Thursday, February 6, 2014

कौतुक

कौतुक
                चांगल्या गुणांचे कौतुक होणे ही माणसाची एक मानसिक गरज आहे. जेंव्हा एखादे चांगले काम माणसाच्या हातून घडते,एखाद्या परीक्षेत घवघवीत यश संपादन केले जाते, एखादा महत्वाचा पुरस्कार मिळतो, किंवा यशस्वी व्यक्ती म्हणून समाजात नाव  होते तेंव्हा आजूबाजूच्या लोकांकडून आपले कौतुक व्हावे असे वाटणे साहजिक आहे. वास्तविक अशा व्यक्तीच्या आसपास वावरणारे नातेवाईक,मित्रमंडळी,शेजारी,शिक्षक, सहकर्मचारी यांनी दिलेली पाठीवरची थाप जीवनात खूपच मोलाची असते. अशा कौतुकामुळे अंगावर मुठभर मांस चढते. अशी व्यक्ती मिळालेल्या प्रोत्साहनामुळे दुप्पट वेगाने प्रगती करू शकते. आजूबाजूच्या लोकांपेक्षाही अशा व्यक्तीचे जेंव्हा आपल्या जवळच्या व्यक्ती जसे आई,वडील,भाऊ,बहिण,पत्नी,मुले यांच्याकडून कौतुक होते तेंव्हा माणसाला आयुष्य  कृतार्थ झाल्यासारखे वाटते.त्याला नवी उर्जा मिळते.   
                  पालक आपले मुल लहान असताना  मुलाने टाकलेले पहिले पाऊल,मुलाच्या तोंडातून आलेला पहिला बोबडा शब्द, टाकलेले पहिले पाउल,लिहिलेले पहिले अक्षर तसेच मुलाच्या आयुष्यातल्या प्रत्येक लहानसहान प्रगतीच्या टप्प्यावर यांचे भरभरून कौतुक करताना दिसतात आजकाल तर अशा क्षणांचे फोटो किंवा व्हिडीओ चित्रण करून असे प्रसंग जतन केले  जातात. जीवनाच्या पुढच्या टप्प्यात मुलांच्या  शिक्षणातल्या प्रगतीच्या काळात तर मुलांना अशा कौतुकाची फारच गरज असते.चांगल्या यशाबद्दल शाबासकी तर मिळायलाच हवी  पण एखाद्या अपयशाच्या क्षणी मुलांना मानसिक आधार व पुढच्या वेळी जादा प्रयत्नासाठी प्रेरणा द्यायची ही तयारी पालकाने ठेवायला हवी.
                                                लहानपणी कौतुक होण्यासाठी लायकी असूनही जर योग्य त्या व्यक्ती कडून अशी शाबासकी मिळाली नाही तर अशी मुले एकलकोंडी होऊ शकतात.आपल्यात  काहीतरी कमी असल्याची भावना अशा मुलांच्या मनात घर करू शकते व सर्व काही ठीक असूनही आत्मविश्वास कमी होण्यासाठी अशा घटना कारणीभूत होऊ शकतात म्हणूनच पालकांनी योग्य गोष्टींचे कौतुक तर आवश्यक तिथे मानसिक आधार आपल्या पाल्याला द्यायला हवा.
                                                योग्य त्या प्रसंगी कौतुक होणे आवश्यक आहे हे खरे आहे पण उठसुठ फक्त कौतुकच होत राहिले तरीही धोकादायक आहे. म्हणजेच शाबासकी देण्यायोग्य गोष्टी असतील तरच कौतुक व्हायलाच हवे पण जेथे आवश्यक आहे तेथे त्याच्यातली कमतरता सुध्दा संबंधीताला कळायला हवी. थोडक्यात यशाबरोबरच अपयश पचविण्याची व अपयशाच्या प्रसंगी ज्या संभाव्य परिस्थितीचा सामना करावा लागतो त्याची जाणीव व मानसिकता सुध्दा अंगी असायला हवी हे सांगायला हवे, नाहीतर नेहमी कौतुकच वाट्याला आलेली व्यक्ती जेंव्हा समाजात वावरायला लागेल तेंव्हा जेंव्हा एखाद्या पसंगी झालेली टीका/अपमान  अथवा मिळणार्या प्रतिक्रिया अशा व्यक्ती सहन करू शकणार नाहीत. त्यामुळे लहानपणापासूनच योग्य त्या वयात यश,अपयश व त्याबरोबरीने येणारे कौतुक किंवा टीका अथवा मिळणारे अन्य प्रतिसाद याची कल्पना व अशा प्रसंगाला सामोरे जाण्याची तयारी या संबंधी पालकांनी मुलांशी मोकळेपणाने बोलायला हवे.वास्तवाची जाणीव कायम मनावर बिंबवायला हवी . आपल्या पाल्याचे खोटे खोटे कौतुक करून तुम्ही त्याला तात्पुरता आनंद देऊ शकाल पण याच तुमच्या वागण्यामुळे त्याला मानसिकदृष्ट्या कमकुवत करत आहात हे सुध्दा तितकेच खरे आहे. एकदा सतत यश मिळत गेले की त्या यशाची सवय लागते आणि जेंव्हा एखादे अपयश समोर उभे राहील तेंव्हा अशा व्यक्तीला जगणे अवघड होऊ शकेल!
                  बऱ्याच ठिकाणी ज्या व्यक्तीकडून फायदा होणार असेल त्या व्यक्तीचे खुशमस्करे त्याच्या भोवती  आपल्या फायद्यासाठी गोळा होतात. खोटेखोटे गुणगान करून अशा माणसाच्या मर्जीत रहाण्याचा प्रयत्न असे खुशमस्करे करत रहातात. त्यासाठी कौतुक/स्तुती करायचा एकही प्रसंग सोडत नाहीत. असे होणारे कौतुक हे बर्याचदा ‘ हरबर्याच्या झाडावर चढवणे असते पण संबंधिताला जर अशा कौतुकाबद्दल जाणीव नसेल तर अशी व्यक्ती वास्तवाशी फारकत घेऊन एका आभासी जगात रहायला लागते. अशावेळी यशाचा कैफ चढायला वेळ लागत नाही.अशा व्यक्तीचा भ्रमाचा भोपळा जेंव्हा कधी फुटतो  तेंव्हा मात्र अशा लोकांची अवस्थ्या वाईट होऊन जाते. वेळीच अशा स्तुतीपासून सावध रहायला हवे.
                  योग्य वेळी व योग्य बाबतीत झालेल्या कौतुकामुळे पुढील प्रगतीसाठी प्रेरणा मिळते.अधिक जोमाने प्रयत्न केले जातात तर कौतुकास पात्र असूनही जर योग्य वयात अपेक्षित असलेली शाबासकीची थाप पाठीवर मिळाली नाही तर माणूस स्वत:ला बदनसीब समजायला लागतो. अशा व्यक्तीची कौतुकाची भूक अपूर्णच रहाते. आजूबाजूला जर किरकोळ बाबतीतही कौतुक होणारे असतील तर त्यांच्याशी स्वत:ची तुलना केली जाते एकप्रकारचा न्यूनगंड येतो आणि माणूस नैराश्याची शिकार होऊ शकतो.
                  एक व्यक्ती म्हणून विचार करतो तेंव्हा असे लक्षात येते की जीवनात सामान्यपणे प्रत्येकाच्या आयुष्यात  अशा कौतुकास्पद कामगिरीचे, उत्तुंग यशाचे, जीवनातल्या वेगवेगळ्या प्रकारच्या आकांक्षांच्या पूर्तीचे, छोट्या मोठ्या पुरस्कारांचे प्रसंग येत असतात व त्या त्या प्रसंगी आपल्याला शाबासकी मिळावी लोकांकडून कौतुक व्हावे असे वाटते. तसेच बऱ्याचदा अपयशाला सामोरे जाणारेही आजूबाजूला असतात .एक संवेदनाशील माणूस म्हणून तुमच्या आजूबाजूच्या अशा यशस्वी व्यक्तींचे जरूर कौतुक करा. यशस्वी विद्यार्थ्यांचे कौतुक करा तर अपयशाच्या प्रसंगी गरजूना आधार द्या. अपयश ही बऱ्याचदा यशाची पायरी असते हे समजून घ्या व लोकाना समजावा.
                  कौतुकास्पद कामगिरीचे कौतुक तर व्हायलाच हवे! तुम्हाला काय वाटते?
                                          .....प्रल्हाद दुधाळ,पुणे.

                  

No comments:

Post a Comment