Tuesday, May 6, 2014

ओळख स्वत:ची.

ओळख स्वत:ची.
       तसं पाहिलं तर आपण इत्तरांपेक्षा स्वत:ला चांगलंच ओळखत असतो! आपल्यामधे काय चांगले गुण दडले आहेत, आपले अवगुण काय आहेत हे सुध्दा त्याला माहीत असतं!आपला जन्मत: स्वभाव कसा आहे,आपल्यातली बलस्थ्याने कोणती व आपल्यात काय कमी आहे याची निश्चित जाणीव प्रत्येकाला असतेच असते.आपण कशाने आनंदी होतो,कोणत्या गोष्टी आपल्याला क्लेशदायक आहेत.आपल्याला कोणत्या गोष्टीमुळे राग येतो तर कोणत्या परिस्थितीत आपल्याला सुख समाधान मिळते याचाही अंदाज आलेला असतो.   पण जगताना  आपल्या खऱ्या स्वरूपाकडे माणूस जाणूनबुजून दुर्लक्ष करतो व तो वास्तवात जसा नाही तशी स्वत:ची एक आभासी प्रतिमा मनात तयार करतो व ही प्रतिमाच  लोकांसमोर आणण्याचा प्रयत्न करतो. अशा प्रकारे त्या प्रतिमेचा एक मुखवटा घालून तो जगात वावरायला लागतो. लावलेला हा मुखवटा हाच आपला खरा चेहरा असल्याचा आव तो आयुष्यभर आणतो व आपली सर्व एनर्जी ती गोष्ट सिद्ध करण्यासाठी वाया घालवतो. या सर्व प्रकारात त्याला काय आनंद मिळतो कोण जाणे? बहुदा आपल्यात जे आहे ते जसेच्या तसे लोकांसमोर आले तर ते कमीपणाचे आहे असे त्याला वाटते मग तो आपल्याकडे नसलेल्या गुणांची लेबले स्वत:ला चिकटवण्याचा प्रयत्न करतो.जसे मग तो त्याची आर्थिक परिस्थिती बेताची असली तरी आपली ‘श्रीमंत’ ही प्रतिमा लोकांसमोर ठेवण्यासाठी आटापिटा करतो! शिक्षण व प्रतिष्ठेच्या खोट्या कल्पना बाळगून तशा प्रतिष्ठेचे तो प्रदर्शन करत रहातो. स्वत:चा समाजात दरारा आहे या कल्पनेपायी गुंडागर्दी करत रहातो. अशाच मानसिकतेतून काळे धंदे करणारे आपण कसे सोज्वळ आहोत हे सिद्ध करण्यासाठी व उजळ माथ्याने समाजात वावरण्यासाठी राजकारण व समाजकारण करतात! काही जण स्वत:ची दानशूर अशी प्रतिमा बनविण्यासाठी प्रयत्न करतात.गल्लोगल्ली लागणारे वाढदिवस व तत्सम भडक फ्लेक्स हा त्यातलाच एक भाग आहे. कसे ही करून लोकांच्या नजरेत रहाण्यासाठी मग वाट्टेल ते चाळे अशा व्यक्ती करत रहातात! मग साधारण  दिसणारी व सुमार अभिनय करणारी नटी सगळे ताळतंत्र सोडून वेगवेगळ्याप्रकारे मिडीया ला मुलाखती देते, नको त्या स्वरूपातले तिचे फोटो फिल्मी मासिकांमध्ये छापून आणते. असा माणूस आपले पितळ उघडे पडू नये सत्य  जगासमोर येऊ नये असा प्रयत्न आयुष्यभर करत रहातो,यासाठी कुठल्याही थराला जायची त्याची तयारी असते पण असे हे बेगडी मुखवटे परिधान करून फार काळ जगाला फसवता येत नाही. एक ना एक दिवस या सगळ्याचा पर्दाफाश होतो आणि मग अशावेळी त्या व्यक्तीचे खरे स्वरूप समाजासमोर उघड झाल्यामुळे नको त्या  नामुष्कीला त्याला सामोरे जावे लागते.
        खरं सांगायचं तर आपण आपली खरी ओळख विसरायची मुळीच गरज नाही. प्रत्येक माणसांकडे अनेक सद्गुण ,सद्विचार मनाच्या तळाशी लपलेले असतात. आपण स्वत:ला आहे त्या स्वरूपात न स्वीकारल्यामुळे स्वत;वरच अन्याय करत असतो. खोटेनाटे वागून थोडे दिवस आपली चांगली छाप समाजात व आजूबाजूच्या माणसांवर पडत असेलही पण हे फार काळ टिकत नाही.आज ना उद्या कुठल्या न कुठल्या कारणाने खरे स्वरूप लोकांसमोर येते आणि  मग असे  बिंग फुटले की नको त्या समस्या संबंधितासमोर उभ्या राहतात. याउलट आपण जर आपल्यात असलेल्या  गुण व दोषांसहित आयुष्याला सामोरे गेलो तर आपल्यावर मनापासून प्रेम करणारे लोक निश्चितच फक्त प्रेमच करत राहतील. त्यासाठी आभासी जगात अधांतरी तरंगत राहण्याऐवजी प्रत्येकाने आपल्यातल्या सद्गुणांच्या खजिन्याची ओळख  करून घेणे आवश्यक आहे. येथे एक गोष्ट कायम लक्षात घ्यायला हवी की या जगातल्या  हरेक व्यक्ती मध्ये काही ना काही गुणदोष हे असतातच!  सर्वगुणसंपन्न व्यक्तीमत्व हे फक्त कल्पना विश्वातच असते. वास्तवात ज्याला आपण सद्गुणांचा पुतळा वगैरे  समजतो अशा माणसातही अनेक दुर्गुण ठासून भरलेले असतात. फक्त त्या नजरेने आपण अशा व्यक्तीकडे पहात नाही म्हणून!
          म्हणून मला असे वाटते की प्रत्येकाने प्रथम स्वत:ला ओळखायला हवे.तुम्ही जसे आहात तशा स्वरूपात स्वत:चा स्वीकार करा जसे आहात त्याच स्वरूपात लोकांसमोर जा! यामुळे तुम्हाला तर स्वत:ची खरी ओळख तर होईलच पण स्वत:ला इत्तरांच्या नजरेतून पारखण्याची संधीही तुम्हाला मिळेल.आपल्या व्यक्तीमत्वातले चमकते पैलू तुम्हाला समजतील या शिवाय कुठे कुठे सुधारणेला वाव आहे ते सुध्दा समजेल. जेथे आवश्यक आहे तेथे सुधारणा करून स्वत:ला एक चांगला माणूस म्हणून घडवू शकाल आणि एकदा का तुम्ही एक चांगला माणूस झाला की धन दौलत प्रतिष्ठा आणि सर्वात महत्वाची मानसिक शांतता आणि समाधान तुमच्यासमोर हात जोडून उभे असेल! त्यासाठी तर माणूस जगत असतो!

                                ......प्रल्हाद दुधाळ.
प्रकाशित -पुनवडी प्रबोधन दिवाळी अंक २०१५.

No comments:

Post a Comment