Wednesday, April 16, 2014

वृत्ती-1

वृत्ती-1

“ माझं ही माझं आणि तुझं ही माझं " अशी मानसिकता असणाऱ्या माणसाचा स्वभाव जन्मत: तर नक्कीच तसा नसतो! अशा व्यक्तीच्या या वृत्तीचा अभ्यास करताना त्याचे बालपण कोणत्या वातावरणात गेले? कुठल्या सामाजिक व आर्थिक परिस्थितीमध्ये तो वाढला? त्याचेवर कुणा कुणाचे चांगले/वाईट संस्कार झाले? या सर्व बाबींचा व्यवस्थितपणे विचार करावा लागेल! कुठल्यातरी प्रकारची असुरक्षितता त्याला वाटत असावी व त्यातूनच अशी स्वार्थी वृत्ती माणसात तयार होत असावी.जी गोष्ट हवी असते ती योग्य त्या वयात व योग्य त्या प्रमाणात  न मिळाल्यामुळे संधी मिळताच  माणूस कुठल्याही थराला जाऊन अशा गोष्टी मिळवण्याचा प्रयत्न करतो. अश्या प्रकारे मिळवलेली गोष्ट त्याच्याकडून कुणी हिसकावून तर घेणार नाही ना? अशी भीती त्याच्या मनात कायम घर करून रहाते,मग तो अशा गोष्टींचा साठा करायला लागत असावा.मग- माझे आहे ते माझेच आहे पण इत्तरांकडे आहे, तेही फक्त माझ्याकडेच असले पाहिजे! अशा मानसिकतेपोटी त्याच्यामधील स्वार्थी वृत्ती त्याच्या मनात जागी होत असावी व शेवटी तोच त्यांचा स्वभाव होत असावा! आपल्याकडे आजूबाजूचे लोक वेगळ्या नजरेने बघत आहेत याची अशा माणसांना जाणीवच होत नसावी!!!. .......प्रल्हाद दुधाळ.

Thursday, April 10, 2014

ओळख.

ओळख.
आपण जेंव्हा बोलत असतो त्यावेळी सतत ‘मी’पणाचा पाढा म्हणत असतो. मी कोण आहे माहीत आहे का? माझी कोणा कोणाशी ओळख आहे माहिती आहे का? मी अमक्या चा मित्र/नातेवाईक/ओळखीचा इत्यादी इत्यादी अशी आपली ओळख करून देत असतो.मला तुम्ही ओळखत नाही का? मी यांव आहे आणि मी त्यांव आहे! अशा प्रकारे माणूस आपली ओळख सांगत असतो.ही ओळख सांगताना आपण कुणीतरी स्पेशल असल्याचा अविर्भाव शब्दा शब्दात ठासून भरलेला असतो. स्वत:बद्दल व स्वकर्तुत्वा बद्दल वास्तव अभिमान जरूर असायला हवा, पण हा अभिमानाला जेंव्हा गर्वाची बाधा होते तेंव्हा माणूस हा मीपणाचा ढोल अजूनच जोरात वाजवायला लागतो! माणूस सर्वात जास्त कुणावर प्रेम करत असेल तर ते या मीपणावर! खर तर जन्माला आलेल्या प्रत्येकाची किमान एक ओळख असतेच! अगदी बेवारस म्हणून सापडलेल्या बालकाची सुध्दा “ बेवारस” अशी एक ओळख असते! प्रत्येक व्यक्ती कुणाचे तरी अपत्य असते,कुणाचेतरी नातवंड असते,कुणाचा भाऊ अथवा बहीण असते अशी अनेक सख्खी, चुलत, मावस, वा दूरची जवळची नाती या स्वरूपात तर त्याची ओळख असतेच पण त्या बरोबरच त्याचे आडनाव, धर्म,जात,पोटजात अशा वेगवेगळ्या प्रकारची त्याची ओळख जन्मापासूनच त्याला चिकटलेली असते. पुढे घराणे,व्यवसाय,उपाधी, पुरस्कार ,प्रसिद्धी अथवा कुप्रसिद्धी यामुळे सुद्धा ही ओळख अजून घट्ट होत जाते.लग्नानंतर अमक्याचा जावई वा सून,अमक्याची बायको अथवा नवरा अशी ओळखीची लांबड वाढतच जाते.समाजात ही ओळख जेवढी मोठी तेवढे त्या व्यक्तीचे नाव मोठे असे गणित मांडले जाते! वास्तव आयुष्यात ही वेगवेगळ्या पातळीवरची ओळख त्या व्यक्तीला नाव व प्रतिष्ठा मिळवूनदेत असते. त्याच्या या ओळखी मुळे समाजात त्याला मान सन्मान मिळतो असा सर्वमान्य समज आहे.आपल्या समाजातील या ओळखीमुळे जे महत्व त्याला प्राप्त झालेले असते ते महत्व दिवसेंदिवस वाढायला हवे असे त्याला वाटत रहाते या मानसिक गरजेतून मग तो मीपणाची जाहिरात जेथे संधी मिळेल तेथे करायला लागतो अशा कायम आत्मस्तुती करणाऱ्या माणसाला काही काळानंतर सगळेजण अहंकारी व्यक्ती म्हणून ओळखायला लागतात. एक नवीन प्रकारची ओळख त्याला मिळू लागते! अशा व्यक्तीला एखाद्या प्रसंगी जर त्याला अपेक्षित असलेल्या प्रकारचे महत्व दिले गेले नाही तर त्याच्या अहंकाराला ठेच लागते. तो या गोष्टीला आपला जाणीवपूर्वक केला गेलेला अपमान मानतो व याला कारणीभूत असलेल्या सबंधित व्यक्तीला आपला वैरी मानायला लागतो! त्याचा द्वेष करायला लागतो.संधी मिळेल तेथे तो याचे उट्टे काढायचा प्रयत्न करतो.
खरच अशा बेगडी ओळखीमुळे मिळालेली प्रतिष्ठा एवढी महत्वाची असते का? सत्ता संपत्ती मान संन्मान यानेच माणसाची ओळख असायला हवी का? एका आध्यात्मिक ट्रेनिंग मध्ये“तुम्ही कोण आहात?” हा एकच प्रश्न पुन्हा पुन्हा विचारला जातो. पहिल्या पाच सहा वेळा त्या प्रश्नाला व्यवस्थित उत्तरे मिळतात. जसे - प्रथम व्यक्ती आपले नाव/आडनाव सांगते. मग कुणाचा मुलगा आहे ते सांगितले जाते.नंतर कुणाचा नातू/पणतू/बहीण/भाऊ/नातेवाईक अशी उत्तरे मिळतात. त्यापुढे धर्म जात,शिक्षण,पदव्या ,पुरस्कार,अधिकार ,नोकरी,व्यवसाय यांचा आधार घेऊन व्यक्ती स्वत:ची ओळख तेत रहाते. पण पुढे “तू खरच कोण?”या प्रश्नाला उत्तर शिल्लक रहातच नाही! त्याला आपली ओळख सहा सात वाक्यातच संपली असल्याची जाणीव होते व एकवेळ अशी येतेकी “ तू कोण आहेस?” या प्रश्नाला केवळ एकच उत्तर द्यावे लागते,ते म्हणजे “मी एक माणूस आहे!” आणि हीच त्याची खरी ओळख असते! कोणत्याही व्यक्तीची एक माणूस हीच एकमेव चिरंतन ओळख आहे! ही खरी ओळख टिकविण्याचा माणसाने खर तर आयुष्यभर प्रयत्न करायला हवा पण वास्तवात असे घडत नाही प्रतिष्ठेच्या खोटा कल्पना घेऊन आयुष्यभर तो जगत असतो,मी आणि माझे माझे म्हणत नीती-अनीती चे सगळे विधिनिषेध पायदळी तुडवून मोहापोटी सत्ता,संपत्ती गोळा करण्याचा तो आटापिटा करतो, जे मिळाले ते त्याने त्याचे समाधान होत नाही मग दिवसेंदिवस त्याची ही हाव वाढतच जाते. मोहाच्या या लाटेत तो वाहात जातो. अखंड धावत रहातोपण ज्या जगण्यासाठी हे सर्व तो करतो ते जगण मात्र राहून जात! जे मिळाले आहे त्याचा उपभोग घ्यायचं तसचं राहून जात आणि एक दिवस त्याचा शेवट होतो! जसा आला होता तसाच मोकळ्या हाताने त्याला या जगाचा निरोप घ्यावा लागतो. एका मानसाचं मुल म्हणून त्याची प्रथम ओळख असते तर डेड बॉडी म्हणून त्याची शेवटची ओळख असते! मधल्या आयुष्यात त्याला मिळालेली ओळख त्याच्या शेवटच्या क्षणी ओळख वा वशिला लावायला कामाला येत नाही!
म्हणूनच मला वाटते आपण आता तरी स्वत:ला ओळखायला हवं, माणसासारख, माणसाशी माणुसकीने वागायला हवं सर्वांना माणसासारख वागवायला हव!
ओळख आता तरी स्वत:ला, आहेस तू एक ‘टिंब’,
महासागरातल्या विशाल, इवलासा एक ‘थेंब’!
तू रे आहेस नियतीच्या हातचे, एक ते बाहुले,
आस्तित्व इथले तुझे, ‘त्याच्या’ इशाऱ्या वरती हले!
भंगून गेली सुख शांती, ऐहिकाच्या मोहापायी,
नीती अनीती ची चाड, उरली तुला मुळी नाही,
फासे तुझे टाकतो तो निर्मिक, बैसुनिया त्या ‘तिथे’
मारू नको बढाई सांगून, मी आलो कोठून कुठे!
माझे माझे म्हणून या जगाला, कितीही तू रे सांग,
सुटते जसेच तसे हातचे म्हणताच तो ‘थांब’!
हे सगळ असंच सुचल म्हणून आपल्याला सांगितलं!
कृपया गैरसमज नको, मी कुणी अध्यात्मिक गुरु नाही!
......प्रल्हाद दुधाळ.

Wednesday, April 9, 2014

संवेदनशील.

                      संवेदनशील .

              हे खरे आहे की प्रत्येकाला हे जग आपल्या मनाप्रमाणे चालावे असे वाटते. मी म्हणतो तेच खरे आहे असे त्याचे ठाम मत असते पण असा विचार करताना त्याला इत्तरांच्या मनात काय आहे हे जाणून घ्यायची मात्र अजिबात गरज वाटत नाही! असा अतिरेकी विचार करणारी माणसे असंवेदनशील असतात! अशी माणसे सामान्यपणे हेकेखोरही असतात.आपल्या मनाप्रमाणे सर्वांनी वागले पाहिजे असा त्यांचा दुराग्रह असतो. या उलट संवेदनाशील माणूस प्रथम समोरच्या व्यक्तीच्या मनाचा विचार करतो. आपले योग्य असलेले म्हणणे समोरच्या व्यक्तीला समजाऊन सांगण्याचा व त्याच्या गळी उतरवण्याचा प्रयत्न तो जरूर करतो,पण त्याच्या मनासारखेच घडायला हवे असा त्याचा अट्टाहास नसतो.अर्थात संवेदनाशील माणूस समझदार असतो व योग्य तेथे तडजोड करायची त्याची तयारी असते!
                   अशा इत्तरांच्या मनाचा सतत विचार करणाऱ्या माणसाची व्यवहारी जगात मात्र प्रचंड गोची होते! कोंडमारा होतो ! होते काय की, संवेदनाशील माणूस जगताना प्रत्येकाच्या मनाचा विचार करून निर्णय घेतो/वागतो.पण ज्याच्याशी तो असे वागतो ती व्यक्ती मात्र अनेकदा असंवेदनशील असते! कुणाच्याही मनाचा विचार करायचा असतो हे त्याचा गावीच नसते! असंवेदनशील माणूस स्वत: तर दु:खी होतोच पण आपल्या वागण्यामुळे आजूबाजूच्या विचारी माणसांना फक्त दु:खच देत रहातो.
           आजूबाजूच्या असलेल्या अशा बहुसंख्य हट्टी व दुराग्रही माणसांच्या वागण्यामुळे मुळात संवेदनाशील असलेला माणुसही काही काळानंतर निराश व्हायला लागतो. आपण सगळ्यां जगाचा विचार करतो पण आपला कोणीच विचार करत नाही असे नकारात्मक विचार तो करायला लागतो. मग तो सर्वांशीच कोरडेपणाने वागू लागतो! आपल्या मनाप्रमाणे वागण्याचे स्वातंत्र्य प्रत्येकाला आहेच, पण त्याबरोबरच आजूबाजूला वावरत असलेल्या माणसांच्या मनाचा विचारही आपण करायला हवा हे कर्तव्य मात्र तो सोयीस्करपणे विसरुन जातो. माणसांच्या अशा संवेदना जर बोथट होत गेल्या तर जगात सर्वत्र मनमानी होईल.
             थोडक्यात काय तर, निकोप समाज व्यवस्थेसाठी प्रत्येकाने समोरच्या माणसाच्या मनाचा विचार प्रथम करायला हवा! आपले मत लादण्या ऐवजी इत्तरांच्या मनाचा विचार व त्यांच्या योग्य मताचा आदर करायला हवा, आपल्या मनात असलेले सर्व खरेच आहे हा हेका बाजूला ठेऊन इत्तरांकडून वेगळा अधिक योग्य पर्याय समोर येऊ शकतो असाही विचार करायला शिकणे आवश्यक आहे. तेंव्हा एकदा आत्मपरीक्षण करून बघू या का? आपल्या चुकीच्या वागण्याचा कुणाला त्रास तर होत नाही ना?.
                                                                                                                                                                          ........प्रल्हाद दुधाळ.

Friday, April 4, 2014

आनंदी माणूस.

आनंदी माणूस.
                    काही माणसंच अशी असतात की त्यांच्या नुसत्या आजूबाजूला असलेल्या आस्तीत्वामुळे इत्तरांना मनाची प्रसन्नता लाभते.आनंद उत्साह अगदी त्यांच्या नसानसात भरून वाहात असतो.ते कायम सकारात्मक विचार करत असतात.संकटात असलेल्यांच्या मदतीला ते धावून जातात.प्राजक्ताच्या फुलांप्रमाणे त्यांच्यामुळे आनंदाचा दरवळ आजूबाजूला पसरत असतो.अशा माणसाला कुठले ना कुठले दु:ख असणारच पण त्याचा लवलेशही त्याच्या चेहऱ्यावर वा वागण्या बोलण्यात नसतो.स्वत: तर ते सतत आनंदात असतातच पण तो आनंद सगळ्यांनाच कसा मिळेल असे पहातात, इत्तरांची काळजी घेतात, सर्वांना अशा माणसाचा  खूप आधार वाटतो.असा माणूस आपल्या सभोवती असणे म्हणजे आपले  भाग्यच! मला वाटते आपल्या प्रत्येकाच्या आयुष्यात असा एक तरी माणूस नक्कीच  असतो! फक्त गरज आहे त्याला ओळखण्याची! एकदा का असा माणूस तुम्हाला सापडला की तुमचे आयुष्यही अखंड आनंदाने भरून जाते! जरा शांतपणे विचार करून पहा, असा माणूस तुमच्या स्वत:च्या आतच आहे! त्या दृष्टीने स्वत:चे एकदा आत्मपरीक्षण करून तर बघा! लक्षात येईल की उगीच इकडे तिकडे शोधायची गरजच नाही असा एक माणूस जो आनंद वाटू शकतो आनंदात जगू शकतो तुमच्यातच आहे. त्याला ओळखा.हे खर आहे की आनंदी, समाधानी राहण्याची एक कला आहे ही कला प्रत्येकांनी आत्मसात करून घ्यावयास हवी.

                                                       ....प्रल्हाद दुधाळ.

Saturday, March 22, 2014

हसतमुख दु:ख.

‘आज जागतिक हास्यदिनाच्या निमित्ताने सर्वांना हसऱ्या शुभेच्छा! या दिनाचे औचित्य साधून माझी एक पूर्वप्रकाशित कथा..... 
.....................
हसतमुख दु:ख.

      जॉन हा माझा एक मित्र. तसा तो मल्याळी भाषिक, पण त्याचा जन्म पुण्यातला.त्याचे शिक्षणही मराठी माध्यमातले,त्यामुळे तो मल्याळी आहे हे सांगितल्याशिवाय समजत नसे.एकदम अस्सल मराठी बोलायचा! उंची साडेपाच फुटाच्या आसपास,तजेलदार व गोरा चेहरा,एकदम बोलके डोळे. तो जाडसर मिशा ठेवायचा आणि चेहऱ्यावर कायमचे मिश्किल हसू, दुर्मुखलेला वैतागलेला भाव त्याच्या चेहऱ्यावर मी कधीच पाहिलेला नव्हता.उत्साहाने कायमच सळसळत असलेला असा हा माझा मित्र! लौकिक अर्थाने कमी शिकलेला होता,पण चलाख आणि तेव्हढाच हुशारही  होता. स्वभावाने एकदम हजरजबाबी व तेव्हढाच दिलखुलास माणूस! कायम हसतमुख असणारा जॉन आणि मी काही काळ एकाच सेक्शनला काम करायचो.तेथेच त्याची माझी काही काळासाठी का होईना पण अगदी घट्ट मैत्री झाली होती.पुढे माझे प्रमोशन झाले व त्या सेक्शनशी माझा संपर्क जवळ जवळ तुटून गेला. त्या काळातल्या अनेक आठवणी अजूनही ताज्या आहेत. आपले काम अगदी प्रामाणिकपणे करणारा हा जॉन, आपले सहकारी व सुपरवायझर यांच्याबरोबर कायम हसत खेळत, चेष्टा मस्करी व भंकस करत असे. आमची नोकरी अशी मजेत चालली होती! ऑफिसात काम करता करता तो जीवनात घडलेले अनेक मजेदार किस्से सांगायचा. ते किस्से तो असे काही खुलवून सांगायचा की बस्स! त्याच्या विनोदी स्वभावामुळे आमचा ऑफिसातला दिवस कसा जायचा ते कळायचेच नाही.कधी तो असे काही सांगायचा, किंवा अचानक अस काही वागायचा, की नंतर सर्वांचे हसून हसून पोट दुखायचे! मात्र हे सगळ करत असताना तो स्वत: मात्र अत्यंत गंभीर चेहरा करून त्या सगळ्याची मजा घेत असे.

     मधल्या कितीतरी वर्षात जॉनचा संपर्क होऊ शकला नाही.खरे सांगायचे तर करिअर घडवण्याच्या नादात मी त्याला पूर्णपणे  विसरून गेलो होतो.एकदा असाच कुणाशी तरी त्या काळातल्या गप्पा रंगल्या होत्या.जुने सवंगडी कुठे  कुठे आहेत,त्यांचे कसे चालले आहे असे विषय निघत राहिले आणि अर्थातच जॉनचा विषयही निघाला. कुणीतरी तो काही दिवसापूर्वी रिटायर झाल्याचे सांगितले.त्याची आठवण निघाली आणि त्याच्या बाबतीतल्या गमती जमतीही  आठवल्या .नकळत चेहऱ्यावर हसू आले!

       तर अशा या माझ्या अवली मित्राचे काही किस्से-
      आम्हाला त्यावेळी एक महिला सुपरवायझर होत्या.आपल्या कामात त्या अत्यंत हुशार होत्या. आपल्या हाताखाली काम करणाऱ्या स्टाफच्या मागे उभे राहून अत्यंत चिवटपणे हवे ते काम करून घेण्यात त्या वाकबगार होत्या.या त्यांच्या चिवटपणामुळे सेक्शन मधील माणसांकडून त्या भरपूर काम करून घेत असत. असे करताना त्या एवढ्या पिडायच्या की समोरच्याला त्यांचा राग यायचा;पण त्यांचा अधिकार व वयाचा आदर ठेवून सहसा त्यांना कोणी उलट उत्तर देत नसे.खर तर त्या मुद्दाम असे वागत नसत; पण कामाच्या नादात हे त्यांच्या लक्षातच येत नसे!

       तर, झाले काय की, माझ्या या मित्राला सलग आठ दिवस या सुपरवायझरकडून भरपूर काम दिले गेले आणि ते काम तो विनातक्रार करत राहिला, त्या दिवसात त्याच्या घरी कुणीतरी आजारी होते,त्यामुळे त्याला त्या आठवड्यात सुट्टी हवी होती;पण या सुपरवायझरकडून ती दिली गेली नाही.त्याची खरी समस्या त्याने ऑफिसमध्ये कुणालाच सांगितली नव्हती. तो आपले काम करत राहिला. मधेच एक दिवस तो ऑफिसला आला नाही.त्या नंतरच्या दिवशी तो ऑफिसला थोडा उशिरा आला आणि तडक सुपरवायझरच्या टेबलाकडे गेला.त्याचा चेहरा अत्यंत गंभीर होता.तो सुपरवायझर समोर बसला.
  नेहमी अत्यंत हसतमुख असणाऱ्या जॉनचा आजचा मूड पाहून सेक्शनमधील सगळे काळजीत पडले होते.आता काय घडणार याचा अंदाज नसल्यामुळे सगळेजण एकदम गोंधळून एकमेकांकडे बघत होते.सुपरवायझरने  त्याला काही विचारायच्या आतच त्याने पिशवीतून आणलेला मोठा दगड टेबलावर ठेवला! दगड पाहून सुपरवायझर बाईंची पार घाबरगुंडीच उडाली.त्यांच्या तोंडातून एकही शब्द फुटेना! रागा रागात जॉन खेकसला

       “मला जर आता कोणी काही बोलले तर बघा! एक तर तुमच्या डोक्यात दगड घालेल किंवा माझे डोके तरी त्यावर आपटून घेईल!”

     असे काही घडू शकेल याचा विचारही कुणाच्या डोक्यात आला नव्हता .सेक्शन मधील सगळेजण एकदम भांबावून गेले होते.एकदम स्तब्धता पसरली.जॉनला अशा प्रकारे वागताना कुणीच कधी पाहिले नव्हते! सुपवायझरला त्याच्या हातातला दगड पाहून आधीच घाम फुटलेला होता! पूर्ण सेक्शनमधे विचित्र शांतता पसरली.सर्वांच्या चेहऱ्यावरची भीती पाहून जॉन ने चेहरा अजूनच गंभीर केला आणि अचानक तो खो खो हसायला लागला! 
     ही सगळी मस्करी होती हे लक्षात आल्यावर सेक्शन मधील सगळेजण त्या हसण्यात सामील झाले व वातावरण निवळले. 
झालेल्या सर्व प्रकाराबद्दल जॉनने बाईंची तसेच सर्वांची माफी मागीतली.........
 तर असा हा जॉन!
     एकदा काय झाल की, हा जॉन आणि त्याचे काही मित्र लोकलने एका लग्नासाठी पुण्याहून दौंडला निघाले होते. नेहमी प्रवास करत असल्याने जॉनकडे दौंड-पुणे असा रेल्वेचा पास होता;पण बरोबर असलेल्या पाच-सहा मित्रांकडे मात्र पास नव्हते. बाकीच्यांची तिकिटे काढणे जरुरी होते; पण त्या मित्रांनी एक थ्रील म्हणून विदाउट तिकीट प्रवास करायचा निर्णय घेतला! जॉनने हे ठीक नाही हे सर्वांना समजाऊन सांगितले;पण कुणीच त्याचे ऐकेना! 
सगळेजण तिकीट न घेताच दौंड शटलमधे चढले. जॉनला काळजी पडली की जर तिकीट चेकरने या सर्वाना विदाउट तिकीट पकडले तर काय? 
     पुणे ते दौंड प्रवासात या मित्रांबरोबर जरी तो त्यांच्या हास्यविनोदात सामील होत होता तरी त्याचा एक डोळा  टी सी कडे होता. जर तिकीट चेक करण्यासाठी टी सी आला तर आपल्या या मित्रांना कसे वाचवायचे याचाच जॉन पूर्ण प्रवासात विचार करत होता.
    त्याने विचापुर्वक मनाशी एक योजना तयार केली.त्यांच्या सुदैवाने दौंड पर्यंत डब्यात टी सी आला नाही.
     आता गाडी दौंड स्टेशन वर आली व एकमेकांची थट्टा मस्करी करत ही मंडळी स्टेशनवर उतरली.जॉनची नजर टी सी चा अंदाज घेत होती.त्याने टी सी कुठे आहे ते पाहून ठेवले. तो नेमका बाहेर जाण्याच्या दरवाजावर उभा होता व प्रत्येकाची तिकिटे तपासूनच बाहेर सोडत होता.
     जॉनने सर्व मित्रांना परिस्थितीची कल्पना दिली व योजना सांगितली....
    सर्व मित्रांनी थोडा वेळ जागेवरच जॉनच्या इशाऱ्याकडे लक्ष देत थांबायचे ठरले. 
    जॉन स्टेशनच्या बाहेर पडायच्या गेटकडे निघाला.आता थोडी गर्दी कमी झाली होती.जॉन सावकाश चालत टी सी च्या दिशेने गेला व त्याची नजर जॉनकडे गेली त्याने तिकिट घेण्यासाठी हात पुढे केल्याबरोबर जॉनने उलट्या दिशेने पळायला सुरुवात केली!
 “चला बरे सावज सापडले!”  
असा विचार करून टी सी ने जॉनच्या मागे धावायला सुरुवात केली.  
जॉन पुढे व टी सी त्याच्या मागे पळायला लागला. 
    जॉन मागे पहात त्याचा अंदाज घेत घेत पळत होता! थोडे अंतर पळाल्यानंतर जॉन अचानक समोरच्या चहाच्या दुकानासमोर ब्रेक लावल्यासारखा थांबला व हाश-हुश्श करत चहावाल्याला चहाची ऑर्डर दिली! 
असे अचानक थांबलेल्या जॉन लापाहून टी सी धापा टाकत त्याच्याजवळ आला व त्याच्यावर जोरात खेकसला....
“टिकट बताव!”
जॉन ने त्याच्याकडे शांतपणे पाहिले व विचारले
“क्यू क्या हो गया?”
“आता बरा सापडला”  
या अविर्भावात टी सी ने दटावले...
“क्यू क्या?  पहले टिकट बताव!”
  जॉनने आरामात मागच्या खिशातून आपले पाकीट काढले, थोडी शोधाशोध केल्यासारखे दाखवले व तीन महिने चालणारा पास काढून त्याच्या समोर धरला!
आता मात्र टी सी चा चेहरा बघण्यासारखा झाला होता!
त्याने वैतागून विचारले
“पास है? फिर भागा क्यू ?”
“अरे साब, मुझे चाय पिने का था! चाय के लिये भागना मना है क्या?  ऐसा कहां लिखा है? मै बाहर थोडे ही भाग रहा था? आओ ना साब आपभी चाय पिओ!”
  “काय हा पागल माणूस आहे!”  अशा नजरेने टी सी ने जॉन कडे पाहिले व त्याचा पास परत दिला आणि घाईघाईने तो बाहेर जाणाऱ्या गेटकडे निघाला.
    जॉनने आरामात चहा घेतला,चहाचे पैसे चुकते केले व गेटवर आला.टी सी कडे पाहून मिश्कीलपणे पास दाखऊ का असे खुणेनेच विचारले.
   वैतागूनच त्याने त्याला हात जोडले व बाहेरचा रस्ता रस्ता दाखवला!
  जॉन बाहेर आला.टी सी ला बाजूला नेवून तयार झालेल्या संधीचा फायदा घेऊन जॉनचे मित्र गेटमधून बाहेर पडून समोरच्या झाडाखाली जॉनची वाट पहात होते.हसत हसत जॉन पुन्हा त्यांच्या गप्पांत सामील झाला!....

       त्याचा अजून एक किस्सा असाच रंजक आहे. एकदा तो आपल्या बाईकवरून चालला होता घाईमध्ये त्याच्या लक्षात आले नाही व चुकून एकेरी वहातूक असलेल्या गल्लीत विरुध्द दिशेने गेला. पुढच्या छोट्या वळणावरच वहातुक पोलीस उभा होता! आता मागे वळणे तर शक्य नव्हते.तो तसाच पुढे निघाला.पोलिसाने शिट्टी मारली व अपेक्षेप्रमाणे त्याला अडवले! त्याचे लायसन्स घेतले,चेक केले व 'नो एन्ट्री'तून आल्याबद्दल पावती फाडायला सांगितले.जॉनने ठरवले की आता याला कसेही करून पटवायला हवे. तो हवालदाराला म्हणाला-
“काकामाफ करा! घाईत माझ्या लक्षात आले नाही, पुन्हा असे नाही होणार!” ;पण हवालदार ऐकण्याच्या मनस्थितीमध्ये नव्हता.
तो दंडाची पावती फाडण्यासाठीच आग्रही होता! जॉन पुन्हा पुन्हा  काकुळतीला येऊन पैसे नाहीत असे सांगत होता;पण हवालदार काही ऐकेना. शेवटी जॉनने हवालदाराला हळूच कानात काहीतरी सांगितले.हवालदाराने विचित्र नजरेने त्याचेकडे पाहिले व मान डोलावली.जॉनने आपली मोटारसायकल वळवली व पुन्हा जेथे त्याने जेथे ‘नो एन्ट्री’ मध्ये प्रवेश केला होता त्या चौकाच्या तोंडाशी गाडी लाऊन उभा राहिला तेथून त्याला हवालदार जरी आडबाजूला उभा होता तरी दिसत होता.गल्लीतून नुकताच बाहेर तो येऊन उभा राहिल्यामुळे पाठोपाठ आलेल्या दोन तीन बाईकवाल्यांनी त्याला विचारले 
“पुढे हवालदार आहे का हो?”
जॉनने आडवी मान हलवल्याबरोबर सगळेजण ’नॉ एन्ट्री’ मधून पुढे गेले, त्यांना पाहून मागे एकापाठोपाठ अजून चारपाच बाईक गेल्या.
जॉनने पोलिसाला हाताने खूण केली.
“जाउ का?”
हवालदार हसला व त्याने त्याला खुणेनेच जायला सांगितले!
जॉनने आपली बाईक चालू केली व पुढे आपल्या मार्गाने निघाला.
हवालदाराशी केलेल्या मांडवलीप्रमाणे जॉन ने दहा-बारा ‘ बकरे ‘ हवालदाराला दिले होते!......
     अशीच एक मजेदार घटना बसच्या संदर्भातली ...  
    जॉन  दुपारची ड्यूटी करायचा.पुणे स्टेशनवरून भोसरीकडे जाणारी बस पकडून तो रात्री  दहाला घरी जायचा.दापोडीला तो उतरायचा. दुपारची ड्युटी असली की तो असाच बसने घरी जायचा. त्या दिवशी ऑफिसमध्ये जरा जास्त काम होते,त्यामुळे त्याला भोसरीला जाणारी रात्रीची शेवटची बस मिळाली.बसमध्ये दोन तीन प्रवाशीच होते, तेही बोपोडीला उतरून गेले. आता हा एकटाच प्रवासी म्हणून बसमध्ये उरला.
 दापोडी आल्यावर तो बसच्या दरवाजासमोर जावून उभा राहिला; पण शेवटची ट्रीप असल्यामुळे ड्रायव्हर व कंडकटर दोघांचेही लक्ष नव्हते.जॉनने बस थांबली नाही हे पाहून स्वत:च बेल ओढली;पण तोपर्यंत दापोडी ओलांडून बस अर्धा किलोमीटरवर पुढे आली होती!
पुढच्या थांब्यावर बस थांबली.                                                                                                         ”घ्या उतरून ...” कंडकटरने जॉनला फर्मावले.                                                        ‘अरे कंडकटरसाहेब मला दापोडीला उतरायचे आहे, मला दापोडीलाच सोडा.                                        “उतरून घे रे, जा ना चालत परत!” 
कंडकटरने उद्धट स्वरात सांगितले;पण जॉन खाली उतरला नाही.                         “कंडकटसाहेब मला दापोडीला उतरायचं आहे,तुम्ही गाडी तेथे थांबवली नाही, आता परत गाडी वळवा आणि मला दापोडीच्या थांब्यावर सोडा, इथे मी उतरणार नाही!”  जॉन विनवणीच्या सुरात बोलत होता.                                                                     “ये उतर खाली; नाहीतर गाडी आता डेपोला जाणार आहे,तिथेच उतरवून देईन!”
 आता त्याच्या मदतीला ड्रायव्हर सुध्दा आला. “मी उतरणार नाही सांगितले ना ,गाडी डेपोला घे नाही तर पोलीस स्टेशनला! माझे दापोडीचे तिकीट आहे, मला दापोडीला सोडायचं”    
आता जॉनने एका बाकावर बैठक मारली. 
जॉन तसा तब्बेतीने मजबूत होता त्यामुळे बळजबरी करणे तर शक्य नाही हे दोघांच्याही  लक्षात आले.                                                                                 “चल रे घे डेपोला गाडी, कसा उतरत नाही ते बघू!” कंडकटरने ड्रायव्हरला फर्मावले.                                 आता बस भोसरी डेपोला आली, गेटवर थांबली. ते दोघे जॉनला उद्धटपणे उतरायला सांगू लागले.धमक्या देवू लागले.   
जॉनचा सत्याग्रह चालूच होता.तो बाकावरून जाम उठायला तयार नव्हता!
 आता कंडकटर व ड्रायव्हरच्या मदतीला सुरक्षा रक्षकही होता;पण त्याच्या अंगाला हात लावायचं धैर्य कुणालाच होत नव्हतं!.
काय करावे ते तिघांनाही समजत नव्हते.शेवटी गेटवरून त्यांनी डेपोच्या व्यवस्थ्यापकाला फोन केला.तो समझदार होता.
त्याने ड्रायव्हरला सांगितले. “जा ,त्याला दापोडीला सोडून ये. तक्रार झाली तर नोकरीवर गदा येईल!” 
   ड्रायव्हरने नाईलाजाने गाडी परत दापोडीकडे वळवली थांब्यावर आल्यावर जॉनला म्हणाला..                                                                                             “आता तरी उतर ना बाबा!”                                                                                मठ्ठाप्रमाणे बसलेल्या जॉनने आता स्मितहास्य केले व खाली उतरला, तोपर्यंत रात्रीचे बारा वाजून गेले होते.                 
    ही गोष्ट इथेच संपती तर तो जॉन कुठला.दुसऱ्या दिवशी जॉनने शहर वाहतूक व्यवस्थेच्या मुख्य महाव्यवस्थ्यापकाला भेटून रीतसर लेखी तक्रार केली आणि मग पुढील पंधरा दिवस ते उद्धटपणे बोलणारे कंडकटर व ड्रायव्हर जॉनच्या हातापाया पडत होते, परत परत माफी मागत होते, दिलेली तक्रार मागे घेण्याची विनंती करत होते! 
  शेवटी जॉनने लेखी माफीनामा घेवून तक्रार मागे घेतली! तर असा हा जॉन मेणाहून मऊ, तर प्रसंगी वज्राहून कठीण होता......
.....तर जॉन रिटायर झाला.अलीकडे त्याच्याशी संपर्क नव्हताच....
दिवस,महिने, वर्षे जात राहिली....
 ....परवाच त्याकाळी आमच्याबरोबर त्या सेक्शनमधे काम करणारा दत्ताराम भेटला.बराच वेळ इकडच्या तिकडच्या गप्पा मारत बसलो. सेक्शन मधील सगळी धमाल पुन्हा आठवली!
“अरे जॉनची काय खबर?” "बर चाललय ना त्याच?"
दत्ताराम गंभीर झाला.
“फार हाल झाले रे शेवटी त्याचे!”
“अस काय झाल?” “शेवटी म्हणजे ? तो आहे ना?”
“नाही रे महिन्यापूर्वीच तो गेला! “.... माझ्यासाठी हा मोठा धक्का होता.
“कसा गेला रे, आजारी होता का?”
दत्तारामने सांगितले...
"अरे आयुष्यभर तो दुर्धर आजाराशी लढत होता! आपल्या सेक्शनमध्ये असतानाच त्याचा आजार त्याला समजला होता; पण कुणालाच माहीत होऊन दिले नाही त्याने! कायम हसत होता, हसवत होता! त्याच्या चेहऱ्यावर आपण कायम फक्त मिश्कील हसूच बघत होतो; पण आयुष्यभर तो दुर्धर कैन्सरशी लढत होता! अगदी जवळच्या माणसांना सुध्दा त्याचा हा आजार माहीत नव्हता! घरी एकटाच असायचा! शेवटी शेवटी त्याचा आजार खूपच बळावला व त्यातच गेला तो!”
दत्तारामला अगदी भरून आलं होतं.
    मी सुन्नपणे बसून राहिलो.खरच आपण समोरच्या माणसाला 'ओळखतो' असे म्हणतो पण कितपत ओळखत असतो ? 
अशा अनेक हसऱ्या चेहऱ्यामागची किती जणांची दु:खे आपल्याला माहीत असतात?
.......मनोमन जॉनला मी सलाम केला.
........ती संध्याकाळ खूपच उदास उदास होती !!!!                                                                © प्रल्हाद दुधाळ.(९४२३०१२०२०)

प्रकाशित -साहित्य चपराक दिवाळी विशेषांक २०१५ .

Friday, March 21, 2014

अहंकार.

                                                       अहंकार. 
            कधीतरी आपण बसने प्रवास करत असतो आपला अत्यंत चांगला मूड असतो.शेजारच्या सीटवरील माणसाशी मस्त गप्पा मारत मजेत प्रवास करू, असा विचार तुम्ही करत असता.तशी गप्पा मारायला सुरुवातही तुम्ही करता पण शेजारचा माणूस तुच्छतेने तुमच्याकडे एक नजर टाकतो व मान वळवून बसतो.त्याच्यात असणाऱ्या अहंकारामुळे तो तुम्हाला बोलण्यायोग्य समजत नाही!
                कधी तुम्ही एखाद्या नातेवाईकाच्या किंवा मित्राच्या घरच्या लग्न समारंभाला जाता अनेक ओळखीची मंडळी आजूबाजूला वावरत असतात,पण प्रत्येकजण आपण कुणीतरी स्पेशल असल्याच्या थाटात वावरत असतो. आपल्याच विश्वात रममाण झालेला असतो.चुकून कोणी बोलला तरी तो स्वत:बद्दलची ‘मी’पणाची टेप वाजवायला लागतो.एकूणच ”मी असा आणि मी तसा” याचा जपच ऐकू यायला लागतो.
                अशा प्रकारे आपल्या दररोजच्या आयुष्यात अनेक अहंकारी व्यक्तींशी आपला संबंध येत असतो तर कधी कधी आपण सुद्धा अहंकार बाळगून समोरच्याशी वागत असतो! काय असतो हा अहंकार? माणसाच्या स्वभावात तो कसा येत असावा? प्रत्येक माणसाच्या स्वभावात अनेक गुणअवगुण असतातच. येथे ‘अहंकार’ या अवगुणाबद्द्ल मी चर्चा करणार आहे.
    माणसातला सर्वात धोकादायक असलेला अवगुण म्हणजे त्याच्यामधे असणारा अहंकार( इगो) होय! माझ्या मते जन्मानंतर काही दिवसच लहान मूल खऱ्या अर्थाने निरागस असते!तेवढेच मोजके काही दिवस कुठल्याही भाव भावना त्याच्या मनात नसतात,पण थोड्या दिवसातच त्याला आपली जवळची माणसे-जसे की आई, वडील,आज्जी, आजोबा वा इत्तर नातेवाईक ओळखायला येऊ लागतात.आपली जवळची माणसे कोण?अनोळखी कोण? याचा त्याला बोध व्हायला लागतो त्यातही आपल्या माणसांपैकी त्याचे कोण जास्त लाड करतो तेही हळुहळु त्याला समजायला लागते.त्यामुळे नकळतच आवडता-नावडता ही भावना त्याच्या मनात रुजली जाते.त्यामुळेच काही ठराविक माणसे समोर दिसली की बाळाची कळी खुलते तर काही व्यक्ती समोर येताच बाळ भोकाड पसरते! हळू हळू त्यातल्या आवडत्या माणसांवर फक्त त्याचा एकट्याचा अधिकार असल्याची भावना किंवा समज त्याला यायला लागते.थोडक्यात मोठेपणी ज्या बऱ्यावाईट सवयी लागू शकतात त्याची सुरुवात नकळत या निरागस वयातच होते.यापुढची पायरी म्हणजे त्याला त्याच्या वस्तु कोणी घेतलेल्या आवडत नाहीत.चुकुन जर त्याच्या माणासांवर, त्याच्या वस्तुंवर कुणाचे अतिक्रमण झाले तर रडून वा गोंधळ घालुन ते आपला निषेध व्यक्त करु लागते. मी म्हणजे कुणीतरी स्पेशल व्यक्ती असल्याची जाणीव त्याला व्हायला लागते त्याच्या  हसण्याला बोबड्या बोलण्याला एवढेच काय प्रत्येक लहान मोठ्या बाललीलांना मिळणारा प्रतिसाद त्याच्या मनावर कुठेतरी नोंदवला जातो. त्याच्या पालकांकडूनही त्याच्या प्रतिक्रियेला लगेच सकारात्मक प्रतिसाद दिला जातो त्याच्या हट्टाला नकळत खतपाणी मिळते त्याला विशेष महत्व मिळते व हळूहळू तशा प्रतिसादाची त्याला सवय जडते.आपण कुणीतरी विशेष आहोत आणि आपण जसे पाहिजे तसे आजुबाजुच्या माणसाना वागायला भाग पाडू शकतो ही जाणीव या चक्रातली पुढची पायरी असते.ही पायरी म्हणजे माणसामधील अहंगंडाचा मीपणाचा पाया असतो.पुढच्या आयुष्यात हीच व्यक्ती कुणाचा तरी मुलगा, कुणाचा तरी मित्र वा नातेवाईक म्हणून ओळखला जातो या बरोबरच तो उच्च शिक्षण घेउन आपल्या नावासमोर वेगवेगळ्या पदव्या लावायला लागतो,आपल्या शिक्षणाला साजेशी नोकरी त्याला मिळते अथवा एखादा बडा उद्योग तो सुरु करतो.आपल्या कर्तुत्वाच्या जोरावर तो सर्व प्रकारचे यश मिळवतो.त्याची स्वत:ची ओळख आता बनायला लागते,बंगला गाडी,नोकर चाकर अशी सर्व प्रकारची सुखे हात जोडून त्याच्या समोर उभी रहातात.सुंदर पत्नी व गोंडस मुळे या वैभवात अजून भर घालतात सत्ता आणि संपती व ऐश्वर्य एकदा मिळाले की त्याबरोबरच या सत्ता व श्रीमंतीचा कैफ त्याला चढायला लागतो.काही खुशमस्करे त्यांचा अहंकार कुरवाळत त्याच्या कडून आपला योग्य तो फायदा करून घेतात. समाजात आपण कुणीतरी विशेष आहोत आपला वेगळाच वट आहे असे तो समजायला लागतो,आपला सामाजिक व आर्थिक स्तर इत्तरांपेक्षा वरचा असल्याची भावना व त्या सोबतची मग्रुरीही स्वभावात व त्याच्या वागण्या बोलण्यात येते.अहंकारी माणूस स्वत:ला विशेष मानत असल्यामुळे तशाच प्रकारची विशेष वागणुक सर्वांकडून त्याला मिळायला हवी अशी नकळत अपेक्षा व पुढच्या टप्प्यात जबरदस्ती आजुबाजुच्या माणसांना तो करायला लागतो. ही विशेष वागणुक म्हणजे त्याला त्याचा हक्क वाटू लागतो! प्रसंगी साम दाम दंड भेद अशी सर्व प्रकारची आयुधे वापरुन हा विशेष दर्जा कायम राखण्याचा प्रयत्न केला जातो.एकदा का ही ग ची बाधा त्याला झाली की असा माणुस नाती-गोती,सखे-सोबती अशा सगळ्यां नात्यांशी फारकत घेतो.आपला अहंकार कुरवाळत बसण्याचे त्याला व्यसनच लागते.हा अहंकाराचा फुगा मग फुगतच रहातो.अशा अहंकारी माणसाचा संबंधच नको असा विचार करून आजुबाजुला वावर असणारी माणसे एक एक करुन त्याच्यापासून तन व मनाने दूर होतात.त्याच्या घमेंडखोर बोलण्याने काही संबंध तर तो स्वत:च तोडतो. या सर्वाचा परिणाम म्हणून मने दुखावलेली अशी अगदी जवळची वा संबंधातली माणसे दुरावतात, पण अहंकारी माणसाला त्याची जाणीव नसते.मित्रमंडळी,नातेवाईक,धंद्यातले भागीदार, हाताखालचे कर्मचारी एवढेच नाही तर कुटूंबातील जवळच्या व्यक्तीसुध्दा अशा माणसाला टाळायला लागतात व एक दिवस असा उगवतो की त्याच्या अहंकाराबरोबर तो फक्त एकटाच असतो.त्याच्या हट्टी,दुराग्रही व अहंकारी स्वभावामुळे तो मानसिक आजाराला बळी पडायला लागतो अशा माणसाने वेळीच आपला अहंकारी स्वभाव स्वत:च बदलण्याचा प्रयत्न केला नाही तर त्याचे भयंकर परिणाम त्या माणसाला आयुष्यभर भोगावे लागतात.
                अहंकार कशाचाही असू शकतो.कधी कुणाला विद्वत्तेचा,कुणाला सत्तेचा,कधी संपत्तीचा तर कधी फुकट्च्या बडेजावाचाही अहंकार असु शकतो. अहंकार मग तो कोणत्याही प्रकारचा असो तो वाईटच,नाही का?
तुम्हाला काय वाटते ?
                            ............प्रल्हाद दुधाळ.पुणे.
(९४२३०१२०२०)
                                                

Sunday, February 16, 2014

नाही म्हणायला शिका!

                                                            नाही म्हणायला शिका!

   एक गोष्ट नक्की आहे की, जर माणसाला स्वत:बद्दल आत्मविश्वास असेल तरच तो इत्तरांवर विश्वास ठेऊ शकतो! मला असे वाटते की,जेंव्हा  कधी आपला कुणी नातेवाईक,मित्र,वा दररोज संपर्कात येणारा जवळचा माणूस एखाद्या गोष्टीबद्दल काही सांगतो,त्यावेळी अशा बोलण्यावर  विश्वास ठेवण्यापूर्वी  व त्याप्रमाणे वागण्यापुर्वी, त्या सांगितलेल्या गोष्टीबद्दल शहानिशा करायला हवी. याशिवाय त्याबद्दल आपल्या अंतर्मनाचा कौलही घेणे आवश्यक आहे, पण असे घडत नाही! खर तर कुणी एखादी गोष्ट करायला सांगीतली तरी ती करायची की नाही या बद्दल निर्णय घेण्यापूर्वी वा तो निर्णय घेतल्या नंतर उद्भवणाऱ्या परिस्थितीची,बऱ्या वाईट परिणामांची तसेच संभाव्य फायदे अथवा तोट्यांची जाणीव प्रत्येकाला असायलाच हवी.एखाद्यावर अंधपणे विश्वास ठेवणे आयुष्यभरासाठी अडचणीचे होऊ शकते!
      साहजिकच प्रश्न उपस्थित होतो की,समोरच्या व्यक्तीवर अजिबात विश्वासच ठेवायचा नाही की काय? प्रत्यक्ष जीवनात समोरच्या व्यक्तीवर असा अविश्वास दाखवणे सोपे आहे का? मला वाटते की, अशावेळी समोरच्या व्यक्तीवर सरळपणे अविश्वास न दाखवता सौम्य भाषेत विचार करण्यासाठी वेळ मागून घेणे केंव्हाही चांगले! अशामुळे होते काय की,त्या जवळच्या व्यक्तीने सांगितलेल्या गोष्टीबाबत शांतपणे विचार करता येतो.त्या बाबीमुळे  होणारे संभाव्य नुकसान आपण टाळू शकतो.जनलज्जा व भिडेखातर कोणतीही चिकित्सा न करता कुठल्याही बाबतीत अतिविश्वास ठेवला तर बऱ्याचदा आपल्या पदरी नको तो  मनस्ताप व निराशा येऊ शकते,म्हणून आयुष्यात अशावेळी थोडासा वाईटपणा घेऊन,योग्य तेथे स्पष्ट भाषेत नकार द्यायला शिकणे अत्यंत आवश्यक आहे! अशाप्रकारे विचारपूर्वक निर्णय घेतल्यानंतर सहसा पश्चाताप करण्याची वेळ येणार नाही.आपल्याला प्रश्न पडला असेल की हे ज्ञान मला कुठून मिळाले?आणि ते मी येथे का पाजळतो आहे? हा प्रश्न अगदी साहजिक आहे,तर आता सांगायला हरकत नाही की ही अक्कल मी विकत घेतलेली आहे! शहाणपणा अनुभवातुन आलेला आहे! बाबतीत मला आलेले अनुभव अजून काही लोकांनाही आलेले असतील आणि त्यावरून कुणाची होणारी संभाव्य फसवणूक तरी टाळली जाईल!
     तर, एकदा माझा एक ऑफिसमधील सहकारी माझ्याकडे आला.त्याने माझ्यासाठी एक फॉर्म आणला होता. तो फॉर्म कुठल्यातरी इन्स्युरंस कंपनीचा होता.त्याने त्या स्कीमबद्दल व त्यानंतर मला होणाऱ्या संभाव्य फायद्याबद्दल थोडक्यात माहिती सांगितली.त्या स्कीम प्रमाणे मी फक्त तीन हजार रुपये एकदाच भरायचे होते व त्या बदल्यात मला कंपनी कडून तीन हजार रुपये किमतीचे साबण,तेल,पेस्ट इत्यादी रोजच्या घरगुती वापराच्या वस्तू डिस्काऊंट वर मिळणार होत्या! शिवाय माझा एक लाख रुपयांचा जीवनभरचा अपघात विमा ती कंपनी देणार होती.या फायद्याशिवाय जर मी त्या प्रकारचा फॉर्म आणखी कुणाला दिला व एक ग्राहक मिळवून दिला तर कंपनीकडून मला एक हजार रुपये परत मिळणार होते! ज्याने माझ्याकडे ही स्कीम आणली तो माझा सहकारी अगदी दररोजच्या संबंधातला असल्यामुळे मला त्याला नाही म्हणता आले नाही आणि भिडेखातर मी कुठलाही मागचा पुढचा विचार न करता तीन हजाराचा चेक त्याला दिला.आठ-दहा दिवसातच मला एक ब्रीफकेस घरपोच मिळाली! त्यामध्ये मी आयुष्यात कधीही न पाहिलेल्या ब्रांड च्या वेगवेगळ्या वस्तू भरलेल्या होत्या.
याशिवाय स्कीम मध्ये कबुल केल्याप्रमाणे अपघात विमा प्रमाणपत्रही होते.केवळ भिडेखातर केलेल्या या व्यवहारामध्ये मला दिलेला फॉर्म मी न वाचताच सह्या केल्या होत्या.येथे मी माझ्या त्या सहकाऱ्यावर अगदी डोळे झाकून विश्वास ठेवला होता.नंतर लक्षात आले की मिळालेल्या वस्तू या अगदीच सुमार दर्जाच्या होत्या! विम्यासाठीच्या अटी व शर्ती अत्यंत फसव्या स्वरूपाच्या होत्या.याशिवाय या विम्याचे दर वर्षी नुतनीकरण सुध्दा करणे आवश्यक होते! आपण आपल्या अगदी जवळच्या माणसाकडून अत्यंत पद्धतशीरपणे फसवले गेलो आहे याची आणि याबद्दल भिडेखातर गप्पही राहावे लागणार असल्याची जाणीव होईपर्यंत उशीर झाला होता! थोडक्यात ” तोंड दाबून बुक्क्यांचा मार” असा तो प्रकार होता. आपल्याला फसवले गेले व आपण अगदी सहजपणे फसलो गेलो या गोष्टीचा अर्थातच खूप मानसिक त्रास झाला! पण एका अनुभवाने शहाणा झाला तर माणूस कसला! हा अनुभव पुरेसा नव्हता की काय कोण जाणे, म्हणून वेळोवेळी अशाच प्रकारे अनेक मित्रांकडून व अगदी जवळच्या माणसांकडून   विविध मल्टीलेवल मार्केटिंग व आभासी फायद्याच्या योजना मला सांगितल्या गेल्या व भाग घेण्याबद्दल गळ घातली गेली व “यांना कसे काय नाही म्हणायचे?” या भिडेखातर मी पुन्हा पुन्हा फसत राहिलो!स्वभावात असलेला मुखदुर्बळपणा कायमच मला संकटात ढकलत राहिला! असे अनेक आर्थिक व मानसिक फटके बसल्यानंतर मी एकदाचा “नाही” म्हणायला शिकलो! थोडक्यात मी आता जो शहाणपणा तुम्हाला शिकवतो आहे त्याची अक्कल मला हजारो रुपयांना विकत घ्यावी लागली आहे! अशा प्रकारच्या नवनवीन फसव्या स्कीम मार्केटमध्ये येत असतात.त्याचे पद्धतशीरपणे मार्केटिंग केले जाते.आपल्या अगदी जवळचा माणूस त्या जाळ्यात ओढला जातो व पुढच्या टप्प्यातील चेनसाठी तो तुमची निवड करतो! ती स्कीम त्यालाही अर्धवटच माहीत असते पण तो पोटतिडकीने तुम्हाला त्यातून मिळणाऱ्या फायद्यांबद्दल सांगत असतो! कंपनीचे डायरेक्टर्स म्हणून अनेक नामांकित लोकांची यादी दाखवली जाते.आत्तापर्यंत फायदा झालेल्या लोकांची भली मोठ्ठी यादी यावेळी वाचून दाखवली जाते.पंचतारांकित हॉटेलमध्ये तुम्हाला बोलावले जाते.आकर्षक पेहरावातल्या मधाळ बोलणाऱ्या कंपनी च्या रिप्रेझेंटेटिवज् कडून अत्यंत लाघवी भाषेत तुमचे स्वागत केले जाते.स्कीम बद्दल अत्यंत आकर्षक प्रेझेन्टेशन ऑडीओ व विडीओज च्या स्वरूपात सादर केले जाते.डायरेक्टर बोर्डावर असलेल्या मोठ्या मोठ्या लोकांची नावे पाहून नाही म्हटले तरी स्कीमवर तुमचा विश्वास बसतो.साखरपेरणी करून होणाऱ्या संभाव्य फायद्यांचे अत्यंत आकर्षक गाजर दाखवले जाते.तेथील एकूण भपकेबाज  वातावरण पाहून तुम्ही कंपनी च्या जाळ्यात अलगद फसता.एखादी रिस्क घ्यायला काय हरकत आहे? असा विचार करून तसेच जी व्यक्ती तुम्हाला तेथपर्यंत घेऊन गेलेली असते त्याचे मन राखण्यासाठी तुम्ही त्या स्कीम मध्ये भाग घेता.कधी कधी अशा स्कीम्स मध्ये हजारो रुपये कर्ज काढून गुंतवले जातात.अशा स्कीम्स मध्ये सुरुवातीला काही लोकांना फायदाही झालेला असतो त्यांचे बँक पासबुक पाहून मोठया विश्वासाने तुम्ही तेथे गुतंवणूक करता.येथे तुमची आर्थिक गुंतवणूक असतेच पण एक नवे स्वप्नही तुम्ही विश्वासाने खरेदी केलेले असते! जेंव्हा तुम्ही अशा स्कीम मध्ये फसले गेल्याचे लक्षात येते तेंव्हा आर्थिक नुकसानीबरोबरच तुमचा विश्वासघातसुध्दा झालेला असतो! पण वेळ गेलेली असते ज्या व्यक्ती मार्फत तुम्ही या जाळ्यात फसलेला असता ती एक तर तुमच्या अतिशय जवळची असते शिवाय अनेकदा या फसवणुकीची ती व्यक्ती सुध्दा शिकार झालेली असते!
  मल्टी लेवल मार्केटिंग हे केवळ एक उदाहरण झाले,पण आपल्या दैनंदिन जीवनात अनेकदा आपण केवळ ‘वाईटपणा घ्यायला नको’ म्हणून मनाविरुध्द निर्णय घेत असतो! कधी कुणाला विश्वासाने सांगितलेल्या गुपिताचा तुमची अगदी जवळची विश्वासातली व्यक्ती तुमच्या विरुध्द वापर करते,तर कधी कुणाला त्याच्या अडचणीत विश्वासाने दिलेले पैसे बुडवले जातात.जवळच्या माणसाबरोबर केलेल्या भागीदारी व्यवसायात फसवणूक होते.नातेसंबंधात अशा फसवणुकीच्या व विश्वासघाताच्या अनेक घटना घडत असतात. कधी जाणीवपूर्वक तर कधी अजाणता आपल्याला अशा फसवणुकीला सामोरे जावे लागते. विश्वासघातामुळे नात्यात तसेच मैत्रीत कायमचा दुरावा निर्माण होतो.अशा विश्वासघाताने आर्थिक नुकसानीपेक्षाही मनावर झालेली जखम खूप खोलवर असते.नंतर कितीही उपचार केले तरी ती सहजपणे भरून येत नाही. म्हणूनच अशा जखमा होऊच नयेत म्हणून योग्य ती खबरदारी घ्यायला हवी.विश्वासाने विश्वास ठेवता येतील अशी माणसे जोडायला हवीत.
  हे खरे आहे की,कधी कधी आयुष्यात असे काही व्यवहार करावे लागतात की ते करताना समोरच्या व्यक्तीवर विश्वास ठेवायलाच लागतो तेथे तुमच्या समोर दुसरा पर्यायच नसतो.अशा व्यवहारांमध्ये तशा प्रकारची फसवणूक होण्याची शक्यता फार कमी असते कारण एकमेकांवरच्या विश्वासावरच अशा व्यवहारांच्या इमारती उभारल्या जातात.पण त्यातूनही झालीच काही फसवणूक,तर ती टाळणे बऱ्याचदा तुमच्या हातात नसते.ती एक प्रकारे अपरिहार्यता असते,तेथे विश्वास ठेवल्याशिवाय व्यवहाराच पुढे सरकणार नसतो! पण जेथे सहज शक्य आहे तेथे तरी आपण कुणावर विश्वास ठेवायचा आणि कुणावर नाही हे तरी नक्कीच ठरवू शकतो!
    प्रश्न आर्थिक असो,भावनिक असो किंवा इत्तर कुठल्याही प्रकारचा असो कुणावर विश्वास ठेवण्यापूर्वी संबंधीत बाबीची योग्य त्या निकषांवर खातरजमा करायला हवी.कोणी कुणाबद्दल काही बरे वा वाईट मत व्यक्त केले तर तेच तुमचे मत बनवणे धोकादायक ठरू शकते.पूर्वग्रह न बाळगता आपल्या स्वत:च्या नजरेने व अनुभवाच्या कसोटीवर घासून त्रयस्थपणे समोरच्या व्यक्तीची पारख करणे थोड्या अभ्यासानंतर सहज शक्य आहे! व्यवहारात किंवा नातेसंबंधात आजूबाजूला उठणाऱ्या वावड्यांवर विसंबून विश्वास ठेवणे संबंधीत व्यवहार अथवा नातेसंबंध अडचणीत आणू शकते म्हणून अंधपणे विश्वास ठेवण्यांऐवजी तारतम्याने विचारपूर्वक आत्मविश्वासाने निर्णय घेणे शहाणपणाचे ठरते.
  आता वरील विवेचनावरून "सहजासहजी कुणावर विश्वासच ठेवायचा नाही का?" असा विचार मनात येणे साहजिक आहे."चुकून विश्वासायोग्य व्यक्तीवर अविश्वास दाखवला तर संबंधात  दुरावा नाही का येणार?"  तर येथे मी पुन्हा सांगतो की,माणसे ओळखण्याची कला तुमची तुम्हालाच आत्मसात करावी लागेल! देहबोलीचा (बॉडी-लँग्वेज) थोडाफार अभ्यास केल्यास विश्वासायोग्य कोण आणि अयोग्य कोण हे तुम्ही सहज ओळखू शकाल. एवढे मात्र नक्की की तुम्हाला या जगात जर आनंदात जगायचे असेल तर योग्य तेथे नाही म्हणता आलेच पाहिजे! आणि कोणत्याही गोष्टीला हो किंवा नाही म्हणायचा अधिकार तुम्हाला नक्कीच आहे!
तुम्हाला काय वाटते!
                                        ..........प्रल्हाद दुधाळ, पुणे.
                                                ९४२३०१२०२०.