Thursday, March 19, 2015

आशा निराशा

आशा निराशा
       अस म्हणतात की माणूस आशेवर जगत असतो.आजचा दिवस जरी कसाही असला तरी उद्या उगवणारा दिवस आजच्यापेक्षा निश्चितच बरा असणार आहे असा विचार करत माणूस आपली मार्गक्रमणा करत असतो. माणसाच्या आयुष्यभर हा आशा आणि निराशेचा खेळ अखंड चालू असतो.मनासारखे घडले नाही तर निराशा दाटून येणे साहजिक आहे,पण जे काही निराशाजनक घडले आहे ते कायमसाठी नसते हे लक्षात घेणे आवश्यक आहे.अपयश ही यशाची पहिली पायरी असते असेही आपण सुविचार म्हणून वाचत असतो पण प्रत्यक्ष जीवनात जेंव्हा एखादी अपयशाची वा अपेक्षाभंगाची चव चाखायला लागते तेंव्हां मात्र माणूस मानसिकदृष्ट्या कोलमडताना दिसतो! काय कारण असेल यामागे?
       माझ्या मते याला कारण आहेत यश आणि अपयशा बद्द्लची माणसाची घट्ट गृहीतके! आपणास  फक्त यशच मिळणार आहे,किंवा माझ्या आयुष्यात काही प्रतिकूल घडूच शकत नाही. असा बाळगलेला अनाठायी  दुराभिमान माणसाला अशी गृहीतके मांडायला कारणीभूत ठरवत आहे! प्रत्येक ठिकाणी फक्त यशच मिळणार आहे गृहीत धरणे अतिशय चुकीचे आहे! हे समजून घ्यायला हवे की,माणसाच्या हातात फक्त प्रयत्न करणे आहे.प्रामाणिकपणे केलेले प्रयत्न यशापर्यंत घेऊन जाऊ शकतात हे जरी खर असलं तरी प्रयत्न हा फक्त अनेक घटकांपैकी एक आवश्यक घटक आहे.हे सुध्दा तितकेच खरे आहे की यश वा अपयश हे परिस्थितीजन्य सुध्दा आहे, हे आपण बऱ्याचदा विसरून गेलेले असतो. उदाहरणच द्यायचे झाले तर नोकरीच्या मुलाखतीचे देता येईल.नोकरीच्या मुलाखतीसाठी तुम्ही अगदी जीव तोडून प्रामाणिकपणे प्रयत्न केले आहेत.मुलाखत अपेक्षेपेक्षाही चांगली झाली आहे.पण नोकरी मिळणे अथवा न मिळणे हे सर्वस्वी त्या त्या वेळच्या परिस्थिती वर अवलंबून आहे! कसे ते पहा.
  ही नोकरी तुम्हाला मिळणार की नाही हे खालील बाबींवर अवलंबून असू शकते असे मला वाटते –
                     1.तुमचे व्यक्तीमत्व व अवगत असलेली कौशल्ये त्या नोकरीसाठी योग्य आहेत का?
            २.उपलब्ध नोकऱ्यांची संख्या व मुलाखतीसाठी आलेल्या उमेदवारांची संख्या किती आहे.
            ३.तुम्ही मुलाखती दरम्यान दाखवलेले तांत्रिक व इत्तर आवश्यक असलेले कौशल्य.
            ४.नोकरीसाठी असलेली स्पर्धात्मक परिस्थिती व या स्पर्धेत तुम्ही मिळवलेले स्थान
            ५. इत्तर अपरिहार्य परिस्थिती ज्यात कुणीही हस्तक्षेप करू शकत नाही. इत्यादी .
    वरीलपैकी एक जरी बाब तुम्हाला प्रतिकूल असेल तरी तुम्हाला असलेली संधी चुकू शकते!आता वरील बाबींपैकी तुमच्या हातात असलेल्या बाबी किती आहेत?यावर विचार करून बघा.तुम्ही केलेले प्रयत्न जरी कितीही प्रामाणिक असले तुम्हाला जरी नोकरी मिळण्याची खात्री असली आणि दुर्दैवाने अशा ठिकाणी यश मिळाले नाही म्हणून तुम्ही निराश होणे सर्वस्वी चुकीचे आहे,कारण बऱ्याच बाबी तुमच्या हातात नव्हत्याच! असे प्रत्येक ठिकाणी असेलच असेही नाही.योग्य संधी समोर येईपर्यंत जिद्दीने प्रयत्न करत रहावेच लागेल.आणि अशी संधी मिळतेच!थोडा धीर धरायची तयारी मात्र हवी.केवळ अपयश येते म्हणून निराश होऊन प्रयत्नच करायचे सोडून देणे म्हणजे वास्तव नाकारणे आहे.प्रत्यक्षात असेही असू शकते की तुम्ही प्रयत्न करत असलेल्या नोकरीसाठी तुमचे कौशल्य कमी पडते आहे,उपलब्ध जागा आणि त्यासाठी असलेल्या स्पर्धेत तुमच्यापेक्षा कुशल लोक उपलब्ध होते.तुम्हाला अजून कौशल्य संपादन करणे आवश्यक आहे.अथवा तुमचा नैसर्गिक ओढाच अशा नोकरीसाठी योग्य नसावा.याचाच अर्थ असाही होतो की तुम्ही स्वत:ला पुरेसं ओळखतच नाही!येथे निराश होण्यापेक्षा आपल्यातल्या उपजत शक्ती व उणीवांचा मागोवा घेणे आवश्यक आहे.नव्याने स्वत:ची ओळख करून घ्यायला हवी.सत्याचा स्वीकार करायला हवा. आपली बलस्थाने व उणीवांचा पुन्हा एकदा अभ्यास करणे आवश्यक आहे.ऊणीवा दूर करून योग्य त्या संधीसाठी नव्याने सज्ज व्हायला हवे!
     फक्त नोकरीच्या बाबतीतच नाही तर वयक्तिक आयुष्यात आपण जी धेय्य ठेवतो,ज्या अपेक्षा
बाळगतो,जी स्वप्ने पहातो ती वास्तवाला धरून आहेत का? यावर शांतपणे विचार करायला हवा.आपली बाळगलेली स्वप्ने वास्तवात उतरण्यासाठी आवश्यक असलेली परिस्थिती अनुकूल आहे का,आणि जर ती परिस्थिती प्रतिकूल असेल तर निराश न होता त्या प्रतिकूलतेवर मात करून यश संपादन करण्याइतपत जिद्द व मानसिक तयारी आहे का? अपेक्षित यश संपादन करताना आशा निराशेचे जे क्षण समोर येतील ते समर्थपणे आपण हाताळू शकतो का?यावर गंभीरपणे विचार करायला हवा.आणि एकदा का या सर्व गोष्टींचा विचार केलेला असेल तर अपयश आले तरी त्यांचा स्वीकार केला जाईल व नैराश्य येण्याचा प्रश्नच उद्भवणार नाही! कारण येथे यशाबरोबरच अपयश सुध्दा गृहीत धरलेले असते.मग होते काय की अपयश आले तरी थोडे वाईट जरी वाटले तरी आपले प्रयत्न कमी पडले असतील याची वास्तव जाणीवही असेल! त्या वेळच्या परिस्थितीचे विश्लेषण केले जाईल आणि जीवनात यशस्वी होण्यासाठी अजून जिद्दीने प्रयत्न करण्याची प्रेरणा आपोआपच मिळत राहील.तसेच आशा निराशेची दोलायमान परिस्थिती हाताळण्याचे कौशल्यही अंगी आलेले असेल.   
     वरील विवेचनावरून एवढे तर निश्चित आहे की माणसाने जीवनात एवढ्या तेव्हढ्या गोष्टींवरून
निराश न होता वा नशिबाला दोष देत न बसता आशावादी दृष्टिकोनातून जीवनाकडे पहाणे गरजेचे आहे.हे वास्तव स्वीकारायला हवे की प्रत्येकाच्या जीवनात असे चढउतार येतच असतात म्हणून निराश न होता सकारात्मक विचार मनात ठेऊन,”हे दिवस सुध्दा जातील व चांगले दिवस येणार आहेत!” असा विचार करत वाटचाल करायला हवी.ही सकारात्मकताच पुढे यशाचे रूप घेऊन येईल म्हणूनच माणसाने आशा सोडू नये! आपण निराश झालो तर आपल्या हातून कुठलही चांगल काम होणार नाही.पण जर आपण आशावादी राहिलो तर निश्चितपणे एक दिवस आपले काम चांगल्या प्रकारे होतं राहील.निराश होऊन निष्क्रिय होण्यापेक्षा एक अनुभव मिळाला असा दृष्टीकोन ठेऊन उलट उत्साहानं विचारपूर्वक काम करण्याची सवय आपण लावून घेतली तर निराशा हा शब्द आपल्या शब्दकोषातून कायमचा निघून जाईल! एका आशेच्या किरणांमधूनही आपल्या जीवनात यशाचा आनंदाचा प्रकाश भरू शकतो.म्हणूनच नेहमी आशावादी रहाणे आवश्यक आहे, आपल्या सुंदर यशस्वी व आनंदी जीवनासाठी आशावाद आणि सकारात्मक विचारसरणी अत्यंत आवश्यक आहे असे मला वाटते!
   काय वाटतंय या बाबतीत आपल्याला?
                                    .....प्रल्हाद दुधाळ.
                                    Pralhaaddudhal.blogspot.com.

          

No comments:

Post a Comment