Friday, February 13, 2015

अंजन

अंजन 
स्थळ : परचुरे काकांचे घर 
पूर्वपीठीका- राघव व वसुधा यांचा दोन वर्षापूर्वी प्रेमविवाह झालेला पण सध्या दोघांमध्ये  पराकोटीचे वाद होत असतात.राघव परचुरे काकांना वसुधाचे लांबचे काका) फोनवर सर्व परिस्थितीची कल्पना देतो व त्यांचा तुटू पहाणारा संसार वाचविण्यासाठी वस
ुधाला समजावून सांगावे अशी विनंती करतो.काका दोघांना बोलावून त्यांच्याशी संवाद साधतात. 
काका –अरे,वसुधा आणि राघव!या या,अलभ्य लाभ! आज कसे काय बुवा इकडे रस्ता चुकले?
राघव- काका,थोडं बोलायचं होत.वेळ आहे ना काका?”
काका- अवश्य बोलूया.प्रथम बसा बर दोघ! आणि काय ग वसुधा गप्प गप्प का एवढी?
वसुधा-(जमिनीकडे पहात) नाही काका,तसं काही नाही.(तिने कसनुसं हसायचा प्रयत्न केला).
काका -हे बघ वसुधा,मला सगळ काही माहीत आहे! राघवने सगळ सांगितलय!आपण याच विषयावर बोलणार आहोत.अरे शिकले सावरलेले तुम्ही पण अडाण्यासारखे वागता?(वसुधा राघवकडे बघते तो तिची नजर चुकवतो).
काका -मला तुम्ही प्रथम हे सांगा की,तुम्हाला माझ्याशी वेगवेगळे बोलायचे आहे की एकत्रच बोलू या?’
वसुधा- नाही, नाही काका,आपण समोरासमोरच बोलू!
काका -वसुधा मला प्रथम खर खर सांग,तू राघववर प्रेम करतेस? आणि हो,राघव, तू मधे एकही शब्द बोलायचा नाही!
वसुधा -हे काय विचारता काका! प्रेमविवाह आहे आमचा!(वसुधा हलकेच लाजते) 
काका -बर,समजलं! आता मला सांग,राघवच्या स्वभावातल्या कोणत्या गोष्टी तुला आवडतात?
(वसुधाचा आता मूड बदलला.आहे उत्साहात ती सांगायला लागते.)
वसुधा- खूप छान स्वभाव आहे त्यांचा! एकदम समजूतदार आहे! मला खूप समजावून घेतो.चुकल तरी रागावत नाही! खूप प्रेम होत हो त्याचं माझ्यावर पण आत्ताच काय झालंय कळत नाही!
काका- मग तुमचा प्रॉब्लेम काय आहे? वाद का होतात दोघात?”वसुधा तूच सांग.
वसुधा- काका,आता विषय निघालाच आहे तर सांगते सगळ तुम्हाला!मला भांडण नकोय हो! पण हल्ली काय होतंय ते समजतच नाही.राघव ऑफिसमधून आला की नुसता बसून रहातो.दिवसभर मी घरात एकटी असते.मला वाटत की त्याने मला वेळ द्यावा.माझ्याशी पूर्वीप्रमाणे बोलावे,पण हा कायम कामात बिझी!गेल्या वर्षभरात सुट्टीच्या दिवशीसुध्दा हा मला कुठे फिरायला घेवून गेलेला नाही.कुठलाही विषय काढला की खूप चिडतो.कुठलाही हट्ट धरला की त्याचा ताल जातो.दिवसभर एकटी असते याचा विचारच करत नाही!दिवसभर नाही नाही ते विचार माझ्या मनात येतात.पण हा लक्षच देत नाही माझ्याकडे!मी फक्त याची सेवाच करावी की काय?एक बायको म्हणून मी याचं सर्व करते,पण याला माझी किंमतच नाही! (वसुधा आता रडू लागते, राघव तिच्याकडे एक पाउल उचलतो पण काका त्याला हातानेच रोखतात, तोही मग बघ्यांच सोंग घेतो.वसुधाच्या.रडण्याचा आवेग हळू हळू ओसरतो. वसुधा पुन्हा बोलायला लागते)
वसुधा-मी माझ्या आईवडिलांशी वाईटपणा घेवून याच्याशी लग्न केलं,पण आता वाटतंय मी चूक केली!”
काका –वसुधा हे बघ,आता तुझी बाजू मला समजली.तुझा संतापही समजला.पण यावर वेगळे होणे हा एकच उपाय आहे का?यावर मागच्या खोलीत जाऊन शांतपणे विचार कर,ज्या कारणासाठी तुमचे वाद होतायेत ती कारणं एवढी गंभीर आहेत का?याचाही डोक्यात राख न घालता विचार कर.जे घडतंय त्या मागील कारणांचा मागोवा घे.मग पुन्हा आपण बोलू! जा तू आत.हे पाणी पी!( काकांन तिला पाण्याची बाटली देतात ती सावकाश आतल्या खोलीत जाते)

(आता काका राघवकडे वळतात) 
काका- हं राघव आता तू बोल!वसुधाच्या तुझ्याबद्द्लच्या तक्रारी तू आता ऐकल्या आहेसच,तेंव्हा त्याबद्दल तुझी भूमिका सांग. 

राघव- काका मला मान्य आहे की,मी कामात खूप बिझी असतो,ऑफिसमध्ये कामाचा खूप ताण असतो.वेगवेगळी टार्गेट पूर्ण करायची असतात.कामाकडे दुर्लक्ष केले तर नोकरी जाऊ शकते! नोकरी गेली तर घराच्या कर्जाचे हप्ते कुठून भरू?बऱ्याचदा घरीही काम घेऊन याव लागतं!पण घरी आलं की वसुधाची वेगळीच भुणभुण सुरू होते.ऑफिसात बॉसकडून त्रास असतोच त्यात अजून हिची भर पडते.अगदी संताप संताप होतो. मग रागाच्या भरात काही न काही बोलले जाते.एकदा का ती बिघडली की मग मला वाट्टेल तशी बोलते.शब्दाला प्रतिशब्द होतो.काका,अगदी वैतागून गेलोय!एका घरात का रहातोय आम्ही?मला तर नको नको झालंय!
काका- राघव,हे बघ,जरा शांतपणे विचार कर.तुझ्यावर अथवा वसुधावर कुणी लग्न लादले आहे का? तुम्ही दोघांनी समजून उमजून एकमेकांचे जोडीदार म्हणून स्वीकारले आहे!तुमचे एकमेकांवर अतिशय प्रेम आहे.आणि या प्रेमानेच तुमचा घात केला आहे.या प्रेमामुळेच तुमच्या एकमेकाबद्दल अपेक्षा वाढल्या आहेत!आणि मग या अपेक्षा पूर्ण होत नाहीत,यापोटी तुम्ही भांडत आहात! अरे कसले हे प्रेम!ही गोष्ट तुम्ही विसरून गेलात की प्रेमात अपेक्षा आली की ते प्रेम रहात नाही तर त्याचे एका व्यवहारात रुपांतर होते!प्रेम म्हणजे त्याग!स्पष्ट बोलतो,पण तुम्ही दोघांनी लग्न म्हणजे काय खेळ समजला आहे का?एकदा विचार करून बघ की वसुधाला सोडून तू, किंवा तुला सोडून ती राहू शकता का?अरे लग्नात तुम्ही आणाभाका घेतल्या त्या काय उपचार म्हणूनच का? कोणत्याही परिस्थितीत शेवटपर्यंत एकमेकाला जीवापाड सांभाळायची शपथ तुम्ही घेतली आहे पण ती निभावण्याची वेळ आल्यावर मात्र माघार घेतायेत तुम्ही!”
(नकळत काकांचा आवाज वाढतो.त्या आवाजाने वसुधाही हॉलमध्ये येते,राघव च्या बाजूला उभी रहाते, काका दोघांना सांगू लागतात)
काका-अरे मुलांनो लग्न म्हणजे सहजीवन.या सहजीवनात पती व पत्नी एकमेकांच्या सुख वा दु:खात बरोबर असतात.वसुधा तिच्या ठिकाणी बरोबर आहे.राघवनेही तिला वेळ द्यायलाच हवा! नोकरी आणि संसार या दोन्हींचा समतोल राखत सहजीवनातला आनंद वेचायचा असतो!नोकरीमधले ताण घरी येऊ नयेत ही काळजी राघवने घ्यायलाच हवी,पण राघव आपल्या सुखी संसारासाठीच राबतोय.त्याला समजून घेणेही वसुधासाठी आवश्यक आहे! कमी तेथे आम्ही या भावनेने एकमेकाला साथ हवी! कुठलीही गोष्ट प्रतिष्ठेची न करता एकमेकाला समजून घेता यायला हवं,समजाऊन सांगताही यायला हवं! एवढी प्रगल्भा तर प्रेमात असायलाच हवी!
वसुधा-काका,आम्ही चुकलो!योग्य वेळी तुम्ही आमच्या डोळ्यात चांगलेच अंजन घातलेत!यापुढे आम्ही कधीच भांडणार नाही.एकमेकांना अंतर देणार नाही.
(वसुधा काकांच्या पायाशी बसते राघव वसुधाच्या खांद्यावर हात ठेवतो काका दोघांना जवळ घेतात!)

 ..........प्रल्हाद दुधाळ.पुणे(९४२३०१२०२०)
प्रकाशित -माळी आवाज मुक्तांगण दिवाळी अंक २०१५ 

No comments:

Post a Comment