Saturday, October 10, 2020

संघर्ष व सकारात्मकता

 

#encouragement

 काही काही लोकांच्या प्रारब्धात केवळ संघर्षच लिहून आलेला असतो, जीवनाच्या प्रत्येक वळणावर त्याला संघर्ष केल्याशिवाय पुढे जाताच येत नाही!

   माझ्या आयुष्याचे तसेच काहीसे आहे..

 मला जीवनात मिळालेल्या प्रत्येक यशाची एक संघर्ष गाथा आहे ती सगळी इथे मांडणे शक्य नाही!   तरीही ....

   मी जन्म घेतल्यापासूनच माझी जगण्याची लढाई सुरू झाली होती.माझी आई सांगायची की  जनमलो तेव्हा मी खूप अशक्त आणि आजारी होतो,जगतो की मरतो अशी माझी अवस्था होती, पण ती लढाई जिंकली! असो... 

   या लेखाचा विषय प्रेरणादायी संघर्ष असला तरी मला माझ्या संघर्षापेक्षा माझ्या सकारात्मक विचारांच्या जोरावर मला कसे मार्ग मिळाले ते सांगणे आवडेल....

त्या प्रत्येक अडचणीच्या प्रसंगी कितीही त्रास झाला असला तरी शेवट सुखांत होता,मला सदैव एक अदृश्य शक्ती मदत करत होती,त्यामुळे असेल किंवा अशी मदत मला मिळणारच आहे या सकारात्मक विचाराच्या जोरावर असेल, मी अडचणी आल्या तरी त्यातून बाहेर पडलो...

आकर्षणाचा सिद्धांत मी हल्ली हल्ली वाचला पण त्याचा अनुभव मात्र मी लहानपणापासून घेतो आहे...

 माझे वडील मी तेरा वर्षाचा असताना गेलेले होते आणि आईच्या कष्टावर/ कसेबसे आमचे जगणे चालू होते.माझी आई कष्टाळू तर होतीच याशिवाय कमालीची स्वाभिमानी होती.धनाच्या बाबतीत दारिद्र्य असले तरी मनाची प्रचंड श्रीमंती तिच्या ठाई होती! सगळ्यांच्या मदतीला कायम तत्पर असणाऱ्या तिला कुणाकडूनही काही मागितलेले मात्र अजिबात खपायचे नाही. अभावातही मार्ग काढत जगण्याचे बाळकडू मला तिच्याकडून मिळाले.'आला दिवस जमेल तसा साजरा करायचा आणि पुढे चालायचे' ही तिची शिकवण मला पुढच्या आयुष्यात सतत कामाला आली....

घरी कमालीचे दारिद्र्य, खायची मारामार होती, असलेली थोडीशी जमीन गहान पडलेली, मोठा भाऊ दारूच्या आहारी गेलेला,अशा परिस्थितीत मी शिकत होतो. परिस्थितीने त्या वयातच एवढी प्रगल्भता आली होती की माझे सगळे लहानपण हरवून गेले होते.

    मी साधारण १० वी झालो होतो आणि अशी वेळ आली की सावकाराकडे गहान असलेली जमीन तो जप्त करणार असल्याची खबर मला मिळाली.नेमका त्याच सुमारास माझा एक चुलत चुलत भाऊ रिटायर झाला. कसं काय माहीत नाही, पण मला त्याला भेटून 'ती जमीन सोडव आणि तुझ्याकडे ठेव,मी नोकरी मिळाली की पैसे देईल' असे सांगायची बुध्दी मला झाली आणि विशेष म्हणजे माझ्या शब्दांवर विश्वास ठेऊन त्याने मदत केली...

   अभ्यासाला पोषक वातावरण नसूनही नशिबाने मी अभ्यासात हुशार होतो. अगदी पहिली ते दहावीपर्यंत मी शाळेत पहिला यायचो आणि केवळ हेच माझे सामर्थ्य होते! मला हायस्कूल स्कॉलरशिप, १२ रुपये महिना मिळायची, सहा महिन्याची स्कॉलरशिप ७२ रुपये एकदम आले की पुढचे चारपाच महिने घरातली तेल मिठाची नड भागवायची. नादारीमुळे शाळेच्या फीचा प्रश्न नव्हता, पण दहावीच्या फॉर्म फी साठी काय करायचे हा मोठा प्रश्न समोर आला होता...

   इथेही माझे प्रगतीपुस्तक कामाला आले आणि पडवळ नावाच्या शिक्षकाने माझी फी भरली...

   अकरावीला लोणंद या गावी नातेवाईकाकडे रहावे लागले, पण मानी स्वभावामुळे मी सहा महिन्यातच मी माझ्यासारख्याच एका फाटक्या मित्राच्या खोलीवर रहायला गेलो. जुनीपानी भांडी गोळा करून स्वतःची भाकरी तयार करायला शिकलो.इथले रयत शिक्षण संस्थेच्या हायस्कूलचे बा.ना.येडेकर नावाचे मुख्याध्यापक आणि पुढे १२ वीला निरेत भोसले सर देवासारखे मागे उभे राहिले आणि अत्यंत वाईट आर्थिक आणि मानसिक परिस्थितीतही मी बारावी पास झालो.

    निरा गावात शिकत असताना जवळ पैसे नाहीत म्हणून सलग चार दिवस उपाशी रहाण्याची वेळ आली तेव्हाच ताटातली भाकरी किती मोलाची असते याचा साक्षात्कार झाला...

त्यावेळी क्षीरसागर नावाचा वीज मंडळाच्या लाईनमनने येऊन माझ्या खिशात नको नको म्हणत असताना वीस रुपयाची नोट कोंबली ...

वेळेला मिळालेल्या या मदतीला काय म्हणावे?

  पुढे पुण्यात दुसऱ्या भावाकडे शिक्षणासाठी आलो, पण त्याचवेळी त्याला परदेशी जायची संधी आली आणि त्याने आपले कुटुंब गावी पाठवले व तो दुबईला गेला.

    पोटासाठी एक भाकरी थापून मी भाड्याच्या सायकलवर १५ किमी सायकलिंग करून गरवारे कॉलेजला जायला लागलो.

   ज्या नागपूर चाळीत मी रहात होतो तिथे माझ्या नव्याने जोडलेल्या मित्रांत  आम्ही शिकणारी एकदोन मुले सोडली तर सगळा आनंदच होता.सगळ्या प्रकारची व्यसने करणारे अनेक मित्र आजूबाजूला होते, पण आपण त्यांच्यासारखे करून बघावे असे कधी वाटले नाही,उलट त्या छंदीफंदी मित्रांनी कायम मला अडचणीच्या वेळी सपोर्टच केला.पैशांची चणचण पाचवीलाच पुजलेली होती, त्यावेळी त्या गलिच्छ वस्तीतल्या इस्माईल खान या बेकरी दुकानदाराने तसेच राजू गुप्ता नावाच्या किराणा दुकानदाराने मला 

" जितना चाहे माल उधार लेके जाना, नोकरी लगेगी तब पैसा देना" असे सांगितले होते आणि स्वतःहून  मदत केली ते माझ्या बाबतीत एवढे उदार होऊन उधार द्यायला स्वतःहून का तयार झाले याचे स्पष्टीकरण मला कधीच समजले नाही! नोकरी लागल्यावर मी त्यांची उधारी चुकवली!

  पुढे एक वर्षातच मला शिक्षणाचे स्वप्न अर्धवट सोडून नोकरी शोधण्याची वेळ आली आणि मला फार तिष्ठत न ठेवता माझ्या शालांत परीक्षेच्या गुणांच्या जोरावर मला  टेलिफोन खात्यात ऑपरेटर म्हणून नोकरी मिळाली! कुणाची तरी कृपादृष्टी असल्याशिवाय अडचणीच्या प्रसंगी एकदा नाही अनेकदा मार्ग मिळणे शक्य होते का? पण, हे सत्य आहे की प्रचंड अडचणी आल्या,त्या निर्मिकाने थोडीफार परीक्षा घेतली आणि संकटातून बाहेर पडण्याचे मार्ग मिळत गेले...कुणी याला अंधविश्वास म्हणेल,पण माझ्या सकारात्मक विचारांनी हे मार्ग माझ्यासमोर आले हा माझा ठाम विश्वास आहे....

  एकट्याच्या तुटपुंज्या पगारात समोर असलेले मोठे मोठे प्रश्न सुटणे केवळ अशक्य होते त्यामुळे आपण शक्यतो विवाह करताना कमावती मुलगी बघायची असा मी विचार करत होतो.माझ्या मनात विचार आला आणि मला हवे तसे स्थळ स्वतःहून समोर आले, लग्न व संसार उभारणी ही कामे माझ्या आर्थिक गणितात बसणे सोपे नव्हते,पण मार्ग निघत गेले... वडगाव शेरीत एका सिंगल खोलीत गांधी शेठच्या दुकानातून हप्त्यावर सगळ्या संसारोपयोगी वस्तू खरेदी केल्या आणि स्मिताचा आणि माझा संसार सुरू झाला!

लग्न ही गोष्ट माझ्या आयुष्यातली टर्निंग पॉइंट ठरली आणि एकापाठोपाठ समस्या सुटत गेल्या...

   जमीन सोडवली, दोन्ही भावांच्या मिळून  पाच  मुलींच्या लग्नाला भरीव अर्थसहाय्य केले, गावी छोटेसे घर बांधले, पुण्यात एक छोटा फ्लॅट घेतला ..

    एका बाजूला आर्थिक परिस्थितीत सुधारणा झाली तर दुसऱ्या बाजूला स्पर्धा परीक्षा देत एकामागोमाग एक प्रमोशन घेत गेलो...

 कधीतरी इंजिनिअर व्हायचं हुकलेले स्वप्न साकार झाले.

मुलगा इंजिनिअर झाला...

हे सगळ चांगलं घडत होते तरी माझ्या समोर नोकरीत व वैयक्तिक पातळीवर काही ना काही अगदी हातघाईच्या समस्या उभ्या रहात होत्याच,पण एव्हाना मला या गोष्टींची सवय झाली होती....

 सकारात्मक विचारसरणीच्या जोरावर आज मी वयाची एकसष्टी पार केली आहे आणि सध्या समाधानी सेवानिवृत्त जीवन जगतो आहे...

  समस्या आली तरी न डगमगता सारासार विवेक वापरून, सकारात्मकता ठेऊन थंड डोक्याने शक्यता पडताळून बघायच्या आणि विश्वासाने निर्णय घायचा, अपयश आले तर एक धडा म्हणून त्याकडे बघायचे आणि पुन्हा प्रयत्न करायचा! 

   फायनली यश मिळणारच आहे या सकारात्मक विचाराने यश निश्चित मिळते, हे मी आज ठामपणे सांगू शकतो ते केवळ मला आलेल्या प्रचीतीमुळे!

 माझा हा संघर्ष माझ्याच एका कवितेत...

जमले जसे....

काही असे काही तसे, जगलो असे जमले जसे,

लाचार कधी झालो नाही, स्व कधी विकला नाही,

 हात कधी पसरला नाही,पडले मनासारखे फासे,

जगलो असे जमले जसे!

गरिबीची लाज नाही,श्रीमंतीचा माज नाही,

सरळ मार्ग सोडला नाही,टाकले नाही घेतले वसे,

जगलो असे जमले जसे!

हवेत इमले बांधले नाही,मृगजळामागे धावलो नाही,

शब्दात कधी सापडलो नाही,झाले नाही कधी हसे,

जगलो असा जमले जसे!

भावनेत कधी वाहीलो नाही, वास्तव कधी सोडले नाही,

विवेकाला तोडले नाही,वागावे लागले जशास तसे,

जगलो असे जमले जसे!

वावगा कधी हट्ट नाही, तडजोडीला ना नाही,

रक्त उगा आटवले नाही, सजवले क्षण छोटे छोटेसे,

जगलो असे जमले जसे!

काही असे काही तसे, 

जगलो असे जमले जसे!

Be Positive...

धन्यवाद....

©प्रल्हाद दुधाळ.(9423012020)

No comments:

Post a Comment