Thursday, July 29, 2021

पुनर्जन्म

#पुनर्जन्म आमच्या कुबेर समूहात पुनर्जन्म या विषयावर लिहिण्यासाठीच्या उपक्रमाची पोस्ट मी त्या दिवशी झोपायला जाता जाता वाचली. रात्रभर छान शांत झोपलो होतो... पहाटे पहाटे एक सुंदर स्वप्न पडले.स्वप्नात चक्क सर्वशक्तिमान परमेश्वर मला दर्शन देण्यासाठी समोर आला! मी देवाला साष्टांग दंडवत घातले... माझ्या भक्तीवर प्रसन्न होत देवाने आशीर्वाद दिले आणि म्हणाला... " वत्सा मी तुझ्यावर प्रचंड खुश आहे,आज मी तुला तुझ्या पुढच्या जन्मासाठी तू मागशील ते वरदान देणार आहे.सांग तुला पुढचा जन्म कसा हवा...." साक्षात परमेश्वराच्या रुपात माझ्यासाठी सुवर्णसंधी हात जोडून उभी होती. खरं तर या जन्मावर, या जगण्यावर माझे खूप प्रेम होते; पण त्याबरोबरच या आयुष्याबद्दल माझ्या काही तक्रारीही होत्या.जगताना या तक्रारी मनात ठेऊन मी आनंदी जीवनाचा देखावा करत असलो तरी आत दाबून ठेवलेल्या इच्छा आकांक्षानी मला देवासमोर खरे खरे सांगायची आणि पुढील जन्मी मला कसा जन्म हवा ते मागायची संधी दिली होती, त्या संधीचे सोने करायची जबरदस्त इच्छा झाली.आयुष्यात आत्तापर्यंत कधीच कुणापुढे काही मागण्यासाठी हात न पसरलेला मी, देवासमोर लोटांगण घालत माझ्या पुढच्या जन्मासाठीच्या मागण्यांचे निवेदन सादर केले... हे सर्वशक्तिमान निर्मिका,पुनर्जन्म ही संकल्पना खरेच आस्तित्वात असेल तर, मला नक्कीच यानंतरचा जन्मही मानव जन्मच हवा;पण काही अटी शर्ती वर! तर,मानव म्हणून पुनर्जन्म घेण्यासाठी माझ्या ज्या काही अपेक्षा आहेत त्या मात्र तुला पूर्ण कराव्या लागतील... या चालू जन्मात मी भावंडात धाकटा म्हणून जन्मलो आणि मला माझ्या आईवडिलांचा सहवास फारसा लाभला नाही. खरे तर जीवनात आपल्या आईवडिलांची सेवा करणे हे माझे कर्तव्य होते; पण तशी सेवा करण्यास मी सक्षम होईपर्यंत ते दोघेही जगातून गेलेले होते त्यामुळे ते कर्तव्य तसेच राहून गेले.म्हणून सांगतो पुढच्या जन्मात मला थोरला म्हणून जन्म मिळायला हवा! अजून एक, या जीवनात मी लहान धाकटा असल्याने माझे बहीण अथवा भाऊ हे भावंडांच्या नात्यापेक्षा माझे पालक म्हणूनच माझ्याशी वागले.अनेक कुटुंबात बहीण भावात जे अल्लड नाते असते ते मला या चालू जन्मात कधीच अनुभवता आले नाही! पुढील जन्मी मात्र ही उणीव नक्की भरून निघावी.सगळ्यात धाकटा असूनही माझ्याकडून तू कर्मे मात्र थोरल्याची करून घेतलीस, तू दिलेली ती एक एक जबाबदारी निभावताना मी माझे लहानपण उपभोगू शकलोच नाही! मला अकाली प्रौढत्व स्विकारावे लागले.इत्तरांच्या अपेक्षा पूर्ण करता करता स्वतःच्या आशा आकांक्षाचे नको इतके मला दमन करावे लागले.विशेष म्हणजे मला माझ्या मनातली ही गोष्ट कधीच कुणाला मोकळेपणी सांगता आली नाही.आजूबाजूचे लोक मला कायम गृहीत धरू लागले.वयाच्या एका टप्प्यावर झालेली ती घुसमट कधीच व्यक्त झाली नाही.तशी परिस्थिती मात्र मला पुन्हा पुढच्या जन्मात नको हो... अजून सांगतो मला सद्वर्तनी,समविचारी मित्र दे. या चालू असलेल्या जन्मात मला माझे विश्व आकाराला आणताना खूप अडथळे माझ्या समोर ठेवले होतेस,कठीण परीक्षा घेतल्या. वेळोवेळी तुझ्या कृपेने मी ते अडथळे त्या परीक्षा यशस्वीरीत्या पार केल्या.तुझ्या कसोटीवर पारखून मला तू यश, कीर्ती समृद्धी सारे सारे दिलेस,कायम सुबुद्धी दिलीस,सर्व दृष्टीने यशस्वी असा लौकिक दिलास.मी नक्कीच कृतज्ञ आहे;पण देवा हे सगळे देताना खूप थकविलेस रे... पुढच्या जन्मात एवढ्या परीक्षा नको रे घेऊ! साधे सरळ सोपे आयुष्य असायला हवे.... आणि हो, या जन्मात मला खूपच संवेदनशील बनवले होते, व्यवहारी जगात एवढं संवेदनशील असणेही बरे नाही रे.... आता मात्र काळजी घे, अंगी धाडस आणि खंबीरता सुध्दा हवी ती मात्र नक्की दे... आणि पुनर्जन्म झाला तरी कुबेर समूहाची सदस्यता अबाधित ठेव बरं का! माझ्या मागण्यांची वाढत चाललेली लांबलचक यादी ऐकून समोर उभा असलेल्या त्या कृपाळू पांडुरंगाच्या ओठांवर प्रसन्न स्मितरेषा उमटली....मला आशीर्वाद देत त्याच्या मुखातून सुंदर गंभीर ध्वनी उमटला "तथास्तु"... अचानक मी झोपेतून जागा झालो... ते स्वप्न आठवून खूपच प्रसन्न वाटत होते! पण हे काय, आपण देवाकडे स्वतःसाठी उगीचच काय काय मागितले! स्वप्नातले ते सगळे आठवले आणि एक प्रकारची उदासी दाटली... मी डोळे मिटले आणि पुनर्जन्मासाठी वास्तविक प्रार्थना केली.. सहण्याचे जे सत्य,धारिष्ट्य मिळू दे, जीवनात ही घडी अशीच राहू दे! नकोच मज समस्यांमधली मुक्ती, रहावी ईश्वरावर निस्सीम भक्ती, अनुभवांची हाव मनात राहू दे, जीवनात ही घडी अशीच राहू दे! नको आळशी मरगळले ते जिणे, बेफिकीर असूदे कायम जगणे, हळवेपण आत असेच राहू दे, जीवनात ही घडी अशीच राहू दे! दु:ख जीवनीचे कधी कोणा चुकते, फळ कर्मांचे योग्य येथेच मिळते, स्वीकारायाचे धैर्य सदैव लाभू दे, जीवनात ही घडी अशीच राहू दे! ........©प्रल्हाद दुधाळ.

No comments:

Post a Comment