Monday, November 21, 2016

भुताटकी.

भुताटकी.

       ते १९८३ साल होते.टेलिफोन खात्यात त्या काळी टेलिफोन ऑपरेटर म्हणून मी नोकरी करत होतो.वेगवेगळ्या शिफ्टमधे ड्युटी करावी लागायची.मी नोकरी करून शिकतही होतो त्यामुळे जास्त करून दुपारची किंवा रात्रीची शिफ्ट करायचो.त्या काळी आजच्या सारखी एसटीडी वा मोबाईलची सोय नव्हती त्यामुळे ट्रंककॉलचे बुकिंग करूनच बाहेरगावी बोलायला लागायचे आणि हे ट्रंक टेलिफोन एक्स्चेंज मी जेथे काम करायचो त्याच बिल्डिंगमध्ये होते.विशेष म्हणजे या ट्रंकएक्स्चेंजमधे सगळ्या शिफ्टमध्ये फक्त लेडीज टेलिफोन ऑपरेटर्सच काम करायच्या.रात्रंदिवस तेथे ट्रंककॉल लावून द्यायचे काम चालू असायचे.रात्री बारा वाजता ड्युटी संपणाऱ्या लेडीजसाठी त्याच बिल्डींगमधे रात्री झोपण्याची सोय केलेली होती.रात्री बारानंतरसुध्दा सुमारे शंभरेक लेडीज तेथे काम करायच्या.

       एक दिवस आवई उठली की या ट्रंक एक्स्चेंजमधील मागच्या बाजूला रात्रीच्या वेळेस भूत दिसले!त्या रात्री ड्युटीवर असलेल्या दोनतीन लेडीजना ते भूत दिसले होते आणि भूत बघून त्या एवढ्या घाबरल्या की त्यातली एक तापाने आजारी पडली.बाकीच्या “आम्ही आता नाईट ड्युटी करणारच नाही” असे म्हणू लागल्या.दुसऱ्या दिवशीही भूत दिसल्याचे अजून काही लेडीज सांगायला लागल्या त्याही खूप घाबरलेल्या होत्या. आठवडाभरात या भूताच्या अफवेने स्टाफमधे घबराट पसरली.ज्यांना नाईट ड्युटी लागेल त्या लेडीज कामावर गैरहजर राहू लागल्या.रात्रीच्या ट्रंककॉल्सवर याचा परिणाम व्हायला लागला.”भूतबीत काही नसते!” असे एरवी छातीठोकपणे सांगणाऱ्या अनेक लेडीज घाबरून नाईट ड्युटीपासून लांब पळायला लागल्या.दिवसेंदिवस हे प्रमाण वाढत राहिले. रात्रंदिवस तेथे कडक सिक्युरिटी व्यवस्था असूनही नाईट ड्युटी करायला कुणी तयार होत नव्हते.

“रात्री साडेबाराच्या सुमारास एक प्रचंड मोठी सावली मागच्या कायमच्या बंद असलेल्या खिडक्यांच्या दुधी काचांवरून पुढे पुढे सरकत जाते,ती सावली एवढी मोठी असते,की एक्स्चेंजमधे काम करणाऱ्या लेडीजची घाबरून घाबरगुंडी उडायची.आपले काम सोडून त्या दुसऱ्या खोलीत निघून जायच्या.रात्र रात्र थरथरत बसून राहायच्या.मागच्या बाजूला एक जुना पारशी माणसाचा बंगला होता.त्या बंगल्यात कित्येक वर्षापासून कुणी रहात नव्हते.त्या बंगल्यात भुताटकी आहे अशी चर्चा आधीपासून होत होतीच आणि सध्या रात्री दिसणाऱ्या या कथित भूतामुळे तर त्या भुताटकीच्या चर्चेला अजूनच घबराटीचे स्वरूप आले होते. एक्स्चेंजच्या वरिष्ठ अधिकाऱ्यांनी स्टाफला “असे काही नसते” हे समजावण्याचा प्रयत्न केला; पण स्टाफ ऐकायच्या मनस्थितीत नव्हता.

”ही भुताटकी बंद झाल्याशिवाय आम्ही कुणीही नाईट ड्युटी करणार नाही असे लेडीज म्हणू लागल्या.रात्रीच्या वेळचे अर्जंट व लायटनिंग ट्रंककॉलसुध्दा लागणे बंद झाले. या बद्दलच्या तक्रारी दिल्लीपर्यंत वरिष्ठ अधिकाऱ्यांपर्यंत पोहोचल्या.

शेवटी असे ठरले की रात्री चार पाच पुरूष कर्मचारी ट्रंकएक्स्चेंजमधे थांबून तथाकथीत भुताटकीची खातरजमा करतील व रिपोर्ट देतील.

दुसऱ्याच रात्री या भुताटकीची खातरजमा करायचे ठरले.मीसुध्दा त्या गृपमधे थांबलो.रात्री बारा वाजले आणि आम्ही त्या खिडक्यांकडे नजर लाऊन बसलो. तसे आम्हीही थोडे घाबरलेलो होतो; पण उसने अवसान आणून त्या भुताची वाट पहात होतो.रात्रीचे साडेबारा होवून गेले तरी भूत काही आले नाही.आता आम्ही त्या घाबरणाऱ्या बायकांची आपापसात चर्चा व टिंगलटवाळी करायला लागलो.

”भुताटकी वगैरे काही नसते.मनाचे खेळ असतात,त्या बायकाना नाईट ड्युटी नको म्हणून बहाणा करत असतील!” 
"नाटक करताहेत",अशी टवाळी करू लागलो.रात्रीचा एक वाजला आणि अचानक प्रचंड मोठी सावली एका खिडकीच्या काचेवर दिसली! या खिडक्या उघडणाऱ्या नव्हत्या त्यामुळे कसली सावली आहे ते बघणेही शक्य नव्हते.हळूहळू ती सावली पुढे पुढे सरकायला लागली,आता ती पुढच्या खिडकीवर दिसायला लागली.मोठ्ठे केस पिंजारलेले डोके त्या सावलीत दिसत होते! आता मात्र आमच्यातले एकदोघे घाबरले होते.मागच्या बाजूला जाणे लगेच शक्य नव्हते.पुढच्या रस्त्यावर जावून बिल्डिंगला वळसा घालायचे आम्ही ठरवले आणि अंधारात तसे गेलोही; पण त्या पडीक बंगल्याच्या आवारात प्रचंड गवत वाढलेले होते आणि माणसांचा वावर नसलेल्या त्या बंगल्यात जायचे आम्हाला डेअरिंगही झाले नाही त्यामुळे आम्ही परत आलो.आत असलेले आमचे साथीदार प्रचंड घाबरलेले होते. त्यांचे म्हणणे होते की ती प्रचंड सावली सगळ्या दाही खिडक्यांवर नंतर दिसून दिसेनाशी झाली.त्या दिवशीची मोहीम अर्धवट सोडून आम्ही निघून गेलो. दुसऱ्या दिवशीही खात्री करायची असे ठरवले गेले त्यासाठी वरिष्ठांच्या परवानगीने एका खिडकीची काच थोडी फोडायचे ठरले.दुसऱ्या दिवशी जेथून नीट दिसेल अशा ठिकाणच्या खिडकीच्या काचेचा खालचा कोपरा आम्ही फोडला. दिवसा उजेडी मागच्या बंगल्याचे निरीक्षण केले व कुठल्या बाजूने बंगल्याच्या परिसरात शिरता येईल याचाही अंदाज घेतला.त्या रात्री अजून दोघेजण आमच्यात सामील झाले आज हे भूत बघायचेच असे आम्ही ठरवले होते! 

दुसऱ्या रात्री आम्ही रात्रभर त्या खिडक्यांकडे बघत बसलो; पण भूत आलेच नाही! काल जे पाहिले ते खरे की आज?, आम्ही सगळे चांगलेच बुचकळ्यात पडलो होतो.रात्रभर जागरण झाले होते.तिसऱ्या दिवशी परत प्रयत्न करू असे ठरवून आम्ही आपपल्या घरी गेलो.

तिसऱ्या रात्री पुन्हा आम्ही भूतासाठी सापळा लावला.रात्री एकच्या सुमाराला पहिल्या खिडकीवर ती अजस्र सावली पडली आणि आम्ही सावध झालो.एकजण फुटलेल्या काचेतून बाहेर बघत होता पण त्याला पहिल्या खिडकीच्या समोरचा भाग दिसत नव्हता.ती सावली हळूहळू पुढे सरकायला लागली साधारण चवथ्या खिडकीवर आल्यावर ती सावली आली आणि फुटलेल्या काचेसमोर असलेला आमचा सहकारी अचानक खो खो हसायला लागला.त्याने दुसऱ्या सहकाऱ्याला त्या अरुंद फटीतून पहायला सांगितले त्याने बाहेर बघितले आणि तोही हसायला लागला.एकेक करून आम्ही सर्वांनीच ते बाहेरचे दृश्य पाहिले आणि पोट धरधरून सगळेजण हसायला लागलो कारण भूत भूत म्हणून सगळे ज्या सावलीला घाबरत होते ती एका वेडसर दिसणाऱ्या बाईची सावली होती! एरवी ही बाई पुणे स्टेशनवर कायम फिरत असलेली प्रत्येकाने पाहिलेली होती! केस पिंजारलेली, अंगावरच्या कपड्याचे भान नसलेली व कायम काही ना काही बडबडत हातवारे करत ती तिथे फिरत असायची!

आम्ही लगेच त्या बंगल्याकडे गेलो.आम्ही बंगल्यात भूत येते असे समजत होतो मात्र सत्य वेगळेच होते.त्या पारश्याच्या बंगल्याच्या कंपाऊंडला लागून एक पायवाट होती त्या पायवाटेवर लोक कचरा टाकायचे तिथे कचऱ्यात टाकलेले अन्न खायला ही बिचारी वेडी बाई तिथे येत असावी,कारण आम्ही गेलो तर ती त्या कचऱ्यात पडलेले अन्न अधाशा सारखी वेचून खात होती! ती जेंव्हा कधी इकडे यायची तेंव्हा पलीकडे असलेल्या पुना क्लब ग्राउंडवर लावलेल्या प्रखर दिव्यांमुळे तिची सावली ट्रंक एक्स्चेंजच्या खिडकीवर पडायची ती जसजशी पुढे पुढे जायची तिची मोठी मोठी होत जाणारी सावली पुढच्या खिडक्यांवर पडायची आणि आतल्या काम करणाऱ्या बायकांसाठी ती भुताटकी ठरत होती!

सगळ्या गोष्टी समजल्यानंतर मात्र त्या गोष्टीवरून त्या घाबरणाऱ्या स्टाफची बरेच दिवस बाकीचा स्टाफ टिंगल करायचा! 
............... @.प्रल्हाद दुधाळ.

No comments:

Post a Comment