Tuesday, February 23, 2016

साहित्याचा जनमानसावर परिणाम ...

साहित्याचा जनमानसावर परिणाम ...
साहित्य जागृत मानवी संस्कृतीचा आरसा आहे.बरेच लोक असे म्हणतात की आजकाल वाचनसंस्कृती लोप पावली आहे,आजची पिढी पुस्तके वाचत नाही.पण नुकत्याच झालेल्या मराठी साहित्य सम्मेलनातील पुस्तक विक्रीचा आकडा पाहिला तर वाचन संस्कृती कमी झाली आहे असे मत चुकीचे ठरते. आजच्या साहित्याचे स्वरूप बदलले आहे. फक्त छापील कथा,कादंबरी अथवा कवितांची वा इत्तर पुस्तके म्हणजे साहित्य ही व्याख्या आता बदलली आहे. कालानुरूप वर्तमानपत्रे, टीव्ही, इंटरनेट साइट्स, ब्लॉग्ज , ई बुक्स वा सोशल मीडिया अशा माध्यमातून विविध प्रकारचे साहित्य मोठया प्रमाणात लिहिले जाते आहे आणि त्याच प्रमाणात ते वाचलेही जाते आहे. इथे आपण चर्चा करतो आहे ती अशा वेगवेगळ्या प्रकारच्या साहित्याचा समाजावर काय परिणाम होतो याची!
माझ्या मते जनमानसावर साहित्याचा निश्चितच प्रभाव पडतो. पुस्तके समाज मनावर कसा परिणाम करू शकतात याची काही उदाहरणे मुद्दाम सांगावीशी वाटतात.विश्वास पाटील यांची लासलगावच्या कांदा व्यवहारावर लिहिलेली ‘पांगिरा’ कादंबरी किवा निवृत्त पोलीस अधिकारी अभिमन्यू सूर्यवंशी यांनी लिहिलेले ‘कुण्या एकाची धरणगाथा’ या पुस्तकाने तत्कालीन समाजाला अस्वस्थ केले होते.'रिडल्स'सारख्या पुस्तकाने समाजात स्फोटक परिस्थिती निर्माण केली. ’घाशीराम कोतवाल’ ,‘सखाराम’ व ' संतसुर्य तुकाराम' वा इत्तर काही धार्मिक पुस्तकानी निर्माण केलेले वादविवाद तर सुपरिचित आहेत.
समाजमनाला व्यापून टाकणारे साहित्य संत ज्ञानेश्वर,संत तुकाराम,संत नामदेव इत्यादि वारकरी संप्रदायातील संतानी लिहिले.संत साहित्याच्या वाचन वा श्रवणाने प्रचंड प्रमाणात समाज जागृती झाली. संत साहित्याने स्वातंत्र्य,समता,बंधुता,सहकार्य,शुद्धभाव,समान संधी,श्रद्धा,ध्येय,देव,वैराग्य,भक्ति आणि युक्ती, शिस्त व एकता अश्या विषयांवरील मार्गदर्शक तत्वे आपल्या अभंग-ओव्यातून सांगून,राष्ट्रधर्माची व भागवत धर्माची ध्वजा सतत फ़डकत ठेवली.जनजागृती केली व समाजाचे ऐक्य वाढवले.
पेशवाईकाळानंतर तत्कालीन समाजात जातिभेद,अंधश्रध्दा व कर्मकांडे वाढली होती.अनिष्ट प्रथा,अघोरी उपाय,जादुटोणा,गंडादोरा यांचे स्तोम नको इतके माजले होते.महात्मा जोतिबा फ़ुलें,महर्षी कर्वे व इत्तर काही समाज सुधारकानी आपल्या साहित्यातून अनिष्ट रुढीपरंपराना हादरे दिले. त्याचा निश्चित असा परिणाम समाजावर झाला.त्यानी केलेल्या शिक्षणप्रसाराने समाजात क्रांती झाली.पुढे बाबासाहेब आंबेडकर यांच्या साहित्याने दलित शोषित समाजामधे मोठया प्रमाणात समाजप्रबोधन केले.अशा वंचित समाजापर्यंत शिक्षण व सामाजिक अधिकार पोहोचले.
परकीय सत्तेच्या जोखडातून भारताला मुक्त करण्यात साहित्याचा सिंहाचा वाटा आहे. लो.टिळक, आगरकर, म.गांधी इत्यादि महापुरूषानी आपल्या वृत्तपत्रीय अग्रलेखातुन व इत्तर लिखाणातून ब्रिटीश साम्राज्याच्या विरोधात जनजागृती केली.साम्राज्याविरूध्द असंतोष जनतेत पसरला व स्वातंत्र्य लढा उभा राहीला.भारत दीडशे वर्षाच्या गुलामीतून मुक्त झाला.
आजच्या काळातही साहित्याचे तेवढेच महत्व आहे. ई-माध्यमामुळे तर हे महत्त्व अजूनच अधोरेखित झाले आहे.फेसबुक,वाट्सॲप च्या माध्यमातून आता सामान्य माणसाला व्यक्त होण्यासाठी एक प्रभावी हत्यार मिळाले आहे. हे दुधारी शस्र हातात आल्यामुळे त्याचे काही घातक परिणामही समाजाला भोगावे लागत आहेत.सत्ताधारी अशा माध्यमाला टरकून रहात आहेत तर समाज मोठया प्रमाणात व्यक्त होत आहे. आधुनिक साहित्याची समाजमनावरची ही वाढती पकड़ काही मर्यादा राखून स्वागतार्हच आहे.
तात्पर्य :-साहित्य जनमानसावर निश्चितपणे चांगला अथवा विपरीत परिणाम घडवू शकते

No comments:

Post a Comment