेबांनी अचानक मला त्यांच्या केबीनमधे बोलावले.साहेबांकडे जाण्याचा माझा कधी संबंध आलेला नव्हता, त्यामुळे थोडा बिचकतच केबीनमधे मी प्रवेश केला.माझ्या आधी तेथे दोन वयस्कर गृहस्थ बसले होते.साहेबांनी त्यांची माझ्याशी ओळख करून दिली.नमस्कार वगैरे झाले.मी दोघांनाही ओळखत नव्हतो!
   झाले होते असे की, आता मी लग्न करणार असेल असे गृहीत धरून आमच्या साहेबांनी त्यातल्या एका गृहस्थाची मुलगी लग्नासाठी  मला सुचवली. साहेबांचे म्हणणे होते की मी त्या मुलीला पाहायचे आणि पसंती कळवावी.हा मला साहेबांनी दिलेला आदेशच होता! खरं तर तोपर्यंत मी माझ्या  लग्नाचा बिल्कूल विचार केलेला नव्हता.त्याची माझी स्वत:ची अशी काही  कारणेही होती.नुकतीच मी पंचविशी पार केलेले होती.अत्यंत प्रतिकूल परिस्थितीमधून माझा इथपर्यंतचा प्रवास झालेला होता.माझे वडील मी आठवीत असतानाच वारले होते आणि माझ्या आईने मोठ्या कष्टाने मला वाढवले होते.घरची थोडी शेती होती, ती सावकाराकडे गहाण पडलेली होती,ती सोडवायची होती.गावात एका खोपटात रहात होतो तेथे एखादी खोली बांधायची होती.भावांना मदत करायची होती .मी पुण्यात झोपडपट्टीत दहा बाय बाराच्या खोलीत एका  भावाच्या आसऱ्याला रहात होतो.एक सायकल आणि दोनचार  कपडयाचे गाठोडे, हीच काय ती माझी मालमत्ता होती! अशा परिस्थितीत मी लग्न करण्याचा विचार करणे अशक्यच होते, पण साहेबांनी आणलेले ते स्थळ तर बघावे लागणार होते! त्याना नाही कसे म्हणणार,नाही का?
  तर....नंतरच्या रविवारी एका जवळच्या मित्राला सोबत घेवून मी मुकूंदनगर भागात माझ्या आयुष्यातल्या पहिल्या मुलगी बघण्याच्या कार्यक्रमाला गेलो.मुलगी पाहिली ती मला शोभेल अशीहोती. राज्य सरकारी महामंडळात ती नोकरीला होती.त्यांचे घर म्हणजे एक सरकारी क्वार्टर होती.घरात फ्रीज,टीव्ही सारख्या सर्व सुखसुविधा होत्या.एकंदरीत ते उच्च मध्यमवर्गीय कुटूंब होते.त्यांच्यासमोर  मी सर्वच आघाड्यांवर अगदीच किरकोळ होतो.पोहे चहा घेतला, जुजबी प्रश्नोत्तरे झाली आणि तेथून बाहेर पडलो.मला  मुलगी पसंत जरी असली तरी आपल्यासारख्या फाटक्या माणसाला ही माणसे आपली मुलगी कशाला देतील ? मला तरी ते सर्व अशक्य कोटीतले वाटत होते! मी ते सर्व विसरून गप्प बसणे पसंत केले.
   आठ दहा दिवसातच आमच्या साहेबांनी परत केबीनमधे बोलावले.त्या मुलीचे वडील आणि आमच्या साहेबांचे मित्र असलेले ते दोघेजण पुन्हा माझ्याकडे आले होते. मी मुलगी बघून आलो पण त्यांना काहीच सांगितले नाही म्हणून साहेब माझ्यावर रागावले.मी शांतपणे ऐकून घेतले.मी साहेबांना व त्या दोघांना माझी सगळी परिस्थिती, माझ्यावर असलेल्या प्रचंड जबाबदाऱ्या, माझा तुटपुंजा पगार व मला पुढच्या आयुष्यात कसा खडतर प्रवास करावा लागणार आहे वगैरे अडचणी समजावून सांगितल्या.माझे बोलणे त्यानी अगदी शांतपणे ऐकून घेतले आणि मला सांगितले की "आम्ही तुमची सर्व माहिती आधीच काढली आहे तरीही तुमचे स्थळ आम्हाला पसंत आहे! तुम्हाला जर मुलगी पसंत असेल तर पुढचा विचार करू नका ती तुम्हाला आयुष्यभर साथ देईल.आज तुमच्याकडे काहीही नसले तरी तुम्ही कर्तुत्वाने मोठे होणार हे नक्की आहे!तुम्हा दोघांच्या पगारात तुम्ही सगळ्या जबाबदाऱ्या पार पाडाल!" माझा चांगला स्वभाव,माझा निर्व्यसनीपणा व काहीतरी करण्याची जिद्द व मुख्य म्हणजे सरकारी नोकरी या गोष्टी त्या लोकांसाठी महत्वाच्या होत्या! तरीही मला त्या मुलीशी माझ्या परिस्थिती बद्दल बोलणे मला आवश्यक वाटत होते म्हणून मी पुन्हा त्यांच्या घरी गेलो व मुलीशीही बोललो. तिनेही मला संपूर्ण साथ देण्याची तयारी दाखवली.तिचे म्हणणे होते की, आपण दोघे एकत्र येवून सगळे प्रश्न सोडवू!” नंतर मात्र मी थोडा गंभीरपणे विचार केला कदाचित नियतीने ही मला देवू केलेली संधी असू शकते.लवकरच दोन्हीकडील वडीलधाऱ्या लोकांच्या सल्ल्याने व आशीर्वादाने माझे लग्न ठरले!
   लग्न झाले आणि आम्ही वडगावशेरी येथे चाळीत एका मित्राच्या शेजारी एक सिंगल खोली भाड्याने घेवून संसार थाटला! सौं.स्मिताचे माझ्या आयुष्यात येणे हा माझ्या आयुष्यात खरोखर टर्निंग पॉईंट ठरला! माझे भाग्य घेऊन ती माझ्या घरी आली असेच मी म्हणेन,कारण त्यानंतर आम्ही एकमेकांना साथ देत सगळ्या जबाबदाऱ्या पार पाडल्या.गावाकडे एक छोटे घर बांधले.गहाण पडलेली शेती सोडवली. सिंगल रूम मधून डबल रूममधे व नंतर चारपाच वर्षातच स्वत:च्या फ्लॅटमधे रहायला गेलो.खात्याअंतर्गत परिक्षा दिल्या व त्यात उतीर्ण होत होत टेलिफोनऑपरेटर या पदावरून आधी टेलिफोन इंस्पेक्टर नंतर कनिष्ठ दुरसंचार अधिकारी व पुढे उपमंडल अभियंता पदापर्यंत पोहोचलो.गरजू नातेवाईकांना आर्थिक मदत करून आपल्याबरोबर त्यांचीही प्रगती कशी होईल हे पाहीले. हे सर्व मी पुढे होवून करत असताना माझी अर्धांगिनी ठामपणे माझी सावली म्हणून माझ्यामागे उभी होती.इथे एक गोष्ट नमुद कराविशी वाटते की,आर्थिक बाबतीत घेतलेल्या एकाही निर्णयावर अगदी एकदाही आमच्यात वाद झाला नाही! माझ्या प्रत्येक निर्णयात ती समर्थपणे माझ्याबरोबर होती. यश जसे वाटून घेत होतो तसेच अपयशही वाटून घेतले.एकुलत्या एक मुलाच्या इंजिनीअर होईपर्यंतच्या सगळ्या परिक्षांच्या वेळी ऑफिसातून रजा घेवून ती त्याला सपोर्ट करत होती.माझे कामाचे स्वरूप असे होते की मला घरी लक्ष देणे अवघड व्हायचे,परंतु या गोष्टीवरून आमच्यात कधीच वाद झाला नाही.प्रत्येक बाबतीत आम्ही चर्चा करून निर्णय घेतले आणि यशाची एक एक पायरी चढत राहीलो. एकमेकांना साथ देताना माणूस म्हणून कधी कधी काही गोष्टींचा त्याग करावा लागतो,तडजोडी कराव्या लागतात.तशा तडजोडी आम्हालाही खूप वेळा कराव्या लागल्या पण त्यावर तोंड वाकडे करण्यापेक्षा त्या गोष्टीमधले आव्हान स्वीकारून त्यातला आनंद घेण्यावर आम्हा दोघांचा भर असायचा,आपण जे करतोय ते आपल्या परिवारासाठी करतोय आणि परिवाराचा आनंद तोच आपला आनंद या एकाच ध्यासाने तिने मला व मी तिला साथ देत राहिलो.एवढे मोठे मन असलेली बायको मिळणे ही माझ्यासाठी खरचं भाग्याची गोष्ट होती.माहेर पुण्यातच असल्यामुळे क्वचितच एकमेकांना सोडून आम्ही राहिलो त्यामुळेच “नसतेस घरी तू जेंव्हा ....” हा अनुभव फारसा घेतला नाही पण आयुष्याच्या एका टप्प्यावर आल्यावर मात्र कधीतरी मनात विचार येतोच ....
तुला वजा केल्यावर....
उमजत नाही,समजत नाही,
असेल कसा तो भविष्यकाळ?
पुढ्यात काय असेल वाढलेले,
तुटली जर वर्तमानाशी नाळ?
अजुनही होते हे मन कातर,
आठवता भेट पहिली वहिली!
 
सात जन्माच्या शपथा हळव्या,
 
झालेली वाट एक ही आपुली!
 
संसारवेल बहरली फुललेली,
अन स्वप्ने सगळी साकारलेली!
आठवते आयुष्याच्या सायंकाळी,
सुखदु:खातली वाट चाललेली!
भयभीत मी, होईल काय माझे,
अर्ध्यावरती साथ सुटल्यावर?
असेल कसले जीवन सखये,
माझ्यातुन तुला वजा केल्यावर?
       
                   ....प्रल्हाद दुधाळ.
                     (९४२३०१२०२०)

                पूर्वप्रसिद्धी - महाराष्ट्र टाईम्स ५ नोव्हे २०१६ 

No comments:

Post a Comment