Friday, November 26, 2021
ज्ञानी- अज्ञानी
ज्ञानी-अज्ञानी
ज्ञान अर्थात एखाद्या गोष्टी बाबतीत सखोल वास्तवाची जाणीव हा माणसाच्या जन्माबरोबर मिळणारा गुण नाही.प्रत्येक बाळ हे या पृथ्वीतलावर आल्यावर सारखेच असते.थोडीफार प्रत्येकाची आकलनशक्ती वेगळी वेगळी असू शकते;पण ज्ञान ही निश्चितच पुढच्या टप्प्यावर मिळण्याची गोष्ट आहे.
दुसरे असे की प्रत्येकाला प्रत्येक क्षेत्रातले परिपूर्ण ज्ञान असणे केवळ अशक्य आहे.वाढत्या वयाबरोबर ज्ञानार्जन करण्याची भूकही वाढत जाते;पण व्यक्तीच्या आजूबाजूचे संस्कार,त्याला उपलब्ध असलेल्या संधी तसेच त्या व्यक्तीची ज्ञान ग्रहण करण्याची कुवत याप्रमाणे ती व्यक्ती कोणत्या क्षेत्रात प्राविण्य मिळवू शकते हे ठरते. मी असे मुळीच मानत नाही की आयुष्यात प्रत्येकाला योग्य संधी मिळेल पण असेही घडत नाही की इथला संधी मिळालेला प्रत्येकजण निश्चितपणे ज्ञानी होईल
इथे प्रत्येकजण आपापल्या वकुबानुसार ज्ञानार्जन करतच असतो;पण एका क्षेत्रात प्रावीण्य असलेली व्यक्ती दुसऱ्या क्षेत्रात तशी अज्ञानीच असते.
समाजात वावरताना मात्र आपल्याला काही स्वतःला सर्वज्ञ समजणारी माणसे पदोपदी भेटतात.त्यांना प्रत्येक गोष्ट माहीत आहे असे निदान त्यांना तरी वाटते.एखाद्या बाबतीत आपल्याला ज्ञान नाही हे कबूल करणे अशा व्यक्तींना कमीपणाचे वाटते!
कोणतीही व्यक्ती स्वतःला परिपूर्ण समजत असेल तर तो वास्तवातील सर्वात मूर्ख व्यक्ती आहे असे माझे मत आहे.
या जगातला प्रत्येक व्यक्ती वेगळी आहे,प्रत्येकाची आवड वेगळी आहे.ज्ञानार्जनाची प्रत्येकाची कुवत वेगळी आहे.एखाद्या व्यक्तीला मिळणारी संधी, अंगिकारता आलेली कौशल्य यावर त्या त्या व्यक्तीचे ज्ञान कमी जास्ती असू शकते .म्हणूनच कुणी कुणाला अज्ञानी म्हणून हिनवणे चुकीचे आहे तसेच मी सर्वज्ञानी आहे असा अहंगंड बाळगणे सुध्दा पूर्णपणे चुकीचे आहे.
हजार अज्ञानी परवडले पण एखादा अर्धवट ज्ञानी खूपच त्रासदायक ठरतो.
जगातील ज्ञानाचे भांडार अमर्याद आहे आणि कोणीही व्यक्ती प्रत्येक क्षेत्रातला तज्ज्ञ होऊ शकत नाही.
तसा तर प्रत्येकजण आयुष्यभर विद्यार्थीच असतो.
प्रत्येकाने या मर्यादांची जाणीव नक्कीच ठेवायला हवी.
कसे ओळखायचे हे ज्ञानी-अज्ञानी?
कणभर ज्यास ज्ञान नाही वास्तवाचे परी भान नाही
तया मूर्ख असे समजावे हात चार लांबच राहावे !
फारसे जरी ज्ञान नाही शिकण्यास नवे ना नाही
असंस्कारी तया समजावे संस्कारांनी सुज्ञ करावे !
तसा तो अडाणी नाही ज्ञानाचे त्यास भान नाही
निद्रेत मग्न समजावे जागृतीचे यत्न करावे!
मुळी ज्यास ज्ञान नाही स्वीकाराचे भान नाही
लबाड त्यास समजावे ढोंग तयाचे उघड करावे !
सर्वज्ञानी परी गर्व नाही ज्ञान दानास नां नाही
गुरुपदी योग्य समजावे ज्ञानामृत ग्रहण करावे !
तर अज्ञानाचा अंधकार दूर करण्यासाठी प्रत्येकाने ज्ञानार्जनाची कास धरावी....
प्रत्येकास अधिकाधिक ज्ञानार्जनासाठी शुभेच्छा....
©प्रल्हाद दुधाळ पुणे
9423012020
Wednesday, November 24, 2021
हट्टी माणसे हटवादी माणसे
हट्टी माणसे हटवादी माणसे...
'हट्टी आहे हो खूप तो'
एखाद्या लहान मुलासाठी हे वाक्य आपण अनेकदा ऐकलेले असते.लहान मुलांचा हट्टीपणा हा सर्वांनी गृहीत धरलेला असतो किंबहुना प्रत्येकजण लहानपणी हट्टी असतोच असतो.
एखाद्या लहान नासमज मुलाने एखाद्या गोष्टीचा हट्ट करणे आणि परिस्थिती असो अथवा नसो तो हट्ट पालकाने पुरवणे हे अगदी साहजिक आहे;पण एखादा वयाने आणि बुध्दीने सशक्त असलेला माणूस ' मी म्हणतो तेच खरे' असे म्हणून आपले चुकीचे म्हणणे इत्तरांवर लादत असेल तर?
नक्कीच अशा हट्टीपणाचे कुणी समर्थन करणार नाही.
हट्टीपणा या विषयाबद्दल जेव्हा चर्चा होते त्यावेळी तीन व्यक्तींचा हट्ट पुरवावाच लागतो असे सर्रास म्हटले जाते.ते म्हणजे बालहट्ट, राजहट्ट आणि स्रीहट्ट .लोक चेष्टेने म्हणतात एकवेळ पहिले दोन हट्ट नाही पुरवले गेले तरी हरकत नाही:पण स्री हट्ट पुरवणे मात्र टाळता येत नाही.
एखाद्या गोष्टीचा कट्टर आग्रह म्हणजे हट्ट. हा हट्ट टोकाचा असेल तर मात्र बऱ्याचदा त्रासदायक ठरतो. पुराणात असे अनेक हट्टाचे आणि त्यापायी झालेल्या नुकसानीचे दाखले पानोपानी दिसतात. रामायणात कैकयी हट्टामुळे रामाला वनवासात जावे लागले तर सीतेच्या सोनेरी हरणाच्या हट्टापायी पुढचे रामायण घडले असे म्हटले जाते.अनेक पौराणिक व ऐतिहासिक कथांमध्ये कुणा ना कुणाच्या हट्टामुळे टोकाच्या घटना घडल्याचे दिसते.
हट्ट ही गोष्ट चांगली की वाईट?
मला वाटते हट्ट चांगला अथवा वाईट नसतो तर त्या हट्टामुळे होणारे परिणाम चांगले अथवा वाईट असू शकतात.एखादा विद्यार्थी म्हट्ट म्हणून उच्च विद्याविभूषित होऊ शकतो तर एखादा विद्यार्थी हट्टाने व्यसनांच्या अथवा कुमार्गाने जातो आणि आपल्या जीवनाचे मातेरे करून घेतो म्हणजेच हट्ट कशाचा आहे यावर तो हट्ट चांगला की वाईट हे ठरेल.
हट्टाने प्रगती होऊ शकते तशीच अधोगतीही होऊ शकते.हट्टाने केलेल्या कष्टाने आयुष्याचे सोने केलेल्या अनेक माणसांची यशोगाथा आपण वाचतो तशीच वावग्या हट्टामुळे सुखात असलेला जीव दारूण दुःखात लोटलेली माणसेही समाजात बघायला मिळतात.हट्टापायी आयुष्याची धूळधाण झालेली माणसेही पावला पावलावर बघायला मिळतात.
हट्ट आणि हटवादीपणा यात निश्चितच फरक आहे.आग्रह आणि दुराग्रह यात जो फरक आहे तोच फरक इथेही आहे.सर्वसमावेशक हितासाठी धरलेला हट्ट नक्कीच भल्यासाठी असेल;पण केवळ मी म्हणतो म्हणून किंवा स्वतःच्या अहंकरापोटी केलेला हटवादी पणा त्या संबंधित व्यक्तीबरोबर सामाजिक आरोग्यासाठीही महाभयंकर ठरू शकतो त्यामुळे हट्ट किती आणि कसला याचे तारतम्य नक्कीच असायला हवे.
अशा हट्टापायी काय काय होऊ शकते ?...
करतो तो पुरा बरबाद,नात्यात येई दुरावा,
हवा का वेगळा पुरावा,नाशच होई हट्टापायी!
माझेच खरे जे म्हणती,दुराग्रह ना सोडती ,
विनाश ओढवून घेती, दुःखी होती हट्टापायी!
नाही वास्तवाचे भान, अंगी वसे दुराभिमान,
अहंकाराने त्या ग्रासला, मातीस मिळे हट्टापायी!
बरोबर ना?
आता तुम्हीच ठरवा हट्टी व्हायचं की हटवादी?
©प्रल्हाद दुधाळ. पुणे
9423012020
Tuesday, November 23, 2021
सजगता..काळाची गरज
सजगता अर्थात चौफेर जागरूकता अंगी असणे ही आज काळाची गरज आहे.तुम्ही कोणीही असा,तुम्ही कोणत्याही वयोगटात असा,दैनंदिन आयुष्यात जगताना पावलोंपावली तुम्ही सजग असायलाच हवे.
दररोजच्या वर्तमान पत्रात किंवा बातम्यात तुम्ही अनेक फसवणुकीचे नवे नवे प्रकार संबंधित भामट्यांनी अंगिकरलेले सतत वाचत वा ऐकत असता...
उदाहरणार्थ ...
घरात एकटे गाठून वृध्द व्यक्तीला लुबाडले.
पॉलिशच्या बहान्याणे महिलेचे दागिने लांबवले.
फोनवर ओ टी पी विचारून खात्यातून परस्पर पैसे काढून घेतले.
किंवा
डेबिट कार्ड क्रेडिट कार्ड संबंधी फसवणूक करून लाखो रुपयांचा गंडा.
अशा त्या मानाने जुनाट पध्दती बरोबरच डिजिटल दुनियेत फसवणुकीचे नवे नवे प्रकार शोधून अपहरण /लुबाडणूक /फसवणूक असे प्रकार सर्रास घडत आहेत.
कधी कधी तर अल्प लाभाच्या आमिषाला बळी पडून लोक विविध मार्गांनी अशा गुन्हेगारांनी लावलेल्या सापळ्यात अलगद सापडतात आणि राजरोसपणे फसवले जात आहेत.
माणसाची एकदा अशी फसवणूक झाली की माणसाला "आपण इतक्या सहजासहजी फसलोच कसे?" असा प्रश्न पडतो.आर्थिक नुकसान तर होतेच त्याबरोबर अनेक प्रकरणात प्रचंड मानसिक त्रासही भोगावा लागतो.स्वतःला तांत्रिक तज्ज्ञ समजणाऱ्या व्यक्तीलाही संपूर्णपणे फसल्यानंतरच आपली हुशारी किती फोल आहे हे कळते.
आजकाल लोकप्रिय झालेल्या ऑनलाईन खरेदी व इतर बँकिंग व्यवहारांमध्ये वेळेची आणि श्रमाची प्रचंड बचत होते याबद्दल दुमत असायचे कारण नाही; पण असे व्यवहार करताना पुरेसे सजग असणे गरजेचे आहे.कुणीतरी पाठवलेल्या कोणत्याही ऑनलाईन लिंक ला क्लिक करण्यापूर्वी सजगपणे त्या लिंक ची तपासणी करणे आवश्यक आहे. आपल्या आर्थिक तिजोरीच्या किल्ल्या अर्थात पासवर्ड ओटीपी कार्ड वा खात्याचे डिटेल्स कुणी मागते आहे म्हणून देणे म्हणजे स्वतःच्या पायावर स्वतःच कुऱ्हाड मारण्यासारखे आहे. फेसबूक अथवा व्हॉट्स ॲप सारख्या आभासी जगातील मैत्रीच्या माध्यमातून व्यवहार करताना खूप सावध असणे गरजेचे आहे. कधी कधी तुमच्या स्वभावाचा पध्दतशीर अभ्यास करून तुम्हाला टार्गेट केले जाऊ शकते तर तुमच्या वयाचे तुमच्या एकटेपणाचे, तुमच्या आजाराचे भांडवल करून लोक तुमच्याशी सलगी वाढवून तुमच्या खाजगी आयुष्यात प्रवेश मिळवतात.नात्यात व्यवहार येतो आणि तुम्ही अलगद फसता.अशावेळी तोंड दाबून बुक्क्यांचा मार अशी परिस्थीती जीवनात येते त्यामुळे स्वभावात सजगता असणे हे अत्यंत गरजेचे आहे.
सध्याचा जमाना
बोकाळला स्वार्थ
भोळेपण व्यर्थ
ध्यानी घे रे
म्हणूनच आजच्या युगात ऑनलाईन किंवा ऑफलाईन व्यवहारच काय पण जीवनाच्या प्रत्येक क्षेत्रात सजगपणे वागणे बोलणे ही काळाची गरज आहे.
पटतय ना?
© प्रल्हाद दुधाळ पुणे
(9423012020)
Monday, November 22, 2021
विवेक...एक विचार
विवेक
विवेक म्हणजे नक्की काय?
मला असे वाटते विवेक म्हणजे सारासार तारतम्य! जीवनातल्या चांगल्या आणि वाईटात फरक करण्याची हातोटी!
योग्य वेळी योग्य निर्णय घेण्याची माणसाची क्षमता म्हणजेही विवेकच! हा विवेक ज्याच्या अंगी आहे त्याला आयुष्यात सहसा अपयशाचा सामना करावा लागत नाही,कारण ज्या गोष्टीत यश मिळेल असेच काम हातात घ्यायची सारासार बुद्धी त्या व्यक्तीला अंगी असलेल्या विवेकामुळे लाभलेली असते.
ज्यांच्या अंगी विवेक असतो त्या व्यक्तींच्या अंगी प्रचंड सहनशीलता असते कारण विवेक जागा ठेऊन निर्णय घेताना खूप संयम ठेवावा लागतो.
माणसाच्या आयुष्यात त्याला अनेक चढउतारांचा संकटांचा सामना करावा लागतो.अनेकदा मानसिक परिस्थिती दोलायमान असते.कधी कधी एकाच वेळी अनेक आघाड्यांवर माणसाला लढावे लागते.प्रचंड कष्ट करावे लागतात.हे कष्ट कधी अंगमेहनत स्वरूपात असतात तर कधी ही बौद्धीक स्वरूपाची मेहनत असते.
अनेकदा निर्णय घेताना त्या निर्णयांच्या परिणामांची जबाबदारी त्या व्यक्तीवर असते अशावेळी खरा विवेकाचा कस लागतो .कधी निर्णय घेताना निती अनितीचा प्रश्नही असतो त्यावेळी तर निर्णय घेताना नुसते बुध्दीचे काम नसते तर संबंधित लोकांच्या सामाजिक व मानसिक स्तरावर होणाऱ्या परिणामांचा विचार होणेही आवश्यक असते.अशावेळी सदविवेकबुद्धीला स्मरून निर्णय घ्यावे लागतात. भले काय बुरे काय, काय केले तर काय होईल.निर्णयाचे चांगले परिणाम काय आहेत, वाईट परिणाम काय आहेत,कोण आनंदी होईल, कुणाला त्रास होईल, कोण दुखावले जाईल आणि या सगळ्यांच्या संभाव्य प्रतिक्रिया काय असतील? त्या प्रतिक्रियांचे काय पडसाद उमटू शकतात? त्याचे समाजावर किंवा कुणाच्या वैयक्तिक आयुष्यावर काय परिणाम लगेच किंवा कालांतराने दिसतील इथपर्यंत लांबवर विचार करण्याचे तारतम्य केवळ विवेकाने साधता येते ....
थोडक्यात काय माणसाच्या जीवनात विवेक या गुणाला अनन्यसाधारण असे महत्त्व आहे. जगताना रात्रंदिवस हर क्षणाला हा विवेक जागा ठेवावा लागतो.त्यातल्या त्यात आनंदी जीवनासाठी हे तारतम्य किंवा विवेक खूपच महत्त्वाचा आहे?
बरोबर ना?
© प्रल्हाद दुधाळ
9423012020
Sunday, August 8, 2021
चिंतन -वृत्ती
चिंतन १...
भर्तृहरी एक कवी,त्याने माणसाचे एकूण चार प्रकार सांगितले आहेत
१. ' माझे वाटोळे झाले तरी चालेल;पण जगाचे चांगले व्हायला हवे.गरज पडली तर मी लोकांचे पाय धरेन;पण आयुष्यात कधी कोणाचे पाय ओढणार नाही ' असा विचार करून तसे वागणारी माणसे.
२. ' माझे चांगले होण्यासाठी कुणाचे नुकसान झाले तरी चालेल.एकदा का सगळे माझ्या मनासारखे झाले की मग मी दुसऱ्यासाठी विचार करेन.माझे पोट भरल्यानंतर मी लोकांच्यासाठी काय करता येईल याचा विचार करेन. ' असा विचार करणारी माणसे.
३. ' माझे चांगले होणे याला माझी सर्वोच्च प्राथमिकता असेल भले त्यासाठी इत्तरांचे वाटोळे झाले तरी चालेल.मी फक्त माझाच विचार करेन.' असे वागणारी माणसे.
आणि
४. ' माझे वाटोळे झाले तरी हरकत नाही; पण माझ्याबरोबर सगळ्यांचे वाटोळे व्हायला हवे. मला जर सुख मिळणार नसेल तर माझ्याबरोबर सर्वांच्या आयुष्यात केवळ दुःखच असायला हवे ' असा आततायी विचार करून तसेच वागणारी माणसे.
खरे तर इतरांचे वाईट चिंतून या जगात सर्व प्रकारची सुखे मिळूनही खऱ्या अर्थाने मिळालेले सुख कोणीही उपभोगू शकत नाही....
.... प्रल्हाद दुधाळ
Friday, August 6, 2021
कर्मयोगी संत सावता माळी..
प्रपंची असुनी परमार्थ साधावा I वाचे आळवावा पांडुरंग I
मोट,नाडा,विहीर, दोरी Iअवघी व्यापिली पंढरी I
किंवा
'स्वकर्मात व्हावे रत, मोक्ष मिळे हातोहात।’
‘सावत्याने केला मळा। विठ्ठल देखियला डोळा।’
ज्या काळात ईश्वर प्राप्तीसाठी अनेक महान संत तीर्थाटने,भजन,कीर्तन, योगयाग,जपतप वा व्रतवैकल्ये आदी मार्गांचा अवलंब करत होते त्याच काळात असेही एक संत होते,ज्यांनी ईश्वरप्राप्तीसाठी कर्मयोगाचा अवलंब केला आणि आपल्या दैनंदिनबकामात पांडुरंग शोधायला भक्तांना सांगितले.
हे महान संत म्हणजे संतश्रेष्ठ सावता माळी! सावता महाराज संत नामदेव संत ज्ञानेश्वर यांचे समकालीन संत होते.
ईश्र्वराला प्रसन्न करून घेण्यासाठी योग-याग-जप-तप, तीर्थव्रत, व्रतवैकल्ये याची बिलकूल आवश्यकता नाही तर केवळ ईश्र्वराचे अंत:करणपूर्वक चिंतन करायला हवे अशी शिकवण त्यांनी दिली.
संत सावता माळी यांच्याबद्दल संत नामदेव म्हणतात:-
धन्य ते अरण, रत्नांचीच खाण। जन्मला निधान सावता तो।।
सावता सागर, प्रेमाचा आगर। घेतला अवतार माळ्या घरी।I
सावतोबा यांचे आजोबा देबू माळी हे पंढरीचे वारकरी होते.त्यांना दोन मुले होती. पुरसोबा आणि डोंगरोबा.पुरसोबा हे धार्मिक वळणाचे होते.आपला शेतीचा परंपरागत व्यवसाय सांभाळून ते भजन-पूजन करीत असत.पंढरीची वारीही ते नियमितपणे करायचे.पुरसोबा यांचा विवाह त्याच पंचक्रोशीतील सदू माळी यांच्या मुलीशी झाला.या दांपत्याच्या पोटी सावतोबा यांचा जन्म( ईसवी सन १२५०) झाला. या घराण्याचे मूळ गाव मिरज संस्थानातले औसे होय. दैवू माळी (आजोबा) अरण या गावी स्थायिक झाले होते.सावता माळी यांनी भेंड गावचे ‘भानवसे रूपमाळी’ हे घराणे असलेल्या जनाई नावाच्या मुलीशी लग्न केले. तिने उत्तम संसार केला. त्यांना विठ्ठल व नागाताई अशी दोन अपत्ये झाली. सावता माळी यांनी आपल्या अभंगात आपल्या व्यवसायातील शब्द व वाक्प्रचार मुक्तपणे वापरले आहेत.
‘साव’ म्हणजे खरे तर शुद्ध चारित्र्य, सज्जनपणा,सावपणा असा याचा अर्थ होतो.सावता महाराज लहानपणापासून विठ्ठलभक्तीमध्ये रममाण झाले. फुले,फळे,भाज्या आदी पिके काढण्याचा त्यांचा पारंपरिक व्यवसाय होता. ‘आमची माळियाची जात, शेत लावू बागाईत’ असे ते म्हणतात.
'कांदा मुळा भाजी, अवघी विठाई माझी I
’'लसुण मिरची कोथंबिरी | अवघा झाला माझा हरि ||’
ऐहिक जीवनात कर्तव्यकर्मे करीत असतानाच काया-वाचे-मने ईश्र्वरभक्ती करता येते, हा अधिकार सर्वांना आहे.
‘न लगे सायास,न पडे संकट,नामे सोपी वाट वैकुंठाची’
असा त्यांचा सरळ साधा अनुभव होता.त्यांनी जनसामान्यांना आपले कर्तव्य करता करता साधता येणाऱ्या आत्मोन्नतीचा मार्ग दाखविला.
सावता माळी हे कर्तव्य आणि कर्म करीत राहणे हीच खरी ईश्वरसेवा अशी शिकवण देणारे संत आहेत. वारकरी संप्रदायातील एक श्रेष्ठ आणि ज्येष्ठ संत म्हणूनही त्यांचा लौकिक आहे. श्री विठ्ठल हेच त्यांचे परमदैवत होते. ते कधीही पंढरपूरला गेले नाहीत.प्रत्यक्ष पांडुरंगच त्यांना भेटावयास येत.
निरपेक्ष वृत्तीने ईश्र्वरार्पण बुद्धीने केलेला प्रपंचच परमार्थ होतो, हीच त्यांची जीवननिष्ठा होती. त्यांना मोक्ष-मुक्ती नको होती.
‘वैकुंठीचा देव आणू या कीर्तनी’ ही त्यांची प्रतिज्ञा होती
‘योग-याग तप धर्म । सोपे वर्म नाम घेता।।
तीर्थव्रत दान अष्टांग। याचा पांग आम्हा नको।।
हाच विचार त्यांनी आग्रहाने मांडला. प्रपंच व आपले कर्तव्य करताना त्याबरोबरच नामसंकीर्तन करण्यावर त्यांनी जास्त भर दिला. भगवंत भक्तीसाठी सर्वसंगपरित्याग करण्याची जरुरी नाही.प्रपंच करता करताही ईश्वर भेटतो असे ते सांगत.
पंढरपूरला जाणाऱ्या वारकऱ्यांना पाणी भाकरी फळे फुले देऊन त्यांची पूजा ते करत.त्यांचे शेत त्यांचा मला हेच सावतोबाचे पंढरपूर होते. मळ्यात काबाडकष्ट करणे, भाज्या आणि फले पिकवणे वाटसरू ची सेवा हीच त्यांच्यासाठी पांडुरंग भक्ती होती.
'तो परमेश्वर माझ्या मळ्यात रहातो मला पंढरपुराला जायची गरज नाही.पांडुरंग मूर्तीत नाही तर आपण रोज जे काम करतो ते मनापासून केले की पांडुरंगाची भेट होते' असा त्यांचा ठाम विश्वास होता. संत एकनाथ सावतोबाबद्दल म्हणतात...
'एका जनार्दनी सावता तो धन्य I तयाचे महिमान न कळे काहीI'
अध्यात्म व भक्ती, आत्मबोध व लोकसंग्रह, कर्तव्य व सदाचार यांचा मेळ त्यांनी आपल्या आचरणात घातला.धर्माचरणातील अंध:श्रद्धा, कर्मठपणा, दांभिकता, अवडंबर व कर्मकांडे याबाबत त्यांनी कोणाचीच भीडभाड ठेवली नाही. त्यावर सतत कोरडे ओढले. तत्त्वचिंतन, सदाचार, निर्भयता, नीतिमत्ता, सहिष्णुता इत्यादी गुणांची त्यांनी भलावण केली.
‘‘प्रपंची असूनि परमार्थ साधावा। वाचे आळवावा पांडुरंग मोट, नाडा, विहीर, दोरी। अवघी व्यापिली पंढरी,’’
'सावता म्हणे ऐसा भक्तीमार्ग धरा I
जेणे मुक्ती द्वारा ओळंगती I'
' आमुची माळीयाची जात I शेत लावू बागाईत II
आम्हा हाती मोट नाडा I पाणी जाते फुल झाडा II'
असे म्हणणाऱ्या सावता महाराजांना त्यांच्या मळ्यातच विठ्ठलदर्शन होत असे.
त्यांच्या सर्व अभंगरचना काशिबा गुरव यांनी लिहून घेतल्या आहेत.
‘स्वकर्मात व्हावे रत, मोक्ष मिळे हातो हात।’ ‘सावत्याने केला मळा। विठ्ठल देखियला डोळा।’
सावता महाराजांना केवळ ४५ वर्षांचे आयुष्य लाभले. धार्मिक प्रबोधनाचे व भक्तिप्रसाराचे कार्य त्यांनी निष्ठेने व्रत म्हणून आचरिले. समरसता आणि अलिप्तता यातील विलक्षण समतोल त्यांच्या व्यक्तिमत्त्वात प्रकर्षाने जाणवतो. आज त्यांचे केवळ ३७ अभंग उपलब्ध आहेत.अरण येथे आषाढ वद्य चतुर्दशी, शके १२१७ (दि. १२ जुलै, १२९५) रोजी संत सावता महाराज अनंतात विलीन झाले. आजही पंढरपूरच्या श्री विठ्ठलाची पालखी वर्षातून एकदा खास त्यांना भेटावयास येत असते.
तर अशा या संतश्रेष्ठ सावता महाराज यांना त्यांच्या पुण्यतिथी निमित्त साष्टांग दंडवत..
पंढरीस आषाढीला जमे वैष्णवांचा मेळा
संत सावता ने ना कधी सोडला आपुला मळा
पंढरीच्या वाटेवरी अखंड टाळ कुटाई
संतश्रेष्ठ सावतालेखी कांदा मुळा ही विठाई
पांडुरंग स्व कर्मामध्ये काम भजन कीर्तन
मनामध्ये हवा भाव नको देखले नमन
कर्मयोगी सावताने नाही पहिली पंढरी
भक्ताच्या या दर्शनार्थ केली विठ्ठलाने वारी
.....पांडुरंग हरी वासुदेव हरी.....
©प्रल्हाद दुधाळ पुणे.
Thursday, July 29, 2021
पुनर्जन्म
#पुनर्जन्म
आमच्या कुबेर समूहात पुनर्जन्म या विषयावर लिहिण्यासाठीच्या उपक्रमाची पोस्ट मी त्या दिवशी झोपायला जाता जाता वाचली.
रात्रभर छान शांत झोपलो होतो...
पहाटे पहाटे एक सुंदर स्वप्न पडले.स्वप्नात चक्क सर्वशक्तिमान परमेश्वर मला दर्शन देण्यासाठी समोर आला! मी देवाला साष्टांग दंडवत घातले...
माझ्या भक्तीवर प्रसन्न होत देवाने आशीर्वाद दिले आणि म्हणाला...
" वत्सा मी तुझ्यावर प्रचंड खुश आहे,आज मी तुला तुझ्या पुढच्या जन्मासाठी तू मागशील ते वरदान देणार आहे.सांग तुला पुढचा जन्म कसा हवा...."
साक्षात परमेश्वराच्या रुपात माझ्यासाठी सुवर्णसंधी हात जोडून उभी होती. खरं तर या जन्मावर, या जगण्यावर माझे खूप प्रेम होते; पण त्याबरोबरच या आयुष्याबद्दल माझ्या काही तक्रारीही होत्या.जगताना या तक्रारी मनात ठेऊन मी आनंदी जीवनाचा देखावा करत असलो तरी आत दाबून ठेवलेल्या इच्छा आकांक्षानी मला देवासमोर खरे खरे सांगायची आणि पुढील जन्मी मला कसा जन्म हवा ते मागायची संधी दिली होती, त्या संधीचे सोने करायची जबरदस्त इच्छा झाली.आयुष्यात आत्तापर्यंत कधीच कुणापुढे काही मागण्यासाठी हात न पसरलेला मी, देवासमोर लोटांगण घालत माझ्या पुढच्या जन्मासाठीच्या मागण्यांचे निवेदन सादर केले...
हे सर्वशक्तिमान निर्मिका,पुनर्जन्म ही संकल्पना खरेच आस्तित्वात असेल तर, मला नक्कीच यानंतरचा जन्मही मानव जन्मच हवा;पण काही अटी शर्ती वर!
तर,मानव म्हणून पुनर्जन्म घेण्यासाठी माझ्या ज्या काही अपेक्षा आहेत त्या मात्र तुला पूर्ण कराव्या लागतील...
या चालू जन्मात मी भावंडात धाकटा म्हणून जन्मलो आणि मला माझ्या आईवडिलांचा सहवास फारसा लाभला नाही. खरे तर जीवनात आपल्या आईवडिलांची सेवा करणे हे माझे कर्तव्य होते; पण तशी सेवा करण्यास मी सक्षम होईपर्यंत ते दोघेही जगातून गेलेले होते त्यामुळे ते कर्तव्य तसेच राहून गेले.म्हणून सांगतो पुढच्या जन्मात मला थोरला म्हणून जन्म मिळायला हवा! अजून एक, या जीवनात मी लहान धाकटा असल्याने माझे बहीण अथवा भाऊ हे भावंडांच्या नात्यापेक्षा माझे पालक म्हणूनच माझ्याशी वागले.अनेक कुटुंबात बहीण भावात जे अल्लड नाते असते ते मला या चालू जन्मात कधीच अनुभवता आले नाही! पुढील जन्मी मात्र ही उणीव नक्की भरून निघावी.सगळ्यात धाकटा असूनही माझ्याकडून तू कर्मे मात्र थोरल्याची करून घेतलीस, तू दिलेली ती एक एक जबाबदारी निभावताना मी माझे लहानपण उपभोगू शकलोच नाही! मला अकाली प्रौढत्व स्विकारावे लागले.इत्तरांच्या अपेक्षा पूर्ण करता करता स्वतःच्या आशा आकांक्षाचे नको इतके मला दमन करावे लागले.विशेष म्हणजे मला माझ्या मनातली ही गोष्ट कधीच कुणाला मोकळेपणी सांगता आली नाही.आजूबाजूचे लोक मला कायम गृहीत धरू लागले.वयाच्या एका टप्प्यावर झालेली ती घुसमट कधीच व्यक्त झाली नाही.तशी परिस्थिती मात्र मला पुन्हा पुढच्या जन्मात नको हो...
अजून सांगतो
मला सद्वर्तनी,समविचारी मित्र दे.
या चालू असलेल्या जन्मात मला माझे विश्व आकाराला आणताना खूप अडथळे माझ्या समोर ठेवले होतेस,कठीण परीक्षा घेतल्या. वेळोवेळी तुझ्या कृपेने मी ते अडथळे त्या परीक्षा यशस्वीरीत्या पार केल्या.तुझ्या कसोटीवर पारखून मला तू यश, कीर्ती समृद्धी सारे सारे दिलेस,कायम सुबुद्धी दिलीस,सर्व दृष्टीने यशस्वी असा लौकिक दिलास.मी नक्कीच कृतज्ञ आहे;पण देवा हे सगळे देताना खूप थकविलेस रे...
पुढच्या जन्मात एवढ्या परीक्षा नको रे घेऊ! साधे सरळ सोपे आयुष्य असायला हवे....
आणि हो, या जन्मात मला खूपच संवेदनशील बनवले होते, व्यवहारी जगात एवढं संवेदनशील असणेही बरे नाही रे....
आता मात्र काळजी घे, अंगी धाडस आणि खंबीरता सुध्दा हवी ती मात्र नक्की दे...
आणि पुनर्जन्म झाला तरी कुबेर समूहाची सदस्यता अबाधित ठेव बरं का!
माझ्या मागण्यांची वाढत चाललेली लांबलचक यादी ऐकून समोर उभा असलेल्या त्या कृपाळू पांडुरंगाच्या ओठांवर प्रसन्न स्मितरेषा उमटली....मला आशीर्वाद देत त्याच्या मुखातून सुंदर गंभीर ध्वनी उमटला "तथास्तु"...
अचानक मी झोपेतून जागा झालो...
ते स्वप्न आठवून खूपच प्रसन्न वाटत होते! पण हे काय, आपण देवाकडे स्वतःसाठी उगीचच काय काय मागितले! स्वप्नातले ते सगळे आठवले आणि एक प्रकारची उदासी दाटली...
मी डोळे मिटले आणि पुनर्जन्मासाठी वास्तविक प्रार्थना केली..
सहण्याचे जे सत्य,धारिष्ट्य मिळू दे,
जीवनात ही घडी अशीच राहू दे!
नकोच मज समस्यांमधली मुक्ती,
रहावी ईश्वरावर निस्सीम भक्ती,
अनुभवांची हाव मनात राहू दे,
जीवनात ही घडी अशीच राहू दे!
नको आळशी मरगळले ते जिणे,
बेफिकीर असूदे कायम जगणे,
हळवेपण आत असेच राहू दे,
जीवनात ही घडी अशीच राहू दे!
दु:ख जीवनीचे कधी कोणा चुकते,
फळ कर्मांचे योग्य येथेच मिळते,
स्वीकारायाचे धैर्य सदैव लाभू दे,
जीवनात ही घडी अशीच राहू दे!
........©प्रल्हाद दुधाळ.
Subscribe to:
Posts (Atom)