Monday, January 23, 2017

एका सस्पेंसची कॉमेडी

      एका एकांकिका स्पर्धेसाठी आमच्या ग्रुपने एक रहस्यकथेवर बेतलेली एकांकिका बसवली होती.आमच्याच ग्रुपच्या एकाने या एकांकिकेचे लेखन केले होते.एकांकिका त्यानेच दिग्दर्शित केली होती, एवढेच काय नेपथ्य, प्रकाशयोजना शिवाय एक प्रमुख भूमिका! अशी अष्टपैलू कामे तो स्वत:च करणार होता.सबकूछ 'मी'च या त्याच्या हट्टापुढे उघडपणे जरी कुणी काही बोलत नसले तरी ग्रुपमधे बरीच नाराजी होती.या एकांकिकेत नायिकेच्या भूमिका करणाऱ्या मुलीवर इंप्रेशन मारण्यासाठी आमचा हा मित्र हा सगळा खटाटोप करत होता हे उघड सत्य होते.एक मात्र निश्चित होते की त्याच्या लिखाणात दम होता.एकांकिकेची संहिता एकदम दमदार होती.जेव्हा प्रथम  वाचन झाले तेव्हाच सर्वानी त्याच्या लिखाणाचे भरभरून कौतुक केले होते.योग्य दिग्दर्शक मिळाला तर आमची ही एकांकिका पहिले बक्षीस मिळवणार् यात शंकाच नव्हती! पात्रांची निवड झाली आणि आमच्या मित्राच्या दिग्दर्शनाखाली तालमी सुरू झाल्या. एका रहस्यमय खुनाचा तपास अशा स्वरूपाचे हे कथानक होते.पंधरा दिवस अथक तालमी झाल्या.एकांकिका छानच बसली.आमचा मित्र या कथेतील पोलीस इन्स्पेक्टरची भूमिका साकारत होता.एकांकिका स्पर्धेचा दिवस उजाडला आणि आम्ही संपूर्ण तयारीने आमची एकांकिका सादर करण्यासाठी रंगमंचावर गेलो.तीसरी घंटा वाजली आणि पडदा सरकला.
      स्टेजवर संपूर्ण अंधार होता.रातकिडे ओरडल्याचा आवाज आणि अचानक एका बाईची प्रचंड किंकाळी..
  एकांकिकेने प्रेक्षकांना खिळवून ठेवले होते.प्रवेशामागून प्रवेश सादर होत होते.थिएटरमधे पिनड्रॉप सायलेंस होता.पुढे काय होणार याची उत्सुकता ताणली गेली होती.खरा खुनी कोण या रहस्याभोवती कथानक फिरत होते.सगळ्यांनी आपआपल्या भूमिका जीव ओतून केल्या होत्या.नाटकाच्या उत्कर्षबिंदूपर्यंत कथा पोहोचली होती.पोलीस इंस्पेक्टर आणि नायिकेमधील संवाद चालू होता.
"मँडम,मला समजलय हा खून कोणी केलाय!'
"कशावरून तुम्ही हे तुम्ही ठरवलं साहेब ?"
"माझ्याकडे तसा पुरावा आहे!"
 "पण तुमचा हा पुरावा खुनी नराधमाला शिक्षा देईल ना?"
  " हो नक्कीच,तुम्हाला दाखवतोच तो पुरावा!" संवाद बोलता बोलता इन्स्पेक्टर पुरावा बाहेर काढण्यासाठी आपला हात खिशात घालतो त्याची नजर मात्र नायिकेची भूमिका करणाऱ्या पात्राकडे होती.उभी असलेली नायिका खाली वाकून काहीतरी घेत होती आणि इन्स्पेक्टरचे लक्ष विचलीत झाले त्याला खिशात ठेवलेला पुराव्यांचा कापडाचा तुकडा काही सापडेना!
तो पुरावा हातात आल्याशिवाय पुढचा संवाद बोलता येणार नव्हता! रंगमंचावर असलेली दोन्ही पात्रे ब्लँक झालेली आणि इन्स्पेक्टर खिशात पुरावा शोधतो आहे.त्याला आता घाम फुटायला लागलेला!
 एकदाचा इन्स्पेक्टरला खिशातला कापडाचा तो तुकडा मिळाला आणि तो पुढचा संवाद बोलण्यापूर्वीच प्रेक्षक ओरडले...
"सापडला.😜😜😜😜"
प्रेक्षकांनी हसून थिएटर डोक्यावर घेतले!
आमच्या रहस्यमय नाटकाची कॉमेडी झाली होती !!!
   ..... @ प्रल्हाद  दुधाळ.

No comments:

Post a Comment