Thursday, January 28, 2016

पानमळा ....स्मृतीमधला.

    पुर्वी माझ्या गावी पानमळ्याची शेती केली जायची.अत्यंत मेहनत व कुशल मनुष्यबळ लागणारे हे पीक होते.एकदा या नागवेली लावल्या की कमीत कमी सहा सात वर्षे फक्त या नागवेलींची काळजी घ्यायची.या मळ्यात सतत काही ना काही काम करावे लागायचे.प्रत्येक भागात वेगळी पध्दत असू शकते; पण आमच्याकडे जे पानमळे असायचे, त्यासाठी अत्यंत सुबक असे वाफे तयार केले जायचे .या वाफ्यांच्या कडेकडेने प्रथम शेवरीचे बी लावले जायचे, त्या बरोबरच पांगारा व शेवगाही मधेमधे लावत असत.मधे मोजकी पपयीची झाडे तसेच केळीसुध्दा लावत.नागवेलीच्या वेलीना वाढ झाल्यावर बिल्कूल उन्हाचा चटका लागू नये म्हणून ही तजवीज केलेली असायची . या बरोबरच पूर्ण मळ्याभोवती वाऱ्यापासून संरक्षणासाठी गवताच्या किंवा वैरणीच्या ताट्यांचे कुंपण केले जायचे . शेवरीची ही झाडे थोडी मोठी झाली की नागवेलीचे छोटे छोटे वेल आणून प्रत्येक शेवरीच्या झाडासोबत समान अंतरावर नागवेल लागवड व्हायची.या पानमळ्याला दर तिसर्या - चवथ्या दिवशी पाणी द्यावे लागायचे. प्रत्येक वाफ्यात काळजीपूर्वक ठराविक पाणी द्यावे लागायचे .एकदा वेल वाढायला सुरू झाले की हे वेल शेवरीच्या झाडाला वाळलेल्या लव्हाळ्याच्या पाण्यात भिजवलेल्या काडीने, जी अगदी सुतळी सारखी वापरता यायची,बांधायचे. साधारणपणे दर चार पाच इंच अंतरावर अशा प्रकारे वेल बांधला जायचा.हे बांधणीचे कामही अत्यंत कौशल्याचे असायचे.नागवेल हळू हळू वाढत जायची. या वेलाना वेळेत पाणी देणे व बांधणी करणे या गोष्टी करत राहीले की वेल अगदी जोमाने वाढायचा. या वेलींवर गर्द हिरवीगार व आकाराने तळहाताएवढी पाने यायची .पानाची ठराविक प्रत  व  रंग तयार झाला की पानांची खुडणी चालू व्हायची.यासाठी तयार केलेली स्पेशल पत्र्याची नखे मिळायची.ही नखे आपल्या हाताच्या नखावर लावून नाजुकपणे पानांची खुडणी केली जायची.पानांच्या प्रती प्रमाणे त्यांची नावे असायची . मला आठवणारे प्रकार म्हणजे कळीची पाने ,जुनवाण पाने ,गबाळ पाने .त्यातल्या कळीच्या पानाला मंडईत चांगला भाव मिळायचा.पानाची खुडणीचे कौशल्यपूर्ण काम  बघण्यासारखे असायचे .दोन हातात पत्र्याची नखे लावून अत्यंत सफाईने एक एक पान खुडायचे ते तसेच हातात ठेवून पुढचे पान खुडायचे.खुडणी करता करता पानांची संख्या व साईझ यावर लक्ष ठेवले जायचे.न मोजता हातात मावेल एवढ्या पानांच्या गठ्ठ्यावरून एक एक शेकडा पाने एका रेषेत लावून केळीच्या पानावर हारीने मांडून ठेवली जायची.हे काम अत्यंत वेगाने व्हायचे .खुडणी करणार्या लोकांच्या हातातले हे कसब अगदी पहाण्यासारखे असायचे.पाचशे पानांच्या एकत्र गठ्ठ्याला कवळी म्हणायचे.ही पाने अत्यंत कौशल्याने केळीच्या ओल्या खुंटाचे व पानांचे  कव्हर करून गोल पॅकिंग करायचे ते पार्सलही पहात रहावे असे असायचे.
(अशा पाच हजार पानांच्या पार्सलला एक विशिष्ट नाव होते ते मला आता आठवत नाही.)पहिल्या खुडणीच्या अशा पार्सल ची बैलगाडीतून गावात ढोल वाजवत मिरवणूक काढली जायची.
हा माल पुणे मुंबईच्या दलालाकडे विकला जायचा.वर्षभर अशी वेगवेगळ्या प्रतीच्या पानाची खुडणी व पाठवणी झाल्यावर साधारणपणे एप्रिल मे महिन्यात वेल रिकामे व्हायचे मग उतरणीचे काम व्हायचे .उतरण म्हणजे शेवरीच्या झाडाना बांधलेले वेल सोडवायचे व वाफ्यात सलग चर खोदून एका विशिष्ठ पध्दतीने गोल करून फक्त वरचा शेंडा वर ठेवून मातीत काळजीपुर्वक पुरायचे.पुन्हा पाण्याची आवर्तणे द्यायची वेल वाढले की बांधणी पाने आली की प्रतावारी प्रमाणे खुडणी असे वर्षभराचे रूटीन करायचे .गावात जवळ जवळ प्रत्येकाच्या शेतात थोड्या क्षेत्रात का होईना हा पानमळा असायचाच .कालपरत्वे पुढच्या पिढ्यांकडे हे पानमळा शेतीचे कौशल्य आले नाही.एकूणच हे अतिकष्ट व कौशल्य लागणारे पीक घेणे बंद झाले आणि वीर परिंचे परिसरातील आमच्या गावचे चविष्ट पान व ते पिकवणारे हिरवेगार व बारमहा थंड सावली देणारे पानमळे व ते पिकविणारे ते हात इतिहासजमा झाले!
आज गावातल्या नव्या पिढीला कधीकाळी इकडे पानाची शेती केली जायची हे माहीत सुध्दा नसेल ....
..... प्रल्हाद दुधाळ.

No comments:

Post a Comment