Saturday, October 10, 2020

नावाचा घोळ....

 नावाचा घोळ....

   

     आमच्या टेलिफोन खात्यात जवळपासच्या खेड्यातून अनेक ग्रुप डी कर्मचारी कामावर यायचे.लोहगाव,वडगाव, केसनंद,वाघोली, फुरसुंगी इत्यादी गावांतून असे शेकडो कर्मचारी कामाला यायचे.

   मी नोकरीला लागल्यावर हळू हळू या लोकांशी ओळखी झाल्या आणि मग त्या त्या गावांच्या उरसाची निमंत्रणे आम्हाला मिळायला लागली. ही झाली ओळखी झाल्यानंतरची गोष्ट, पण नोकरीला  लागल्यावर पहिल्याच वर्षी घडलेली एक गोष्ट सांगतो....

   माझ्याबरोबर केसंनंद गावावरून दररोज ये जा करणारे ज्ञानेश्वर हरगुडे  हे काम करायचे.मीही खेड्यातून आलेला असल्याने आमची थोड्याच दिवसात चांगली मैत्री झाली होती.आम्ही त्याला माऊली या नावाने हाक मारायचो...

   डिसेंबर महिन्यात केसनंद गावचा उरूस असतो.माऊलीने सांगितले होते की उरसापूर्वी   पंधरा दिवस आधी त्यांच्या गावात दूध किंवा  दुधाचे सगळे पदार्थ वर्ज्य केले जातात,अगदी लहान मुलांनाही दूध दिले जात नाही! या काळात सगळे गाव कोरा चहा पिते...

  त्या वर्षी पहिल्यांदाच माऊलीने आम्हा मित्रमंडळींना उरसाच्या दिवशी संध्याकाळी केसनंदला यायचे निमंत्रण दिले.तोपर्यंत त्या गावाबद्दल तिथल्या लोकांबद्दल फार काही माहीत नव्हते....

   ऑफिस सुटल्यावर त्या दिवशी आम्ही सात आठजण सायकलवर पंधरा किलोमीटरवर असलेल्या केसंनंदला निघालो....

   एक तर अंधार आणि आमच्यापैकी कुणी याआधी तिकडे गेलेला नसल्याने रस्ता विचारत विचारत आम्ही त्या गावात एकदाचे पोहोचलो....

  " इथे माऊली हरगुडे कुठे रहातात हो? "

आमच्यापैकी एकाने रस्त्यात एकाला विचारले...

 " हे काय इथे ,चला माझ्याबरोबर...."

आम्हाला ती व्यक्ती एका चाळवजा घरात घेऊन गेली....

   आत जाऊन त्याने पाण्याचे तांबे भरून आणले आणि म्हणे...

"घ्या हात धुवून ...."

आम्ही हातपाय धुवेपर्यंत त्याने बसायला घोंगड्या अंथरल्या, आम्ही नजरेने माऊलीला - आमच्या मित्राला शोधत होतो, तोपर्यंत ती व्यक्ती म्हणाली...

" चला घ्या बसून जेवायला. .'

"माऊली कुठाय? "

" येईल तो एवढ्यात, बसा तुम्ही...."

समोर सुके मटण, कलरफुल रस्सा,चुलीवरच्या खरपूस भाकरी, कांदा लिंबाच्या फोडी भरलेली ताटे वाढली गेली. बऱ्यापैकी सायकलिंग झाल्याने सगळ्यांना सडकून भुका लागल्या होत्या....

   आम्ही सगळेजण त्या झणझणीत टेस्टी जेवणावर तुटून पडलो....

आमचे जेवण  करून झाले तरी आमचा मित्र माऊली काही आम्हाला दिसेना...

" अहो माऊली कसा काय नाही आला अजून?" 

  आमच्यातल्या एकाने पुन्हा विचारले....

 मग मात्र ती व्यक्ती बोलली...

"मी सुध्दा माऊली आहे की!"

आणि मी सुध्दा टेलिफोन खात्यात काम करतो की!"

आमच्या चेहऱ्यावरची प्रश्नचिन्ह बघून शेवटी त्याने खुलासा केला....

" अहो खरंच, माझं नाव ही ज्ञानेश्वर हरगुडे आहे मलाही माऊली म्हणतात ..."

"मी लाईनमन आहे...

तुमचा माऊली ना, तिकडे वस्तीवर रहातो चला तुम्हाला सोडतो तिकडे!"

 म्हणजे आम्हाला भलत्याच माऊलीने जेवायला घातले होते तर!

 मग त्याने खुलासा केला...

 "पोरांनो तुम्ही टेलिफोन खात्यात नव्याने आलात म्हणून माहीत नाही तुम्हाला....

 आमच्या गावातल्या जवळ जवळ प्रत्येकाचे आडनाव हरगुडे आहे आणि प्रत्येक घरातला निदान एकजण तरी टेलिफोन खात्यात नोकरीला आहे! अजून एक - या गावात एकाच  नावाची दोन - दोन, तीन - तीन माणस आहेत बरं का! चला माऊलीचे घर दाखवतो!"

 एकदाचा आमचा माऊली आम्हाला भेटला आणि मग पुन्हा एकदा जेवणाची फर्मास पंगत जमली....

 नंतर हे चांगलच लक्षात आले की आमच्या लाईन स्टाफ मध्ये हरगुडे,शिंदे,सातव, हरपले  आडनाव असलेल्या माणसाचे नुसते आडनाव माहीत असून चालणार नाही तर त्याचे संपूर्ण नाव माहीत असायला हवे, कारण असे एकच आडनाव असलेली शेकडो माणसे पुण्यातल्या टेलिफोन खात्यात लाईनमन म्हणून काम करतात!

   ©प्रल्हाद दुधाळ.

No comments:

Post a Comment