Friday, May 9, 2014

गैरसमज- नात्यांमधला कर्करोग.


                 नात्यांमधला भयानक कर्करोग-गैरसमज.
                   माणसा माणसातील नाती ही त्यांच्या एकमेकांवर असलेल्या विश्वासावर टिकून असतात मग ती नाती रक्ताची असोत नाहीतर मैत्रीची! अशी नाती निर्मळ व पारदर्शी  असतील तर सहसा कुठल्याही प्रकारच्या गैरसमजाचे प्रसंग येत नाहीत, पण जर एकमेकांशी संवाद साधताना एका बाजूने जरी शब्दाचा वेगळा अर्थ लावला गेला तरी अशा नात्याला गैरसमजाची लागण होऊ शकते.आणि गैरसमजाचा हा कर्करोग प्रत्यक्ष कर्करोगा पेक्षाही वेगाने पसरून नात्याचा विनाश व्हायला फारसा वेळ लागत नाही! म्हणून चुकून माकून जर अशा नातेसंबंधात जर अशी गैरसमजाची भयानक गाठ आढळली तर त्यावर  वेळीच उपचार करणे आवश्यक आहे.अर्थात हे नाजूक स्नेहबंध जीवापाड जपण्यासाठी प्रत्येक व्यक्तीने आपल्यापरीने काळजी घ्यायलाच हवी.
                  असे नाजूक नातेसंबंध जपण्यासाठी आपण काय करू शकतो ते पाहू –
१.      कुणाशीही संवाद साधताना शब्दांचा वापर जपूनच करायला हवा, शब्द हे शस्र आहे याची जाणीव प्रत्येकाला असायला हवी. बोलताना चुकीची शब्दफेक,आवाजातील चढ-उतार, उच्चारांची चुकलेली पट्टी आदी गोष्टी क्षणात अर्थाचा अनर्थ करु शकतात! त्यामुळे बोलताना जाणीवपूर्वक व शांतपणे आपले म्हणणे योग्य शब्दामध्ये मांडणे आवश्यक आहे. आपल्या बोलण्याचा काही वेगळा अर्थ तर निघत नाही ना? हे पडताळून पहाणे गरजेचे आहे.जरूर असेल तेथे तत्काळ स्पष्टीकरण देऊन आपल्याला अभिप्रेत असलेला अर्थच समोरच्या व्यक्तीपर्यंत पोहचत आहे ना हे पाहिले पाहिजे.कारण योग्य प्रकारे झालेला सुसंवादच स्नेहबंध घट्ट करायला मदत करतो
२.      कधी कधी बोलताना स्पष्ट बोलणे आवश्यक असते. गोल गोल बोलून तात्पुरता वाईटपणा घेणे टाळता येते,पण यामुळे पुन्हा पुन्हा तसेच प्रसंग समोर येतात त्यामुळे उगाच  भिडस्तपणा न ठेवता स्पष्ट भाषेत बोलणे गरजेचे असते त्यामळे गैरसमजाचे प्रसंगच येणार नाहीत.समोरच्या व्यक्तीपासून एखादी गोष्ट लपविण्यापेक्षा सत्य परिस्थिती समोर ठेवल्यामुळे संबंधिताला वास्तवाची जाणीव होईल.समोर उभी असलेली अपरिहार्य परिस्थिती व त्याचे गांभीर्य समोरच्या व्यक्तीला समजेल.हे सर्व योग्य अशा शब्दांमध्ये समजाऊन दिल्यामुळे मने कलुषित व्हायचे तर टळेलच पण नात्यात उद्भवणारी संभाव्य कटुतासुद्धा टाळता  येईल.स्पष्टवक्तेपणा हवा पण बोलताना विनाकारण टोमणे मारून बोलणे वा टोचून बोलणे टाळणे आवश्यक आहे.ज्यावेळी समोरची व्यक्ती बोलते आहे त्यावेळी शांतपणे मधे न टोकता त्याचे संपूर्ण बोलणे ऐकून घ्यायची तयारी ठेवली पाहिजे. अर्धवट ऐकलेल्या बोलण्यातून वेगळा अर्थ निघू शकतो त्यामुळे समोरच्या व्यक्तीला नक्की काय म्हणायचे आहे ते समजून घेतल्याने गैरसमज वा वादविवादाचा प्रश्नच येणार नाही.समोरच्या व्यक्तीचे बोलणे जर तुम्हाला पटणारे नसेल तर त्याचे बोलणे पूर्ण ऐकून घेवून नंतर मुद्देसूदपणे व सप्रमाण त्याचे मत  कसे योग्य नाही हे शांतपणे समजाऊन सांगणे जरुरीचे आहे.येथे लक्षात घेणे आवश्यक आहे की, असा संवाद साधताना दोघांपैकी एकजण जरी क्रोधात असेल तर असा संवाद तात्पुरता थांबवणे कधीही योग्य ठरते! कारण बहुतेक वेळा भावनेच्या भरात केलेली कृती नातेसंबंधात बाधा आणते, याशिवाय रागाच्या भरात अनेकदा एकमेकांच्या आत्मसन्मानाचा आदर राखला जात नाही.चुकून समोरच्या व्यक्तीचा झालेला तेजोभंग पुढे अनर्थास कारणीभूत होवू शकतो!
३.      एक गोष्ट कायम लक्षात घेतली पाहिजे की जगात असणाऱ्या प्रत्येक समस्येला एक तरी योग्य,समाधानकारक वा त्याच्या जवळचे उत्तर असतेच असते! त्यामुळे कोणत्याही समस्येवर सकारात्मक दृष्टीकोन ठेऊन विचार केला तर नक्कीच सर्वमान्य पर्याय समोर येतो.नातेसंबंधात कोणतीही कटुता न आणता समोरासमोर चर्चा करून,एकमेकाला समजून घेऊन,प्रसंगी माफ करून वा माफी मागून, झालेले गैरसमज दूर करता येतात.प्रत्येकाने असे माणसामाणसांत तयार झालेले स्नेहबंध टिकवण्याला प्राधान्य द्यायला हवे, त्यासाठी सर्व प्रकारचे मतभेद,अहंकार बाजूला ठेऊन या नातेसंबंधाला महत्व द्यायला हवे.
४.                      मानवी मन हे एक गहन असे कोडे आहे, हे कोडे सोडवण्यात भल्या भल्यांना अपयश आले आहे.या विचित्र मनोव्यापारामुळे क्षणभरात सरळपणे वागणारा माणूस अचानक वाकड्यात घुसू पहातो.एकदा का मनाला षड्रिपूंपैकी एकाची जरी बाधा झाली तरी माणसाच्या वागण्याला धरबंध रहात नाही त्यातूनच समज-गैरसमज वाढत जातात.मानवी नातेसंबंधात दुरावा येतो.अपेक्षाभंग होतात.अहंकारी व हट्टी मन माघार घ्यायला तयार होत नाही.अहंकाराला ठेच पोहचते आणि मग व्यक्ती व्यक्तीमधल्या अगदी क्षुल्लक गोष्टी प्रतिष्ठेच्या केल्या जातात.मोडेन पण वाकणार नाही अशी भूमिका घेऊन पुढचा मागचा विचार न करता,जीवनातील अत्यंत महत्वाच्या अशा नातेसंबंधाला तिलांजली दिली जाते. अशा वेळी सारासार विवेकबुध्दीचा वापर करणे माणूस विसरून जातो.डोक्यात राख घालून आततायीपणे वागले जाते.खर तर अशा वेळी जीवनातले स्नेहबंध महत्वाचे की इत्तर भावना? याचा थंड डोक्याने विचार करायला हवा.
५.      या जगात जन्मलेली प्रत्येक व्यक्ती वेगळी आहे.व्यक्ती तितक्या प्रकृती या म्हणीप्रमाणे प्रत्येकात विविध गुण दोष,वृत्ती व विकृती भरलेल्या आहेत,हे सत्य समजून घ्यायला पाहिजे.एक माणूस दुसऱ्यासारखा बोलेल अथवा वागेल याची मुळीच खात्री देता येत नाही त्यामुळे तशा तऱ्हेच्या अपेक्षांवर आधारीत नातेसंबंध कधीच टिकणारे नसतात हे प्रत्येकाने समजून घ्यायला हवे.नाती टिकवण्यासाठी काही घेण्याबरोबरच काही देण्याची अर्थात तडजोडीची भूमिका असायला हवी.
      अशा प्रकारे नातेसंबंधात कोणत्याही प्रकारचे गैरसमज होणार नाहीत आणि झालेच तर चर्चेने सुसंवाद साधून ते दूर होतील व हे संबंध अडचणीत येणार नाहीत याची प्रत्येकाने काळजी घेतली तर माणसा माणसातली नाती अजूनच दृढ होत जातील. मानवी जीवन क्षणभंगुर आहे,आपल्याकडे असलेला प्रत्येक क्षण महत्वाचा आहे त्यामुळे तो क्षण नको त्या गोष्टींत व्यर्थ घालवण्याऐवजी तो आनंदात जगण्यासाठी  माणसा माणसातला सुसंवादच उपयोगी ठरणार आहे! असतो.यासाठी -
                                    चुकल चुकून काही,
लगेच मागावी माफी.
चुकल कुणाच काही,
 करुन टाकाव माफ .
बोलून टाकाव काही,
 खुपलेल मना मनात.
  किल्मिष नकोच काही,
 आनंदी नातेसंबंधात .

  आपल्याला काय वाटते?

                          .......................प्रल्हाद दुधाळ.                                 ५/९ रुणवाल पार्क, मार्केट यार्ड पुणे ३७.
         (९४२३०१२०२०)
pralhad.dudhal@gmail.com

                         

No comments:

Post a Comment