Friday, January 17, 2014

वाटणी.

   वाटणी.
   बाबुराव हॉस्पिटलमध्ये शेवटच्या घटका मोजत होते डॉक्टर च्या सांगण्यावरून बाबुरावांच्या पत्नीला  चारही मुलांना बोलाऊन घेण्यात आले. सगळेजण जमा झाल्यावर डॉक्टरच्या समोरच  बाबुराव निरवानिरवीचे बोलू लागले.म्हणाले “ मी आता मरणार आहे तेंव्हा तुम्ही सगळेजण एकमेकाना सांभाळा व आपल्या आईला अंतर देऊ नका.काळजी घ्या. “
बायकोकडे वळून तिला म्हणाले  –
“बर का ग, डेक्कनच्या चार बिल्डिंग तुझ्याकडेच राहू दे!, सहकार नगरचे सगळे बंगले थोरल्या व
दोन नंबरच्याला देऊन टाक! शिवाजीनगर मधली दुकाने तीन नंबरला व बिबवेवाडी ची सगळी दुकाने
 व चाळी चार नंबर ला दे! चल आता मी निघतो ,माझी जायची वेळ झाली.”
बाबुरावांचे ऐश्वर्य ऐकून व त्यांनी आपल्या  मालमत्तेची मुलांमध्ये केलेली वाटणी पाहून डॉक्टर फारच प्रभावित झाले.त्यांना अगदी गहिवरून आले. थोड्याच वेळात बाबुरावांचे निधन झाले. डॉक्टरने
बाबुरावांच्या  मुलांना सांगितले-
 “आपल्या वडिलांचे क्रियाकर्म व्यवस्थितपणे होऊ दे, पैसे काय पळून जात नाहीत, हॉस्पिटल चे बील सावकाश पाठवून द्या!”
बाबुराव जाऊन चार महिने झाले तरी बिलाचे पैसे मिळाले नाही म्हणून डॉक्टर ने शेवटी बाबुरावांच्या
पत्नीला गाठले व खडसावले -
“ काय हो ताई, बाबुरावांनी केवढी तरी मालमत्ता तुम्हा सगळ्याना वाटली तरीसुध्दा माझे बिलाचे पैसे अजून का दिले नाही?”
बायको गरजली –
“ कसली डोंबलाची मालमत्ता घेऊन बसलात डॉक्टर? अहो त्यांचा पेपर टाकायचा धंदा आहे! त्याची
वाटणी करून गेले ते!!!!!!!!!”

                     .........प्रल्हाद दुधाळ.

No comments:

Post a Comment