Saturday, December 21, 2013

सुख म्हणजे नक्की काय असतं ?

सुख म्हणजे नक्की काय असतं ?
    सुख सुख म्हणतात ते असत तरी काय? अनेक माणसांप्रमाणेच मला ही हा प्रश्न कायम छळत आलेला आहे.माझ्या मते सुखी असणे ही एक मानसिक अवस्थ्या आहे त्यामुळे सुख व्यक्तीसापेक्ष आहे.या जगात सर्वसुखी असणारी एकही व्यक्ती असणे शक्य नाही हे प्रत्येकाला माहीत आहे तरीसुद्धा या जगातला प्रत्येक माणूस आपण सुखी व्हावे म्हणून धडपडताना दिसतो. मुळात हे सुख आहे तरी काय?अस काय सुख मिळत असेल सुखी असण्याने की हरेक व्यक्ती सुखामागे धावते?
    प्रथम सुख आणि दु:ख यातला फरक लक्षात घेणे आवश्यक आहे.मी आत्ताच म्हटले प्रत्येक व्यक्ती सुखामागे धावते याचाच दुसरा अर्थ असाही होतो की प्रत्येकजण थोडा तरी दु:खी असतो आणि सुखी होण्याचा प्रयत्न करत असतो!
 प्रत्येक व्यक्तीच्या सुखी असण्याच्या कल्पना वेगवेगळ्या असू शकतात.एका व्यक्तीचे सुख हे दुसऱ्या व्यक्तीच्या दु:खाचे कारण आहे असेही असू शकते! म्हणजेच स्वत:च्या सुखापायी दुसऱ्याला दु:ख देणे हे सुद्धा माणसाच्या सुखाच्या आड येते!
  उदाहरणार्थ, एका कंपनीमध्ये एका कर्मचाऱ्याची भरती करायची आहे.कंपनीने दिलेल्या जाहिरातीला मिळालेल्या प्रतिसादावरून त्या एका जागेसाठी एकूण दोनशे लायक व्यक्ती इच्छुक आहेत.या दोनशेमधून एकाचीच निवड होणार आहे. येथे नोकरी मिळाली हे एका व्यक्तीच्या सुखाचे कारण आहे पण हेच कारण बाकी एकशे नव्याण्णव व्यक्तींच्या दु:खाचे कारण आहे असे आपण म्हणू शकतो! पण यावरून एकशे नव्याण्णव लोक दु:खी आहेत असा निष्कर्ष काढणे चुकीचे होईल! सुख दु:खाच्या माणसाच्या कल्पना एवढ्या मर्यादेत बसणाऱ्या नक्कीच नाहीत!
  सुख आणि दु:ख ही मानवजन्माच्या जगण्याची विभिन्न पण अविभाज्य अंगे आहेत.जगात दु:ख आहे म्हणून सुखाचे महत्व आहे! यासाठी सुख या संकल्पनेची थोडी व्यापक चर्चा करणे आवश्यक आहे. सर्वसाधारणपणे माणूस सुखी आहे असे केंव्हा म्हटले जाते? खालील यादीमधील एक किंवा अनेक गोष्टी व्यक्तीकडे असणे म्हणजे तो सुखी असल्याचे गृहीतक आहे-
१.भरपूर स्थ्यावर व जंगम मालमत्तेचा मालक असणे.
२.अनिर्बंध सत्तधीश असणे.
३.आर्थिक,शैक्षणिक व कौटुंबिक बाबतीत यशस्वी असणे.
४.उच्चशिक्षित असणे.
५.समाजात मान मतराब असणे.
६.सुसंस्कारित असणे.
७.आनंदात असणे.
८.मनासारखा जोडीदार व भरपूर कुटुंबस्वास्थ्य असणे.
९.सज्जन व दानशूर असणे.
१०.सत्संग व अध्यात्मातील प्रगतीमुळे समाधानी असणे.
११.मुले कर्तबगार असणे.
१२.दिमतीला भरपूर नोकरचाकर असणे.
१३ ऐसपैस सर्व सुखसोयींनी युक्त बंगला असणे.
१४.दिमतीला आधुनिक महागड्या मोटारी चा ताफा असणे.
१५.सरकारी व खाजगी मोठ्ठे अधिकारी असणे.
१६.सर्वगुणसंपन्न असणे.
.................इत्यादी इत्यादी.
    ही यादी कधीच संपणारी नाही कारण माणूस सुखाच्या बाबतीत कधीच संतुष्ट नसतो.त्याची सुखाची तहान कायम वाढती असते.पायी चालणारा माणूस पायच नसलेल्या माणसापेक्षा खर तर सुखी आहे,पण तो आपल्याकडे चालण्यासाठी पाय आहेत यातल्या सुखापेक्षा आपल्याकडे सायकल नाही हा विचार करून दु:खी दिसतो! बर त्याला सायकल मिळाली की तो सुखी होईल असेही नाही! मग तो दुचाकी किंवा चारचाकी नाही म्हणून कुरकुरत असतो. हे दुष्टचक्र असे वाढत्या प्रमाणात चालत रहाते.जे आपणाजवळ आहे,जे वास्तव आहे त्यातला आनंद घेण्यापेक्षा जे नाही त्यामागे धावण्यात माणूस आपली सर्व शक्ती खर्च करत रहातो. आपल्याला नक्की काय हवे याचे तारतम्य नसल्यामुळे पूर्ण आयुष्य आभासी सुखामागे धावत रहातो.अनेकांना याचे भान मरेपर्यंत येत नाही तर काहींना आयुष्याच्या संध्याकाळी सुखाचे भान येते पण वेळ गेलेली असते! आयुष्यातल्या कितीतरी आनंदाला  आपण मुकलो आहे याचे भान सरत्या आयुष्यात आल्यानंतर माणूस अजूनच दु:खी होतो.पण तोपर्यंत सगळ हातातून निसटलेले असते.
  सुखाचा शोध घेण्यासाठी भल्याभल्यांनी आपल्या जीवनाचे रान केलेले आपण ऐकले आहे पण खर्या सुखाचा शोध कुणाला लागल्याचे ऐकिवात नाही! खरे तर सुखाचा शोध घेण्यासाठी इकडे तिकडे धावायची गरजच नाही. “ तुझे आहे तुजपाशी पण जागा चुकलासी” या उक्तीप्रमाणे सुख अगदी तुमच्याजवळ आहे पण ते ओळखता यायला हवे! आभासी सुख हे मृगजळासारखे आहे,जेवढे तुम्ही त्याच्यामागे धावणार त्याच वेगाने ते लांब लांब जाते. या पळापळीत मानव जन्म संपून जातो पण सुख मात्र सापडत नाही!
  एक उदाहरण म्हणून सांगतो माझ्या ओळखीचे एक गृहस्थ्य आहेत. त्यांनी अनेक अडचणींवर मात करत एका दरिद्री कुटुंबात जन्म घेऊनही कष्ट करत उच्चशिक्षण घेतले व ते एक प्रथितयश सरकारी अधिकारी आहेत.दिमतीला सरकारी गाडी व नोकरचाकर आहेत.त्याच्या इशाऱ्यावर एका कार्यालयाचा कारभार चालतो. समजदार पत्नी व सुसंस्कारित मुले आहेत.या व्यक्तीला लांबून ओळखणारे या माणसाचा हेवा करतात.सर्वजण विचार करतात की हा किती सुखी माणूस आहे! पण प्रत्यक्षात हा माणूस कायम वैतागलेला असतो.आपल नशिबच खराब आहे.मी श्रीमंत घरात जन्मलो असतो तर आज कुठल्या कुठे पोहचलो असतो, मी यांव केले असते अन त्यांव केल असत म्हणून कायम चिडचिड चालू असते. हाताखालच्या लोकांना कायम छळत असतो. बायको व मुलांवर विनाकारण ओरडत असतो.आपल्या आयुष्यात जे आहे त्यातले सुख/आनंद/समाधान न बघता त्याने जे जे मिळाले नाही त्याचा विचार करून स्वत:चे व आजूबाजूला संपर्कात असणार्या प्रत्येकाचे जगणे त्याने वेठीला धरलेले असते! खर तर त्याने आपण केलेल्या प्रगतीबद्दल आनंदी व समाधानी असायला हवे.आपण प्रतिकूल परिस्थितीवर मात करून इथपर्यंत पोहोचलो व आयुष्यात यशस्वी झालो याचा त्याला अभिमान असायला हवा.आपल्या कुटुंबाबद्दल त्याला समाधान असायला हवे.थोडक्यात काय तर हा माणूस खर तर सुखात आहे! पण खर्या सुखाबद्दल नीट माहिती नसल्यामुळे सुखात असूनही तो त्याच्या विचारसरणीमुळे तो दु:खात आहे!
  तुम्ही सुखात आहात की दु:खात आहात हे समजून घ्यायचे असेल तर प्रथम स्वत:ला ओळखता यायला हवे! स्वत:ची ओळख नव्याने करून घ्यायची तयारी हवी कारण तुम्ही सुख कशाला म्हणता, दु:ख कशाला म्हणता हे तुमच्या विचार करायच्या पद्धतीवर अवलंबून आहे. म्हणून एकदा पुन्हा नव्याने यावर विचार करून बघा स्वत:ला दु:खी ही बिरुदावली लावण्यापूर्वी सारासार विवेकबुद्धी व प्रामाणिकपणे स्वत:चे परीक्षण करून बघा -
१.        स्वत:मध्ये कोणते कोणते चांगले गुण आहेत त्याची यादी करा.
२.        स्वत:मधल्या दोषांची व मर्यादांची यादी करा.
३.        आपण अहंकारी तर नाही ना याचे पुन्हा एकदा परीक्षण करा. कारण अहंकार हा तुम्ही सुखी होण्यातला मुख्य अडसर असू शकतो!
४.        तुमच्या आयुष्यात पुढे येणार्या (तुमच्यासाठी) सकारात्मक अथवा नकारात्मक परिस्थितीचा सामना करण्यासाठी तुम्ही सज्ज आहात का?
५.        या जगातली प्रत्येक व्यक्तीमत्व वेगळे वेगळे असते याची तुम्हाला जाणीव आहे का?
६.        आयुष्यात प्रत्येक गोष्टीला एक पर्याय व प्रत्येक समस्येला एक योग्य असे पर्यायी उत्तर असते यावर तुमचा विश्वास आहे का, आणि हा पर्याय स्वीकारण्याची तुमची मानसिकता आहे का हे  पुन्हा एकदा तपासून घ्या.
७.        प्रत्येक घटना जशी तुम्हाला दिसते तशीच नसून  त्या घटनेची दुसरीही काही बाजू असू शकते याचा आपण कोणतीही प्रतिक्रिया देण्यापूर्वी विचार करता का?
८.        आपल्या अवास्तव अपेक्षांचे ओझे तुम्ही कोणावर लादत तर नाही ना?याबद्दल कधी विचार केला आहे का?
९.        तुम्ही आपल्या आजूबाजूला वावरणार्या माणसाना ते तुमच्या मताप्रमाणे वागतील /बोलतील असे गृहीत धरता का?
१०.     आयुष्यात हत्ती होऊन लाकडे फोडण्यापेक्षा मुंगी होऊन साखर खाणे बऱ्याचदा शहाणपणाचे असते या उक्तीवर आपला विश्वास आहे का?
११.     जी परिस्थिती समोर आहे ती बदलणे (काही मर्यादेनंतर) तुमच्या हातात नसते याची तुम्हाला जाणीव आहे का?
१२.     आपण दुसऱ्या व्यक्तीबरोबर जसे वागतो /बोलतो तसेच इत्तर तुमच्याबरोबर वागले/बोलले तर तुम्हाला चालेल ना? एकदा तपासून बघा.
१३.     प्रत्येक परिस्थिती ही त्या त्या वेळेपुरती असते.पुढे ती निश्चितपणे बदलणार असते.त्यामुळे उतावळेपणाने कोणताही निर्णय घेणे आततायीपणा ठरू शकतो! यावर तुमचा विश्वास आहे का?
१४.     तुमच्यामधले गुण अथवा दोष  आजूबाजूच्यांना त्रासदायक तर होत नाहीत ना? एकदा त्या पद्धतीने विचार करून बघा.
    तर आत्मपरीक्षण ही सुखाकडे वाटचाल करण्यातली पहिली पायरी आहे! आपण ज्या प्रकारे वागतो विचार करतो त्यामुळे आपण कुणासाठी दु:खाचे कारण तर होत नाही ना हा विचार स्वत: सुखाची अपेक्षा करणार्याने प्रथम करायला हवा.असा विचारच तुम्ही स्वत:ला  व इत्तराना सुखी करण्यासाठीचे पहिले पाऊल आहे!
  स्वत:मधले दोष दूर करणे तेव्हढे सोप्पे निश्चितच नाही. डोळसपणे अथक प्रयत्न केल्यानंतरच हे साध्य होऊ शकेल. पण स्वत:च्या  व इत्तर माणसांच्या दुख:चे कारण असलेले आपले  दोष प्रयत्नपूर्वक दूर करणेच श्रेयस्कर ठरेल.काही त्रासदायक सवयी बदलणेच योग्य ठरेल.
  माझ्या माहितीमध्ये एक गृहस्थ्य आहेत.ते भल्या पहाटे उठतात व सोसायटीच्या मंदिरात जातात.तेथील घन्टा जोरजोरात वाजवतात तसेच मोठ्या भसाड्या आवाजात भजने म्हणतात त्यांचे काही समवयस्क ही त्यांचेबरोबर असतात. आपण करत असलेल्या प्रचंड देवपूजेमुळे त्यांना मोक्ष मिळणारच असा त्यांचा ठाम विश्वास आहे. जोरजोरात घंटानाद व भजने यांमुळे सोसायटीत रहाणारे रुग्ण,लहान मुले,रात्रपाळी करून नुकतेच घरी पोहचलेले रहिवाशी यांचे मनस्वास्थ्य आपण वेठीला धरतोय व आपल्याला लाभणार असलेल्या संभाव्य सुखापायी अनेक जणांच्या दुख:चे कारण होत आहोत हे त्यांच्या गावीच नसते! अशा देवापुजेने मोक्ष तर दूरच पण शिव्याशापच मिळणार!
   तर इत्तरांना जर आपण सुख देऊ शकत नसू तर निदान त्यांच्या दु:खाचे कारण तरी होऊ नये एवढे तारतम्य तरी सुखाची अभिलाषा असणार्याने ठेवायला हवेच. आहे त्या परिस्थितीचे योग्य मूल्यमापन करून त्याच स्वीकार केला गेला तर त्यामधले सुखाचे क्षण वेचणे अवघड निश्चितच नाही!
  आता मूळ मुद्दा- हे सुख सुख म्हणतात ते नक्की काय असत?तर असे म्हणता येईल कि तुम्ही सुखी आहात का दु:खी आहात हे ठरवणे तुमच्या वृत्तीवर अवलंबून आहे! तुम्ही स्वत:ला सुखी समजायला लागला तर तुम्ही नक्कीच सुखात असणार तुम्ही स्वत:ला दु:खी समजून रडत बसला तर सुख कशा कशात आहे हे कधीच तुम्हाला कळू शकणार नाही. कविवर्य मंगेश पाडगावकर यांची एक कविता आहे-
पेला अर्धा भरला आहे,
अस सुध्दा म्हणता येत.
पेला अर्धा सरला आहे,
अस सुध्दा म्हणता येत.
सरला आहे म्हणायचं
की भरला आहे म्हणायचं?
तुम्हीच ठरवा.
सांगा कसं जगायचं?
कण्हत कण्हत की
गाण म्हणत?
तुम्हीच ठरवा.
  तुम्ही सुखी आहात,समाधानी आहात,यशस्वी आहात,आनंदी आहात हे समजणे आणि तसे तुम्ही  होणे हे सर्वस्वी तुमच्या विचारासरणीवर अवलंबून आहे.आपल्या सुखाच्या कल्पना वास्तवावर घासून बघितल्या की सुखाबाबत आपण जमिनीवर राहून विचार करू लागतो.
   मोठी स्वप्ने माणसाला कायमच खुणावत असतात आणि सर्वांगीण प्रगती साठी मोठी स्वप्ने पहायलाही हवीत पण मोठ्या स्वप्नांमागे धावताना आपल्याकडील हातात असलेल सुख तर निसटत नाही ना?याच भान ठेवणे आवश्यक आहे.माझ्याकडे जे आहे ते सत्य आहे व ते माझे आहे त्यातून, ते मिळवताना समाधान मिळाले आहे,आनंद मिळाला आहे किंवा मिळणार आहे,हे समाधान व आनंद हेच खरे सुख आहे.या वास्तवाचा स्वीकार करण्याची सवय लावली की तुम्ही सुख तुमच्याकडे धावत आहे. कारण सुख कशात मानायचे हे तुमच्या विचार करायच्या पद्धतीवर अवलंबून आहे.माणसाला हवे असलेली प्रत्येक गोष्ट आयुष्यात मिळेलच असे नाही पण याचा अर्थ जे काही मिळाले आहे तेही काही कमी नाही ही विचारसरणी तुम्हाला एका आनंदी मानसिक अवस्थेकडे घेऊन जाते आणि ही मानसिक अवस्थ्या म्हणजेच सुख!
  एकदा या दृष्टीने विचार करायला सुरुवात तर करून बघा!!!!!!!!
                                                .................प्रल्हाद दुधाळ.
                                                           ९४२३०१२०२० . 
प्रकाशित - विचार परिवर्तनाचा ई दिवाळी अंक २०१४.
  

    

No comments:

Post a Comment