Tuesday, February 9, 2016

फजिती

माझीही एक फजिती ....
अनेक कुबेरानी आपल्या फजितीचे प्रसंग लिहिले आहेत.मी सुध्दा माझ्या जीवनातील असा एखादा प्रसंग लिहावा म्हणून आठवू लागलो.संत कबीर आपल्या एका दोह्यात म्हणतात ....
ऐसे जगह बैठिये कोई ना बोले उठ,
ऐसी बात कहिये कोई ना बोले झुठ .
आयुष्यभर या शिकवणी प्रमाणे जगत आल्यामुळे सहसा फजितीचे प्रसंग वाट्याला फारसे आले नाहीत.तरीही अगदी शालेय वयातला एक प्रसंग आठवला ज्या प्रसंगी चांगलीच फजिती झाली होती ....तर  तोच प्रसंग सांगतो.
     मी सातवीत असतानाची गोष्ट आहे, त्या वर्षी प्रचंड दुष्काळ पडला होता .मी गावातल्या प्राथमिक शाळेत शिकत होतो.त्या काळी  बोर्डाची पी एस सी परिक्षा सातवीला असताना द्यावी लागायची .हे खुप महत्वाचे वर्ष मानले जायचे.शाळेचा रिझल्ट चांगला लागायला हवा म्हणून शिक्षक भरपूर अभ्यास करून घेत असत.शाळेत रात्री विद्यार्थ्याना  थांबवून अभ्यास घेतला जायचा .गावात त्या काळी दर अमावास्येच्या दिवशी ग्रामदेवता भैरवनाथाच्या मंदिरात गावजेवण(भंडारा)दिले जात असे.त्यावेळी विजेची सोय नव्हती,त्यामुळे रात्री अभ्यासासाठी आम्ही शाळेतच राहून कंदिलाच्या प्रकाशात अभ्यास करत असू.शाळेची एकदम कडक शिस्त होती.गावातच राहणारे अत्यंत मारकुटे तसेच यामुळेच  विद्यार्थ्यांमध्ये प्रचंड दहशत असलेले गुरुजी शाळेचे मुख्याध्यापक होते.त्यांचा नियम होता की काहीही कारण असले तरी रात्री आठ वाजल्यानंतर कुणीही शाळेच्या बाहेर पडायचे नाही.आमची शाळा गावातल्या पेशवेकालीन वाड्यात भरायची. तर झाले काय की,अशाच एका अमावस्ये ला आम्ही मुलांनी मंदिरातल्या भंडाऱ्याच्या जेवणावळीत  जावून जेवायचे ठरवले. कुणाच्याही नकळत गुपचूपपणे आम्ही मंदिरात गेलो व मान खाली घालून भंडार्याच्या  पंक्तीत बसलो.समोरच्या पत्रावळीवर  कुणीतरी लापशी वाढली, भराभर जेवायचे होते त्यामुळे  हातात घास घेतला  अचानक समोर लक्ष गेले आणि समोरच्या व्यक्तीला पाहून हादरलोच!
           शाळेचे मुख्याध्यापकच पंक्तीत लापशी वाढत होते! त्यांची एवढी  प्रचंड दहशत होती की आम्ही जेवायचे सोडून  शाळेकडे धूम ठोकली! आता आपली काही धडगत नाही,शाळेतून आपल्याला काढून टाकणार या भीतीपोटी पुढचे तीन दिवस शाळेच्या वेळेत घरातून निघत होतो,पण शाळेला गेलोच नाही! आता शाळा कायमसाठी सोडायची व शेतातच काम करायचे असं मनाशी पक्क ठरवूनही टाकले!
  स्वत: मुख्याध्यापक चौथ्या दिवशी जातीने घरी आले व समजूत घातली तेंव्हा कुठे शाळेवर उपकार केल्याच्या अविर्भावात अस्मादिक शाळेत गेले! त्यावर्षी सातवीच्या (त्यावेळची पी.एस.सी.)परीक्षेत केंद्रात पहिला आलो आणि शेतमजूर होता होता वाचलो!!!!
  आजही झालेल्या फजितीचा  तो  प्रसंग आठवतो तेंव्हा अजाण वयातल्या त्या वेडेपणाचे हसू येते!
.....प्रल्हाद दुधाळ. पुणे. (९४२३०१२०२०)

No comments:

Post a Comment