Monday, September 18, 2017

गोष्ट स्वप्नपुर्तीची....

गोष्ट स्वप्नपुर्तीची....
गोष्ट एकोणीसशे शहात्तर सालातली आहे,नुकताच मी शालांत परीक्षा उतीर्ण झालो होतो. त्या काळी आमच्या गावाच्या जवळपास कोठेही पुढच्या शिक्षणाची सोय नव्हती,त्यामुळे यापुढे शिक्षणासाठी पुण्याला जायचं आणि किमान इंजीनारिंगची पदवी वा पदविका घ्यायची असे स्वप्न मी पहात होतो!
घरची आर्थिक परिस्थिती अत्यंत हलाखीची होती त्यामुळे हे स्वप्न कितीही आकर्षक वाटत असले तरी कुणाचेतरी आर्थिक पाठबळ व मानसिक आधार मिळाला तरच प्रत्यक्षात येणार होते! त्याकाळी आजच्यासारखी उदंड खाजगी कॉलेजेस नव्हती.पदवी अथवा पदविकेसाठी शासकीय संस्थेमधेच प्रवेश मिळवायला लागायचा आणि ते तेव्हढे सोपे नव्हते.पदविकेसाठी प्रवेशसंख्या अत्यंत मर्यादित असायची. मला कसेही करून इंजिनिअरिंग पदविकेला प्रवेश मिळवायचा होता. मी इकडून तिकडून माहिती गोळा केली आणि शासकीय तंत्रनिकेतन मध्ये प्रवेशासाठी अर्ज केला.मला शालांत परीक्षेला चांगले मार्क्स होते त्यामुळे पदविकेला प्रवेश मिळायची खात्री वाटत होती.प्रवेशाची यादी लागायला बरेच दिवस अवधी होता त्यामुळे अर्ज करून मी परत गावाला गेलो.साधारण एकदीड महिना गेला तरी प्रवेशासंबंधी काहीच समजले नाही.गावात टेलिफोनची सुविधाही नव्हती.प्रवेशासंबंधात पोस्टाने कळविले जाईल असे अर्ज स्वीकारताना मला सांगण्यात आले होते,त्यामुळे दररोज नेमाने पोस्टमनकडे चोकशी करत होतो.चोकशीसाठी प्रत्यक्ष पुण्याला जाणे आर्थिक कारणाने शक्य नव्हते.
त्या वर्षी जुलै महिन्यात प्रचंड पाऊस पडत होता.सगळ्या ओढ्यांनाल्यांना पूर आलेला होता, रस्ते वाहून गेले होते.गावाकडे येणारी एस.टी.ची बसही चारपाच दिवस गावाकडे फिरकली नव्हती! आठवडाभरानंतर एकदाचा पाऊस थांबला.
एक दिवस पोस्टमनने शासकीय तंत्रनिकेतनकडून आलेले पत्र घरी दिले,नेमका त्या दिवशी मी अकरावीच्या प्रवेशासाठी विसेक किलोमीटर अंतरावरच्या दुसऱ्या गावाला गेलो होतो. त्या दिवशी मी तिकडेच बहिणीच्या घरी मुक्काम केला.तिसऱ्या दिवशी परत घरी आल्यावर मला ते पत्र मिळाले.माझा आनंद गगनात मावत नव्हता!
शासकीय तंत्रानिकेतनकडून माझ्या प्रवेशासंबधीचे ते पत्र होते!
मी घाईघाईने पत्र उघडले,माझ्या पदविका प्रवेशासाठीचा तो “चान्स कॉल'' होता!
मी ते पत्र पुन्हा नीट वाचले.पत्रातील मजकुराप्रमाणे दिलेल्या तारखेच्या आत मी प्रवेशासाठी संपर्क साधायचा होता,तसेच प्रवेश फी भरून प्रवेशाचे इत्तर सोपस्कार पूर्ण करायचे होते.पुढे एक सूचनाही दिलेली होती की दिलेल्या वेळेत हे सोपस्कार पूर्ण न केल्यास माझ्याऐवजी माझ्यानंतर वेटिंग लिस्टमधील पुढच्या विद्यार्थ्याला प्रवेश दिला जाणार होता! पत्रावरची तारीख पुन्हा पाहिली आणि मला रडूच कोसळलं! प्रवेशाचे सर्व सोपस्कार पूर्ण करण्याची शेवटची तारीख उलटून वर एक आठवडा झाला होता!
माझ इंजिनिअर व्हायचं स्वप्न धुळीला मिळालं होते!
आयुष्यातली एक अत्यंत अनमोल अशी संधी हुकली होती! थोड्याच वेळात मी स्वत:ला सावरले, कारण रडून काहीच उपयोग नव्हता.
याबाबतीत मदत वा मार्गदर्शन करेल असे कुणीही ओळखीचे नव्हते.मुळात त्याकाळी अख्ख्या गावातून दोनतीन लोकच पदवीपर्यंत शिकले होते आणि ते सगळेजण शहरात रहात होते.
मला खूप वाईट वाटत होते,कारण त्या काळी इंजीनारिंग पदविकाधारकाला शासकीय व खाजगी क्षेत्रात भरमसाठ संधी उपलब्ध होत्या! पण आता विचार करून फायदा नव्हता.
पुढे काहीतरी करणे भाग होते.
नातेवाईकांचा आधार घेवून शेजारच्या गावी अकरावीला प्रवेश घेतला.अकरावी झाली, नंतर बारावीसाठी अजून दुसऱ्या गावाला गेलो. कसाबसा बारावी पास झालो.
पुढे पुण्यात बी एस्सीला प्रवेश घेतला.दुसऱ्या वर्षात शिकत असतानाच टेलिफोन खात्यात नोकरी लागली. मग नोकरी करता करता पदवी मिळवली.खात्याअंतर्गत प्रमोशनसाठी घेतल्या जाणाऱ्या स्पर्धापरीक्षा देत देत एकदाचा “इंजिनिअर” झालो.
आपण इंजिनिअर व्हायचं हे माझे स्वप्न उशिरा का होईना पण आता साकार झाले होते!
आता माझ्या ऑफीसच्या केबिनबाहेर लावलेल्या पाटीवरच्या नावासमोर ‘उपविभागीय अभियंता’ हे पद लावत असलो तरी असे पुन्हा पुन्हा वाटत रहाते की त्यावेळी ‘ती’ संधी जर साधता आली असती तर आयुष्यात अजून खूप मोठा पल्ला गाठता आला असता!
आजच्या अभियंता दिनाच्या सर्व क्षेत्रातल्या अभियंत्यांना खूप खूप शुभेच्छा!
. ....प्रल्हाद दुधाळ.पुणे (९४२३०१२०२०)

No comments:

Post a Comment